तेराव्याच्या जेवणात रायता खाल्ल्यानंतर अँटी-रेबीज लस घेण्यासाठी का लागली रांग?

फोटो स्रोत, AMIT KUMAR
- Author, सैयद मोजिज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात तेराव्याच्या जेवणात रायता खाल्ल्यानंतर जवळपास 200 लोकांनी अँटी-रेबीज लस घेतली आहे.
बदायू जिल्ह्यातील उझानी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पिपरौल गावात तेराव्या दिवसाच्या जेवणात लोकांना रायता वाढण्यात आला होता.
गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना नंतर माहित झालं की हा रायता बनवण्यासाठी ज्या म्हशींचं दूध वापरण्यात आलं होतं, त्यापैकी एका म्हशीचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की त्या म्हशीला कुत्रा चावला होता आणि तिच्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसली होती.
लखनौमधील डॉक्टर बाकर रजा म्हणतात, "संक्रमित प्राणी किंवा गुरांचे कच्चे दूध किंवा मांस खाल्ल्यानंतर अँटी-रेबीज इंजेक्शन घेणं आवश्यक आहे."
बदायूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) रामेश्वर मिश्रा म्हणतात, "रेबीज झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणं खूप कठीण असतं. त्यामुळेच खबरदारी म्हणून अँटी-रेबीज लस घेणं योग्य ठरतं."

गावकऱ्यांनुसार, 23 डिसेंबर 2025 ला गावातील एका व्यक्तीच्या तेराव्यानिमित्त जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
या जेवणाला गावातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसच इतर गावं आणि शहरांमधूनदेखील अनेक नातेवाईक आणि परिचित आले होते. या जेवणात लोकांना रायतादेखील वाढण्यात आला होता.
गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांना जेवणानंतर माहीत झालं की रायता तयार करण्यासाठी ज्या म्हशीच्या दुधाचा वापर करण्यात आला होता, त्या म्हशीला कुत्रा चावला होता. त्यानंतर त्या म्हशीला काही काळ वेगळं ठेवण्यात आलं होतं. मात्र त्या म्हशीचं दूध काढून ते इतर म्हशींच्या दुधामध्येच मिसळण्यात आलं होतं.
त्या म्हशीचा 26 डिसेंबर 2025 ला मृत्यू झाला आणि तिच्यामध्ये रेबीजची लक्षणंसुद्धा दिसली होती.
त्यानंतर 27 डिसेंबर गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटी-रेबीज लस घेण्यास सुरुवात केली.
उझानीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी गेलेले कौशल कुमार म्हणाले, "ज्या म्हशीच्या दुधाचा मठ्ठा खाल्ला होता, तिचा 26 डिसेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर माहीत झालं की म्हशीला कुत्रा चावला होता. त्यामुळे आम्ही इथे लस घेण्यासाठी आलो आहोत."
गावातील काहीजणांनी सांगितलं की त्यांच्या मनात भीती निर्माण झाली की कदाचित त्या सर्वांना एक गंभीर आणि जीवघेणा आजार होईल.

फोटो स्रोत, AMIT KUMAR

म्हशीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सर्वात आधी काहीजणांनी उझानीच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात संपर्क केला.
डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी अँटी-रेबीज लस घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर मोठ्या संख्येनं गावकरी, ग्रामीण सामुदायिक आरोग्य केंद्रात आणि खासगी हॉस्पिटलमध्ये येण्यास सुरुवात झाली.
तेराव्याचं जेवण केलेल्या धर्मा यांनी सांगितलं, "संसर्ग होईल की काय अशी भीती वाटते आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी आलो आहोत."
हॉस्पिटलमध्ये महिलादेखील मोठ्या संख्येनं आल्या होत्या. या महिलांनी देखील तेराव्याचं जेवण केलं होतं.
याच लोकांमध्ये असलेल्या कमलेश म्हणाल्या, "आम्ही तेराव्याच्या जेवणासाठी गेलो होतो. तिथे म्हशीच्या दुधापासून रायता बनवण्यात आला होता. त्या म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळेच आम्ही इथे आलो आहोत."

फोटो स्रोत, AMIT KUMAR
सीएमओ रामेश्वर मिश्रा म्हणाले की शनिवार, 28 डिसेंबरपर्यंत 166 जणांनी अँटी-रेबीज लस घेतली होती.
अँटी-रेबीज लस घेणाऱ्यांची एकूण संख्या जवळपास अडीचशे होऊ शकते.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, रेबीज एक गंभीर आजार आहे. कोणत्याही प्रकारची शंका आल्यावर खबरदारी घेणं आवश्यक आहे.
आरोग्य विभागाच्या टीमनं 27 डिसेंबरला गावात जाऊन लोकांना समजावलं की घाबरण्याची गरज नाही. मात्र लशीचे सर्व डोस वेळेवर घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
गावकऱ्यांनी हेदेखील सांगितलं की सध्या कोणामध्येही रेबीजची लक्षणं आढळलेली नाहीत. आरोग्य विभागानुसार, गावातील स्थिती आता सामान्य आहे. लोक हळूहळू निर्धास्त होत आहेत.
बदायूचे सीएमओ रामेश्वर मिश्रा म्हणाले, "ज्यांनी रायता खाल्ला होता, त्यांना लस दिली जात आहे. लस घेण्यात कोणताही अपाय नाही."
ते पुढे म्हणाले, "खबरदारीचा उपाय म्हणून लस घेण्यात काहीही नुकसान नाही. कारण रेबीजवर जवळपास कोणताही उपचार नाही."

फोटो स्रोत, AMIT KUMAR

दरम्यान गोरखपूरमधून देखील अशीच बातमी समोर आली आहे. तिथे जवळपास 200 जणांनी अँटी-रेबीज लस घेतली आहे.
इंडिया टुडे या मासिकातील एका वृत्तानुसार, गोरखपूरमधील उरुवा ब्लॉकमधील रामडीह गावात रेबीजचा संसर्ग झालेल्या गाईचा मृत्यू झाला होता.
वृत्तानुसार, या गाईच्या कच्च्या दूधाचा वापर गावातील एका कार्यक्रमात करण्यात आला होता.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दूधाचं सेवन जवळपास 200 जणांनी केलं होतं.
या गाईला तीन महिन्यांपूर्वी एक भटका कुत्रा चावला होता. त्यानंतर त्या गाईचं वर्तन असामान्य आणि आक्रमक झालं होतं. डॉक्टरांनी नंतर ही लक्षणं रेबीजशी जोडली.
गाईच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागानं दूध प्यायलेल्या सर्व लोकांना अँटी-रेबीज लस घेण्याचा सल्ला दिला होता.
उरुवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे इंचार्ज डॉक्टर ए पी सिंह म्हणाले की आतापर्यंत 170 हून अधिक लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.
रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे माणसांवर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, AMIT KUMAR
हा प्रश्न विचारल्यावर लखनौमधील डॉक्टर बाकर रजा म्हणाले, "संक्रमित प्राणी किंवा गुरांचं कच्चं दूध किंवा मांस खाल्ल्यानंतर अँटी-रेबीज लस घेणं महत्त्वाचं आहे. अर्थात उकळलेल्या दूधाच्या बाबतीत या आजाराची शक्यता कमी असते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून लस घेतली पाहिजे. कारण रेबीजवर कोणतेही उपचार नाहीत."
बलरामपूरमधील सरकार हॉस्पिटलमधील डॉक्टर गौरी शंकर वर्मा म्हणाले, "उकळलेल्या दुधाच्या बाबतीत कमी धोका असतो. मात्र तरीदेखील धोका असतो. कारण हे माहित नसतं की दूध किती तापमानाला आणि किती वेळ तापवण्यात आलं आहे."
डॉक्टर गौरी शंकर वर्मा म्हणतात, "सर्व लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून अँटी-रेबीज लशीचे पाच डोस दिले जातात. पहिला डोसच्या तीन दिवसांनी दुसरा डोस, सातव्या दिवशी तिसरा डोस, चौदाव्या दिवशी चौथा डोस आणि अठराव्या दिवशी शेवटचा डोस दिला जातो."
आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की रेबीज हा एक जीवघेणा आजार आहे. यात योग्य वेळी लसीकरण केल्यास हा आजार पूर्णपणे रोखता येतो. अशा प्रकरणांमध्ये जागरुकता आणि सतर्कता हाच सर्वात मोठा बचाव आहे.
दरम्यान, देशभरात डॉग बाइट म्हणजे कुत्रा चावल्याच्या प्रकरणांची संख्या सातत्यानं वाढते आहे.
2023 मध्ये ही संख्या जवळपास 30 लाख होती. मात्र आता ही संख्या आणखी वाढली आहे.
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्य मंत्री एस पी सिंह बघेल यांनी 22 जुलै 2025 ला लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं होतं, "2024 मध्ये देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. यादरम्यान रेबीजमुळे झालेल्या संशयास्पद 54 मृत्यूचं वृत्तदेखील समोर आलं होतं."
ही आकडेवारी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत गोळा करण्यात आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











