You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली, 9 भाविकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये शिव खोडीहून कटरा या ठिकाणी जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर बस दरीत कोसळल्यानंतर 9 भाविकांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रियासीच्या पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले की, भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण गेले. यामुळे बस दरीत कोसळली. यात 33 जण जखमी झाले तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
या भागात गेल्या अनेक दिवसांपासून यंत्रणा हाय अलर्टवर असून वेगवेगळ्या प्रकारे सुरक्षा वाढवली होती आणि त्यांना अलर्टवर ठेवलं होतं, असं रियासीच्या पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितलं.
मोहिता शर्मा यांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर चालकाचा तोल गेला आणि बस खड्ड्यात कोसळली.
राहुल गांधींची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
शिवखोडी येथील तीर्थक्षेत्राहून जात असलेल्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला दुःखद आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ही लाजीरवाणी घटना जम्मू-काश्मीरमधील चिंताजनक स्थिती दर्शवणारी असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, "मी सर्व शोकाकुल परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी आशा करतो."
दहशतवादाविरोधात सर्व देश एकजुटीने उभा राहील, असंही राहुल गांधी म्हणाले.
दोषींना सोडणार नाही - अमित शाह
या हल्ल्यानंतर दोषींना सोडलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
अमित शाह म्हणाले, “ज्यांनी हा घृणास्पद हल्ला केलाय, त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. हल्ल्यातील जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करतंय.”
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेबद्दल दुख: व्यक्त केलं आहे.
"जम्मू काश्मीरच्या रियासीमधून भयानक बातमी समोर आलीय. बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवाद्यांना ज्या ठिकाणाहून मिटवलं होतं तिथं पुन्हा परतले आहेत, हे दुर्दैवी आहे,” असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.