गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात नेमका वाद काय आहे?

फोटो स्रोत, CCTVFootage
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद उघड झाल्याचं पहायला मिळत आहे.
या प्रकरणात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवणकर यांना पोलिसांनी अटक केली असून तिघांनाही उल्हासनगर न्यायालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विद्यमान आमदार असून, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी खुद्द पोलीस ठाण्यात गोळीबार कसा केला? शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यातला नेमका वाद काय आहे? जाणून घेऊया.
राजकीय शीतयुद्धातून गोळीबार?
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या गोळीबारामागे दोघांमधला जमिनीचा वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच दोघांमध्ये कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावरून राजकीय शीतयुद्ध सुरू होतं, असंही स्थानिक सांगतात.
यामुळे या गोळीबारानंतर त्यांच्यातील राजकीय स्पर्धा आणि विधानसभेच्या उमेदवारीच्या राजकारणाची चर्चा सध्या सुरू आहे.
गणपत गायकवाड गेल्या 15 वर्षांपासून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दोन टर्म त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर 2019 मध्ये ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले.
तर यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही पाठिंबा दिला आहे.
गणपत गायकवाड यांचा टीव्ही केबलचाही मोठा व्यवसाय आहे.
तर महेश गायकवाड हे शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. पक्षात दोन गट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. तसंच ते माजी नगरसेवक आहेत.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यावरून दोन्ही गटांकडून राजकीय हालचाली सुरू होत्या, असंही समजतं.
तसंच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महेश गायकवाड इच्छुक असून गेल्या दोन वर्षांपासून ते यासाठी काम करत आहेत, असंही सांगितलं जातं.
'कल्याण लोकसभेवर भाजपचा दावा असेल,' असे विधान गेल्या वर्षी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना याची दखल घ्यावी लागली होती.

फोटो स्रोत, Facebook
तसंच गेल्या दोन वर्षांपासून महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यावर विकासकामांवरून टीका, वैयक्तीक टीका टिप्पणी, आरोप- प्रत्यारोप सुरू असल्याचंही स्थानिक सांगतात.
एका माजी आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दोघांमधला वाद जुना आहे. जमिनीवरून तर वाद आहेच पण यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा सुद्धा आहे.
महेश गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. गोळीबार घटनेच्या पूर्वीही महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत."
उल्हासनगर न्यायालयात हजर केल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांना बोलण्याची संधी दिली असता त्यांनी पोलिसांवर आरोप केले. पोलीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली काम करत असून गोळीबाराशी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही असं त्यांनी न्यायालयात सांगितलं.
माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला याचाही विचार करावा, असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Eknath Shinde
तपासासाठी महत्त्वाचं असलेलं सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसं आलं, ते एकतर्फी प्रसारित करण्यात आलं आहे, असं आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते आमदारांच्या मुलाला बाहेर मारहाण करत होते हे फुटेज बाहेर का आलं नाही? असाही प्रश्न वकिलांनी उपस्थित केला.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान याबाबत ठाणे जिल्ह्यातील विशेषत: कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकारणाबाबत बोलताना सांगतात,
"गणपत गायकवाड यांनी यापूर्वी शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हापासून संघर्ष हा होताच शिवसेनेसोबत. काही ठिकाणी विकासकामांवरून वाद झाल्याचं समोर आलं होतं. विद्यमान आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात विकासकामांवरून श्रेयवादाची लढाई होत असल्याचं समोर आलं होतं."
"गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वादाचे पडसाद समाज माध्यमांवरती दिसत होते. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर भीडायचे. काही काळापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना समोरासमोर येण्याचं आव्हान केलं होतं.
त्यानुसार कार्यकर्तेही तयार केले. हा वाद चिघळण्याची शक्यता पाहता पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. यामुळे दोघांमध्ये राजकीय वैमनस्य किंवा स्पर्धा तर होतीच," असंही प्रधान सांगतात.

जमिनीचा वाद काय आहे?
गणपत गायकवाड आणि त्यांच्या पार्टनरने कल्याणमधील एका गावात जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे पैसे देण्यावरून वाद सुरू होता.
या जागेवर विकास करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या जागेवर आमदार गणपत गायकवाड हे सुद्धा भागीदार असल्याचे समजतं.
गणपत गायकवाड हे त्या जमिनीवर कुंपण करण्यासाठी गेले असता त्यांचा वाद झाला. या वादात जाधव कुटुंबियांनी महेश गायकवाड यांना मध्यस्थी करून वाद मिटवण्याची विनंती केली.
यानंतर हा वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. आणि तिकडे गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं.
गोळीबार कसा झाला?
शुक्रवारी (2 जानेवारी) रात्री उशिरा भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार करण्यात आला.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे सहकारी राहुल पाटील जखमी झाले.
दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली.
त्याचवेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या.

फोटो स्रोत, Getty Images
पोलीस स्टेशनमधील CCTV फुटेजनुसार, गोळीबारानंतर एकच गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.
त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांवर IPC अंतर्गत 307, 120 (b) 143, 147, 148, 149 ही कलमं लावण्यात आल्याचं ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितलं.
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली
या गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
"कायद्यासमोर सर्व समान असून कोण कुठल्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता दोषींवर कायदेशीरच कारवाई केली जाईल. गोळीबार पोलीस स्टेशनला का झाला? आणि गोळीबार का झाला? याचे सत्य आपल्याला शोधून काढावे लागेल," अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.










