गाणं गायल्यानं कोणत्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये होते सुधारणा? जाणून घ्या त्यामागील विज्ञान

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डेव्हिड कॉक्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सूरात गा, अथवा सूराची काळजी न घेता कसंही गा. पण, बऱ्यापैकी प्रत्येकाला गाणं गायला आवडतं. किमानपक्षी ऐकायला तरी आवडतंच आवडतं. कुणी 'बाथरूम सिंगर' असतं, तर कुणी आपली इतर दैनंदिन कामं करताना गातं...

पण एवढं मात्र नक्की की, मेंदूपासून ते मनापर्यंत, गाणं गाण्याचे अनेक प्रकारचे फायदे असतात.

खासकरून, जेव्हा लोक समूहात गाणं गातात, तेव्हा तर गाणं अधिकच फायद्याचं ठरतं. कारण, ते लोकांना जवळ आणतं. ते आजारांशी लढण्यासाठी शरीराला तयार करतं आणि तुमच्या वेदनाही कमी करू शकतं.

त्यामुळेच, तुम्ही जर गाणं गात नसाल तर आजपासूनच गायला सुरूवात करा. किमान तुमच्या आनंदासाठी आणि शरीराला होणाऱ्या या फायद्यांसाठी तरी...

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

अ‍ॅलेक्स हे 'स्ट्रीट केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर म्युझिक थेरपी रिसर्च'मध्ये संशोधन करतात.

संगीत कशाप्रकारे मुलांना आणि प्रौढांना मेंदूच्या दुखापतींमधून बरं होण्यासाठी मदत करू शकतं, यावर त्या आपल्या अभ्यासातून संशोधन करत आहेत.

"गायन ही एक मानसिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक क्रिया आहे," असं ते सांगतात.

जे लोक एकत्र गाणं गातात, त्या लोकांना सामाजिक एकात्मतेची भावना फारच खोलवर अनुभवता येते, असं संशोधन सांगतं.

ही बाब मानसशास्त्रज्ञांना नेहमीच आश्चर्यचकित करताना दिसते.

इतकंच नव्हे तर जे लोक गाणं गाताना संकोच बाळगतात, तेदेखील सुरात गाऊ लागतात.

संशोधन असं सांगतं की, एकमेकांना अजिबात परिचित नसलेले अनोळखी लोकदेखील निव्वळ एक तास एकत्र बसून गाणं गायल्याने एकमेकांच्या प्रचंड जवळचे होऊ शकतात.

आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, गाणं गायल्याने फुफ्फुसं आणि श्वासोच्छवासाच्या संपूर्ण यंत्रणेलाही फायदा होतो.

काही काही संशोधक तर गाणं गाण्याचा वापर हा फुफ्फुसाच्या आजारांशी लढणाऱ्या लोकांवरील उपचार म्हणूनही करताना दिसतात.

आनंदाच्या लहरी...

गाणे गाणं फक्त मनोरंजकच नसतं, तर ही प्रक्रिया शरीरावर बऱ्याच प्रकारचे प्रभावी परिणाम करते. गाणं गायल्याने हृदयाची स्पंदनं तसेच ब्लड प्रेशरदेखील अधिक चांगलं होऊ शकतं, असंही सिद्ध झालं आहे.

खासकरून लोक जेव्हा समूहात अथवा क्वायरमध्ये गाणं गातात, तेव्हा ही प्रक्रिया आपल्या इम्यून सिस्टीमला आणखीनच मजबूत करणारी ठरते. मात्र, निव्वळ गाणं ऐकल्यानं हे परिणाम दिसून येऊ शकत नाहीत.

असं का घडतं, यामागे अनेक प्रकारची विश्लेषणं उपलब्ध आहेत. जैविक दृष्टीकोनातून असं मानलं जातं की, गाणं आपल्या व्हेगस नर्व्हला अधिक सक्रिय करतं.

ही व्हेगस नर्व्ह थेट आपल्या व्होकल कॉर्ड्स आणि गळ्याच्या मांसपेशींशी जोडलेली असते.

गाणं गाताना लांब आणि नियंत्रित श्वास सोडले जात असल्याने आपल्या शरीरातून एंडोर्फिन हे हार्मोन स्त्रवू लागते. त्यामुळे, आपल्याला आनंद मिळतो, चांगलं वाटायला लागतं आणि वेदना कमी व्हायला लागतात.

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गाणी गाणं आपल्या मेंदूच्या दोन्ही भागांमध्ये पसरलेल्या न्यूरॉन्सच्या एका मोठ्या नेटवर्कला सक्रिय करतं.

त्यामुळेच, भाषा, हालचाल आणि भावनांशी निगडीत भाग अधिकच सक्रिय होतो. सोबतच, गाणं गाताना श्वासोच्छवासावर लक्ष दिल्यानं तणाव कमी करण्यासही मदत होते.

स्ट्रीट असं सांगतात की, "ही 'चांगलं वाटत असल्या'ची प्रतिक्रिया आपल्या आवाजातील चढउतार, चेहऱ्यावरचे हावभाव आणि शरीराच्या एकूण मुद्रेवर स्पष्टपणे दिसून येते."

या सगळ्या फायद्यांच्या मागे इतरही काही सखोल कारणं असू शकतात. काही मानवशास्त्रज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, आपले आदिम पूर्वज बोलायला सुरू करण्यापूर्वी गाणंच गायचे. ते निसर्गातील वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करायचे अथवा विविध भावना व्यक्त करण्यासाठी गळ्यातून स्वर वेगवेगळे काढायचे.

हे जटिल स्वरूपाचे सामाजिक संबंध, भावना आणि रितीरिवाजांच्या विकासांमध्येही महत्त्वाचं ठरलं असावं.

स्ट्रीट असं सांगतात की, हा काही योगायोग नाहीये की, गाणे गाणं हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. मग ती व्यक्ती संगीतामध्ये रस ठेवत ठेवत असो अथवा नसो. आपला मेंदू आणि शरीर हे जन्मापासूनच गाण्यावर सकारात्मक अशी प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असतं.

ते सांगतात की, "आपण मुलांना लहानपणापासूनच अंगाई ऐकवतो. अगदी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर होणाऱ्या अंतिम संस्कारामध्येही आपण गाणं गातो. आपण पाढेही सूरातच म्हणतो आणि 'गमभन' ही अक्षरं शिकण्यासाठीही आपण सुरांचाच वापर करतो."

सोबतीनं गाणे गाणं...

मात्र, वेगवेगळ्या प्रकारचं गाणं गायल्यानं एकसारखाच फायदा मिळतो, असं नाही. संशोधन असं सांगतं की, समूहात अथवा क्वेअरमध्ये गाणं हे एकट्यानं गाणं गाण्याच्या तुलनेत मानसिक आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं.

याच कारणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांमध्ये सहकार्य, भाषेचा विकास करण्यासाठी आणि त्यांच्या भावना नियंत्रित करण्यासाठी गाण्याचा वापर केला जातो.

गाणं गाण्याचा सर्वांत कमालीचा फायदा असा आहे की, मेंदूला झालेल्या दुखापतीमधूनही बरं होण्यासाठी ते फायद्याचं ठरू शकतं.

जगभरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञही वेगवेगळ्या आजारांशी दोन हात करणाऱ्या लोकांचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी गाण्याचा वापर करत आहेत.

संशोधकांनी कॅन्सर, स्ट्रोक तसेच पार्किन्सन आणि डिमेन्शियाने पीडित असलेल्या लोकांची देखभाल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कम्युनिटी क्वेअरच्या परिणामांवर संशोधन केलेलं आहे.

उदाहरणार्थ, गाण्यामुळे पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये बोलण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. कारण, पार्किन्सन रोग जसजसा वाढत जातो, तसतसं बोलण्यावरच परिणाम होत जातो.

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

गाणे गाणं हे सामान्यत: आपलं आरोग्य अधिक चांगलं करण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग आहे. हा एक असा व्यायाम आहे जो अजूनही कमी लेखला जातो.

परंतु, त्याची तुलना जलद चालण्याच्या व्यायामाच्या परिणामांशीही करता येते.

"गायन ही एक शारीरिक क्रिया आहे आणि त्याचे काही फायदेही व्यायामासारखेच असू शकतात," असं साउथहॅम्प्टन विद्यापीठातील श्वसन फिजिओथेरपीचे सहयोगी प्राध्यापक अॅडम लुईस म्हणतात.

एका अभ्यासात असंही सुचवण्यात आलं आहे की, व्यावसायिक गायकांनी केलेलं गायन आणि स्वरांचे व्यायाम हे हृदय आणि फुफ्फुसांसाठी ट्रेडमिलवर मध्यम गतीनं चालण्याइतकंच फायदेशीर असतं.

दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर सामूहिक गायनाचे फायदे अनेकदा दुर्लक्षित केले जातात, हेदेखील संशोधकांना अधोरेखित करायचं आहे.

स्ट्रीट सांगतात की, गाणे गाणं हे लक्ष केंद्रित करण्यासाठीही फायद्याचं ठरतं.

"यामुळे खोलीत अचानक एक बरोबरीचं वातावरण तयार होतं. जिथं केअरटेकर आणि आरोग्यसेवा देणारे कर्मचारी देखील रुग्णांसारखेच गाणं गाऊ लागतात. असं बरोबरीचं आनंददायी वातावरण इतर कोणतीही गोष्ट घडवून आणू शकत नाही." स्ट्रीट म्हणतात.

प्रत्येक श्वासासोबत फायदा

श्वसनाच्या दीर्घकालीन समस्या असलेल्या बहुतेक लोकांना गाणे गाणं फायदेशीर ठरतं, असं दिसतं.

म्हणूनच इम्पिरियल कॉलेज लंडनमधील क्लिनिकल लेक्चरर केयर फिलिप यांच्यासाठी हा विषय संशोधनाचा एक प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे.

फिलिप स्पष्ट करतात की, गायनानं हे आजार पूर्णपणे बरं होऊ शकत नाहीत, परंतु पारंपारिक पद्धतींसह यांचाही एकत्रित वापर केल्यास अशी उपचार पद्धती निश्चितच परिणामकारक असू शकते.

"श्वास घेण्यास त्रास होत असल्याने काही लोकांच्या श्वासोच्छवासाची पद्धत बदलू शकते. त्यामुळे ते अनियमित आणि कमी प्रभावी बनतं," फिलिप म्हणतात.

"काही गायनावर आधारित तंत्रांमुळे स्नायूंचा वापर, श्वासाची लय तसेच खोली सुधारते आणि लक्षणंही सुधारू शकतात."

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या अभ्यासांपैकी एक म्हणजे त्यांनी 'ब्रीदिंग प्रोग्राम' घेतला आणि लॉन्ग कोविड पेशन्ट्सवर नियंत्रित परिक्षणामध्ये त्याचा वापर केला.

हा ब्रीदिंग प्रोग्राम इंग्लिश नॅशनल ऑपेराच्या व्यावसायिक गायकांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.

सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या निकालांवरून असं दिसून आलं की या चाचणीत सहभागी झालेल्या कोविड रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा झाली आणि त्यांच्या श्वासोच्छवासाच्या काही समस्या कमी झाल्या.

मात्र, या नाण्याची दुसरी बाजू अशीही आहे की गाणं पूर्णपणे जोखीममुक्त आहे, असं नाही. विशेषतः ज्यांचं आरोग्य आधीच कमकुवत आहे, त्यांच्यासाठी ही बाब लागू पडते.

कोविड-19 साथीच्या सुरुवातीच्या काळात, सामूहिक गायनाला संसर्गजन्य घटनेशी जोडण्यात आलं होतं. कारण गाण्यादरम्यान मोठ्या प्रमाणात विषाणूंचा हवेतून प्रसार होऊ शकतो.

"जर तुम्हाला श्वसनाचा संसर्ग असेल, तर त्या आठवड्यात क्वेअर प्रॅक्टीस वगळणं केव्हाही चांगलं ठरू शकतं. जेणेकरून तुम्ही इतरांना धोक्यापासून वाचवू शकाल," असं फिलिप सांगतात.

पण गाण्याचा सर्वात उल्लेखनीय फायदा म्हणजे गाणं हे मेंदूला दुखापतीतून बरं होण्यास मदत करतं.

याचं एक उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या माजी संसद सदस्य गॅब्रिएल गिफोर्ड्स यांची कहाणी. त्या 2011 मध्ये डोक्याला गोळी लागल्याने जखमी झाल्या होत्या.

अनेक वर्षांच्या कालावधीत, त्यांनी चालणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं या गोष्टी पुन्हा शिकून घेतल्या.

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

या प्रक्रियेमध्ये थेरपिस्टने त्यांच्या बालपणातील गाण्यांचा वापर करून त्यांची बोलण्याची क्षमता परत मिळवून देण्यास मदत केली.

स्ट्रोकमधून बरं होणाऱ्या रुग्णांसाठी संशोधकांनी अशाच पद्धती वापरल्या आहेत. खरं तर, तासनतास गाणं पुन्हा पुन्हा ऐकल्यानं मेंदूच्या दोन भागांमध्ये नवीन कनेक्टिव्हिटी निर्माण करणं शक्य होतं.

अनेकदा गंभीर स्ट्रोकनंतर हा भाग प्रभावित होतो.

असं मानलं जातं की, गाण्याची प्रक्रिया मेंदूची न्यूरोप्लास्टिकिटी वाढवते. त्यामुळे स्वत:ला पुन्हा स्वत:शीच नव्याने जोडूीन घेता येतं आणि नवीन न्यूरल नेटवर्क तयार करता येतं.

काही सिद्धांतांनुसार, ज्यांची संज्ञानात्मक क्षमता, म्हणजेच विचार करण्याची, समजून घेण्याची, शिकण्याची इत्यादी मानसिक क्षमता कमी होत चालली आहे, अशा लोकांना गाणं मदत करू शकतं.

खरं तर, गाण्यामुळे मेंदूवर खूप दबाव येतो. त्यासाठी सतत लक्ष देणं, शब्द शोधणं आणि स्मरणशक्तीला चालना देणं फार आवश्यक असतं.

गाणं गायल्यानं आपल्याला बरं का वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images

"वृद्धांमध्येही गाण्याचे संज्ञानात्मक फायदे हळूहळू वाढत आहेत," असं हेलसिंकी विद्यापीठातील न्यूरोसायकॉलॉजीचे प्राध्यापक टेप्पो सार्कमो म्हणतात.

पण गाण्यामुळे खरोखरच संज्ञानात्मक घट कमी होणं रोखता येतं का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजूनही मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकालीन अभ्यासांची आवश्यकता आहे."

स्ट्रीट सांगतात की, गाणं हे मानवी जीवनाचा इतका महत्त्वाचा भाग का आहेत, हे आपल्याला गाण्याचे सामाजिक आणि न्यूरोकेमिकल पातळीवर होणारे प्रभावी परिणाम स्पष्ट करतात.

मात्र, त्यांची एक चिंता अशी आहे की लोक तंत्रज्ञानाशी जसजसं अधिकाधिक जोडले जात आहेत, तसतसं लोक गाण्यापासून दूर होत आहेत आणि त्यामुळे त्याचे फायदेही लोकांना कमी होऊ लागले आहेत.

"आम्हाला यातून बरंच काही मिळतंय, विशेषतः मेंदूच्या दुखापतीतून बरे होण्याच्या बाबतीत," असं ते सांगतात.

गंभीर दुखापत झालेल्यांसाठीही गाणं प्रभावी ठरू शकतं, हे दर्शविणारे अभ्यास नुकतेच समोर येऊ लागले आहेत.

गाण्याने नेहमीच समुदायांना एकमेकांशी जोडण्यात मोठी भूमिका बजावली आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)