You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लातूरच्या नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; जातीय शिवीगाळ करत मारहाण केल्याचा कुटुंबाचा आरोप
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय मुलीचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत आढळून आला. प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी कुटुंबीयांनी हा मृत्यू घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
रविवारी (4 जानेवारी) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर विद्यालय प्रशासनाकडून पालकांना माहिती देण्यात आली.
मात्र, तोपर्यंत पीडित मुलीचा मृतदेह लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आला होता. मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत कुटुंबीयांनी थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
"आधी गुन्हा दाखल करा, मगच शवविच्छेदन," अशी भूमिका घेत नातेवाईकांनी तब्बल 30 तास आंदोलन केले.
सोमवारी (5 जानेवारी) पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या मुलीच्या पार्थिवावर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
ही मुलगी अत्यंत हुशार आणि अभ्यासात प्रगती करणारी होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. इतक्या लहान वयात तिने आत्महत्या केली असावी, यावर त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (5 जानेवारी) लातूरच्या गांधी चौकात नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मोठ्या संख्येने महिलांच्या सहभागामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राथमिक मृत्यूची नोंद करण्यात येत असून, शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. अहवालानंतर दोषींविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत शाळा प्रशासनाकडून त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघींवर गुन्हा दाखल
पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून बीएनएस कलम 108, 115 (2), 3 (5) अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3 (2) (va) प्रमाणे हॉस्टेलची सुप्रीडेंट पल्लवी कणसे, स्टाफमधील लता गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे, "हॉस्टेलच्या मुलींकडून असे कळाले की, 3 जानेवारीला रात्री 8 वाजता हजेरी झाल्यानंतर बाथरूममध्ये लव्ह चिन्ह काढून त्यात मुला-मुलीचे नाव लिहिल्याच्या संशयावरून सुप्रीडेंट पल्लवी कणसे हिने तिला टॉर्चर केले आणि जातीय शिवीगाळ करत मारहाण केली. "
"या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असं मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटलं आहे. तर स्टाफमधील लता गायकवाड नेहमी मुलीला त्रास देत होती", असं देखील एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी अटकेत असल्यानं त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिल्यास ती येथे अपडेट करण्यात येईल.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)