तर आईन्स्टाईन 6000 रुपये पगारावर भारतात कुलगुरू झाले असते

अल्बर्ट आईनस्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जेव्हा जेव्हा अल्बर्ट आईनस्टाईन अणि भारताचा एकत्र उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा आईनस्टाईनचं महात्मा गांधींविषयी उच्चारलेलं एक वाक्य कायम उद्धृत केलं जातं. आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: "येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता."

विश्वशांतीसाठी, विशेषत: महायुद्धोत्तर जगात, झोकून देऊन काम करणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन यांना पराकोटीच्या हिंसेलाही अहिंसेनं उत्तर देऊन सत्याग्रहाचं तत्वज्ञान प्रत्यक्ष जगून दाखवणारे महात्मा गांधी यांच्याबद्दल आकर्षण असणं स्वाभाविक होतं.

गांधींच्या हयातीपासून आजपर्यंत ते सगळ्याच जागतिक नेत्यांना आहे. आईनस्टाईन अपवाद नव्हते आणि ते केवळ आकर्षण राहिलं नाही तर नंतर ते ऋणानुबंधही झाले.

पण आईनस्टाईनचा भारताशी असलेला संबंध केवळ गांधींपुरताच सीमित नाही. आईनस्टाईन कधी प्रत्यक्ष भारतात आले नाहीत, पण या प्रदेशाविषयी त्यांना कायमच कुतुहल होतं. अनेक प्रकारची त्यांची मतं होती.

त्यांच्या स्वत:च्या आणि त्यांच्याविषयीच्या उपलब्ध प्रकाशित लिखाणातून ते स्पष्ट दिसतं. शिवाय, काही समकालीन भारतीयांशी त्यांचे जुळलेले ऋणानुबंध, मैत्र हेही जपून ठेवावं आणि साजरं करावं असं.

अल्बर्ट आईनस्टाईनचा जन्म 14 मार्च 1879 ला झाला आणि त्यांचं निधन 18 एप्रिल 1955 ला झालं. म्हणजे 76 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं. आईनस्टाईनच्या अगोदरही आणि नंतरही अनेकांना असं दीर्घायुष्य मिळालं.

पण आपल्या काळात आणि नंतरच्या अगणित काळावरही स्वत:चा अमीट ठसा उमटवणारं कर्तृत्व मोजक्यांचं होतं. आईनस्टाईनचं तसं होतं.

अल्बर्ट आईनस्टाईनचा जन्म 14 मार्च 1879 ला झाला आणि त्यांचं निधन 18 एप्रिल 1955 ला झालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अल्बर्ट आईनस्टाईनचा जन्म 14 मार्च 1879 ला झाला आणि त्यांचं निधन 18 एप्रिल 1955 ला झालं.

विश्वाची स्वत:कडे बघण्याची दृष्टी आईनस्टाईनमुळे बदलली. त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत, गुरुत्वाकर्षणाची न्यूटोनियन सिद्धांतापेक्षा नवी मांडणी, अवकाश आणि काल (Space and Time) यांच्या वर्तणुकीच्या क्रांतिकारी संकल्पना यामुळं विश्वाचं मानवी आकलन मुळापासून बदललं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

E = mc2 या आईनटाईनच्या विज्ञान न अभ्यासलेल्यांच्याही तोंडी बसलेल्या समीकरणानं ऊर्जेला मुक्त केलं आणि तो रस्ता जगाला न्यूक्लिअर फिशनमार्गे अणुबॉम्बच्या काळात घेऊन आला.

कालाचीही आईनस्टाईनपूर्व आणि आईनस्टनोत्तर अशी मांडणी करावी लागते, इतकं प्रभावी हे कर्तृत्व होतं. आधुनिक विज्ञान आणि पर्यायानं आधुनिक जग पुरतं बदलून गेलं.

पण, ज्याचा मेंदूच्या रचनेतही काही विशेष होतं का असा प्रश्न सर्वांना पडावा आणि मृत्यूपश्चात त्याचा सखोल अभ्यास व्हावा, अशा बुद्धिवंताचा प्रभाव हा केवळ विज्ञानावरच नाही. हा सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ हा विचारवंत होता, तत्वज्ञ होता.

या तत्वज्ञानाने समकालीन भारतीयांशी आईनस्टाईनचं मैत्र जुळलं असं म्हणता येईल. महात्मा गांधींसोबतच अल्बर्ट आईनस्टाईनचे संबंध होते रविंद्रनाथ टागोर आणि पंडित जवाहरलाल नेहरुंशी.

टागोरांशी तर मैत्री म्हणावी असे संबंध होते. या तिघांशीही असलेला आईनस्टाईनचा पत्रव्यवहार, भेटीचा वृत्तांत तपशीलानं प्रसिद्ध आहे. त्याविषयी बरंच लिहिलं, बोललं गेलं आहे.

पण आईनस्टाईन आणि भारत यांचे संबंध पाहतांना सर्वात अगोदर त्यातले पाहू जो आईनस्टाईनचा मूळ विषय आहे. भौतिकशास्त्र. आणि जेव्हा फिजिक्सचा उल्लेख होतो तेव्हा आईनस्टाईनसोबत एका भारतीयाचं नाव प्रामुख्यानं येतं. सत्येंद्रनाथ बोस.

बोस-आईनस्टाईन सिद्धांत

भौतिकशास्त्राच्या आणि त्यातही 'क्वांटम मेकॅनिक्स'च्या विद्यार्थी-अभ्यासकांना जो सिद्धांत ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो म्हणजे 'बोस-आईनस्टाईन सिद्धांत'.

यात बोस म्हणजे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस. विज्ञानाच्या क्षेत्रात आईनस्टाईनशी असलेला हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा असा भारताचा संबंध. ज्याचा प्रभाव आधुनिक विज्ञानावरही पडला.

हा सिद्धांत काय आहे हे समजून घेण्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जावं लागेल. आधुनिक विज्ञानासाठी हा एक अत्यंत महत्वाचा काळ मानावा लागेल कारण ब-याच जुन्या संकल्पना इथं मोडून पडल्या आणि नवी दृष्टी एकूणच संशोधनाला मिळाली. अल्बर्ट आईनस्टाईन हे त्यातलं अग्रगण्य नाव.

अल्बर्ट आईनस्टाईन आणि सत्येंद्रनाथ बोस

फोटो स्रोत, Albert Eintein Estate/Twitter

फोटो कॅप्शन, अल्बर्ट आईनस्टाईन आणि सत्येंद्रनाथ बोस

"विसाव्या शतकाच्या सुरुवातीला असं जाणवलं की जे अतिशय सूक्ष्म असे कण असतात, इलेक्ट्रॉन असतील, अथवा अगदी अणू असेल, यांना तोपर्यंत माहित असलेले न्यूटनचे बल, वस्तुमान, गती अशांच्या संबंधांचे हे नियम होते, ते पूर्णपणे लागू होत नाहीत. ते स्पष्ट करतांना साधारण 1902-03 च्या आसपास आईनस्टाईननं त्याचे काही सिद्धांत मांडले."

"त्यात त्यानं सर्वात महत्वाची ही गोष्ट सांगितली की, प्रकाश (Light) हा तरंगाच्या (waves) स्वरुपात नसून तो सूक्ष्म कणांचा (particles) बनलेला असतो. हे सांगणारा तो पहिला होता. त्यात अर्थात मॅक्स प्लॅंकचंही मोठं योगदान आहे," 'आय आय टी चेन्नई' इथं कार्यरत असणारे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ धोमकर सांगतात.

"पण आईनस्टाईननं हे पहिल्यांदा मांडल्यानंतर 1920 च्या आसपास नील्स बोहर, श्रॉडिन्जर अशा अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन 'क्वांटम मेकॅनिक्स'चा खूप मोठा आणि महत्वाचा सिद्धांत मांडला. विविध परिस्थितीत हे जे सूक्ष्म-अतिसूक्ष्म कण असतात, अणू, किंवा त्यातले इलेक्ट्रॉन, हे कसे वागतात याविषयी हा सिद्धांत आपल्याला सांगतो," सिद्धार्थ सांगतात.

या संशोधकांना असं दिसलं की या सूक्ष्म कणांचा जर विचार केला तर त्यांच्यात दोन वेगवेगळे प्रकार आहेत. कोणत्याही कणांना वस्तुमान (mass), भार (charge) अशा प्रकारचे गुणधर्म असतात. 'क्वांटम मेकॅनिक्स'मध्ये 'स्पिन' नावाचा एक गुणधर्म असतो.

पहिल्या प्रकारचे जे कण असतात. त्यांना 'फर्मियॉन्स' म्हणतात कारण ते फर्मी नावाच्या शास्त्रज्ञाने शोधले. या दोन कणांचे गुणधर्म जर सारखे असतील तर ते एकत्र, एका ठिकाणी राहात नाहीत.

"याच्या अगदी विरुद्ध, जे दुस-या प्रकारचे कण असतात, ज्यात प्रकाश ज्यापासून बनलेला असतो ते फॉटॉन्स असतात, वा काही व्हायब्रेशन्स (फोनॉन) असतात, या कणांचे सगळे गुणधर्म समान असले तरीही त्यांना एकत्र रहायला आवडतं," सिद्धार्थ सांगतात.

अल्बर्ट आईनस्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अल्बर्ट आईनस्टाईन

इथं, या दुस-या प्रकारचे जे कण आहे, इथं सत्येंद्रनाथ बोसांचा या कहाणीत प्रवेश होतो. साल 1924 होतं आणि तेव्हा फाळणीपूर्व ब्रिटिशकालीन भारतात सत्येंद्रनाथ हे ढाका विद्यापीठात संशोधन करत होते.

"हे जे दुस-या प्रकारचे कण आहेत जे गुणधर्म समान असूनही एकत्र राहतात, यांच्या एकंदर वागणुकीविषयी सांगणारा सिद्धांत मांडावा लागला. तो सिद्धांत सत्येंद्रनाथ बोस या भारतीय भौतिकशास्त्रज्ञानं मांडला. हे त्यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं की असे कण असू शकतात जे गुणधर्म समान असूनही एकत्र राहतात. ते विविध परिस्थितीत एकमेकांशी कसे वागतील हे बोसांनी सांगितलं," सिद्धार्थ सांगतात.

संशोधन आणि मांडणी झाल्यावर त्यांनी विज्ञानक्षेत्रात नेहमी जसं होतं तसं केलं. त्यांनी एक शोधनिबंध लिहिला आणि एका सायन्स जर्नलकडे पाठवला. पण अर्थातच तेव्हा बोसांना फार कोणी ओळखत नव्हतं.

त्या जर्नलच्या संपादकानं तो पेपर वाचल्यावर परत पाठवला आणि म्हटलं की त्यांना तो बरोबर वाटत नाही आणि ते प्रकाशित करणार नाहीत. बोसांना मात्र खात्री होती हे काहीतरी नवीन आहे आणि महत्वाचं आहे.

इथं या घटनाक्रमात आईनस्टाईन यांचा प्रवेश होतो.

"बोस तो रिसर्च पेपर आईनस्टाईनकडे पाठवला. आईनस्टाईला अर्थातच हे लगेच समजलं हे खूप महत्वाचं आहे. त्यानं तो स्वत: जर्मन भाषेत भाषांतरित केला आणि तेव्हाच्या एक खूप मोठ्या जर्मन जर्नलकडे पाठवला. त्याखाली त्यानं एक टीप लिहिली: 'हा अत्यंत महत्वाचा निष्कर्ष आहे. तेव्हा कृपया तो प्रकाशित करावा'. तो तसा झाला आणि त्या काळी 'क्वांटम मेकॅनिक्स'मध्ये काम करणा-या सगळ्यांना त्याचं महत्वही पटलं," सिद्धार्थ पुढे म्हणतात.

एका खूप मोठ्या संख्येच्या सूक्ष्म कणांच्या वर्तनाविषयी या सिद्धांतानं उलगडून सांगितलं ज्याला आज 'बोस-आईनस्टाईन मॉडेल' असं म्हटलं जातं. या प्रकारच्या कणांना नंतर विज्ञानविश्वामध्ये बोस यांच्या संशोधनावरुन 'बोसॉन्स' असं संबोधलं जाऊ लागलं. यानं 'क्वांटम मेकॅनिक्स' मध्ये संशोधनाला एक नवी दृष्टी मिळाली.

हे संशोधन किती क्रांतिकारी होतं आणि आजच्या काळातही कसं उपयुक्त आहे?

"आता सर्वांना माहित असेल की स्वित्झर्लंडच्या 'सर्न' मध्ये जो 'लार्ज हायड्रोजन कोलायडर' आहे. तिथं साधारण 11 वर्षांपूर्वी 'हिग्स बोसॉन' या कणाचा शोध लागला. पीटर हिग्स नावाच्या शास्त्रज्ञानं सर्व मूलभूत कणांना वस्तुमान कसं मिळतं याविषयीची थिअरी मांडली. त्या थिअरीतून जे कण निर्दर्शनास आले तेही बोसॉन्स गणले जातात. म्हणून त्यांना 'हिग्स बोसॉन्स' असं म्हटलं गेलं," सिद्धार्थ सांगतात.

आईनस्टाईननं बोसांच्या कल्पनेचं श्रेय घेतलं?

जेव्हा या विषयात, या संदर्भात आईनस्टाईनचं नाव घेतलं जातं तेव्हा सत्येंद्रनाथ बोसांचं नावंही घेतलं जातं. पुढे विज्ञान क्षेत्रांतर्गत एक उलटसुलट चर्चाही झाली. आईनस्टाईन आणि बोस यांच्यात या संशोधनावरुन, श्रेयावरुन काही वाद झाल्याचं म्हटलं गेलं. पण अभ्यासकांनी त्यात काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

काही वर्षांपूर्वी जर्मनीतल्या ओल्डनबर्ग विद्यापीठातल्या विज्ञान इतिहास अभ्यासक राजिंदर सिंग यांनी 'आईनस्टाईन रिडिस्कव्हर्ड: इंटरॅक्शन्स विथ इंडियन ऍकॅडेमिक्स' या त्यांच्या पुस्तकात या कथित वादांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

बोस यांच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या काही कहाण्या नंतर पसरवल्या ज्या ऐकिव गोष्टींवर आधारित होत्या असं ते 'इंडियन सायन्स वायर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात.

आईनस्टाईनचं नाव घेतलं जातं तेव्हा सत्येंद्रनाथ बोसांचं नावंही घेतलं जातं.

फोटो स्रोत, Albert Einstein Estate/Twitter

फोटो कॅप्शन, आईनस्टाईनचं नाव घेतलं जातं तेव्हा सत्येंद्रनाथ बोसांचं नावंही घेतलं जातं.

आईनस्टाईननं बोस यांची कल्पना वापरुन ती स्वत: 'आयडियल गॅस' स्थितीत वापरली का आणि तो एका प्रकारचा विश्वासघात होता का, या प्रश्नावर राजिंदर सिंग उत्तर देतात:

"नाही. संशोधनाच्या क्षेत्रात कोणीही स्वत:च्या कल्पना इतरांना विस्तारासाठी देत नसतं. आईनस्टाईन तरी त्याला अपवाद का ठरावा? पण यामुळं प्रत्यक्ष आईनस्टाईन आणि बोस यांचे संबंध कायम राहिले कारण आईनस्टाईननं कायम बोस यांना आपलं सहकारी मानलं आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर बोस यांचं काम प्रकाशात आणण्यासाठी कायम प्रयत्न केले."

"आईनस्टाईनचं मोठेपण हे की त्याला या बोसांच्या संशोधनाचं महत्व समजलं. त्यानं पुढं स्वत: बोसॉन्सवर बरंच संशोधन केलं. बोस यांनीही केलं. त्याच संशोधनात पुढे 'बोस-आईनस्टाईन इक्वेशन अथवा स्टॅटिस्टिक्स ' ज्याला म्हणतात तेही त्यांनी मांडलं. त्या दोघांचं नाव किती ठिकाणी जोडलं गेलं आहे यावरुनच समजेल की काम किती मोठं आहे," डॉ.सिद्धार्थ धोमकर म्हणतात.

...तर आईन्स्टाईन भारतीय विद्यापीठाचे कुलगुरु झाले असते

हे कदाचित ऐकल्यावर चक्रावून टाकणारं असेल आणि ते खरंच प्रत्यक्षात आलं असतं तर काय घडलं असतं या प्रश्नाचा सतत विचार करायला लावणारं असेल. पण ते खरं आहे.

एका भारतीय विद्यापीठानं 1937 साली अल्बर्ट आईनस्टाईन यांना कुलगुरुपदाची ऑफर दिली होती. ते विद्यापीठ होतं त्रावणकोर विद्यापीठ (म्हणजे आताचं केरळ विद्यापीठ) आणि पगार होता महिना 6000 रुपये .

इतिहास लेखक ए एस मेनन यांनी 'त्रावणकोर विद्यापीठा'चा इतिहास विस्तारानं लिहून प्रकाशित केला आहे. त्यात त्यांनी ही माहिती प्रकाशात आणली.

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या बातमीसाठी मुलाखत देतांना त्यांनी म्हटलं आहे त्रावणकोर संस्थानचे दिवाण सर सी रामस्वामी अय्यर यांच्या पुढाकारानं आणि सल्ल्यानं तत्कालिन संस्थानच्या शेवटच्या राजानं आईनस्टाईन यांना ही विचारणा केली होती.

आईनस्टाईनना त्रावणकोर विद्यापीठानं कुलगुरु म्हणून बोलावलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आईनस्टाईनना त्रावणकोर विद्यापीठानं कुलगुरु म्हणून बोलावलं होतं.

तेव्हाच्या काही स्थानिक कागदपत्रांवरुन याची पुष्टी होते, पण आईनस्टाईन यांना पाठवलेलं पत्र मात्र मिळालेलं नाही. अर्थात आईनस्टाईन यांनी ही ऑफर नाकारली असावी आणि ते अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठातच कायमचे स्थायिक झाले.

पण आईनस्टाईन जर भारताच्या या विद्यापीठात कुलगुरु झाले असते तर भारतीय विज्ञानविश्व आज काय असतं याची कल्पनाच केलेली बरी.

आईनस्टाईन आणि त्यांचे 'रब्बाय' टागोर

भारताशी अल्बर्ट आईनस्टाईनशी असलेल्या संबंधांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दोन 'नोबेल विजेत्यां'च्या या मैत्रीविषयी कायम बोललं जातं. आईनस्टाईन आणि रविंद्रनाथ टागोर.

हे मैत्र असं होतं की भारतात टागोरांना आदरानं 'गुरुदेव' म्हटलं जातं, तर आईनस्टाईन त्यांचा 'रब्बाय' असा उल्लेख करी. 'रब्बाय' म्हणजे हिब्रू भाषेत 'गुरु किंवा धर्मगुरु'.

या दोघांचा संवाद, पत्रव्यवहार याविषयी दोघांनीही भरपूर लिहिलं आहे आणि त्यावर अभ्यासकांनीही लिहिलं आहे. आपल्या काळात विज्ञानासोबतच एकंदरच मानवजातीच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल त्यांनी केलेला सखोल विचार आणि गांभीर्य या दोघांच्या संवादामध्येही होतं.

धर्म, सत्य, विज्ञान, सौंदर्य, सत्य, शांतता या आणि अशा असंख्य विषयांभोवती त्यांची चर्चा फिरते आणि लिहिले वा उच्चारलेले विचार तत्वज्ञानाची जागा घेतात. दोघेही जागतिक शांततेसाठी आग्रही असलेली प्रभावी आणि व्यक्त होणारे चिंतक होते.

रसूल सोरखाबी यांनी 2005 साली 'करंट सायन्स'मध्ये आईनस्टाईनच्या भारताशी असलेल्या संबंधांविषयीच्या लेखात टागोर-आईनस्टाईन मैत्रीविषयी लिहिलं आहे. त्यात ते लिहितात की या दोघांचा सतत पत्रव्यवहार तर होताच, पण किमान तीन वेळा ते एकमेकांना प्रत्यक्ष भेटल्याच्या नोंदी आहेत.

आईनस्टाईन आणि टागोर यांचं मैत्र होतं.

फोटो स्रोत, Albert Enstein/Twitter

फोटो कॅप्शन, आईनस्टाईन आणि टागोर यांचं मैत्र होतं.

ते एकमेकांना प्रथम महायुद्धानंतर 1912 मध्ये जर्मनीमध्ये पहिल्यांदा भेटले. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1913 साली टागोरांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.

पण टागोर त्यापूर्वीच पश्चिमेत आणि जगभर महत्वाचे साहित्यिक, चिंतक म्हणून गणले जात होते. त्यामुळे विज्ञानाच्या परिप्रेक्ष्याबाहेरही विचारविश्व असणा-या आईनस्टाईननी त्यांच्याशी संवाद सुरु करणं स्वाभाविक होतं.

तो सुरु झालेला संवाद शेवटपर्यंत सुरु राहिला. या पहिला भेटीनंतर टागोरांनी लिहून ठेवलंय की आईनस्टाईननं त्यांचा 'मानवाच धर्म' वाचलं होतं आणि त्यावर ते प्रदीर्घ काळ बोलत होते.

टागोर त्यानंतर 14 जुलै 1930 ला पुन्हा जर्मनीतच बर्लिनजवळच्या घरी आईनस्टाईनला भेटले. त्याच वर्षी 14 डिसेंबरला आईनस्टाईन आणि टागोर एकत्र अमेरिकेच्या दौ-यावर होते तेव्हा न्यूयॉर्कमध्ये त्यांची तिसरी आणि माहित असलेली शेवटची भेट झाली.

त्या दोघांनी एकत्र भेटताभेटताभेटता-लिहितांना तत्वचिंतन केलं. कधी त्यात मतभेदही होते. 'सत्याच्या स्वरुपाबद्दल त्यांची मतं वेगवेगळी होती, त्यात भेद होते,' असं सोरखाबी नमूद करतात. पण त्यामुळं संवाद कधी थांबला नाही. जागतिक पातळीवरच्या एकमेकांच्या उपक्रमांनाही त्यांनी पाठिंबा दिला.

1930 मध्ये आईनस्टाईन, रविंद्रनाथ टागोर आणि फ्रेंच शांततावादी रोमेन रोलंड यांनी पुढाकार घेऊन लष्करामध्ये तरुणांची भरती आणि प्रशिक्षणाविरोधात जाहिरनामा प्रकाशित केला होता. 1931 मधे जेव्हा 'गोल्डन बुक ऑफ टागोर' प्रकाशित झालं, तेव्हा त्याची प्रस्तावना आईनस्टाईन, महात्मा गांधी आणि रोलंड यांनी हस्ताक्षरित केली होती.

दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर होता. 1932 मध्ये टागोरांना जेव्हा इराणमध्ये आईनस्टाईनविषयी विचारण्यात आलं,

तेव्हा ते म्हणाले, "आईनस्टाईननं मानवता आणि शांततेसाठी स्वत:ला वाहून घेतलं आहे. ती एक महान व्यक्ती आहे. ते कोणत्याही प्रकारे वंशवाद मानत नाहीत आणि सर्व मनुष्यजात समान आहे असं मानतात. आईनस्टाईन त्याच्या काळातला महान तत्ववेत्ता आहे."

आईनस्टाईन आणि महात्मा गांधी

महात्मा गांधी आणि आईनस्टाईन यांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही, पण आईनस्टाईनचं गांधींविषयीचं कुतुहल शेवटापर्यंत आटलं नाही. ते वाढतंच गेलं. आईनस्टाईन स्वत: 'पॅसिफिस्ट' म्हणजे शांततावादी होते आणि जागतिक शांततेसाठी संशोधनाव्यतिरिक्त त्यांची उर्वरित आयुष्य त्यांनी दिलं होतं.

अशा व्यक्तीसाठी जगातला सर्वात मोठा शांततेचा लढा देणारे गांधी हे जवळचे वाटले नसते तरच नवल. ही जवळीक एवढी होती की आईनस्टाईनच्या घरी गांधीचा फोटो लावला होता आणि आजही कायम ठेवण्यात आला आहे.

सोरखाबी यांनी त्यांच्या लेखात लिहिल्याप्रमाणे, गांधी आणि आईनस्टाईनचा एकमेव माहित असलेला पत्रव्यवहार 1931 सालचा आहे जेव्हा गांधी गोलमेज परिषदेसाठी लंडनला आले होते.

त्यांच्या दोघांच्याही परिचयाच्या एका व्यक्तीमार्फत पत्र पाठवून गांधींना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त करतांना आईनस्टाईन लिहितात: "तुमच्या कर्तृत्वानं हे दाखवून दिलं आहे की हिंसेच्या मार्गी न जाताही आदर्श स्थिती प्राप्त करता येते. अहिंसेच्या मार्गाने हिंसा करणा-यांवर विजय मिळवता येतो. तुमचं उदाहरण समोर ठेवूनच मानवतेला हिंसेतून उद्भवणारी अशांतता जागतिक प्रयत्नांतून थांबवता येईल."

महात्मा गांधी आणि आईनस्टाईन यांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महात्मा गांधी आणि आईनस्टाईन यांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही.

गांधी या पत्राला उत्तर देतांना आईनस्टाईनला भारतात त्यांच्या आश्रमात येण्याचं आमंत्रण देतात. "तुमच्यासारख्या नजरेत येणं ही माझ्या कार्याला एका प्रकारची पावतीच आहे," असं गांधी आदरानं आईनस्टाईनला आमंत्रण देतात.

आईनस्टाईननं असंख्य वेळा विविध भाषणांमध्ये, लेखनात, मुलाखतींमध्ये गांधींचा गौरव केला आहे. त्यांची स्तुती केली आहे. त्यांचा अहिंसेचा रस्ताच योग्य आहे अशी खात्री झाली आहे.

पण असं असलं तरीही आईनस्टाईन हा स्वत: विचारी मनुष्य होता. समोर आलेलं स्वत:च्या तर्कानं तावून सुलाखून घेणं हा वैज्ञानिकाचा स्वभाव होता. जिथं मतभेद आहेत ते स्पष्टपणे ते मांडत असत. तसेच गांधींच्याही काही विचारांबद्दल त्यांची मतमतांतरं होती.

आईनस्टाईनच्या मते गांधींच्या विचारामध्ये दोन कमकुवत बाजू होत्या. सोरखाबी यांनी 1935 सालच्या 'ग्राफिक सर्व्हे'मधली आईनस्टाईनची मुलाखत उधृत केली आहे. त्यांचे मतभेद हे कोणत्या परिस्थितीत अहिंसेचा मार्ग अवलंबिता येतो यावर आणि औद्योगिकिकरणाबद्दलच्या गांधीच्या भूमिकेबद्दल होते.

"प्रतिकार न करणं हा प्रतिकूल परिस्थितीत अतिशय हुशार उपाय असू शकतो पण तो केवळ आदर्श परिस्थितींमध्येच वापरता येऊ शकतो. म्हणजे, भारतात तो ब्रिटिशांविरोधात वापरता येऊ शकतो, पण जर्मनीत तो नाझींविरोधात वापरता येणार नाही."

"दुसरं, आधुनिक समाजात यंत्रांचा वापर कमी अथवा न करण्याची गांधींची भूमिका चुकली आहे. यंत्र इथं आता असणारंच आहेत आणि हे वास्तव मान्य करायलाच हवं," आईनस्टाईन स्पष्टपणे नोंदवतात.

आईनस्टाईननं असंख्य वेळा विविध भाषणांमध्ये, लेखनात, मुलाखतींमध्ये गांधींचा गौरव केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आईनस्टाईननं असंख्य वेळा विविध भाषणांमध्ये, लेखनात, मुलाखतींमध्ये गांधींचा गौरव केला आहे.

पण असं असलं तरीही गांधींच्या मोठेपणाबद्दलचं आईनस्टाईनचं मत यत्किंचितही कमी होत नाही. 1948 मध्ये गांधींच्या हत्येनंतर व्यथित झालेले आईनस्टाईन भारतातल्या कोलकाता आणि अंबाला इथून गांधींच्या टिकाकरांनी पाठवलेल्या पत्रांना उत्तर लिहितांना गांधींची बाजू घेतात.

कोलकात्याच्या कलाकाराला ते लिहितात: "गांधींच्या तंत्रज्ञानविरोधी भूमिकेवर टीकेत तथ्य आहे. पण भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतलं त्यांचं कार्य आणि अहिंसेचं तत्वज्ञान पाहता, या महान व्यक्तीच्या एका छोटेखानी चुकीकडे पाहणं योग्य नव्हे."

अंबाल्याच्या प्राध्यापकला त्यांनी लिहिलं: "गांधींचं आत्मचरित्र हे मानवी महानतेचं सर्वोत्तम उदाहरण आहे. तुमच्या मताशी सहमत नसलेल्याचा हत्या करणं हे तुम्ही योग्य ठरवता आहात का?"

सोरखाबींनी ही दोन्ही उत्तरं नोंदवली आहेत. 18 जुलै 1950 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसारित केलेल्या 'शांततेच्या शोधात' या विशेष भाषणात आईनस्टाईन अतिशय स्पष्टपणे सांगतात की गांधींच्या मार्गाशिवाय अन्य मार्ग जगाकडे नाही.

"माझ्या मते गांधी हे आपल्या काळातील सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये सर्वात प्रबुद्ध व्यक्ती होते. त्यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या रस्त्यावरुन आपण चालावं आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट कृत्यापासून स्वत:ला लांब ठेवावं."

आईनस्टाईन आणि जवाहरलाल नेहरु 

अगदी रविंद्रनाथ टागोरांसारखा घनिष्ठ संबंध नसेल वा गांधींच्या तत्वज्ञानासारखं भारावलेपण नसेल, पण त्यांच्याखालोखाल आईनस्टाईन यांचा भारतातल्या चौथ्या व्यक्तीशी जो अधिक संबंध आला तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी.

आईनस्टाईन यांचं नेहरुंकडे लक्ष थोडं उशीरा गेलं असं म्हणावं लागेल, पण नेहरु मात्र पूर्वीपासूनच आईनस्टाईन यांच्या वैज्ञानिक कार्याबाबत ,सापेक्षतावादाच्या सिद्धांताबाबत जाणून होते. त्यांनी 'भारताचा शोध' या त्यांच्या पुस्तकातही तसा उल्लेख केला आहे.

भारत स्वतंत्र झाल्यावर नेहरु जेव्हा पहिले पंतप्रधान म्हणून अमेरिकेच्या दौ-यावर गेले तेव्हा ते आवर्जून जाऊन अल्बर्ट आईनस्टाईन यांना भेटले. त्यांना 'भारताचा शोध' हे स्वत:चं पुस्तकही त्यांना भेट म्हणून दिलं. नेहरुंसोबत तेव्हा त्यांची कन्या इंदिरा गांधी याही होत्या.

सोरखाबी यांनी आईनस्टाईननी नेहरुंचं पुस्तक पूर्ण वाचून पत्राद्वारे दिलेला अभिप्रायही नोंदवला आहे. त्यात आईनस्टाईन लिहितात: "मी तुमचं अत्यंत सुंदर असं पुस्तक वाचलं. कोणत्याही पाश्चिमात्य वाचकासारखा पहिला भाग वाचायला जरा जड गेला. पण हे पुस्तक तुमच्या महान देशाच्या वैभवशाली अध्यात्मिक आणि बौद्धिक परंपरेची ओळख करुन देते."

आईनस्टाईन आणि नेहरु 1949 मध्ये अमेरिकेत भेटले.

फोटो स्रोत, Albert Einstein Estate/twitter

फोटो कॅप्शन, आईनस्टाईन आणि नेहरु 1949 मध्ये अमेरिकेत भेटले.

आईनस्टाईन युद्धविरोधी होते हे आपण अगोदर पाहिलेलंच आहे. दुस-या महायुद्धानंतर जगाची झालेली अमेरिका आणि रशिया अशा गटांमध्ये विभागणी, त्यातून निर्माण झालेली अशांतता यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यामुळे नेहरुंच्या नेतृत्वातल्या अलिप्ततावादी भारताकडेही त्यांचं लक्ष होतं.

एका पत्रकाराला उत्तर देतांना ते म्हणतात, "मी गांधी आणि नेहरुंचं काम आदरानं पाहिलं आहे. अमेरिका-रशिया वादामध्ये तटस्थ राहण्याची भारताची भूमिका अशा अधिक अलिप्ततावादी राष्ट्रांना एकत्र आणेल आणि शांततेचा उपाय शोधेल." चीन आणि तैवानच्या वादातही नेहरुंनी मध्यस्थी करावी यासाठी आईनस्टाईननं त्यांना लिहिलं आहे.

महर्षी कर्वे जेव्हा आईनस्टाईनना भेटतात

ज्या भारतीयांच्या अल्बर्ट आईनस्टाईन यांच्याशी संबंध आला त्यात अजून एक महत्वाचं नाव म्हणजे 'भारतरत्न' महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्व्यांना महत्वाचे समाजसुधारक म्हणून ओळखलं जातं.

पुण्यात त्यांनी विधवाविवाह आणि स्त्री-शिक्षणाचं उभं केलेलं कार्य कालातीत होतं. 'कर्वे स्त्री शिक्षण संस्था' उभारुन त्यांनी एक मोठी संस्था उभारली.

पण स्त्री-शिक्षणाचं हे महत्वाचं काम उभारतांना त्यांना अल्बर्ट आईनस्टाईन यांचीही मदत झाली हे कदाचित थोडक्यांना माहित असावं.

आईनस्टाईन यांना महर्षी कर्वे जर्मनीत बर्लिन येथे भेटले.

फोटो स्रोत, Albert Einstein Estate/Twitter

फोटो कॅप्शन, आईनस्टाईन यांना महर्षी कर्वे जर्मनीत बर्लिन येथे भेटले.

त्यासाठी कर्वे हे युरोपच्या दौ-यावर असतांना 1928 च्या सुमारास जर्मनीत बर्लिन येथे आईनस्टाईन यांना भेटले. त्या भेटीचं छायचित्रही उपलब्ध आहे. ही भेट झाल्याची नोंद आईनस्टाईन यांच्या भेटींच्या वहीतही नोंद आहे.

कर्वे यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलं की महिला विद्यापीठाची कल्पना त्यांच्या मनात घोळत होती आणि त्यासाठी युरोपचा दौरा त्यांनी केला. या दरम्यानच त्यांची आईनस्टाईनशी भेट झाली. आईनस्टाईच्या आवाहनाचाही त्यांना फायदा झाला असावा.

आईनस्टाईननं सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडल्यानंतर तो प्रयोगानं सिद्ध होण्याअगोदर 1919 मध्येच तो पहिल्यांदा भाषांतरित भारतात साहा आणि बोस यांनी केला होता. तेव्हापासून भारताला आईनस्टाईनचं आणि आईनस्टाईनला भारताचं कुतुहल राहिलं आहे.

आजही अनेक तरुण भारतीय वैज्ञानिक आईनस्टाईनच्या सिद्धांतांवर काम करत आहेत, प्रसंगी आव्हान देत आहेत. पण दोघांचा एकमेकांवरचा प्रभाव जराही कमी झालेला नाही.