क्रिकेट वर्ल्ड कप Ind vs Pak : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे फॉर्ममध्ये आल्यानं पाकिस्तानची चिंता वाढलीये?

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, द्वारकानाथ संझगिरी
    • Role, क्रिकेट समीक्षक आणि लेखक

रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळला ते पाहताना मला मी टीव्हीवर हायलाईट पाहतोय असं वाटलं.

टाकला जाणारा चेंडू हे रोहितच्या चौकार, षटकार यांचं इंधन होत. बचाव इतिहासा मधली गोष्ट वाटत होती.

रोहितला संधी देण्यासाठी किशन एकेरी धाव घेत होता. स्लीपिंग पार्टनर म्हणजे काय याच मूर्तिमंत उदाहरण इशान किशन होतं.

हे दृश्य ज्याला फलंदाजी आवडते, मोठे फटके पाहायला आवडतात त्याच्यासाठी प्रेक्षणीय होत. त्यात रोहित फॉर्मात असताना नाजुक आणि शैलीदार फटाक्यांचा बादशाह असतो.

तो यंत्रवत खेळत नाही. पण लतादीदीने घेतलेली एखादी मुरकी, एखादी जागा किंवा आलाप गाणं वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊन कान तृप्त करत, तसं ह्याच्या खेळीच असतं.

वाडेकर, दुराणी, विश्वनाथ, लक्ष्मण, यांच्या बाबतीत जे माझं व्हायचं तेच होतं. दोन डोळे अपुरे वाटतात.

पण त्या आनंदात आपण एक गोष्ट विसरतो की नयनरम्य फटकेबाजी म्हणजे क्रिकेट नाही. कोटलाच्या खेळपट्टीवर छोटी विमान सहज उतरली असती अशी ती खेळपट्टी होती. गोलंदाज काय कप्पाळ करणार? प्रत्येक गोलंदाज बुमरा नसतो.

भारतातील पीच बॅटिंगसाठी बनवलेली?

ह्या वर्ल्ड कपकडे पाहिल्यावर लक्षात येत की आपण ज्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत त्यावर फलंदाजी फुलेल एव्हढच पाहिलंय. गोलंदाज दुय्यम नागरिक ठरतायत.

वर्ल्ड कप सुरू होऊन फक्त आठवडा झाला तरी किती शतकं झाली पाहा. तब्बल 11 झाली. ऑस्ट्रेलिया विरूध्द राहुलचं थोडक्यात चुकलं.

ह्याचं कारण काय? खेळपट्ट्या धावांच्या राशी उभ्या करण्यासाठी तयार केलेल्या आहेत.

टी20 मुळे 50 षटकांच्या सामन्याची लोकप्रियता कमी झालीय, ही भीती आहे. वर्ल्ड कप असून प्रेक्षक मैदानाकडे फिरकत नाहीत, हे दिसतंय (तरी तिकीट फुल्ल कशी हे विचारू नका) त्यामुळे खेळपट्टीचा रूपाने धावा तयार करण्याचे कारखाने टाकले जात आहेत का?

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

त्यादिवशी दक्षिण आफ्रिकेने 400च्या वर धावा केल्या. वन डेचे नियम बदलले ह्याचा त्यात भाग आहे. पण खेळपट्टी ही खरी नायिका किंवा खलनायिका आहे.

याला तुडुंब धावा आवडतात त्याच्यासाठी नायिका, ज्यांना बॅट आणि चेंडूच द्वंद्व हवंय त्यांच्यासाठी खलनायिका.

धावा मलाही आवडतात. त्यादिवशी मी रचीन रवींद्र आणि काँनवेच्या फलंदाजीवर लुब्ध झालो. मेंडिसची फलंदाजी पाहून मला माझे लाडके मित्र रॉय डायसं आणि अरविंद यांची आठवण आली. श्रीलंकेच्या जवळपास 350 धावाना पाकिस्तानच्या, रिझवान ने जे प्रत्युत्तर दिलं ते थक्क करणार होत.

पण तरीही ह्या धावा काढताना झालेली खेळपट्टीची मदत विसरता येत नाही.

खेळपट्टीने गोलंदाजीची नांगी ठेचलेली असते. त्यामुळे चांगला फलंदाज उखळ पांढरं करून घेतो.

भारत ऑस्ट्रेलिया हा एकच सामना होता, जिथे खेळपट्टी फलंदाजीच्या पूर्ण प्रेमात नव्हती. गोलंदाजाना वाव मिळाला. आणि त्याच बरोबर, विराट आणि राहुलने काढलेल्या धावांची किंमत, इतर शतकांपेक्षा दामदुपटीने वाढली.

रोहित शर्मा फॉर्ममध्ये येणं किती महत्त्वाचं होतं?

अर्थात, अफगाणिस्तान विरुद्धच्या विजयामुळे अनेक फायदे झाले.

रोहितच्या फलंदाजीची अलीकडची अडचण ही सुरवातीला चेंडू स्विंग होणे ही आहे. विशेषतः इन्स्विंग त्याचा घात करताना दिसतो पण ती परीक्षा त्याची ह्या सामन्यात झाली नाही.

पण धावा माणसाला आत्मविश्वास देतात. त्याचे लाडके पूल क्षणात प्रेक्षकांत जात होते. काही वेळेला चेंडू किंचित आखूड टप्प्याचा असेल नसेल, त्याने लीलया पूल केला. म्हणजे किती लवकर त्याला चेंडू दिसत होता.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

दुसरी गोष्ट म्हणजे दोन क्षेत्र रक्षकातल्या मोकळ्या जागा काढणे. गोलंदाज चेंडू टाकायला जाताना मैदानावर गोलंदाज सोडून 10 क्षेत्र रक्षक दिसायचे.

रोहितने फटका मारला की चेंडू सीमारेषाकडे जाताना दिसायचा क्षेत्र रक्षक अदृश्य व्हायचे. मुंबई बंदच्या रस्त्यासारखं मैदान दिसायचं. जणू फटक्यांसाठी जागा करून दिलीय.

पाकिस्तान विरूध्द खेळताना त्यांचे वेगवान गोलंदाज चेंडू चांगला स्विंग करतात. रोहितने सुरवातीची पाच षटकं नीट सांभाळायची आणि नीट पहायची गरज आहे.

नंतर अख्ख पाकिस्तान त्याला पाहत बसेल. काल विराट ऑस्ट्रेलियाची उरलेली खेळी पुढे खेळला. त्याला जास्त फलंदाजी न मिळाल्याचं दुःख वाटल असेल. त्याचं शतक 50 धावांनी चुकल.

पण ४७ धावा करून मला ईशान किशन बिलकुल आत्मविश्वासाने खेळतोय अस वाटल नाही.

जी गोलंदाजी त्या खेळपट्टीवर रोहित डोळ्याला पट्टी लाऊन खेळला असता, तिथे किशन थोडा चष्मा हरवलेल्या माणसासारखा चाचपडला.

पाकिस्तान विरूध्द गिल खेळणं अजून तरी कठीण वाटत आहे. मग राहुलने वर येऊन मध्ये सूर्याने यावं का?

भारत - पाकिस्तान मॅचपूर्वी काय गोष्टी महत्त्वाच्या?

पण रोहित इतका आनंद मला काल बुमराहने आणि कुलदीप यादवने दिला.

बूमराह ही आपली द्रौपदीची थळी आहे. विकेट हवी सांग थाळीला. नवा चेंडू, मध्ये ब्रेक थ्रू आणि डेथ ओवर्स, बूमराह द्रौपदीची थाळी बनतो. मुख्य म्हणजे त्याला फोडून काढलंय ही खरीखुरी ब्रेकिंग न्यूज असते.

त्याच परतणं हे वरदान आहे. ते यॉर्कर्स तसेच रॉकेट सारखे आहेत. बाऊन्स हादरवणारा आहे. मुख्य म्हणजे विकेट तो हाताच्या रेशा वाचल्या सारख्या वाचतो. त्याप्रमाणे पटकन त्याला टप्प्यात बदल करता येतो.

पहिल्या दोन सामन्यात त्याच्या गोलांदाजीत चूक काढणं भीमसेन यांच्या गाण्यात चूक काढण्यासारखे वाटलं.

बाबर आझम आणि रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तान विरूध्द खेळताना, रोहित, विराट, राहुलचा फॉर्म, बुमरा, कुलदीप, जडेजाची गोलंदाजीतली चमक ह्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात.

पाकिस्तानवरही श्रीलंकेच्या विरूद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयाने अंगावर मूठभर मांस चढवलं असेल. तरीही शेवटी जो मानसिक दबाव घेईल तो सिकंदर ठरेल.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)