रॉबिन मिन्झ: IPL मध्ये कोट्यवधींची बोली लागली, घरी फोन केल्यावर आई-वडील रडू लागले

- Author, आनंद दत्त
- Role, बीबीसीसाठी, रांचीहून
19 डिसेंबरला दुबई इथे IPL-17 साठी झालेल्या लिलावात झारखंडमधील तीन खेळाडूंना वेगवेगळ्या संघांनी विकत घेतले.
यामध्ये जमशेदपूरच्या कुमार कुशाग्राला दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपयांना आणि रांचीच्या सुशांत मिश्राला गुजरात टायटन्सने 2.20 कोटी रुपयांना विकत घेतले.
पण यावेळी झारखंडच्या तिसऱ्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली. त्याचं नाव आहे रॉबिन मिन्झ.
21 वर्षांच्या डावखुऱ्या रॉबिनला गुजरात टायटन्सने 3.60 कोटी रुपयांना विकत घेतले.
ESPNcricinfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मिन्झ हा पहिला आदिवासी खेळाडू आहे, ज्याला आयपीएल संघात खेळण्याची संधी मिळणार आहे.
‘आईला फोन केला तेव्हा ती रडू लागली’
IPL लिलावाची घोषणा झाल्यावर बीबीसीने रॉबिनशी बातचित केली. तो म्हणाला, "मी विचारही केला नव्हता, पण तसं घडलं. मला एखाद्या संघाने 20 लाख रुपयांना जरी विकत घेतलं असतं तरी मी खूष झालो असतो. पण दुबईतल्या लिलावात माझी किंमत वाढतच गेली.
संघात निवड झाल्यानंतर मी माझ्या आईला फोन केला तेव्हा ती रडायला लागली. बाबाही रडू लागले. IPLमध्ये निवड झाल्याने माझे कुटुंब खूप आनंदी आहे."
रॉबिन भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो.
"धोनी IPLमध्येही खेळणार आहे, मीही खेळणार आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझी तुलना त्यांच्याशी होऊच शकत नाही. आमच्यात एकच साम्य आहे की, मीसुद्धा त्यांच्यासारखा विकेटकीपर आणि फलंदाज आहे," असं रॉबिन सांगतो.
रॉबिन गेल्या चार वर्षांपासून झारखंड क्रिकेट संघात खेळत आहे.
या काळात त्याला महेंद्रसिंग धोनीला अनेकवेळा भेटण्याची आणि त्याच्याकडून टिप्स घेण्याची संधी मिळाली.
तो म्हणतो, "धोनी सर नेहमी म्हणायचे की, शांत मनाने खेळा आणि नेहमी पुढचा विचार करा."
रॉबिन एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे.

एवढ्या पैशाचे तो काय करणार?
या प्रश्नावर तो म्हणतो, “या पैशाचे मी काय करणार किंवा माझ्या कुटुंबाचे काय करणार आहेत याचा विचार सध्या आम्ही करत नाही. माझी एकच इच्छा आहे की IPLमध्ये माझ्या संघासाठी चांगले खेळावे आणि भविष्यात टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळावी.”
वडिलांनी आधीच फटाके आणले होते
रॉबिनचा जन्म झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील सिलम पांदनटोली गावात झाला. पण गेल्या काही वर्षांपासून तो रांचीच्या नामकुम भागात आपल्या कुटुंबासोबत राहात आहे.
घर जवळ असूनही रॉबिन घरी जात नाही. कारण तो सध्या झारखंडच्या 23 वर्षांखालील संघाचा भाग असल्याने तो संघासोबत सराव करण्यात व्यस्त आहे.
त्याचे वडील फ्रान्सिस झेवियर मिन्झ हे निवृत्त लष्करी जवान आहेत. ते 24 वर्षे '9 बिहार रेजिमेंट'मध्ये तैनात होते.
सध्या ते रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
बीबीसीशी बोलताने ते म्हणाले, “मला IPLमध्ये रॉबिनच्या निवडीबद्दल खात्री होती. तो म्हणाला होतो की, काळजी करू नका, कुठली तरी टीम मला विकत घेईल. मी विचार करत होतो की माझ्या मुलाला एखाद्या संघाने 20 लाख रुपयांत विकत घेतले तरी चालेल. पण माझ्या मुलाचे नाव एखाद्या संघाशी जोडले जावे.”
झेवियर मिन्झ म्हणाले, "मला खूप आनंद झाला. म्हणूनच मी फटाके आणले होते. मुलाची निवड झाली तर आज फोडू, नाही तर नाताळच्या दिवशी फोडू. पण आता एका दिवसात सगळे फटाके फोडले आहेत.”
रॉबिनची आई अॅलिस मिन्झ सहज म्हणाली, "माझ्यासाठी यापेक्षा मोठी ख्रिसमस भेट असूच शकत नाही. मला ही बातमी समजल्यापासून रडूच येतंय. माझे एकच स्वप्न आहे की धोनीने झारखंडला जसे गौरव मिळवून दिला, तसाच माझ्या मुलानेही करावं."
अॅलिस मिन्झ त्यांच्या शालेय दिवसांमध्ये फुटबॉलपटू आणि अॅथलीट होत्या.
बालपणापासूनच रॉबिनला क्रिकेटचे कॉचिंग
रॉबिनचे वडील झेवियर मिन्झ मुलाची जुनी आठवण सांगतात, " माझा मुलगा दोन वर्षांचा होता तेव्हा त्याने काठीने चेंडू मारायला सुरुवात केली. लहानपणी मी त्याला टेनिस बॉल दिला तेव्हा त्याने तो चेंडू उजव्या हाताऐवजी डाव्या हाताने खेळायला सुरुवात केली.
"मला त्याचं विशेष वाटलं. कारण माझ्या कुटुंबात कोणीही डाव्या हाताने खेळत नाही. क्रिकेट सोडून इतर सगळ्या गोष्टी तो उजव्या हाताने करतो. वयाच्या पाचव्या वर्षी मी त्याला क्रिकेट कोचिंगसाठी पाठवायला सुरुवात केली.

पहिल्या आदिवासी क्रिकेटपटूच्या प्रश्नावर ते म्हणतात, "आम्ही एवढंच म्हणतो की जर कोणी इतिहास लिहिणार असेल तर त्यांनी पहिल्या पानावर या गोष्टीचा उल्लेख करावा."
रॉबिनची मोठी बहीण करिश्मा सध्या डेहराडूनमध्ये बीएसी अॅग्रीकल्चरचे शिक्षण घेतेय, तर धाकटी बहीण रोशिता मिन्झ12वी उत्तीर्ण झाल्यानंतर NEET ची तयारी करत आहे.
झेवियर मिन्झ म्हणतात, "मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा मी विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून बोर्डिंग पास तपासेल आणि माझा मुलगा IPL टीममध्ये सामील होण्यासाठी रांचीहून फ्लाइटमध्ये बसायला येईल."
'वेस्ट इंडिजच्या फलंदाजांसारखी ताकद'
झारखंड अंडर-19 पूर्व विभागीय स्पर्धेत रॉबिनने केवळ 5 सामन्यात एकूण 3 शतके झळकावली आहेत.
त्याच्या सर्वोत्तम खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला की 2019 मध्ये त्याने विदर्भ विरुद्ध 133 धावा केल्या होत्या. ती त्याची सर्वोत्तम खेळी होती.
रांचीचे आसिफ हक अन्सारी हे रॉबिनचे प्रशिक्षक आहेत. हक सध्या 100 हून अधिक खेळाडूंना नमकुम येथील स्टेडियमध्ये प्रशिक्षण देत आहे.
रॉबिनविषयी बोलताना हक सांगतात, “त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्याकडे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांसारखी ताकद आहे. रॉबिन एका ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा करू शकतो. लांब षटकार मारतो.”
धोनी आणि रॉबिनमधील साम्य
रॉबिनचा आवडता क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्यामध्ये बरंच साम्य आहे.
धोनीप्रमाणेच रॉबिनही फलंदाज आणि विकेटकीपर आहे.
धोनीप्रमाणेच लांब षटकार मारणे ही त्याची खासियत आहे.
धोनीने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले तेव्हा तो बारावी पास झाला होता.
रॉबिननेही दहावी झाल्यानंतर पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याने पुढचं शिक्षण घेतलं नाही.
रॉबिन सध्या झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (JSCA) 23 वर्षांखालील संघासाठी खेळत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








