सदाशिव अमरापूरकर : नाटक करतो म्हणून वडिलांनी ठेवलं होतं डांबून; नगरचा 'नाटकवेडा' बॉलिवूडचा जबरी खलनायक कसा झाला?

फोटो स्रोत, Reema Amarapurkar & VISHESH FILMS
तेव्हाच्या अहमदनगरमधील एका छोट्या गावातील एक नाटकवेडा मुलगा ते बॉलिवूडमधील जबरी खलनायकाच्या विविध छटा साकारून दोन फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावावर करणारा अजरामर कलाकार...
संत कबीरांनी आपल्या दोह्यांमधून एका स्वप्नलोकाची कल्पना मांडली होती. त्याला नाव दिलं होतं 'अमरापूर'. अर्थात, असं एक गाव जे अमर्त्य माणसांचं प्रेमनगर असेल. जिथं दु:ख, दैना आणि द्वेषाला अजिबातच स्थान नसेल.
सदाशिव अमरापूरकर आपल्या भूमिकांमधून अमर्त्य तर राहिले आहेतच, पण ते कबीराच्या याच कल्पितादर्शाला वास्तवात आणण्यासाठी उभं आयुष्य जगत राहिले.
शेवगाव तालुक्यातील अमरापूरमधील हा नाटकवेडा 'बंडू'. कॉलेजवयीन आयुष्यापासून जणू नाटक जगण्यासाठीच ठार वेडा झालेला.
पण 'ग्लॅमर' हे त्याचं उद्दिष्ट्य कधीच नव्हतं. ते असं रातोरात अचानक मिळूनही त्यानं कधी जमीन सोडली नाही.
किंबहुना, जमिनीवरच्या प्रश्नासाठीच तो सतत झटत राहिला. नरेंद्र दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असो वा सामाजिक कृतज्ञता निधी असो, आपण समाजाचं देणं लागतो, ही 'भूमिका' वठवणं त्यानं कधीच सोडलं नाही.
आज त्यांचा स्मृतिदिन. जाणून घेऊयात, सदाशिव अमरापूरकर या खलनायकी मुखवट्यामागच्या सच्च्या माणसाबद्दल.
नाटकवेडा 'बंडू'
सदाशिव अमरापूरकरांना कॉलेजवयीन जीवनापासूनच नाटकाचं वेड होतं.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आकाशवाणीची परिक्षा पास करून काही दिवस परभणी केंद्रावरही काम केलं होतं.
पण, तिथलं कोरडं उष्ण वातावरण न मानवल्यामुळे आणि कुणाच्या तरी आदेशाखाली सतत काम करत राहणं, हे त्यांच्या स्वभावाला धरून नसल्यामुळे त्यांनी ती नोकरी लगेचच सोडली आणि ते नाटकाच्या ओढीनं पूर्णवेळ अभिनयाकडेच वळले.
हौस म्हणून नाटक करण्याला त्यांच्या वडिलांचा विरोध नव्हता पण जेव्हा व्यावसायिक नाटकात जाण्याचा आणि पूर्णवेळ अभिनयाचाच निर्णय त्यांनी घेतला, तेव्हा त्यांच्या वडिलांचा त्यांना प्रचंड विरोध झाला.
हा विरोध आणि लग्न झालेलं असताना प्रचंड आर्थिक अस्थैर्य पत्करूनही ते नाटक करत राहिले.
याबाबतचा किस्सा सदाशिव अमरापूरकर यांनी 'राज्यसभा' टिव्हीला दिलेल्या आपल्या शेवटच्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
"एके दिवशी वडिलांनी मला नाटकाच्या सरावाला जाण्यापासून फारच अडवलं आणि घरी कोंडून ठेवलं. त्यांना असं वाटत होतं की, मी त्यात जरा अति वाहवत चाललोय. कारण, माझं लग्न झालं होतं, मुलं झाली होती, तरीही मी नाटकच करत होतो. त्यावेळी मला जाणीव झाली की, मी नाटक सोडून दुसरं काहीही करू शकत नाही. त्यावेळी मी वडिलांना ओरडून म्हणालो की, मी फक्त नाटक करू शकतो आणि मी तेच करणार."
त्यांच्या पत्नी सुनंदा या एलआयसीमध्ये कामाला होत्या. त्यामुळेही ते आपली आवड जोपासू शकले.
व्यावसायिक नाटक मिळेपर्यंत, नगरमध्ये सातत्याने नानाविध हौशी नाटकांचे प्रयोग करत राहणं आणि राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं बसवणं, हा त्यांच्या तोवरच्या आयुष्याचा भागच बनला होता.
त्यांना चित्रपटात काम करण्याची पहिली संधी मिळाली ती '22 जून 1897' या मराठी चित्रपटातून. त्यात त्यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली होती.
त्यानंतर सदाशिव अमरापूरकर यांना अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही पातळ्यांवर चांगली प्रसिद्धी मिळू लागली.
विजय तेंडुलकरांसहित अनेक नाटककारांची नाटकं त्यांनी दिग्दर्शित तर केलीच शिवाय, स्मिता पाटील पासून ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापर्यंत अनेक कलाकारांना नाटकांमध्ये दिग्दर्शितही केलं.

फोटो स्रोत, Reema Amarapurkar
त्यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांनी 'खुलभर दुधाची कहाणी' नावाचं आपलं आत्मकथन लिहिलंय.
अमरापूरकरांच्या नाटकाच्या या साऱ्या प्रवासाविषयी सांगताना त्या लिहितात की, "अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला निधी जमा करण्याकरता अनेक विद्यार्थ्यांकडून नाटकं करण्यात आली. त्यातूनच नाटकवेडाचं बीज त्यांच्यात पडलं."
पुढे त्या सांगतात की, "सदाशिव अमरापूरकर हा त्यातलाच एक नाटकवेडा मुलगा होता. त्याला जे आवडत होतं त्याबद्दलचं ज्ञान, मिळेल तिथून गोळा करत गेला आणि मग त्यातूनच पुढे नाटकाच्या सर्व अंगांची जाण असलेला उत्तम अभिनेता तयार झाला."
त्यांनी शालेय वयात कथाकथनमध्येही सगळ्यात जास्त आणि गावोगावची बक्षिसं पटकावली होती, असंही त्या सांगतात.
त्या म्हणतात की, "आता मागे वळून बघताना मला असं जाणवतं की, आयुष्यात जर सिनेमात जाण्याची संधी आली नसती, तर सदाशिव जन्मभर खूप आनंदाने नगरमध्ये राहून नाटकातच रमला असता."
सदाशिव अमरापूरकरांनी आपल्या कारकिर्दीत 'सूर्याची पिल्ले', 'छिन्न', 'कन्यादान', 'छू मंतर', 'मी कुमार', 'हवा अंधारा कवडसा', 'बखर एका राजाची', 'अकस्मात', 'ती फुलराणी', 'ज्याचा त्याचा विठोबा', 'हॅण्ड्स अप' अशा काही महत्त्वाच्या नाटकांमध्ये काम केलं.
'अर्धसत्य'ने दिलं रातोरात ग्लॅमर
1982 च्या सुमारास 'हँड्स-अप' या नाटकातील त्यांची पोलीस इन्स्पेक्टरची गाजत होती.
तेव्हा विजय तेंडुलकर 'अर्धसत्य' या हिंदी चित्रपटाची पटकथा लिहित होते. हा चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी दिग्दर्शित करणार होते.
तेंडुलकरांनी या चित्रपटातील इन्स्पेक्टरच्या रोलसाठी गोविंद निहलानी यांना सदाशिव अमरापूकर यांचं 'हँड्स-अप' हे नाटक पहायला सुचवलं. निहलानींनी नाटक पाहून अमरापूरकर यांना दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं.
याविषयी माहिती देताना सुनंदा अमरापूरकर सांगतात की, "त्यांनी सदाशिवला 'अर्धसत्य'साठी निवडलं खरं, पण त्यातील 'रामा शेट्टी' या छोट्या खलनायकी भूमिकेसाठी. ही भूमिका लांबीनं लहान होती. सदाशिव थोडा खट्टूच झाला, पण त्यानं भूमिका स्वीकारली. 'बघूया तर करून' या माफक विचारानं. फक्त तीनच दिवसांचं ते काम होतं."

फोटो स्रोत, GOVIND NIHLANI
पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेल्या हा 'रामा शेट्टी' इतका गाजला की ते रातोरात स्टार झाले.
त्यानंतर त्यांना चित्रपटात घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांची प्रचंड धडपड सुरू झाली.
हा किस्सा सांगताना सुनंदा अमरापूरकर लिहितात की, "आमच्याकडे फोन नव्हता. समोर होडीवाला म्हणून पारशी कुटुंब राही, त्यांच्याकडे असलेल्या फोनवर दिवसा-रात्री कधीही फोन येऊ लागले. त्या काळात सदाशिवकडं शेकड्यानं चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्याला तर बोलणी कशी करायची, कोण चांगले, कोण कसे, भूमिका कशी निवडायची, पैसे किती सांगायचे, किती मिळत असतात, अशी काहीच कल्पना नव्हती."

फोटो स्रोत, मेहता पब्लिशिंग हाऊस
शेवटी तेंडुलकरांनीच सदाशिव यांना सांगितलं की तुला एखादा सेक्रेटरी नेमावा लागेल.
चित्रपटाच्या या ऑफर स्वीकारताना अनेकांनी त्यांना स्क्रीनवरचं नाव 'रामा शेट्टी' असं लावण्याचा सल्ला दिला होता; पण त्यांनी ते स्पष्टपणे नाकारून 'सदाशिव अमरापूरकर' असंच ठेवण्यास सांगितलं.
पण त्यांच्या याच 'रामा शेट्टी'ने काही मिनिटांच्या दृश्यात थेट 'फिल्मफेअर' पुरस्काराला गवसणी घातली होती नि 'सदाशिव अमरापूरकर' हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतलं महत्त्वाचं नाव बनवून ठेवलं होतं.
नंतर कधीतरी अमरापूरकरांनी तेंडुलकरांना विचारलं होतं की, मला हा रोल तुम्ही का दिला, तेव्हा तेंडुलकर म्हणाले होते की, तुमचे डोळे अपॉर्च्यूनिस्ट आहेत.
"त्यानं मंत्र्यापासून गुंडापर्यंत आणि पोलिसांपासून तृतीयपंथी खलनायकापर्यंत सगळ्याच भूमिका केल्या. त्याही अस्सल वाटाव्यात अशा. पत्रकारांनी त्यावरून मला कितीतरी वेळा छेडलं, की त्यांनी अशी वाईट भूमिका केली. चित्रपटात अमकीतमकीवर बलात्कार केला. तुम्हाला काय वाटलं? अरे, जोपर्यंत तो त्याला दिलेलं काम चोख करतो आहे, वाईट माणसांची कामं चांगली करतो आहे, तोपर्यंत मला काही वाटायचा प्रश्नच कुठे येतो?" असं सुनंदा अमरापूरकर लिहितात.
खलनायकी भूमिकेपासून मिळालेली ओळख ते खलनायकी भूमिकांचा कंटाळा
सदाशिव अमरापूरकर यांचे डोळे बोलके होते, आवाज दमदार होता, त्यांना भूमिकेची समज अचूक होती. शिवाय, त्यांनी शब्दफेकीची 'नगरी शैली' राष्ट्रीय पातळीवर पोचवली. त्यांना इंडस्ट्रीत सामान्यत: 'तात्या' असं म्हटलं जायचं.
त्यांनी खलनायकी भूमिकाच मोठ्या प्रमाणावर केल्या. पण, त्यातही विविधता होती.
'सडक' चित्रपटात त्यांनी साकारलेली 'महाराणी' ही एक किन्नर खलनायिका भूमिका आजही आपल्याला खिळवून ठेवते.

फोटो स्रोत, VISHESH FILMS
अशा अनेक छटांचे खलनायकी रोल साकारल्यानंतर त्यांना खलनायकी भूमिकांचा कंटाळा येणं स्वाभाविकच होतं.
नंतर नंतर ते विनोदी भूमिकांकडेही वळले. 'इश्क' चित्रपटातील त्यांची भूमिका असो वा 'हम साथ साथ है'मधील करिष्मा कपूरच्या वडिलांची भूमिका असो, ते तिथेही छाप सोडून गेलेच.
त्यांनी 1979 ते 2014 पर्यंत सुमारे साडेतीनशे चित्रपटांत कामे केली.
त्यात मराठी, हिंदी, हरियाणवी, बंगाली अशा चित्रपटांचा समावेश आहे.
या चित्रपटांमध्ये 'आरं आरं आबा आता तरी थांबा', 'सावरखेड एक गाव', 'दोघी', 'वास्तुपुरुष', 'अर्धसत्य', 'आखरी रास्ता', 'सडक', 'कालचक्र', 'खतरों के खिलाडी', 'मोहरा', 'हम साथ साथ है', 'कुली नंबर वन', 'हुकूमत, ऐलाने जंग', 'मेरे दो अनमोल रतन', 'तेरी मेहेरबानिया', 'बॉम्बे टॉकीज' यांचा समावेश होतो.
त्यांनी 'भारत एक खोज', 'राज से स्वराज तक', 'भाकरी आणि फूल', 'शोभा सोमनाथ की' या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं.
त्यांना त्यांच्या कारकिर्दीत दोन फिल्मफेअर अवॉर्ड, क्रिटिक अवॉर्ड, पॉप्युलॅरिटी अवॉर्ड, सर्वोत्तम चरित्र अभिनेता अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
या चित्रपटांमध्ये 'आरं आरं आबा आता तरी थांबा', 'सावरखेड एक गाव', 'दोघी', 'वास्तुपुरुष', 'अर्धसत्य', 'आखरी रास्ता', 'सडक', 'कालचक्र', 'खतरों के खिलाडी', 'मोहरा', 'हम साथ साथ है', 'कुली नंबर वन', 'हुकूमत, ऐलाने जंग', 'मेरे दो अनमोल रतन', 'तेरी मेहेरबानिया', 'बॉम्बे टॉकीज' यांचा समावेश होतो.
त्यांनी 'भारत एक खोज', 'राज से स्वराज तक', 'भाकरी आणि फूल', 'शोभा सोमनाथ की' या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं.
त्यांना त्यांच्या कारकिर्दीत दोन फिल्मफेअर अवॉर्ड, क्रिटिक अवॉर्ड, पॉप्युलॅरिटी अवॉर्ड, सर्वोत्तम चरित्र अभिनेता अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
सामाजिक कार्यकर्त्यांचा खंदा आधारस्तंभ
त्यांच्या खलनायकी मुखवट्यामागे समाजाविषयी कणव असलेला एक सच्चा कार्यकर्ताही होता, हे फार कमी जणांना माहिती आहे.
त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट होती. ती भूमिका नुसतीच त्यांच्यापुरती स्पष्ट नव्हती तर ते समाजातील राजकीय-सामाजिक घटनांवर वेळोवेळी भूमिका घेतही होते.
निव्वळ वैचारिक भूमिका मांडूनही ते कधी स्वस्थ बसले नाहीत, तर ज्याला अक्षरश: तन-मन-धनाने म्हणता येईल, अशाप्रकारे ते अनेक सामाजिक चळवळींसाठी आधारस्तंभ ठरले.
अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी साधना साप्ताहिकामध्ये लिहिलेल्या 'अभिनेता असूनही कार्यकर्ता' या लेखात त्यांच्याबद्दल म्हटलंय की, "बऱ्याच कलावंतांना मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने 10 टक्के राखीव कोट्यातून स्वस्तात घरं मिळतात. तात्यांनाही असं घर 80 च्या दशकात मिळालं. पुढे स्वत:चं घर झाल्यावर केवळ दोनच कलाकारांनी सरकारी कोट्यातून मिळालेली घरं सरकारला परत केली. एक निळूभाऊ फुले आणि दुसरे तात्या. कोट्यवधी रुपये किंमत झालेल्या घराला सरकारची विनंती अथवा कोणाची टीकाटिप्पणी नसतानाही स्वत:हून परत करणारे तात्यांसारखे कलाकार होऊन गेले, यावर आज कोणाचा विश्वास बसणार नाही."

फोटो स्रोत, Reema Amarapurkar
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असो, वा अशा सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निधी उभा करण्यासाठीची 'सामाजिक कृतज्ञता निधी'ची संकल्पना असो, या सगळ्यात ते आघाडीवर होते.
त्यांनी निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, सुधीर जोशी, रीमा लागू, भारती आचरेकर अशा अभिनेत्यांसोबत बसवलेलं 'लग्नाची बेडी' हे नाटक महाराष्ट्रातील गावोगावी जाऊन सादर केलं.
त्यासाठी या कलाकारांनी एक रुपयाही घेतला नाही. त्यांच्यासोबत अनिल अवचट, नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव यांच्यासारखे कार्यकर्ते असत.
त्यातून जे लाखो रुपये जमा झाले, त्याच्या व्याजातून आजही सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मासिक मानधन दिलं जातं.
सध्या 'साकृनि'चे कार्यवाह असलेले सुभाष वारे सदाशिव अमरापूरकर यांच्या योगदानाविषयी बोलताना म्हणाले की, "त्यांनी फक्त या नाटकात कामच केलं नाही, तर त्यानंतरही होणाऱ्या विश्वस्त मंडळ बैठकांना ते उपस्थित असायचे. अगदी निळू फुले, श्रीराम लागूदेखील उपस्थित असायचे. ते सक्रियपणे सूचनाही करायचे. अशा कार्यकर्त्यांच्या शिबिरालाही अमरापूरकर हजर रहायचे. त्यांच्यासारखा माणूस शिबिरात येऊन आपलं ऐकतो, याचं कार्यकर्त्यांनाही अप्रूप वाटायचं."

फोटो स्रोत, Reema Amarapurkar
त्यांच्या कन्या रिमा अमरापूरकर बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "नरेंद्रकाकांचा फोन आला की, ते बऱ्याचदा गमतीनं फोन उचलता-उचलताच म्हणायचे की, "हा आता मला कामाला लावणार." पण त्यांनी सांगितलेलं काम तितक्याच तत्परतेनं करायचातसुद्धा. किंबहुना, 'कधी नरेंद्र आता मला काम सांगतोय.' याची ते जणू वाटच बघायचे."
गिरीश कुलकर्णी सांगतात की, "सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेचा कितीही राग आला तरी आपण स्वत: एकाकी पडू, अशा पद्धतीची राजकीय हाराकिरी चळवळीला परवडणार नाही, असं म्हणून तात्या आपल्या मतावर ठाम राहिले. नगरमध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. सर्व पक्षांनी गुन्हेगारांना राजरोस राजाश्रय दिला आहे. नगरच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल व नगरकरांच्या प्रतिक्रियाहीनतेबद्दल तात्यांनी एका जाहीर भाषणात गुन्हेगारांची नावे घेऊन परखड भाष्य केलं. तेव्हा नगर मेलेले नाही, हा संदेश सर्व नगरकरांमध्ये पसरून एक चैतन्य निर्माण झालं."
पुढे ते त्यांच्याबद्दल सांगतात की, "होळीच्या दिवशी पाण्याची चाललेली नासाडी आणि महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट या पार्श्वभूमीवर तात्यांनी मुंबईत निषेधाचा सूर काढला. विरोधकांनी हातापायी केली. परंपरावादी आणि संस्कृतिनिष्ठांनी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भेटल्यावर तात्यांनी सांगितलं की, 'आपण आपला मुद्दा समाजासमोर कृतिशीलपणे ठेवला, आपले काम झाले."
मुखवट्यामागचा सच्चा माणूस
चित्रपटसृष्टी ही आभासांची दुनिया आहे. जास्त दिवस त्यात राहिलं की, माणूस स्वत:बद्दलच्या आणि जगाबद्दलच्या आभासात जगायला लागतो, याची त्यांना पक्की जाणीव होती, असं रिमा अमरापूरकर सांगतात.
"त्यांनी स्वत:ला त्या आभासांपासून प्रयत्नपूर्वक लांब ठेवलं. म्हणूनच तर कुठेही परगावी शूटिंगला जाताना त्यांच्याबरोबर फिल्मी दुनियेशी संबंध नसलेले मित्र असायचे आणि मित्र असो वा नसो डझनभर पुस्तकं तरी नक्कीच असायची."
त्यांना फोटोग्राफी आणि चित्रं काढण्याचीही आवड होती. पुस्तकं तर ते भरपूर वाचायचे. अगदी चित्रपटाच्या सेटवरही मधल्या वेळात ते पुस्तकं वाचायचे, असं त्या सांगतात.
"लायब्ररीतून पुस्तकं आणण्यापेक्षा विकत घेऊनच पुस्तक वाचायचं, असा त्यांचा दंडकच होता. त्यामुळे, पुस्तकंही जगतात, असं त्यांचं मत होतं. त्यांच्यामुळे आमच्या घरी अगदी वैचारिक पासून ते सस्पेन्स-थ्रिलरपर्यंत, सगळ्या प्रकारची पुस्तकं जमा झालेली आहेत. त्यांचा हा वाचनाचा संस्कार आम्हीही कधी सोडला नाही."
सुनंदा अमरापूरकर या त्यांच्या अगदी बालपणापासूनच्या मैत्रिण. नाटकातूनच त्यांचं सूत जुळत गेलं आणि त्यांनी या बालमैत्रिणीशीच लग्न केलं.

फोटो स्रोत, Reema Amarapurkar
त्या सांगतात की, "तो वयापेक्षा जास्त परिपक्व होता. सगळ्या बाबतीतला साधेपणा आणि अस्सलपणा त्याला आवडत होता. काय अस्सल आणि काय कमअस्सल ते त्याला अचूक समजत असे. म्हणून तो कधी 'वरलिया रंगा'ला भुलला नाही. कशाला भुलून काही करणाऱ्यातला तो नव्हताच. त्याचं हे वेगळेपण मला भावत असे."
ते वेळेच्या बाबतीत काटेकोर होते. ठरलेल्या ठिकाणी वेळेवर जायचं, हा त्याचा नियमच होता, असंही त्या सांगतात.
"सदाशिवचं एक वैशिष्ट्य होतं. त्याला कायम मित्र सोबत लागायचे. गप्पा मारायला. म्हणजे तो मजेत असायचा. मित्र हा घटक त्याच्या संपूर्ण आयुष्यात फारच महत्त्वाचा होता."
रिमा अमरापूरकर सांगतात की, "त्यांच्या मित्रांमुळे आणि पुस्तकांमुळे त्यांचं खऱ्या जगाशी, खऱ्या प्रश्नांशी, खऱ्या माणसांशी असलेलं नातं कधीही तुटलं नाही. उलट ते घट्ट होत गेलं आणि त्याचे बारकावे, कंगोरे त्यांना समजत गेले. त्यामुळे कोणत्याही घटनेबद्दल बोलताना, त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच दृष्टिकोन दिसून यायचा."
सदाशिव अमरापूरकरांचं 2014 साली निधन झालं.
आपल्या शेवटच्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, "अभिनय करणं, भूमिका करणं हाच हाच माझा श्वास आहे."
या विधानाप्रमाणेच, ते आयुष्यभर भूमिका करत राहिले आणि घेतही राहिले.
संदर्भ:
1. खुलभर दुधाची कहाणी - सुनंदा अमरापूरकर - मेहता पब्लिशिंग हाऊस
2. Guftagoo with Sadashiv Amrapurkar - Sansad TV
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











