'माझ्याकडे तुझे नग्न फोटो आहेत'; बीबीसीनं सेक्सटॉर्शन प्रकरणाचा 'असा' काढला माग

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तीर धोंडी,
    • Role, बीबीसी

"माझ्याकडे तुझे नग्नावस्थेतले फोटो आहेत आणि तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत."

हा थरकाप उडवणारा मेसेज अमेरिकेतील किशोरवयीन मुलगा इव्हान बोएटलरला सोशल मीडियावर आला. त्याला वाटले होते की, तो एखाद्या मुलीसोबत बोलतोय, पण प्रत्यक्षात तो एक सायबर स्कॅमर होता.

पहिला मेसेज आल्यानंतर केवळ 90 मिनिटांत 16 वर्षांच्या इव्हानने आपले जीवन संपवले.

सेक्सटॉर्शन म्हणजे लैंगिक गोष्टीवरून केले जाणारे ब्लॅकमेलिंग. सेक्सटॉर्शन हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन गुन्ह्यांपैकी एक आहे. यात बळी ठरलेल्या लोकांना, विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील किशोरवयीन मुलांना फसवून त्यांच्याकडून खासगी फोटो किंवा व्हीडिओ मागवले जातात. हे स्कॅमर त्यावर पैशाची मागणी करून पैसे न मिळाल्यास ते सार्वजनिक करण्याची धमकी देतात.

"त्या रात्री जेव्हा आम्हाला सांगितले की, तो गेला आहे, तेव्हा काहीच समजले नाही. आमच्या कुटुंबात हे कसे होऊ शकते हे मला अजूनही उमजत नाहीये," इव्हानची आई कॅरी सांगते.

मिसूरीमधील त्यांच्या घरी, जिथे ती इव्हनचे वडील ब्रॅडसोबत राहते, कॅरी आपल्या मुलाचे वर्णन करताना सांगते की, तो एक हुशार, आनंदी मुलगा होता ज्याला मासेमारी, खेळ आणि शिकारीची आवड होती.

ते सांगतात की, जानेवारी 2024 च्या गारठलेल्या दुपारी स्नॅपचॅटवर इव्हानला 'JennyTee60' नावाच्या मुलीकडून मेसेज आला. पण प्रत्यक्षात ती मुलगी नव्हती. काही मिनिटांतच 'जेनी'ने इव्हानला स्वतःचे खासगी फोटो शेअर करायला प्रवृत्त केले आणि लगेचच त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

एव्हन बोएटलरचे आई-वडील त्याचं वर्णन एक हुशार, मजेशीर आणि उत्साही तरुण म्हणून करतात ज्याला मासेमारी, खेळ आणि शिकार करायला प्रचंड आवडायचं.
फोटो कॅप्शन, एव्हन बोएटलरचे आई-वडील त्याचं वर्णन एक हुशार, मजेशीर आणि उत्साही तरुण म्हणून करतात ज्याला मासेमारी, खेळ आणि शिकार करायला प्रचंड आवडायचं.

2 वर्ष उलटूनही बोएटलर कुटुंबाचे दु:ख अजून तसूभरही कमी झालेले नाही. एफबीआयने दबाव टाकूनही मेटासारख्या सोशल मीडिया कंपन्या कोर्ट ऑर्डरशिवाय माहिती देत नाहीत. इव्हानच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुढील तपासात फारशी प्रगती केली नाही असे दिसते.

मात्र एक धागा मिळाला होता. स्कॅमरने इव्हानकडून फेसबुक लॉग-इन मागितले आणि वापरताना आपला आयपी अॅड्रेस मागे सोडला.

त्या डिजिटल पुराव्यावरून माग काढत मी नायजेरियामधील काही ठिकाणांवर पोहोचलो, विशेषतः लागोस या मोठ्या शहरात, जिथे मला या गुन्ह्याच्या मागे असलेले लोक सापडतील अशी आशा होती.

माझी पहिली भेट झाली ती शहरातील बकाल समजल्या जाणाऱ्या भागात राहणाऱ्या "याहू बॉयज"शी. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ईमेलद्वारे फसवणूक करणाऱ्या लोकांवरून हे नाव पडले.

हे तरुण, साधारण 20 वर्षांच्या आसपासचे, गरीब वस्त्यांमध्ये राहत होते पण त्यांना जलद पैसे आणि महागड्या गाड्यांची स्वप्नं पडत होती.

तेथे मला ओला भेटला. त्याने सेक्सटॉर्शनची पद्धत अगदी सहजतेने समजावून सांगितली.

"तू एखाद्या महिलेच्या नावाने अकाउंट उघडतोस, खोटी नावं बनवणाऱ्या साइट वरून.. या अश्या साईट्स आहेत जिथे तुला हव्या त्या देशातील लोकांची खोटी नावं मिळतात," असं तो म्हणाला.

आम्ही अडेसोबत गेलो, जेव्हा तो एका पारंपरिक वैद्याकडे गेला होता. तेथे एका विधीमध्ये कबूतराचं बलिदान दिलं गेलं, ज्यामुळे त्याला संपत्तीशी जोडले जाईल, असा त्यांचा विश्वास होता. 
फोटो कॅप्शन, आम्ही अडेसोबत गेलो, जेव्हा तो एका पारंपरिक वैद्याकडे गेला होता. तेथे एका विधीमध्ये कबूतराचं बलिदान दिलं गेलं, ज्यामुळे त्याला संपत्तीशी जोडले जाईल, असा त्यांचा विश्वास होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रोफाईल तयार झाल्यावर सावज शोधण्यास सुरुवात होते. समोरच्या स्क्रीनवरील मुलं स्कॅमर्ससाठी फक्त एक युजरनेम असतात. दिवसातून शेकडो लोकांना मेसेज जातात, ज्यात एकाने जरी पैसे पाठवले तरी त्यांचा फायदा होतो.

मी त्याला बोललो की हे निर्दयी आहे, एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. तो म्हणाला, "मला वाईट वाटत नाही कारण मला पैशांची गरज आहे."

त्याला अमेरिकन किंवा ब्रिटिश किशोरवयीन मुलाकडे पैसे नसतील हे पटणे अशक्य होते. त्याच्या मते, पाश्चिमात्य देशात जन्म म्हणजे आपोआपच सुबत्ता.

त्याने स्पष्ट सांगितले की तो मुलांनाच लक्ष्य का करतो.त्याचे असे म्हणणे आहे की, मुलांचा सेक्सकडे कल जास्त असतो, आणि त्यांना भीती असते की फोटो वर्गात, पालकांकडे किंवा मित्रांकडे जाईल.

ओला एकटाच काम करत होता, पण इतर काही प्रकरणांत दिसले की लागोसमधील सेक्सटॉर्शन आता संघटित टोळ्यांच्या स्वरूपात चालते. या टोळ्यांना प्रमुख असतात, त्यांच्याखाली एक सिस्टिम आहे, साधनं आहेत ज्यांच्या माध्यमातून अधिकाधिक नफा वाढवण्याचा प्रयत्न असतो.

माझी शोधयात्रा मला मकोको या गरीब भागात घेऊन गेली, जिथे पाण्यात उभारलेल्या लाकडी खांबांवर घरं उभी आहेत.

चित्रिकरणासाठी आधी तेथील प्रमुखांची परवानगी घ्यावी लागली आणि स्थानिक लोक मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत होते.

मला आधीच सांगितले गेले होते की येथे काही ठिकाणी "हसल किंग्डम्स" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणांवर तरुणांच्या टोळ्या फोनवरून ऑनलाइन फसवणूक चालवतात. अशा ठिकाणांचे व्हिडिओ किंवा चित्रीकरण फारच क्वचित किंबहुना कधीच झालेले नव्हते. पण बराच संवाद आणि खूप प्रयत्नांती मला अखेर तेथे प्रवेश देण्यात आला.

इन्स्टाग्रामवरील फसवणुकीनंतर ब्रँडन गफींच्या १७ वर्षांच्या मुलानं आयुष्य संपवलं.
फोटो कॅप्शन, इन्स्टाग्रामवरील फसवणुकीनंतर ब्रँडन गफींच्या १७ वर्षांच्या मुलानं आयुष्य संपवलं.

'हसल किंग्डम्स' एका कमी उंच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होती. एका लहानशा खोलीत डझनभर तरुण लॅपटॉप आणि फोन घेऊन बसले होते. वातावरण कॉल सेंटरसारखे होते. खोटी प्रोफाईल्स, बनावट स्क्रिप्ट्स आणि नवीन सावजांची नावं एकमेकांना देत होते.

सर्व पैसे म्होरक्याकडे, म्हणजे "घोस्ट" नावाच्या माणसाकडे जात होते. तेथे अनुभवी स्कॅमर आपले शिष्य तयार करत होते.

दिसायला ही अगदी सोपी कमाई वाटत होती, त्यांना आकर्षण होतं झटपट पैशाचं, पण त्यांच्या दिखाव्याच्या आड दडलेलं होतं काही तरी अधिक भयंकर. किशोरवयातील मुलांना गुन्ह्याच्या जगात ओढलं जात होतं.

मोठे मेंटॉर्स त्यांना स्वप्नं दाखवत आणि प्रत्येक फसवणुकीतून हिस्सा घेत. आणि अशा प्रकारे तयार होतो एक गुन्ह्यांचा सापळा ज्यातून सुटणं जवळपास अशक्य असतं.

मी पाहिले तेव्हा लक्षात आले की हा प्रकार आता एकट्या स्कॅमरचा राहिला नाही. ही संघटित, कार्यक्षम आणि निर्दयी पद्धत होती.

इव्हानचा स्कॅमर अशा हसल किंग्डमचा भाग होता का? घोस्ट म्हणाला की ते प्रामुख्याने आर्थिक, रोमान्स स्कॅम करतात. सेक्सटॉर्शन हे लाजिरवाणे मानले जाते.

तरीही त्यांनी सांगितले की अनेक याहू बॉईज "याहू प्लस" कडे वळत आहेत. ते स्थानिक मांत्रिकाकडे जाऊन आशीर्वाद घेतात, मंत्र करून सावज सहज फसतील असे मानतात.

पारंपारिक मंत्रतंत्र करणारे लोक म्हणजे तिथल्या संस्कृतीचा जुना पाया. म्हणून या तरुणांसाठी त्यांच्याकडे जाणं म्हणजे नवीन सिम कार्ड घेण्याइतकं सहज आणि सामान्य होतं.

मी 20 वर्षांचा ॲडी भेटला, जो नुकताच सेक्सटॉर्शन करत होता. त्याने मला एका सायबर-आध्यात्मिकतावाद्याकडे नेले. एक असा माणूस, जो त्याच्या मते जास्त पैसा कमवायला मदत करू शकतो.

तो शहराच्या एका भागात लपून बसलेला होता . तिथे एका खोलीत मूर्ती होत्या, तिथे कबुतराचे बलिदान देण्यात आले. त्याचं रक्त जमिनीवर सांडत होतं. ॲडीला सांगण्यात आलं की रक्ताचे थोडे अंश खा. त्याच्या मते हा व्यवसायासाठी खर्चाचा भाग होता.

मला सर्वात प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे जुन्या आणि नव्या जगाचा संगम. एका बाजूला शतकांपूर्वीचे विधी, तर दुसरीकडे डीपफेक तंत्रज्ञान वापरणारे स्कॅमर.

नंतर मला आणखी एक स्कॅमर भेटला जो २१व्या शतकातील जादू वापरत होता. म्हणजेच डीपफेक टेक्नॉलॉजी. त्याने एका रेचल नावाच्या महिलेला पैसे दिले होते जसे भाड्याने घेतल्यासारखे. आणि तिचाच चेहरा वापरून तो लोकांना फसवत होता. त्याने मला आपल्या लॅपटॉपवर अॅप दाखवला. प्रोफेशनल लेव्हलचं फेस-स्वॅपिंग टूल ज्याची किंमत होती तब्बल $3,500 (सुमारे ₹२.६ लाख). तो म्हणाला, "कमाई जर पहिली तर हा खर्च नक्कीच वसूल होतो ."

आमच्या डोळ्यांसमोर ‘हसल किंग्डम्स’मधले तरुण फसवणुकीचे डाव रचत होते. त्यांचे बहुतांश स्कॅम पैशांशी आणि प्रेमाच्या नावाखालील फसवणुकीशी जोडलेले होते.
फोटो कॅप्शन, आमच्या डोळ्यांसमोर 'हसल किंग्डम्स'मधले तरुण फसवणुकीचे डाव रचत होते. त्यांचे बहुतांश स्कॅम पैशांशी आणि प्रेमाच्या नावाखालील फसवणुकीशी जोडलेले होते.

अमेरिकेत गेल्या तीन वर्षांत सेक्सटॉर्शनच्या तक्रारी दुप्पट झाल्या, 2024 मध्ये 55,000 वर पोहोचल्या. ब्रिटनमध्ये दर महिन्याला 110 प्रकरणे नोंदवली जातात.

सोशल मीडिया कंपन्या सांगतात की त्या कारवाई करतात, पण टीकाकारांच्या मते त्या अधिक कठोर पाऊले उचलू शकतात.

साऊथ कॅरोलिनामध्ये माझी भेट झाली ब्रँडन गफी यांच्याशी जे राज्याचे प्रतिनिधी आहेत . ज्यांचा मुलगा गॅविन ने 2022 मध्ये इंस्टाग्रामवर लक्ष्य बनल्यानंतर आत्महत्या केली. तो फक्त १७ वर्षांचा होता.

ब्रँडन मेटाविरुद्ध खटला दाखल करणार होता. त्यांचा आरोप होता की कंपनीने त्यांच्या मुलाचं सायबर शिकाऱ्यांपासून योग्य संरक्षण केलं नाही. ब्लॅकमेलसाठी वापरलेले एक खाते नंतर हटवण्यात आलं, पण इतर अकाउंट्स सुरूच राहिले.

मेटाने 2024 मध्ये नायजेरियाशी संबंधित 63,000 अकाउंट्स बंद केल्याचा दावा केला. यापैकी 2,500 अकाउंट्स एकाच जाळ्यातून चालवले जात होते, जी पाश्चिमात्य देशांतील किशोरवयीन मुलांना लक्ष्य करत होती. पण टीकाकार म्हणतात, ही संख्या समस्या किती मोठी आहे हेच दाखवते.

ब्रँडन म्हणतात की, "हे सगळं त्यांनी एका दिवसात फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं का, जेव्हा मुलांवर अजूनही हल्ले सुरू आहेत. आणि जर खरंच एका दिवसात इतकं काही करू शकले, तर मग त्यानंतर काहीच का केलं नाही?"

यावर मेटाच्या प्रवक्त्याने उत्तर दिलं की, "आम्ही फक्त हवं तसं केलं असतं तर सेक्सटॉर्शन संपलं असतं. हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. ते म्हणतात की, "आम्ही हे थांबवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. स्कॅमर नेटवर्क तोडून आणि कायद्याच्या यंत्रणेला मदत करून."

मेटाचे प्रवक्ते म्हणाले की हे एकाच दिवशी संपवता येईल असे म्हणता येणार नाही.सध्या आमच्याकडे जागतिक पातळीवर 40,000 कर्मचारी सुरक्षेसाठी काम करत आहेत, गेल्या दशकात 30 अब्ज डॉलर्स गुंतवले गेले आहेत.

मेटाचे माजी इंजिनिअर आर्टुरो बेझार यांनी अमेरिकन काँग्रेससमोर सांगितलं की कंपनी मुलांच्या सुरक्षेबाबतच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करते.

त्यांनी मला सांगितलं की तरुण वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेली प्रणाली मूळतः अपुरी आणि निकृष्ट होती.

त्यांनी सांगितलं, "ते सतत दाखवत आहेत की त्यांना मुलं संकटात आहेत हे जाणून घेण्याची इच्छा नाही आणि इतर लोकांना हे कळवायचीही इच्छा नाही. कारण त्यांना त्याच्याशी सामना करायचा नाही."

मेटाने सांगितले की, मिस्टर बेझारने सुचवलेल्या अनेक उपाययोजना आधीच लागू आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, गतवर्षी इंस्टाग्रामवर किशोर खात्यांसाठी अंगभूत संरक्षणासह नवीन फीचर लागू केले गेले, ज्यामुळे ते फक्त आधीपासून कनेक्ट असलेल्या लोकांकडूनच मेसेज मिळवू शकतात.

प्रवक्त्याने सांगितले की, कोणतीही गोष्ट स्पॅम म्हणून रिपोर्ट केली गेली असेल आणि जर ती समुदायाच्या नियमांचं उल्लंघन करत असेल तर कंपनी कारवाई करते.

इव्हान बोएटलरच्या प्रकरणाबद्दल स्नॅपचॅट ने सांगितले की, "बोएटलर कुटुंबाच्या दु:खात आम्ही त्यांच्यासोबत आहोत."

स्नॅपचॅटने सांगितले: "आम्हाला सेक्सटॉर्शन अजिबात मान्य नाही. असे आढळल्यास आम्ही खाते लगेच बंद करतो आणि पोलिसांना मदत करतो."

जर तुम्ही ऑनलाइन छळाचे बळी ठरला असाल, तर मदतीसाठी BBC Action Line पाहू शकता.

इंटरनेट वॉच फाउंडेशनकडे एक टूल आहे, जिथे 18 वर्षांखालील मुले आपले न्यूड किंवा लैंगिक फोटो गुप्तपणे रिपोर्ट करून इंटरनेटवरून काढून टाकू शकतात.

आणि जर फोटो, व्हिडिओ अद्याप ऑनलाइन प्रकाशित झालेले नसतील, तरी त्या चॅरिटीकडे त्या चित्रासाठी डिजिटल फिंगरप्रिंट तयार करण्याची सोय आहे ज्यामुळे ते पुढे ऑनलाइन शेअर होण्यापासून रोखता येते. परंतु त्यांनी स्पष्ट केले की एन्क्रिप्ट केलेल्या नेटवर्क्स (उदा. WhatsApp) किंवा कोणाच्या तरी फोन/कंप्युटरवर सेव्ह केलेल्या फाइल्समधून ती सामग्री काढता येत नाही.

ब्रिटनमध्ये, ही चॅरिटी Childline सोबत काम करते, जी "Report Remove" सेवा द्वारे हे साधन उपलब्ध करून देते. या सेवेत मुलाला काउन्सलरशी बोलण्याचा पर्यायही दिला जातो.

IWF ने सांगितले की, 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांत त्यांनी 'रिपोर्ट रिमूव्ह' कडून आलेल्या ७२३ तक्रारींवर कारवाई केली, त्यापैकी २२४ प्रकरणं सेक्‍सटॉर्शनशी संबंधित होती.

दरम्यान, इव्हनच्या आईवडिलांसाठी न्याय मिळवणे अजूनही अवघड आहे. मेटा आणि स्नॅपचॅट डेटा देण्यास तयार नाहीत, तर ज्या नायजेरियन सेवा प्रदात्याशी आयपी अॅड्रेस जोडला होता, त्याने माहिती जतन केलेलीच नव्हती. पुरावे गमावले गेले.

मेटा आणि स्नॅपचॅट डेटा प्रदर्शित करण्यात असमर्थ असल्यामुळे, इव्हानच्या स्कॅमरचा शोध घेण्याची सर्व आशा आता GloWorld कडे होती. ही नायजेरियातील सेवा प्रदाता असून IP पत्त्याशी लिंक होती.

काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर, अखेर मला याप्रकरणाबद्दल माहिती मिळाली. GloWorld ने ही माहिती दोन वर्षे ठेवायची होती, पण त्यांनी ती ठेवली नाही.

मी बोएटलर्सना फोन केला. त्यांनी माझ्या प्रयत्नांचे आभार मानले. ब्रॅड म्हणाले: "तो खूप छान मुलगा होता. त्याचे पालक होणे अवघड नव्हते, कारण तो इतका चांगला माणूस होता."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)