'बॉक्सर बंड' : भारतीय सैनिकांनी चीनच्या तियानजिन शहरात जाऊन दाखवलेल्या पराक्रमाची कहाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अवतार सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तो 4 ऑगस्ट, 1900 चा दिवस होता. शीख आणि पंजाबी रेजिमेंटच्या तुकड्या चीनमधील तियानजिनकडे रवाना झाल्या. त्या 8 देशांच्या एका मोठ्या आघाडीचा भाग होत्या.
या तुकड्यांना बंडखोरांनी वेढलेल्या एका भागात मदतीसाठी पाठवण्यात आलं होतं.
भारतीय सैनिकांच्या तुकड्या चीनमध्ये काय करत होत्या, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. तर चीनमध्ये त्यावेळी 'बॉक्सर बंड' सुरू होतं. तिथल्या चर्च आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना पाठवलं होतं.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनमधील तियानजिनमध्ये भेट झाली. या शहराला जुने ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
ठाकूर गदाधर सिंह हेही या लढाईत सहभागी होते. त्यांनी 'थर्टीन मंथ्स इन चायना' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की, 3 हजार ब्रिटिश सैनिकांना बीजिंगमुक्त करण्यासाठी जाण्याचा आदेश देण्यात आला होता.
यामध्ये पहिल्या शीख इन्फंट्रीचे 500 सैनिक, 7 व्या राजपूत बटालियनचे 500 सैनिक, 24 व्या पंजाब बटालियनचे (इन्फंट्री) 250 सैनिक, पहिल्या बंगाल लान्सर्सचे 400 सैनिक, रॉयल वेल्श (वेल्च) फ्यूसिलियर्स व्हाईट बटालियनचे 300 सैनिक आणि हाँगकाँग हिंदुस्तानी बटालियनचे 100 सैनिक होते.
उर्वरित सैनिक आणि दारूगोळा तियानजिन आणि इतर ठिकाणांचं रक्षण करण्यासाठी ठेवण्यात आला होता.
बॉक्सर बंड काय होतं?
बॉक्सर बंड जगाच्या इतिहासातील एक प्रमुख घटना म्हणून नोंदवला गेला आहे. बॉक्सर त्यांच्याच देशात ख्रिश्चन मिशनऱ्यांना लक्ष्य करत होते.
हे बंड शमवण्यासाठी 8 देशांच्या आघाडीनं चीनमध्ये सैन्य पाठवलं होतं. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, जपान, अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रिया-हंगेरी या देशांचा समावेश होता.
बीबीसीमधील एका वृत्तानुसार 1899 आणि 1901 दरम्यान चीनच्या उत्तर भागात 'बॉक्सर बंड झालं होतं. चीनच्या चिंग राजवटीच्या कार्यकाळात होत असलेल्या सुधारणा रोखण्यासाठी, परदेशी लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि पारंपारिक शासनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हा बंड करण्यात आला होता.
परदेशी हस्तक्षेपामुळे हा बंड अपयशी ठरला. त्यानंतर रशिया आणि जपान या पाश्चात्य शक्तींनी कमकुवत झालेल्या चिंग राजवटीकडून आणखी सवलती आणि फायदे पदरात पाडून घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
चीनच्या उत्तर भागातील बंडखोर शेतकरी स्वत:ला 'बॉक्सर' म्हणत असत. ते ख्रिश्चन मिशनरी आणि धर्मांतरित झालेल्या लोकांना मृत्यूदंड देण्याची मागणी करत. या धर्मांतरित लोकांना चीनचे गद्दार मानलं जात होतं.
सुरुवातीला चीनमधील न्यायालयानं त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अनेक चिनी ख्रिश्चन लोकांचा मृत्यू झाला. अखेरीस हे बंड दडपण्यात आलं.
गदाधर सिंह लिहितात, "आमची 7 वी राजपूत बटालियन चीनमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय तुकडी होती. त्यामुळे आमचं स्वागत अत्यंत उत्साहानं करण्यात आलं."
त्यावेळच्या परिस्थितीबद्दल ते लिहितात, "तियानजिन हे चीनच्या उत्तर भागातील एक मोठं आणि समृद्ध शहर होतं आणि आहे. हे एक शहर होतं, जिथे कोणीही रहिवासी नव्हतं. घरं होती, मात्र घरात राहणारं कोणीही नव्हतं. मृतदेह होते, मात्र जीवन नव्हतं!"
"तियानजिनमध्ये जवळपास 800 परदेशी लोक मारले गेले. ज्या अमेरिकन व्यक्तीशी मी बोललो, त्यानं जपानी लोकांची खूप स्तुती केली. त्यानं जोर देत म्हटलं की तियानजिनमध्ये आगमन आणि विजय, दोन्हीही गोष्टी जपानी लोकांमुळेच शक्य होऊ शकल्या. एरवी ते अशक्य होतं," असंही ते नमूद करतात.
शीख सैनिकांचं शौर्य
ब्रिटिश सिव्हिल सेवेतून निवृत्त झालेले गुरमुख सिंह यांनी 'अँग्लो-शीख रिलेशन्स अँड द वर्ल्ड वॉर्स' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, बंड चिरडल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्याला तिथे तैनात करण्यात आलं होतं.
त्यांनी लिहिलं, "13 जून 1904 ला 47 व्या शीख रेजिमेंटला चीनच्या उत्तर भागात तैनात करण्याचा आदेश देण्यात आला. तिथे त्यांना बॉक्सर बंडानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मित्रराष्ट्रांच्या सैन्याचा भाग म्हणून तैनात करण्यात आलं होतं."
"ही रेजिमेंट मे 1905 च्या सुरुवातीपासून ते एप्रिल 1908 पर्यंत, 3 वर्षे चीनच्या तियानजिन आणि लुताई शहरांमध्ये होती. त्या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी खूप शौर्यानं काम केलं."

फोटो स्रोत, Getty Images
गुरमुख सिंह लिहितात की, त्यांच्या या कामगिरीमुळे उत्तर चीनचे सैन्य कमांडर ब्रिगेडियर जनरल डल्ब्यू. एच. वाल्टर्स इतके प्रभावित झाले की, त्यांनी जाताना म्हटलं,"...तुम्ही महाराजांच्या सैन्याच्या कोणत्याही तुकडीपेक्षा कमी नाही."
त्याचबरोबर, ते लिहितात की, जर्मन फील्ड मार्शल वॉन वाल्डरसी यांनी शांघायमध्ये शीखांच्या परेडचं निरीक्षण केलं आणि त्यांची शारीरिक ठेवण आणि लष्करी हालचालींचं खूप कौतुक केलं.
मात्र त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की, फक्त सहाच वर्षांनी हीच 47 वी शीख रेजिमेंट फ्रान्समध्ये सर्वोत्तम जर्मन सैनिकांचा पराभव करेल.
लष्करी इतिहासकार मनदीप सिंह बाजवा म्हणतात की, शिखांच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी सैन्याचं प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रांकडे विशेष लक्ष दिलं. त्यामुळे देखील ते या लढाईच्या वेळी पुढे होते.
"शीख सैनिकांचं नेतृत्व खूपच चांगलं होतं. पंजाबी सैनिकांमध्ये शीख, मुस्लीम आणि पठाणदेखील होते. भारताची फाळणी झाल्यानंतर या सैनिकांचा एक मोठा भाग पाकिस्तानात गेला," असंही ते नमूद करतात.
बॉक्सर्सबद्दल सहानुभूती
त्यावेळी चीन एक स्वतंत्र देश होता. या लढाईला तिथल्या जनतेचा देखील पाठिंबा मिळाला.

फोटो स्रोत, Getty Images
मनदीप बाजवा म्हणतात, "बंड म्हणजे आपल्याच देशात सरकारच्या विरोधात उचलेलं पाऊल असतं. मात्र बॉक्सर्स त्यांच्याच देशात युद्ध लढत होते."
"त्यांना त्यांच्या देशातून परदेशी प्रभाव संपवायचा होता. व्यापारावरील परदेशी नियंत्रण संपवण्यासाठी ते लढत होते. मात्र या युद्धाला 8 देशांनी मिळून चिरडून टाकलं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











