संजय दत्तनं साकारलेला चौधरी अस्लम ते 'घर में घुसकर मारेंगे' डायलॉग, 'धुरंधर'वर पाकिस्तानमधून ब्लॉग

    • Author, मुहम्मद हनिफ
    • Role, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक

हल्ली संपूर्ण चित्रपट पाहायची गरज भासत नाही. चित्रपट नंतर येतो, पण त्याची गाणी, डान्स, रील्स आणि 'घुस के मारेंगे'सारखे डायलॉग आपल्या मोबाइलवर आधीच पोहोचतात.

'धुरंधर' पाकिस्तानमधील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला नाही. पण काही लोकांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून तो पाहिल्याचं समोर आलं आहे.

त्यांचे काही नेहमीचेच आक्षेप आहेत. संपूर्ण पाकिस्तान लखनौसारखा नाही. इथे सगळेच हात वर करून 'आदाब-आदाब' करत नाहीत. सुरमा लावणारेही आमच्यात मोजकेच लोक आहेत.

पण या चित्रपटात कराचीमधील दोन प्रसिद्ध व्यक्तिरेखा रहमान डकैत आणि एसपी चौधरी अस्लम दाखवण्यात आले आहेत. कराचीमध्ये हे दोघे कुणासाठी हिरो, तर कुणासाठी व्हिलन आहेत.

म्हणूनच लोकांनी हा चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहिला आहे. यात लोकांनी अक्षय खन्नाला अरबी गाण्यांवर बलुची नृत्य करताना पाहिलं. तर संजय दत्त चौधरी अस्लमच्या भूमिकेत बलुच लोकांना शिवीगाळ करताना दिसला आहे.

लोक या सिनेमाचा आनंदही घेत आहेत. त्याचबरोबर भारतातल्या लोकांना हेही सांगत आहेत की, आमचे चौधरी अस्लम तुमच्या संजय दत्तपेक्षा जास्त देखणे होते. अक्षय खन्नाने उत्तम अभिनय केला आहे. आमचा रहमान डकैत क्रूर होता, पण इतकाही निर्दयी नव्हता.

'धंदाही आणि देशसेवाही'

भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देशांच्या सरकारांचा एकच नारा आहे, 'हम घुसकर मारेंगे'. पण हा नारा सर्वात आधी एखाद्या सिनेमाच्या हिरोने दिला होता की सरकारने, हेच आता कळेनासं झालं आहे. पण भारतीय चित्रपटांमधील गुप्तहेर अनेक वर्षांपासून कराचीला ये-जा करत असतात.

दिवंगत अभिनेता इरफान खान आणि त्यांचे साथीदार 'डी-डे' चित्रपटात दाऊद इब्राहिमला कराचीतून परत आणायला आले होते आणि त्यांनी त्याला खरंच परत नेलंही.

खरा दाऊद इब्राहिम सध्या कुठं आहे माहीत नाही?

सैफअली खान दोन-तीन चित्रपटांमध्ये बदला घेण्यासाठी कराचीला आला होता. हाणामारी करून आणि मुजरा पाहून तो सुखरूप परत गेला.

ज्या चित्रपटांत भारतीय हेर पाकिस्तानात येतही नाहीत, त्यातसुद्धा लढाई मात्र पाकिस्तानशीच दाखवलेली असते.

सलमान खानला, शाहरुख खानला एखादी सुंदर पाकिस्तानी आयएसआय एजंट स्विमिंग पुलाजवळ भेटते आणि त्यांच्या प्रेमात पडते.

खर्‍या आयुष्यात आयएसआयसोबत काम करणाऱ्या बिचाऱ्या पाकिस्तानी लोकांना मात्र इतक्या सुंदर गुप्तहेर मुली त्यांनी नेमक्या कुठे लपवून ठेवल्या आहेत, असा प्रश्न पडतो.

या चित्रपटांचा फॉर्म्युला साधा आहे, थोडासा देशभक्तीचा स्पर्श, एक-दोन आयटम साँग, दर तिसऱ्या मिनिटाला पाकिस्तानींना उडवणारा सीन आणि बॉक्स ऑफिसवर धमाल. व्यवसाय पण होईल आणि देशसेवा देखील.

तसं पाहिलं तर माझ्या मते, सीमेवर लढण्यापेक्षा, फायटर जेट्सवर अफाट पैसे खर्च करण्यापेक्षा, घुसून मारण्यापेक्षा थेट सेटवर घुसून चित्रपट बनवणं जास्त चांगलं आहे. त्यामुळे इंटरनेटवरही धमाल होते आणि मीम्स बनवणारेही याची मजा घेतात.

चित्रपटाच्या सुरुवातीला साधारणपणे लिहिलेलं असतं की, हे खरं नाही, हे खोटं आहे किंवा ही एखादी छोटी ऐतिहासिक घटना होती. आम्ही याला फिक्शनमध्ये रूपांतरित केलं आहे.

'मुंबई हल्ल्याच्या वेळी कराचीची परिस्थिती'

मुंबईवर 26/11 चा जेव्हा हल्ला झाला तेव्हा कराचीमध्ये जल्लोष करण्यात आला होता, असं 'धुरंधर'मध्ये दाखवण्यात आलं आहे.

मी माझं निम्मं आयुष्य कराचीमध्ये घालवलं आहे. कराची इतकं मोठं शहर आहे की, कोणीही त्याला संपूर्ण कराची माहिती आहे, असा दावा करू शकत नाही. संपूर्ण कराचीत माझे मित्र राहतात.

यामध्ये सरकारवर नाराज असलेले लोकही आहेत, छोटे-मोठे गुन्हेगार आहेत, काही जिहादी विचारसरणीचे लोकही आहेत. पण मी कधीही कुणाकडून मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा कराचीच्या लोकांनी जल्लोष केला होता, हे ऐकलं किंवा पाहिलंही नाही.

कराचीतील बहुतांश लोकांनी कदाचित मुंबई प्रत्यक्षात पाहिली नसेल, पण चित्रपटांत नक्की पाहिली असेल. त्यांना मुंबईही कराचीसारखं समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं शहर वाटतं.

जेव्हा हल्ल्याची बातमी आली तेव्हा मला आठवतं, संपूर्ण शहर घाबरलं होतं आणि लोक विचार करत होते की, आमच्यावर आता हे कोणतं नवीन संकट आलं? बाकी चित्रपटात काय दाखवायचं ते ठरवणं चित्रपट बनवणाऱ्यांच्या हातात असतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)