कामेरा : 'विषप्रयोग' करण्यासाठीची रशियातील गुप्त प्रयोगशाळा, शत्रूंचा काटा काढण्यासाठी व्हायचा वापर

विषाची बाटली

फोटो स्रोत, Getty Images

( ही बातमी बीबीसी मराठीवर पहिल्यांदा जून 2022मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. ती पुन्हा शेअर करत आहोत.)

सोव्हिएत संघाचे पहिले नेते व्लादिमीर लेनिन यांनी 1922 सााली हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्वतःला संपवण्यासाठी उत्तराधिकारी जोसेफ स्टॅलिन यांना सायनाईड द्यायला सांगितलं होतं, असं काहींचं मत आहे.

मात्र, स्टॅलिन यांनी नकार दिला. सायनाईडसारख्या विषाच्या प्रयोगाचे हे सुरुवातीचे दिवस होते.

मात्र, इतर काहींच्या मते 1918 साली बोल्शेविक क्रांतीदरम्यान लेनिन यांना गोळी घालण्यात आली, त्यावेळी याची सुरुवात झाली. डॉक्टरांच्या मते त्यांना जी गोळी लागली होती ती आधी क्युरेर रेसिन या विषात बुडवण्यात आली होती.

तर 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला लेनिन यांच्या आदेशावरून क्रेमलीन विष कारखान्याची स्थापना झाली, अशी खात्री काही सूत्रांना वाटते. विषाच्या या संशोधन केंद्रात सोव्हियत संघ आपल्या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असे.

सोव्हिएत रशियाची पहिली राजकीय आणि लष्करी गुप्तचर संघटना असलेल्या 'चेका' पासून याची सुरुवात झाल्याचं बोललं जातं.

क्रांतीच्या विरोधात सुरू असलेलं कार्य किंवा क्रांतीच्या मार्गावरून भरकटलेल्या लोकांचा बिमोड करणं, हे या गुप्तचर संस्थेचं काम होतं.

सोव्हिएतच्या या गुप्तचर यंत्रणेचं नाव अनेकदा बदलण्यात आलं होतं. अगदी सुरुवातीला त्याला 'स्पेशल ऑफिस' म्हटलं गेलं. पुढे लॅबोरेटरी -1, लॅबोरेटरी-एक्स, लॅबोरेटरी-12 अशीही नावं ठेवण्यात आली. स्टॅलिन यांच्या काळात या प्रयोगशाळेला 'कामेरा' किंवा 'द चेंबर' नावाने ओळखलं जायचं.

रशियन भाषेत 'कामेरा' म्हणजे 'तुरुंग'

सोव्हिएत संघाचं विघटन झालं त्यावेळी कामेराच्या अनेक गुप्त मोहिमा लीक झाल्या. अनेक असंतुष्टांनी त्यांची पुष्टी केली.

मात्र, आजही कामेरामध्ये अनेक गुपितं दडल्याचं बोललं जातं. यावरूनच कामेरा किती गूढ होतं याचा अंदाज बांधता येतो.

प्रभावी हत्यार

राजकीय हत्यार म्हणून विषाचा वापर करण्याची परंपरा फार जुनी आहे. विषाच्या शक्तीचा अंदाज येण्यासाठी नोकरांवर त्याचा वापर करून बघितल्याचेही संदर्भ इतिहासात आढळतात. इतकंच नाही तर याचा वापर करणारा सोव्हिएत संघ एकमेव होता आणि शेवटचा असेल, असंही नाही.

सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने 1960 साली फिडेल कॅस्ट्रो यांच्या हत्येचा प्रयत्न केला तेव्हा सिगारमध्ये बोटुनिलम हे विष मिसळून देण्यावरही विचार झाला होता. फिडेल कॅस्ट्रो सिगारचे शौकीन होते.

कुठल्याही अतिविशेष व्यक्तीला ठार करण्याची योजना आखताना या घातक आणि प्रभावी विषाच्या वापराचा विचार व्हायचा.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

असं विष जे ठार करेल आणि सुगावाही लागणार नाही.

मात्र, कामेराचं उद्दीष्टं असं विष तयार करण्याचं होतं जे चवहीन असेल, गंधहीन असेल आणि मारेकऱ्याचा सुगावाही लागणार नाही.

1957 साली सोव्हिएत संघविरोधी लेखक लेव्ह रेबेट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, असं मानलं गेलं. चार वर्षांनंतर केजीबी या गुप्तचर संस्थेच्या एका हेराने आपण रेबेट यांच्या चेहऱ्यावर सायनाईडच्या बाटलीतून विषारी गॅस सोडल्याचा दावा केला होता.

एका राजकारण्याचाही मृत्यू त्यांच्या रीडिंग लँपवर शिंपडलेल्या द्रवाने झाला होता. बल्बच्या उष्णतेने ते द्रव संपूर्ण खोलीत पसरलं आणि त्यात त्या राजकाण्याचा मृत्यू झाला होता.

केजीबीच्या हेरांनी सोडियम फ्लोराईडचाही वापर केला. या विषाचा ठराविक प्रमाणात वापर केला तर मृत्यूचं नेमकं कारणच शोधता येत नाही. कारण, अनेकजण रोजच्या जिवनात याचा वापर करतात आणि त्यांच्या रक्तात आधीपासूनच सोडियम फ्लोराईड असतं.

उंदिर मारण्यासाठीचं औषध असलेल्या थॅलियम या विषाचाही माणसावर वापर व्हायचा. थॅलियम रेडिएशन गुणधर्म असणारा आहे. जास्त प्रमाणात दिल्यास त्यातून घातक किरणोत्सर्ग होतो.

मार्कोव बल्गेरियात प्रथितयश लेखक होते. पत्नी एनाबेल आणि मुलगी अलेक्झांड्रा रायनासह.
फोटो कॅप्शन, मार्कोव बल्गेरियात प्रथितयश लेखक होते. पत्नी एनाबेल आणि मुलगी अलेक्झांड्रा रायनासह.

खरंतर डॉक्टर या विषाची लक्षणं ओळखतात. मात्र, मारेकऱ्यांनी एखाद्याला एवढ्या छोट्या प्रमाणात थॅलियम दिलंय की त्यातून शरीरात प्राणघातक किरणांचं उत्सर्जन होऊन हळूहळू त्याचा मृत्यू होईल, याचा अंदाज डॉक्टरांना येत नसे आणि पोस्टमॉर्टेम होईपर्यंत थॅलियमचं विघटन होऊन ते उडून जायचं. त्यामुळे शरीरात विषाचे ट्रेसेस सापडत नसत. काही प्रकरणांमध्ये विष देऊन हत्या केल्याचं आढळून आलं तरी मारेकऱ्याचा शोध लागत नसे. अशा प्रकरणांमध्ये खुनासाठी अज्ञात हत्यार वापरल्याचं सांगितलं जाई आणि विष वैज्ञानिकही काही जुजबी स्पष्टीकरण द्यायचे.

विषप्रयोगात अनेक शक्यता असतात आणि मारेकरी याच शक्यतांचा फायदा घेतात.

काळजीपूर्वक हत्येचं नियोजन केलं आणि अनुभवी एजेंटने त्याची अंमलबजावणी केली असेल तर विषप्रयोगाच्या प्रकरणांमध्ये आरोप कधीच सिद्ध व्हायचे नाहीत.

विषप्रयोगाचा दुसरा फायदा असा की हा इतरांसाठी इशारा असायचा. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली तर त्याचे किती गंभीर परिणाम होतील, अशी गर्भीत धमकी यात असायची.

काही विषप्रयोगांमध्ये तात्काळ मृत्यू होत असे तर काही खूप वेदनादायी असत. वेदनादायी विषप्रयोगात मृत्यू येण्याआधी मरणयातना भोगाव्या लागत आणि आपली जवळची व्यक्ती अशा मरणयातना भोगत असताना बघणं, त्याच्या कुटुंबीयांसाठीही भयावह आणि वेदनादायी असायचं.

माणसांवर विषप्रयोग

वसीली मित्रोखीन यांनी लिहिलेली 6 ट्रंक भरून कागदपत्रं 30 वर्षांनी सापडली तेव्हा या प्रयोगशाळेच्या अस्तित्वाचा पहिला संदर्भ पाश्चिमात्य देशांच्या हाती लागला. त्यांनी केबीजीच्या परदेशातल्या शाखेत आणि पहिल्या मुख्य संचलनालयात अभिलेखागार पदावर असताना ही सर्व कागदपत्रं गोळा केली होती.

रशियाचे अनेक माजी गुप्तचर अधिकारी, काही निवृत्त तर काही दलबदलू अधिकाऱ्यांनी सिक्रेट सर्व्हिसची आणखी अनेक गुपितं उघड केली. मात्र, स्टॅलिनचे माजी गुप्तहेर पावेल सुदोप्लातोव्ह यांनी ती प्रयोगशाळा आणि तिचे संचालक प्रा. ग्रिगोरी मॅरानोव्हस्की यांच्याविषयी लिहिलेली माहिती सर्वांत धक्कादायक होती.

मॅरानोव्हस्की नियमित तपासणीच्या नावाखाली लोकांना विषाचे इंजेक्शन्स द्यायचे, असं सुदोप्लातोव्ह यांचं म्हणणं होतं.

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

स्टॅलिन यांचे गुप्त पोलीस प्रमुख लव्हरेंटी बेरिया आणि जनरल वसीली ब्लोखीन यांच्या आदेशावरून मॅरानोव्हस्की यांनी कामेरामध्ये तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा गुलाग या छळछावणीतल्या कैद्यांवर वापर केला होता. यात मस्टर्ड गॅस, डिजिटॉक्सिन, क्युरेर, सायनाईड आणि इतर अनेक प्रकारच्या विषांचा समावेश होता.

या विषप्रयोगांचे एक पीडित स्वीडनचे डिप्लोमॅट राउल वॉलेनबर्ग हेदेखील होते. सोव्हिएत संघाच्या कैदेत त्यांचा गूढ मृत्यू झाला होता. युक्रेनच्या काही राष्ट्रवादी नेत्यांचाही असाच गूढ मृत्यू झाला होता.

जागतिक पटलावर सोव्हिएत संघ

अभ्यासकांच्या मते शीतयुद्ध शीगेला पोहोचलं असताना राजकीय प्रतिस्पर्धी, असंतुष्ट, दलबदलू, निर्वासित आणि सोव्हिएत प्रजासत्ताकच्या उद्देशाने स्वातंत्र्य समर्थक नेत्यांवर नर्व्ह एजंट आणि रासायनिक अस्त्रांच्या वापराचा एक नवा पॅटर्न उदयास आला.

अगणित लोकांनी या भयाचा सामना केला. रशियन लष्कराच्या गुप्त सेवेत काम केलेले आणि 'द केजीबी पॉयझन फॅक्ट्री' या पुस्तकाच्या लेखकाने द वॉल स्ट्रीट जनरलच्या आपल्या लेखात लिहिलंय, "विषच सापडलं नाही तर त्यामुळे किती लोकांचा मृत्यू झाला, हे तरी कसं कळणार?"

सोव्हिएत संघाच्या शेवटच्या काळात केजीबीने शत्रूंचा काटा काढणं सुरू ठेवलं होतं, हे सर्वश्रृत आहे. 1978 साली बीबीसीचे पत्रकार जॉर्जी इव्हानोव्ह मार्कोव्ह यांची लंडनमध्ये हत्या करण्यात आली. या कटात केजीबीचा हात होता, हे केजीबीचे हेर ओलेग कलुगीन यांनी मान्य केलं आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

कामेरामध्ये रिसीन या विषारी पदार्थाचं छोट्या दाण्यांच्या रुपात उत्पादन घेतलं गेलं. कुणालाही कळू न देता इंजेक्ट करण्यासाठी ते डिझाईन करण्यात आलं होतं. याने छोटा किडा चावल्याइतकाच त्रास व्हायचा आणि पोस्ट मॉर्टेममध्ये त्याचा सुगावाही लागायचा नाही.

बल्गेरियन मारेकऱ्यांनी हे विष आपल्या छत्र्यांच्या टोकावर ठेवून खून केले.

मात्र, अनेकांचा बळी घेण्यासाठी विष तयार करणारी ही प्रयोगशाला बंद झाली का की कुठल्यातरी स्वरुपात ती अजूनही सुरू आहे, हे आजही निश्चित सांगता येत नाही. कामेराचं गूढ अजूनही कायम आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.