'लडका कभी काम करता है?', ऑस्कर नामांकित 'अनुजा' शॉर्टफिल्मचा हा डायलॉग काय सांगतो?

अनुजा चित्रपटातील एक दृश्य

फोटो स्रोत, ANUJAFILM

फोटो कॅप्शन, अनुजा चित्रपटातील एक दृश्य

"मुली महत्त्वाकांक्षी नसतील तर मग कोण असेल? मुलगा कधी काम करतो का?"

अनुजा आणि पलक या दोन बहिणी अंधाऱ्या जागी बसलेल्या असतात. टॉर्चच्या प्रकाशात वर्तमानपत्रात "वधुवरा"च्या जाहिराती वाचत असतात. त्यावेळी त्या हे वाचतात आणि त्यावर मत मांडतात.

भारतातील कथेवर आधारित "अनुजा" या शॉर्ट फिल्मला ऑस्कर्स म्हणजे द अ‍ॅकेडमी अवार्डसाठी नामांकन मिळालं आहे. ही शॉर्ट फिल्म 23 मिनिटांची आहे. 'अनुजा'ला बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म प्रकारात नामांकन मिळालं आहे.

अ‍ॅडम जे ग्रेव्स 'अनुजा'चे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. प्रियंका चोप्रा जोनास 'अनुजा'ची कार्यकारी निर्माती आहे. चित्रपटाच्या नऊ निर्मात्यांमध्ये गुनीत मोंगा कपूरही आहेत.

2023 मध्ये 'बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी' श्रेणीत ऑस्कर जिंकणाऱ्या 'द एलिफंट व्हिसपरर्स' या भारतीय माहितीपटाच्या निर्मात्याही गुनीत मोंगा होत्या. ऑस्कर पुरस्कार जिंकणारा हा पहिला भारतीय माहितीपट होता. गुनीत यांच्या 'पीरियड' या शॉर्ट फिल्मलाही ऑस्कर पुरस्कारांमध्ये यश मिळालं होतं.

'अनुजा' शॉर्ट फिल्मची कथा, त्याच्याशी संबंधित लोक आणि ऑस्कर जिंकणाऱ्या भारतीयांबद्दल या लेखात जाणून घेऊया. त्याचबरोबर ऑस्कर पुरस्कारांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, हे देखील जाणून घेऊया.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

काय आहे 'अनुजा' ची कथा?

'अनुजा' ही दोन बहिणींची कथा आहे. त्या दोघी दिल्लीतील एक कापड कारखान्यात काम करतात. तिथे काम करत असताना आयुष्यातील आव्हानं आणि दोन्ही बहिणींच्या गप्पा यातून चित्रपटाची कथा पुढे सरकते.

चित्रपटात अनुजाचं वय फक्त नऊ वर्षे आहे. ती तिची बहीण पलक बरोबर राहते. अनुजाची भूमिका सजदा पठाणनं केली आहे तर पलकची भूमिका अनन्यानं केली आहे.

सजदा 'सलाम बालक ट्रस्ट'च्या सेंटरमध्ये राहते. बालमजुरीपासून सुटका, मुलींना शिक्षणाची संधी आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं काम ही ट्रस्ट करते.

चित्रपटात अनुजाची भूमिका करणारी सजदा

फोटो स्रोत, ANUJAFILM

फोटो कॅप्शन, चित्रपटात अनुजाची भूमिका करणारी सजदा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये या बहिणी बोर्डिंग शाळेतील शिक्षण, वधूवराच्या जाहिराती यांच्यावर बोलताना दिसतात.

मुलींना समाजात वावरताना ज्या तिरकस नजरांना तोंड द्यावं लागतं, त्याची एक झलक 'अनुजा'च्या ट्रेलरमध्ये दिसते.

आयएमडीबी या चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बेवसाईटनुसार, या चित्रपटात अनुजाला शाळेत शिकण्याची एक संधी मिळते.

या महत्त्वाच्या निर्णयापर्यंत कसं पोहोचावं हे या बहिणींसमोरचं आव्हान असतं, अशी या चित्रपटाच्या कथा आहे. हा निर्णय या दोन्ही बहिणींचं आयुष्य बदलू शकतो.

'अनुजा'चे दिग्दर्शक कोण आहेत?

'अनुजा' चित्रपटाच्या वेबसाईटनुसार, अ‍ॅडम जे ग्रेव्स यांनी पेंसिलेव्हेनिया विद्यापीठात बीए आणि पीचएडी केलं आहे.

ते प्रदीर्घ काळ वाराणसीतही राहिले आहेत. अ‍ॅडम यांनी बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृतचं शिक्षण घेतलं आहे.

राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक स्वयंसेवी संस्थांशी देखील अ‍ॅडम जोडले गेलेले आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्या सुचित्रा मत्तई आहेत. सुचित्रा या अ‍ॅडम यांच्या पत्नीदेखील आहेत.

2024 च्या ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभाचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2024 च्या ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभाचा फोटो

युनीसेफनुसार, जगात सरासरी 10 पैकी एक मुलगी बालमजूरीला तोंड देत असते. ही आकडेवारी आणि आपल्या आसपासच्या मुलींची परिस्थिती पाहून हा चित्रपट बनवला असल्याचं अ‍ॅडम सांगतात.

अ‍ॅडम म्हणतात, "मी ज्या मुलींना भेटलो, त्या मुली कठीण परिस्थिती असतानादेखील खूपच प्रेरणादायी होत्या, त्यांच्यात अंगभूत लढवय्येपणा होता. या मुलींच्या क्षमतांचा प्रभाव पडणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. या मुलींच्या अनुभवावर आधारित चित्रपट बनवणं आवश्यक होतं."

ऑस्करच्या शर्यतीत भारतीय कधी होते?

ऑस्कर हा चित्रपटांच्या दुनियेतील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

आतापर्यंत अनेक भारतीयांनी ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. अर्थात ज्या चित्रपटांचा परदेशी संबंध होता अशांना मिळालेल्या ऑस्करची संख्या जास्त आहे.

ज्या भारतीयांना आतापर्यंत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे त्यात पुढील नावांचा समावेश आहे,

  • 1983: भानू अथैया यांना 'गांधी' चित्रपटासाठी 'बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन'च्या श्रेणीत ऑस्कर मिळाला होता.
  • 1992: सत्यजित रे यांना 'ऑनररी लाईफ टाइम अचिव्हमेंट' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
  • 2009: रसूल पोकुट्टी यांना 'स्लमडॉग मिलियनेर' चित्रपटासाठी 'साऊंड मिक्सिंग'साठी ऑस्कर मिळाला होता.
  • 2009:'स्लमडॉग मिलियनेर' चित्रपटासाठी 'ओरिजिनल सॉंग' साठी गुलजार यांना आणि 'ओरिजिनल स्कोअर'साठी ए आर रहमान यांना ऑस्कर मिळाला होता.
  • 2023: 'द एलीफंट व्हिसपरर्स' या चित्रपटासाठी गुनीत मोंगा आणि कार्तिकी यांना 'बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट कॅटेगरी'साठी ऑस्कर मिळाला होता.
  • 2023: 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्यासाठी संगीतकार किरावानी आणि गीतकार चंद्रबोस यांनी 'ओरिजिनल सॉंग' श्रेणीत ऑस्कर मिळाला होता.

याव्यतिरिक्त, भारतीयं वंशाच्या राहुल ठक्कर, कोटालांगो लियोन यांना 2016 आणि विकास यांना 2018 मध्ये 'अकॅडेमी अवार्ड फॉर टेक्निकल अचिव्हमेंट' पुरस्कार मिळाला होता.

अनुजाचा ऑस्करपर्यंतचा प्रवास

वरिष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक रामचंद्रन श्रीनिवासन यांनी बीबीसीला सांगितलं की, "नामांकन हा प्रक्रियेचाच भाग आहे. चित्रपटाची निवड होण्यापासून पुरस्कार मिळण्यापर्यंतची प्रक्रिया जवळपास सहा महिन्यांची असते. या कालावधीत चित्रपट बनवणारे चित्रपटाला पुरस्कार मिळावा म्हणून जोरदार प्रयत्न करतात."

ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे जगभरात 10 हजारांहून अधिक सदस्य असतात. त्यातील बहुतांश अमेरिकेतीलच असतात. तर भारतातून जवळपास 40 जण याचे सदस्य असतात.

हे सदस्य संपादन, ध्वनी, व्हीएफएक्स सारख्या वेगवेगळ्या 17 श्रेणींशी संबंधित असतात. यातील 16 श्रेणी कलेशी निगडीत असतात तर 17 वी श्रेणी बिगर तांत्रिक असते.

सत्यजीत रे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सत्यजीत रे

श्रीनिवासन म्हणाले होते, "दरवर्षी या श्रेणींशी संबंधित सदस्य ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या 300 हून अधिक चित्रपटांसाठी मतदान करतात. मग मतदानाच्या आधारे 10 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये चित्रपटांची निवड होते. निवडलेल्या चित्रपटांसाठी पुन्हा मतदान होतं आणि शेवटी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची अंतिम यादी तयार केली जाते."

मग पुढील जबाबदारी पीआर कंपन्या सांभाळतात. त्यानंतर चित्रपट अ‍ॅकॅडमीच्या सदस्यांना दाखवला जातो.

श्रीनिवासन म्हणाले, "तुमचा चित्रपट दाखवण्यासाठी तुम्ही कोण आहात? हे त्यांना सांगावं लागतं. त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागतो. नाश्ता, जेवण सोबत करावं लागतं. चित्रपटाच्या मार्केटिंगमध्ये कोणतीही चूक होऊ न देण्याचाच तुमचा प्रयत्न असतो."

1957 मध्ये प्रदर्शित झालेला 'मदर इंडिया' हा ऑस्करच्या टॉप पाच चित्रपटांमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय चित्रपट होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)