नोकरीच्या आमिषाने जाळ्यात अडकवून शोषण; 'सायबर गुलामी'पासून बचावासाठी 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी
तंत्रज्ञान आणि माहितीचं आदान-प्रदान यात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड विकास आणि परिणामी बदलही झाला आहे. त्यामुळं इतर अनेक गोष्टीही बदलल्या असल्याचं पाहायला मिळतं.
इंटरनेट किंवा तंत्रज्ञानामुळं बदललेली अशीच आणखी एक गोष्ट म्हणजे, नोकरी शोधण्याची पद्धत. पण हीच पद्धत सायबर गुन्हेगार संधीसारखी वापरत असल्याचं पाहायला मिळतं.
आजघडीला नोकरीचा शोध हा प्रामुख्यानं ऑनलाईनच घेतला जात असल्याचं पाहायला मिळतं. नोकऱ्यांबद्दल माहिती देणारे विविध प्रकारचे पोर्टल याबरोबरच सोशल मीडिया आणि अशाच इतर ऑनलाईन माध्यमांमधूनही नोकऱ्या शोधल्या जातात.
पण अशा ठिकाणी खोट्या, फसव्या पण आकर्षित करणाऱ्या जाहिराती देऊन सायबर गुन्हेगार तरुणांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांना गुलामासारखं राबवून घेतलं जातं.
विशेष म्हणजे अशाप्रकारे अडकवलेल्या तरुणांचं शोषण तर केलंच जातं, पण त्याचबरोबर त्यांना ऑनलाईन फसवणूक केल्या जाणाऱ्या टोळ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यं करायलाही भाग पाडलं जातं.
सायबर पोलिसांनी अशा फसवणुकीचे काही प्रकार समोर आणले असून त्या माध्यमातून या गुन्हेगारांची फसवणुकीसाठी वापरली जाणारी पद्धत कशी असते, काय करायला हवं आणि काय खबरदारी घ्यावी, याबाबतची महाराष्ट्र सायबर पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे.
यापासून वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी हा प्रकार कसा चालतो आणि पोलिसांनी केलेल्या यापूर्वीच्या काही कारवाईंबाबत आपण माहिती जाणून घेऊयात.
शेकडो तरुणांची सुटका
महाराष्ट्र सायबर क्राईम पोलिसांनी अशाच काही प्रकरणांत अडकलेल्या तरुणांच्या सुटकेबाबतची आणि टोळ्यांचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या हँडलवर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
त्यानुसार म्यानमारमधून एकूण 540 तरुणांची सुटका केल्याचं सांगितलं आहे. त्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 64 जणांची सुटका केल्याचं म्हटलं आहे.
या पीडितांकडून प्रचंड मजुरीची कामं करून घेतली जात होती, असं त्यात सांगण्यात आलं होतं.

तसंच या सर्वांना उपाशी ठेवलं जात होतं, त्याचबरोबर त्यांचं शोषण केलं जात होतं आणि इतर फसवणुकींच्या कामांसाठी त्यांचा वापर केला जात होता, असंही सांगण्यात आलं.
तामिळनाडूमध्ये सुशिक्षित तरुणांना जाळ्यात अडकवणाऱ्या एजंटचं एक रॅकेटही उध्वस्त करण्यात आलं होतं. त्यावेळी 54 जणांना अटक करण्यात आली होती.
गोवा आणि नेपाळमधून काम करणारी आंतरराष्ट्रीय टोळीही पोलिसांनी उध्वस्त केली होती. ही टोळी महिलांना वर्क फ्रॉम होमच्या नोकरीच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून ऑनलाईन स्कॅमची गुन्हेगारी कृत्ये करून घेतली जात होती.
कसा चालतो फसवणुकीचा प्रकार
अशा प्रकारे तरुणांना अडकवण्याचा प्रकार हा नोकरीच्या जाहिरातीपासून सुरू होतो. व्हाट्सअॅप, टेलिग्राम किंवा अशा प्रकारच्या इतर सोशल मीडिया आणि संशयास्पद वेबसाईट यावरही अशाप्रकारच्या जॉब ऑफर असतात, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
या जाहिरातींमध्ये तरुणांना क्रिप्टो अॅनालिस्ट, डिजिटल मार्केटिंग आणि डाटा एंट्रीसारख्या विविध प्रकारच्या परदेशातील नोकऱ्यांचं आमीष तरुणांना दाखवलं जातं.
त्यासाठी 50000 ते 200000 रुपयांपर्यंत पगार मिळणार असल्याचं सांगून तरुणांना आणखी जास्त प्रमाणात या नोकऱ्यांकडं आकर्षित केलं जातं. पण प्रत्यक्षात परदेशांत ज्या ठिकाणी फसवणुकीसाठी विशिष्ट ऑफिसेस तयार केली असतात त्याठिकाणी त्यांना काम करायला लावलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रामुख्यानं 18 ते 35 वयोगटातील मुलांना अडकवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. एकदा ही मुलं नोकरीच्या जाळ्यात अडकली की त्यांना गुलाम बनवून ठेवलं जातं. विदेशात जाताच त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेतात.
त्यानंतर त्यांना गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांबरोबर बळजबरी काम करण्यास भाग पाडलं जातं. 12 ते 18 तास त्यांच्याकडून काम करून घेतात. त्यांच्यावर निगराणी ठेवली जाते. त्यांना मारहाण करणे, उपाशी ठेवणे आणि वेळप्रसंगी त्यांना कुटुंबीयांना हानी पोहोचवण्याची धमकी देण्याचे प्रकारही केले जातात.
पण या सर्वापासून बचाव व्हावा म्हणून खबरदारी घेणं गरजेचं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं cybercrime.gov.in या वेबसाईटवर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी सुचवल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

शक्यतो नेहमी अधिकृत जॉब पोर्टल (नोकरीविषयक संकेतस्थळ) किंवा वृत्तपत्रांमध्येच नोकरीच्या संधींसाठी सर्च करायला हवे.
सर्च इंजिनवर अॅड्स किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या जाहिराती किंवा स्पॉन्सर्ड लिंक्सवर असलेल्या जाहिरातींवर क्लिक करून नोकरीसाठी अप्लाय करणे टाळायला हवे.

कोणत्याही नोकरीविषयक वेबसाईट (जॉब पोर्टल) वर नोंदणी करण्याच्या पूर्वी त्या वेबसाईटची प्रायव्हसी पॉलिसी चेक करायला हवी. त्यातून सबंधिक वेबसाईट यूझरची कोणती माहिती मिळवते आणि त्याचा वापर कसा केला जातो याबाबत माहिती मिळेल.

एखाद्या नोकरीच्या संदर्भात माहिती समजली तर त्याच्याशी संबंधिक कंपनीची वेबसाईट तपासून योग्य ती माहिती घ्या. जाहिरात अधिकृत आहे किंवा नाही, तसंच त्याबाबत अधिक गोष्टी त्यातून समजू शकतील.
बहुतांश वेळा कंपन्या त्यांना पाहिजे असलेल्या मनुष्यबळाविषयी किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीविषयी वेबसाईटच्या करिअर या सेक्शनमध्ये माहिती मिळू शकते.

तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी नोकरीसाठी नोंदणी केली आहे, त्याबाबतची नोंद तुमच्याकडेही असू द्या. कोणत्याही अनोळखी ई मेल किंवा स्पॅम ई मेलला किंवा अनोळखी कंपनीच्या ई मेलला प्रतिसाद देऊ नका.
अशा प्रकारचे ई मेल फसवणुकीसाठी वापरले जाण्याची शक्यता असते.

सरकारी नोकरीच्या संधींबाबत माहिती मिळवण्यासाठी नेहमी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाची पाहणी करायला हवी.
सर्व सरकारी विभागांच्या संकेतस्थळांच्या पत्त्यात gov.in किंवा nic.in असा शेवट असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास 'www.mha.gov.in' अशा प्रकारचे असतात. तसंच सर्व सरकारी विभागांद्वारे नेहमी शक्यतो आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये नोकरीबाबत जाहिरात दिली जाते.

ई मेल अॅड्रेस किंवा नोकरीच्या जाहिरातीतील मजकुरात इंग्रजी लिखाणाच्या चुका असतील तर त्यावर लक्ष ठेवा. जर त्यात लिखाणाच्या, व्याकरणाच्या किंवा चिन्हांशी संबंधित चुका असतील तर त्यात काहीतरी काळंबेरं आहे अशी शंका घ्यायला हरकत नाही.
अशा प्रकारचे ईमेल अॅड्रेस हे खऱ्या कंपन्यांसारखे दिसणारे असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास '[email protected]' ऐवजी '[email protected]' असा पत्ता असायला हवा किंवा कंपनीच्या नावात '[email protected]' ऐवजी '[email protected]' अशा प्रकारचे चुकीचे स्पेलिंग असते.

सध्या अनेक जॉब पोर्टल हे बायोडेटा लिहिणं, बायोडेटा प्रमोशन आणि नोकरीबाबत माहिती देण्यासाठी सशुल्क सेवा देतात.
पण, अशा पोर्टल्सना पैसे देण्यापूर्वी ते अधिकृत आहेत का? यासह त्यावरील प्रतिक्रिया (reviews) तपासा. विश्वासार्ह संकेतस्थळांविषयी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांकडून माहिती घेऊ शकता.

जर पैशाच्या मोबदल्यात नोकरी देण्यासंबंधीचा एखादा ईमेल असेल तर त्यात काहीतरी गौडबंगाल आहे हे समजून घ्यावं.
कोणतीही कंपनी किंवा संघटना त्यांच्याकडे काम करण्यासाठी कर्मचाऱ्याकडून पैसे आकारत नाही. अनोळखी एजंटना कधीही पैसे देऊ नका.

सध्या अनेक कंपन्या या मोबाईल,व्हीडिओ कॉल किंवा गुगल हँगआऊट्सद्वारे मुलाखती घेतात. पण अशा प्रकारच्या ऑनलाईन मुलाखतीपूर्वी त्या संस्थेबद्दल आणि त्यांच्या प्रतिनिधींबद्दल योग्य ती माहिती मिळवा.
ऑनलाईन मुलाखतीपूर्वी मुलाखत घेणाऱ्याला नोकरी आणि संस्थेबद्दल सविस्तर प्रश्न नक्की विचारा.

विदेशातील नोकरीच्या जाहिरातीची www.eMigrate.gov.in वर खात्री करून घ्यावी. नोकरीला होकार देण्यापूर्वी लेखी कराराची मागणी करा. त्यातही कोणत्याही करारावर सह्या करण्यापूर्वी व्यवस्थित खात्री करून आणि वाचूनच पुढचा निर्णय घ्या.
समजा तुम्ही नोकरीसाठी परदेशात पोहोचला तर तुमचा पासपोर्ट सांभाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद व्यक्तीकडे तुमचा पासपोर्ट जाणार नाही याची काळजी घ्या.

आजच्या काळामध्ये सायबरक्राईम आणि मानवी तस्करी यांचा एकप्रकारे आपसांत संबंध निर्माण झाला आहे. कोणतीही नोकरी ही तुमच्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी असू शकत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
जर एखादी संधी किंवा ऑफर फारच चांगली म्हणजे विश्वास बसणार नाही अशी असले तर थोडं थांबून त्यावर शांतपणे विचार करणं गरजेचं ठरेल. कारण तुम्ही आज विचारपूर्वक विचारलेलं एक पाऊल भविष्यातील शोषणापासून वाचवू शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











