अर्जुनचा नेम चुकला; पंजाबने मुंबईचा गड भेदला

फोटो स्रोत, Getty Images
विजयासाठी 215 धावांचं प्रचंड आव्हान मिळालेल्या मुंबईने विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले पण अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यासमोर त्यांना 13 धावा कमी पडल्या. अर्शदीपने 4 विकेट्स पटकावत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. वानखेडे स्टेडियम हा मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला. दमदार सांघिक कामगिरीच्या बळावर पंजाबने मुंबईचा गड भेदला. अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या 16व्या षटकात पंजाबने 31 धावा वसूल केल्या. तिथून मुंबईची लय हरपली ती डाव संपेपर्यंत.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात डळमळीत झाली. इशान किशन एक धाव करुन माघारी परतला. पण यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरुन ग्रीन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूत 76 धावा जोडल्या. लायम लिव्हिंगस्टोनच्या फिरकीने रोहितला चकवलं. त्याने 27 चेंडूत 44 धावा केल्या. रोहितच्या जागी खेळायला आलेल्या सूर्यकुमार यादवने चौकार-षटकारांची लयलूट सुरू केली. सूर्यकुमार-ग्रीन जोडीने 36 चेंडूत 75 धावांची वेगवान भागीदारी रचली. पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजाचा या जोडीने समाचार घेतला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नॅथन एलिसने ग्रीनला बाद करत ही जोडी फोडली. ग्रीनने 43 चेंडूत 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ग्रीन बाद होताच सूर्यकुमारने सूत्रं हाती घेतली. मैदानात चौफेर फटकेबाजी करणारा सूर्यकुमार मुंबईला जिंकून देणार असं चित्र होतं. धावगतीचं दडपण वाढत होतं. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर अक्रॉस जाऊन खेळण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न अथर्व तायडेच्या हातात गेला. सूर्यकुमारने 26 चेंडूत 57 धावांची अविश्वसनीय खेळी केली. 18व्या षटकात सूर्यकुमार बाद झाला आणि मुंबईची धावगती मंदावली. सूर्यकुमार बाद झाला तेव्हा मुंबईला 14 चेंडूत 33 धावांची आवश्यकता होती.

फोटो स्रोत, Getty Images
19व्या षटकात टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा जोडीने 15 धावा वसूल केल्या. शेवटच्या षटकात मुंबईला जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता होती. अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर टीम डेव्हिडने एक धाव घेतली. अनुनभवी तिलक वर्माला स्ट्राईक मिळाला. दुसरा चेंडू निर्धाव पडल्याने मुंबईवरचं दडपण वाढलं. तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलकला त्रिफळाचीत केलं. चौथ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेयर नेहल वढेरालाही तिलकप्रमाणेच त्रिफळाचीत केलं. या दोन विकेट पडल्याने मुंबईसाठी विजय आवाक्याबाहेर केला. पंजाबने 13 धावांनी विजय मिळवल्या. अर्शदीपने 29 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स पटकावल्या.
अनुभवी गोलंदाजांची अनेक षटकं बाकी असताना अनुनभवी अर्जुन तेंडुलकरला षटक देणं मुंबईला चांगलंच महागात पडलं आहे. 83/4 अशा स्थितीत पंजाब किंग्ज संघ होता. अर्जुनने टाकलेल्या 16व्या षटकात 31 धावा लूटल्या गेल्या आणि मुंबईची लयच हरवली. पंजाबने 214 धावांचा डोंगर उभारला. यानंतर सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरवर टीकाही होऊ लागली.
कॅमेरुन ग्रीनने मॅथ्यू शॉर्टला 11 धावांवर तंबूत धाडलं. प्रभसिमरन सिंग अर्जुन तेंडुलकरच्या फसव्या यॉर्करची शिकार ठरला. लायम लिव्हिंगस्टोनने सुरुवात चांगली केली. पण पीयुष चावलाच्या फिरकीच्या जाळ्यात तो अलगद अडकला. विदर्भवीर अथर्व तायडे चावलाच्याच गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पंजाबच्या 9.4 षटकात 83/4 धावा झाल्या आहेत. हंगामी कर्णधार सॅम करन आणि हरप्रीत सिंग भाटिया यांनी चाचपडत सुरुवात केली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्यांनी एकेरी दुहेरी धावा काढायला सुरुवात केली. 15 षटकात पंजाबने 118 धावांचीच मजल मारली होती.
अर्जुनच्या त्या ओव्हरने मुंबईची लय बिघडली

फोटो स्रोत, Getty Images
कॅमेरुन ग्रीन, जेसन बेहनड्रॉफ आणि जोफ्रा आर्चर यांची षटकं शिल्लक असतानाही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनच्या हाती चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर सॅम करनने लाँगऑफ क्षेत्रात खणखणीत षटकार लगावला. दुसरा चेंडू वाईड गेला. तांत्रिकदृष्टया दुसऱ्या चेंडूवर सॅम करनने फुलटॉसवर चेंडू चांगल्या तऱ्हेने तटवून काढत चौकार वसूल केला. यानंतर करनने एक धाव काढली.
हरप्रीत सिंगने चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. पाचवा चेंडू अर्जुनच्या हातून फुलटॉस पडला आणि हरप्रीतने उत्तुंग षटकार चोपला. सहावा चेंडू कंबरपेक्षा अधिक उंचीचा असल्याने पंचांनी नोबॉलचा इशारा दिला. मात्र तोवर चेंडू पीयुष चावलाला भेदून सीमारेषेपलीकडे गेला होता. अखेर सहाव्या चेंडूवर हरप्रीत सिंगने पूल करत आणखी एक चौकार लगावला. अशा रीतीने अर्जुनच्या षटकात तब्बल 31 धावा निघाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
जोफ्रा आर्चरने टाकलेल्या 17व्या षटकात 13 धावा निघाल्या. दुखापतीमुळे आर्चरला लौकिकाला साजेशी गोलंदाजी करता येत नसल्याचं स्पष्ट झालं.
18व्या षटकात सॅम करनने दोन टोलेजंग षटकार लगावले. यानंतर एक धाव घेतली. पुढच्या चेंडूवर हरप्रीत सिंग बाद झाला. पण विदर्भच्या जितेश शर्माने आल्या आल्या चेंडूला प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलं.
19व्या षटकात आर्चरने 10 धावाच दिल्या. पण याही षटकात दोन चौकार पंजाबने लगावले.
शेवटच्या षटकात जितेश शर्माने बेहनड्रॉफच्या गोलंदाजीवर आणखी 2 षटकार खेचले. त्यानंतर जितेश शर्मा बाद झाला. पण हरप्रीत ब्रारने आल्या आल्या एक चौकार वसूल केला. या षटकात 17 धावा निघाल्या. पंजाबने 214 धावांची कमान उभारली. पंजाबतर्फे कर्णधार सॅम करनने 29 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 55 धावांची तडाखेबंद खेळी केली. हरप्रीत सिंगने 28 चेंडूत 41 धावा केल्या. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 50 चेंडूत 92 धावा केल्या. जितेश शर्माने 7 चेंडूत 25 धावांची वेगवान खेळी केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








