सूर्यकुमार यादवला दंड, तर हारिस रऊफवर 2 सामन्यांची बंदीची कारवाई ICC ने का केलीय?

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांना आशिया कपच्या सामन्यात आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (आयसीसी) मंगळवारी (4 नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केली असल्याची माहिती दिली.
भारताविरुद्धच्या सामन्यात हारिस रऊफवर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन्ही सामन्यांसाठी त्याच्या मॅच फीच्या 30-30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर पुढील 2 एकदिवसीय सामन्यांसाठी बंदीही घालण्यात आली आहे.
म्हणूनच पाकिस्तानी क्रिकेटर हारिस रऊफ मंगळवारी (4 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात संघासोबत नव्हता. तो दुसऱ्या सामन्यातही संघाचा भाग असणार नाही.
सूर्यकुमार यादवलाही सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड भरावा लागणार आहे.
आयसीसीने काय म्हटलं?
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा एकमेकांविरुद्ध खेळले. या तिन्ही सामन्यांमध्ये नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आयसीसीने ही कारवाई केली.
मंगळवारी आयसीसीने याबाबत एक निवेदन जारी केलं. त्यानुसार, आयसीसीच्या एलीट पॅनेलच्या सदस्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या 14, 21 आणि 28 सप्टेंबरच्या सामन्यांबाबत सुनावणी पूर्ण केली.

फोटो स्रोत, Reuters
- 14 सप्टेंबरच्या सामन्याची सुनावणी सामन्याचे रेफ्री रिची रिचर्डसन यांनी केली. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादववर कारवाई करण्यात आली, असं आयसीसीने सांगितलं.
- सूर्यकुमार यादवला आयसीसीच्या आचारसंहितेचे कलम 2.21 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. या कलमानुसार खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. त्याला सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत.
- साहिबजादा फरहानवरही (पाकिस्तान) त्याच कलमानुसार कारवाई करण्यात आली. त्याला फक्त इशाराच देण्यात आला आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
- हारिस रऊफवरही (पाकिस्तान) त्याच कलमानुसार सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्यालाही दोन डिमेरिट पॉइंट दिले आहेत.
21 आणि 28 सप्टेंबरच्या सामन्यांसाठी काय कारवाई?
या सामन्याची सुनावणी रेफ्री अँडी पॉइक्रॉफ्ट यांनी केली.
परंतु, या सुनावणीत भारतीय क्रिकेटर अर्शदीप सिंग दोषी ठरला नाही. कारण त्याने आचारसंहिता कलम 2.6 चे उल्लंघन केलेलं नाही. हे कलम अश्लील, आपत्तिजनक किंवा अपमानास्पद वर्तन किंवा हावभावाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.
त्याचबरोबर 28 सप्टेंबरच्या आशिया कप फायनल सामन्यासाठी भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहवरही कारवाई करण्यात आली आहे.
आयसीसीच्या मते, जसप्रीत बुमराहने कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. या कलमाअंतर्गत खेळाचा अनादर करण्यासंबंधीचा आरोप येतो. त्याने अधिकृत इशारा आणि प्रस्तावित शिक्षा स्वीकारली. त्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला. शिक्षा स्वीकारल्यामुळे वेगळी सुनावणी करण्याची गरज पडली नाही.
मात्र याच सामन्यासाठी पाकिस्तानचा हारिस रऊफही दोषी ठरला आहे. त्याला सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले.
यानंतर हारिस रऊफला 24 महिन्यांच्या कालावधीत एकूण 4 डिमेरिट पॉइंट्स मिळाले.

फोटो स्रोत, Getty Images
आयसीसीच्या नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांमध्ये चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स मिळाले, तर हे पॉइंट सस्पेन्शन पॉइंट्मध्ये बदलतात आणि त्याला सामना बंदीच्या शिक्षेला सामोरं जावं लागतं.
दोन सस्पेन्शन पॉइंट्स मिळाल्यावर खेळाडूला एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा टी-20 सामन्यासाठी निलंबित केलं जातं.
तसेच, हे डिमेरिट पॉइंट्स खेळाडूच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये 24 महिन्यांसाठी राहतात आणि नंतर काढले जातात.
पाकिस्तानचा हारिस रऊफ 4 आणि 6 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे सामन्यांमध्ये खेळणार नाही, असं आयसीसीने सांगितलं.
आशिया कप आणि भारत-पाकिस्तान वाद
यावेळी आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडली.
या स्पर्धेत 14, 21 आणि 28 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने झाले. 28 सप्टेंबरला भारताने ही स्पर्धा जिंकली. पण त्याआधीच्या दोन सामन्यांतही भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.
पण यावेळी या दोन देशांमधील सामन्यांवर पहलगाम हल्ल्याचे सावट होते. ताण इतका वाढला की दोन्ही देशांच्या खेळाडूंनी खेळाच्या परंपरेनुसार हस्तांदोलनही केले.
टॉसच्या वेळीही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्यात औपचारिक 'हँडशेक' झाला नाही.
पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, तो पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या पाठीशी उभा आहे.
सूर्यकुमार यादव म्हणाला, "मला थोडा वेळ घ्यायचा आहे. आम्ही पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या पाठीशी उभे आहोत. हा विजय आम्ही आमच्या लष्कराला समर्पित करतो. ते आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतील."
त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) पहिल्या सामन्याच्या रेफ्रींविरोधात आयसीसीकडे तक्रार केली होती.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी एक्सवर लिहिलं की, 'सामन्याच्या रेफ्रीकडून आयसीसीची आचारसंहिता आणि क्रिकेटच्या स्पिरिटचं, तसेच एमसीसी कायद्याचे जे उल्लंघन केलं आहे, त्याबाबत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली आहे.'

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानने आरोप केला की, सामन्याच्या टॉसच्या वेळी रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना हस्तांदोलन करू नका असं सांगितलं होतं.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव खूप वाढला होता.
त्याचवेळी, 21 सप्टेंबर रोजी सुपर फोर सामन्यातही तसंच वातावरण दिसून आलं.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, भारत आणि पाकिस्तानमध्ये आता काही स्पर्धा शिल्लक राहिलेली नाही आणि याबाबत आता प्रश्न विचारणंही थांबवलं गेलं पाहिजे.
तो म्हणाले, "तुम्ही भारत आणि पाकिस्तानमधील स्पर्धेबाबत प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. कारण माझ्या मते जर दोन संघ 15-20 सामने खेळतात, त्यात एखादा संघ 7-8 सामने जिंकत असेल तर त्याला चांगलं क्रिकेट म्हणता येईल. पण 13-0 किंवा 10-1 (मला अचूक आकडे माहिती नाहीत) असं असेल, तर ती स्पर्धा म्हणता येणार नाही."
भारताने फायनल सामन्यात पाकिस्तानला पाच विकेटने पराभूत केलं. पण सामन्यानंतर ट्रॉफीबाबत जे काही घडलं, ते क्रिकेटच्या मैदानावर पूर्वी कधीही पाहायला मिळालं नाही.
भारतीय संघाने एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचेही प्रमुख आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, खेळाडूंनी हा निर्णय आधीच घेतला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, हा संघाचा सामूहिक निर्णय होता.
जेव्हा वाद मैदानापर्यंत पोहोचला नव्हता
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान संघांमध्ये दिसलेला तणाव आधी मैदानावर कधीही दिसलेला नव्हता.
या वर्षाच्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला गेलेला नव्हता.
पण 23 फेब्रुवारीला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांच्यात जोश होता.
त्या सामन्यात शतक झळकावून भारतीय संघाला विजय मिळवून दिल्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानच्या खेळाडूंशी फक्त हस्तांदोलनच नाही तर त्यांना मिठीही मारली होती.
हारिस रऊफला मिठी मारतानाचा त्याचा एक फोटोही खूप चर्चेत आला होता.
रऊफ हा तोच गोलंदाज आहे, त्याच्या षटकात दोन षटकार मारून विराट कोहलीने 2022 साली झालेल्या टी20 विश्वचषकातील भारत पराभूत होत असलेला सामना फिरवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
2022 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानच्या हारिस रऊफला आपली जर्सी भेट दिली होता. त्याचा व्हीडिओ बीसीसीआयच्या एक्स हँडलवरही पोस्ट केला होता.
या कृतीसाठी हारिस रऊफने विराट कोहलीची खूप प्रशंसा केली आणि म्हटलं होतं की, "विराट कोहली अप्रतिम खेळाडू आहे. मी त्याच्याकडे खूप दिवसांपासून जर्सीची मागणी केली होती आणि आता त्याने सही केलेली जर्सी मला दिली. खूप छान वाटलं."
इतकंच नाही तर जवळपास तीन वर्षे विराट कोहली खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी जुलै 2022 मध्ये बाबर आझमने एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की, "ही वेळही निघून जाईल." विराट कोहलीने त्या पोस्टला उत्तर देत बाबर आझमचे आभार मानले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











