निसर्गसौंदर्यानं नटलेला 'हा' देश काही खास लोकांना नागरिकत्व का देतो आहे?

फोटो स्रोत, Getty Images
तुमचे पूर्वज एखाद्या दुसऱ्या देशातले असतील, तर त्या मूळ देशात जाण्यासाठी किंवा तिथलं नागरिकत्व मिळवण्यासाठी तुम्हाला काही सवलती मिळू शकतात. भारतासह अनेक देशांत अशा सवलती दिल्या जातात.
पण आता आफ्रिकेतले काही देश अमेरिकेतील काही खास लोकांनी नागरिकत्व देत आहेत.
लॉरेन हिल आणि सियेरा या अमेरिकेतल्या प्रसिद्ध गायिकांना यंदा जुलैमध्ये पश्चिम आफ्रिकेतील बेनिन या देशाचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले.
चित्रपट निर्माती टोन्या लुईस ली आणि त्यांचे पती स्पाइक ली यांनाही अमेरिकेत बेनिनच्या आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे राजदूत बनवण्यात आलं.
इतकंच नाही तर ज्यांच्या पूर्वजांना अमेरिका आणि युरोपमध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते, अशा लोकांना नागरिकत्व देण्यासाठी बेनिनच्या नव्या सरकारने एक कायदाच केला आहे. या कायद्याचे नाव आहे 'माय आफ्रो ओरिजिन्स' म्हणजेच माझे आफ्रिकन मूळ.

फोटो स्रोत, Getty Images
घाना, सियेरा लिओन आणि गिनी-बिसॉ हे देशही आफ्रिकन वंशाच्या लोकांना नागरिकत्व देऊ लागले आहेत.
या देशांना जगातली उत्तम प्रतिभा आणि संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित करायची आहे आणि त्यांच्या देशाची कला आणि संस्कृती जगासमोर आणायची आहे.
पण यामागे गुलामगिरीचा मोठा दुर्दैवी इतिहासही आहे.
मिडल पॅसेज
सोळाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेतील एक कोटीहून अधिक लोकांना जबरदस्तीने पकडून जहाजांद्वारा अटलांटिक समुद्रापलिकडे अमेरिकेत पाठवण्यात आलं.
प्रामुख्यानं पश्चिम आफ्रिकेतील प्रदेशांतून या लोकांना पकडलं जायचं. सतराव्या शतकात बेनिनमधलं विडाह बंदर हे या गुलामांच्या व्यापाराचे मुख्य केंद्र बनलं.
तिथे युरोपियन व्यापाऱ्यांच्या बंदीगृहात गुलामांना बेड्यांनी जखडून ठेवायचे आणि मग जहाजांत भरून अमेरिकेत पाठवायचे.

फोटो स्रोत, Getty Images
यातल्या नव्वद टक्क्यांहून अधिक लोकांना कॅरिबियन बेटे आणि दक्षिण अमेरिकेत पाठवण्यात आले. बेनिनमधलं तत्कालीन डाहोमी साम्राज्य या व्यापारात युरोपियन लोकांना मदत करत असे.
या साम्राज्याचे सैनिकही शेजारी देश आणि जमातींतून लोकांना पकडून आणत आणि गुलाम म्हणून विकत. त्याविषयी अमेरिकेतील एमोरी विद्यापीठात आफ्रिकन-अमेरिकन इतिहासाविषयीच्या सह प्राध्यापक डॉ. बायो होल्सी माहिती देतात.
"डाहोमींकडे ताकदवान आणि प्रशिक्षित सेना होती. ते आसपासच्या प्रदेशात हल्ले करत असतं. लढाईत पकडलेले लोक राजाची मालमत्ता मानली जात असे."
डाहोमी राजे शस्त्रास्त्रं आणि इतर सामुग्रीच्या मोबदल्यात या पकडलेल्या लोकांना गुलाम म्हणून युरोपीय व्यापाऱ्यांना विकायचे.
डॉ. होल्सी माहिती देतात की त्याबदल्यात रोपीय लोकांनी बंदुका आणि दारुगोळा आणल्यानं आफ्रिकेतील युद्धाचे स्वरूप बदलले.
"डाहोमी साम्राज्यानं या शस्त्रांचा वापर करून शेजारच्या प्रदेशांवर कब्जा केला आणि अधिकाधिक लोकांना पकडून आणलं, जे गुलामांचा व्यापार करणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांच्याही फायद्याचं ठरलं.
"बदल्यात, या शस्त्रांच्या मदतीने डाहोमी साम्राज्याने आपल्या समुदायाला गुलाम होण्यापासून वाचवले आणि मोठी संपत्ती जमवली."

गुलाम बनवलेल्या आफ्रिकन लोकांना आताच्या USA आणि लॅटिन अमेरिकेत खाणींमध्ये मजुरी करण्यासाठी तसंच तंबाखू आणि ऊसाची शेती करण्यासाठी पाठवले जाई. ही पिकं युरोपात विकली जात.
गुलामांना पकडून आणण्याच्या प्रक्रियेला "मिडल पॅसेज" असं म्हटलं जायचं. या मिडल पॅसेजवर युरोपीय लोकांचा पूर्ण ताबा होता, असं डॉ. होल्सी सांगतात.
"गुलामांचा व्यापार प्रामुख्यानं युरोपीय लोकांनीच सुरू केला होता. तेच आपल्या जहाजांतून गुलामांना पकडून नेत असत. पुढे या गुलामांना अमेरिकेत पुन्हा विकलं जायचं. तिथे त्यांना शेतमजुरीही करावी लागायची.
काही शतकं चाललेल्या या गुलाम व्यापाराचा पश्चिम आफ्रिकेवर मात्र अत्यंत वाईट परिणाम झाला.
तरुण आणि सक्षम लोकांना जबरदस्तीने उचलून नेल्यानं या प्रदेशात मजुरांची कमतरता निर्माण झाली. वस्त्र आणि भांडी उत्पादनं, हस्तकला उद्योग कोलमडले.
गुलामी व्यापारामुळे युद्धं आणि सामाजिक हिंसाही वाढली. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर गुलामांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली.
पण त्यानंतर युरोपीय देशांनी आफ्रिकेतील प्रदेशांवर कब्जा करण्याची मोहीम सुरू केली.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत हा वसाहतवाद सुरू होता.आफ्रिकेतील बहुतेक देशांवर प्रामुख्यानं यूके आणि फ्रान्सने कब्जा केला.
त्याचा मोठा धक्का तिथल्या स्थानिक समाज आणि अर्थव्यवस्थेला बसला, ज्याचे परिणाम आजही जाणवतात.
वेगळा इतिहास
गुलामांची सर्वाधिक आयात ब्राझिलमध्ये व्हायची, जी तेव्हा पोर्तुगीज वसाहत होती.
ब्राझिलमधून यातल्या अनेक गुलामांना कॅरेबियन बेटं आणि हैतीमध्ये नेलं गेलं, अशी माहिती अॅना लूसिया अराउजो देतात. त्या ब्राझिलशी संबंधित आहेत आणि अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापक आहेत.

अॅना माहिती देतात की आज आफ्रिकेबाहेर आफ्रिकन मूळ असलेल्या लोकांची सर्वात मोठी लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलच्या निम्म्या लोकसंख्येचे मूळ आफ्रिकेत आहे.
1835 मध्ये ब्राझिलमध्ये गुलामांचं मोठं बंड झालं. गुलामांचा व्यापार बंद होण्यामागे हेही एक कारण ठरलं. या बंडानंतर ब्राझिलमध्ये आणल्या गेलेल्या चाळीस लाख गुलामांपैकी अनेकजण पुन्हा मायदेश परतण्यात यशस्वी ठरले.
अॅना लूसिया अराऊजो सांगतात, "जे लोक आफ्रिकेत परतले त्यांची संस्कृती बदलली होती. ते वेगळी भाषा बोलत आणि स्थानिक लोकांपेक्षा थोडे वेगळे दिसत होते. त्यांच्याकडे नवीन कौशल्ये आली होती.
"त्यामुळे स्थानिकांच्या तुलनेत ते वरच्या वर्गात गणले जायचे. त्यातून त्यांचा स्थानिक लोकांशी संघर्ष सुरू झाला. गुलाम व्यापारात कोणाची काय भूमिका होती, यावरूनही वाद झाले."
1 ऑगस्ट 1960 रोजी बेनिन फ्रान्सच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. शीतयुद्धाच्या त्या काळात हा देश सोव्हिएत संघाच्या प्रभावाखाली गेला.
1990 च्या सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तोवर, इकडे बेनिनची अर्थव्यवस्थाही विस्कटली होती.
तेव्हा बेनिनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांस्कृतिक पर्यटनाचा आधार घेतला आणि वूडू उत्सव सुरू केला, असं अॅना लूसिया अराउजो सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
हा उत्सव दरवर्षी जानेवारीत साजरा केला जातो. या योजनेचा बेनिनला आर्थिक फायदा झाला, पण गुलामांच्या व्यापारामुळे समाजात पडलेल्या खोल दऱ्या मात्र भरल्या नाहीत.
"लोकांचं वादावरून लक्ष हटवता येईल, हाही वूडू धर्मांचा उत्सव साजरा करण्यामागचा एक उद्देश होता.
"कारण जे लोक गुलाम व्यापाराचे बळी पडले आणि ज्यांना या व्यापाराला हातभार लावला, त्या दोघांचेही वंशज या प्रथा पाळतात. अनेक कुटुंबे आणि समुदायांमध्ये या मुद्द्यावरून तणाव आहे," असं अॅना लूसिया अराउजो सांगतात.
संधीचं नवं युग
डॉ. लेनर्ड वांचेकॉन हे बेनिनमधील अफ्रिकन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे संस्थापक आणि प्रमुख आहेत.
ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात राजकारण आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे प्राध्यापकही आहेत. बेनिनमध्ये संधींचं नवं युग सुरू होतंय असं त्यांना वाटतं.
"माझा जन्म मध्य बेनिनमधील एका छोट्या गावात झाला, जिथे फक्त 250 लोक राहायचे. माझ्या गावाभोवती नद्या आणि तलाव होते.
"बेनिनमध्ये अशा अनेक जागा तसंच गुलाम व्यापाराशी संबंधित अनेक संग्रहालयं, स्मारकं, किल्ले आणि राजवाडे आहेत. मला वाटतं तिथे पर्यटनाची संधी आहे."

फोटो स्रोत, Getty Images
बेनिन हा निसर्गसौंदर्यानं नटलेला देश आहे खरा. पण अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या नागरिकांना बेनिनला न जाण्याचा सल्लाही दिला आहे.
डॉ. वांचेकॉन यांना ही अतिशयोक्ती वाटते. ते म्हणतात, "बातम्यांमध्ये जे येते त्या तुलनेत बेनिन खूपच सुरक्षित आहे. बेनिन एक रोचक देश आहे. इथे पाच वेळा लष्करी उठाव झाले, पण रक्तपात झालेला नाही.
"उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात या देशानं मोठी प्रगती केली आहे. माझ्या गावातून आधी चाळीस विद्यार्थी शाळेत जात होते, त्यापैकी चौदा जणांनी आता पीएचडी केलं आहे."
शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती केली असली तरी बेनिनची अर्थव्यवस्था अजूनही कमकुवत आहे.
व्यापारासाठी बेनिन शेजारच्या नायजेरियावर अवलंबून आहे, जी आफ्रिकेतली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. लेनर्ड वांचेकॉन यांच्या बेनिनला पर्यटनावर अवलंबून न राहता अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इतर देशांसोबत काम करावे लागेल. ते सांगतात, "बेनिनकडे विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती नाही. पण कृषीक्षेत्रात संधी आहेत.
"पर्यटनासोबत खासगी उद्योगांना, विशेषतः सुशिक्षित लोकांना प्रोत्साहन दिले तर खूप साध्य होऊ शकते."
देशाचे भविष्य सुधारण्यासाठी बेनिनला आता परदेशात राहणाऱ्या बेनिनच्या वंशातील लोकांची मदत हवी आहे.
विकासाच्या दिशेने पाऊल
चित्रपट निर्माती आणि उद्योजक टोन्या लुईस ली या बेनिनमधून गुलाम म्हणून नेलेल्या लोकांच्या वंशज आहेत.
यावर्षी जुलैमध्ये बेनिन सरकारने त्यांना आणि त्यांचे चित्रपट निर्माते पती स्पाइक ली यांना अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन लोकांसाठीचे आपले राजदूत म्हणून नेमले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टोन्या सांगतात की गुलामीचा व्यापार ही एक मोठी शोकांतिका होती, पण ते दःख भरून निघणार नाही, असं मात्र नाही.
"शेकडो वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्यांना घरी परतण्याचा पर्याय मिळतो आहे. ज्यांनी ही शोकांतिका घडवून आणली आणि जे त्यात बळी पडले, त्यांच्या वंशजांमध्ये समेट घडवण्याची ही प्रक्रिया आहे. यानं जुन्या जखमा भरतील आणि चांगले परिणाम होऊ शकतील."
टोन्या सांगतात की त्यांच्यासारखे अनेकजण अमेरिकेत आहेत ज्यांना आता आफ्रिकेत जाण्यासारखं एक ठिकाण मिळालं आहे.
"मला वाटतं मते बेनिनकडे ही एक उत्तम संधी आहे. ते जगाला दाखवू शकतात की ते गुलाम व्यापारात कसे सहभागी होते आणि आता शेकडो वर्षांनंतर जखमा भरून काढण्यासाठी ते कोणते पाऊल उचलत आहेत.
"मला आशा आहे की या योजनेमुळे शोकांतिकेच्या जखमा भरून निघतील आणि उज्वल भविष्यासाठी मदतच होईल."
टोन्या लुईस ली यांच्या पूर्वजांना गुलाम म्हणून अमेरिकेत नेण्यात आलं होते. पण आता त्यांच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या अमेरिकन नागरिक म्हणून मोठ्या झाल्या आहेत.
1700 पासून त्यांचे पूर्वज अमेरिकेत राहात आले आहेत. पण आता आफ्रिकेतही आपल्यासाठी एक जागा आहे, ज्याला आपण घर म्हणू शकतो, असं त्यांना वाटतं.
टोन्या यांना आता त्यांच्यासारख्या इतर अमेरिकन, लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन लोकांना त्यांच्या मूळाशी जोडण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याच उपक्रमाअंतर्गत 2024 मध्ये त्यांनी बेनिनला भेट दिली होती. त्यावेळी संमिश्र भावना जाणवल्याचं त्या सांगतात.
"तो खूप कठीण अनुभव होता. शतकांपूर्वी आमच्या स्वतःच्या लोकांनी माझ्या पूर्वजांना जबरदस्तीनं गुलाम बनवून अमेरिकेत पाठवले होते.
"मला तेव्हा खूप दुःख आणि रागही जाणवला, तिथे परतणाऱ्या इतर आफ्रिकन मूळ असलेल्या लोकांनाही हेच वाटले असेल."
"मला असंही जाणवलं की माझ्या पूर्वजांना इथून जबरदस्ती अमेरिकेत पाठवले गेले होते आणि आज मी माझ्या कुटुंबासह इथे परत आले आहे.
"मी अजूनही अमेरिकन आहे आणि आफ्रिकनही आहे. या दोन्ही ओळखींच्या आधारे भावी पिढीसाठी काही चांगले करण्याचा मी प्रयत्न करेन.
"मी बेनिनच्या किनाऱ्यावर उभी राहून समुद्राकडे पाहत होते, तेव्हा मला वाटलं, आपण ती शोकांतिका सहन केली, त्यातून बाहेर पडलो, बहरलो आणि आज परतण्यात यशस्वी झालो. ही गोष्ट आंतरीक शक्तीची जाणीव करून देत. हे पाहून माझ्या पूर्वजांनाही नक्कीच आनंद वाटेल."
एकीकडे बेनिनला आपली प्रतिमा बदलायची आहे, इतिहासातल्या जखमा भरून काढायच्या आहेत.
तर दुसरीकडे युरोप आणि अमेरिकेत राष्ट्रवादी विचारसरणी पसरते आहे. त्यामुळे अनेक लोक आपलं मूळ कुठे आहे, याचा विचार करत आहेत.
त्यामुळे टोन्या लुईस ली सांगतात तसंच बेनिनची योजना आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी गुलामगिरीच्या जखमा भरून काढण्याची एक संधी ठरू शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











