अमजद खान यांना गब्बरची भूमिका अशी मिळाली होती

SHOLAY MOVIE

फोटो स्रोत, SHOLAY MOVIE

"यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा."

हा संवाद होता शोले सिनेमातल्या गब्बरसिंहची भूमिका करणाऱ्या अमजद खान यांचा.

एखाद्या खलनायकाला डोक्यावर घेऊन तो सिनेमा खलनायकामुळे लक्षात राहणं फारच दुर्मिळ असतं. शोले आणि गब्बर यांचं नातं तसंच होतं.

या भूमिकेत अमजद खानन अगदी सहज वावरताना दिसले तरी ही भूमिका त्यांच्या वाट्याला तितक्या सहजी आली नव्हती.

गब्बरची भूमिका

गब्बरची भूमिका आधी डॅनी यांना देऊ करण्यात आली होती तसंच स्क्रीन या नियतकालिकात शोलेमधील कलाकारांच्या फोटोंतही डॅनी यांना स्थान मिळालं होतं.

पण त्याचवेळेस डॅनी यांना फिरोज खान यांच्या धर्मात्मा सिनेमाचं चित्रिकरण करण्यासाठी अफगाणिस्तानात जायचं होतं. त्यामुळे त्यांनी शोलेचं काम सोडलं.

तेव्हा सलिम खान यांनी जावेद अख्तर यांना अमजद खान यांची आठवण करुन दिली. जावेद अख्तर यांनी अमजद यांचं एक नाटक दिल्लीत पाहिलं होतं. त्याचं कौतुकही त्यांनी सलीम यांच्याजवळ केलं होतं, याला बरीच वर्षं होऊन गेली होती.

गब्बरच्या भूमिकेसाठी शोध सुरू असताना सलीम यांना अमजद यांची आठवण झाली. अमजद खान हे प्रसिद्ध चरित्र अभिनेता झकारिया खान म्हणजेच जयंत यांचे पुत्र होते.

अमजद खान यांच्यासंबंधित काही रोचक गोष्टी

  • पेशावरमधील एका पठाण कुटुंबात जन्मलेले अमजद खान यांनी नाटकाच्या माध्यमातून सिनेक्षेत्रात प्रवेश केला होता. वडील जयंत यांच्याबरोबर त्यांनी काही सिनेमांत बालकलाकार म्हणून काम केलं होतं पण 1973 साली चेतन आनंद यांच्या हिंदुस्थान की कसममधून त्यांच्या सिनेकारकीर्दीची वाटचाल सुरू झाली.
  • 1975 मध्ये अमजद यांना शोलेमध्ये संधी मिळाली. एका बिस्किट कंपनीनं त्यांना ब्रँड अँबेसडर म्हणून नेमलं होतंं यावरुन गब्बरच्या भूमिकेचं यश दिसून येतं. जाहिरातींमध्ये बॉलीवूड खलनायकांना स्थान मिळणं तसं दुरापास्तच.
  • अमजद खान यांच्याआधी हिंदी सिनेमात अजित यांना खलनायकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. मात्र सिनेमात खलपुरुषाला एक वेगळी ओळख मिळण्याचं काम गब्बरमुळे झालं. 70 आणि 80 च्या दशकात खलनायकाची लोकप्रियता आणि लोकाग्रह याचा विचार करता अमजद खान यांनी त्या काळावर अधिराज्य गाजवलं, असं म्हणावं लागेल.
  • नायकाची भूमिका करणारे अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध अमजद खान खलनायक म्हणून अनेक यशस्वी सिनेमांत दिसले. यात मुकद्दर का सिकंदर, लावारिस, महान, देशप्रेमी, राम-बलराम, गंगा की सौगंध, परवरिश, नसीब, मिस्टर नटवरलाल, सुहाग, नास्तिक, सत्ते पे सत्ता, कालिया अशा सिनेमांचा समावेश होता.
SHATRANJ KE KHILARI

फोटो स्रोत, SHATRANJ KE KHILARI

  • अमजद खान फक्त गब्बरच्या प्रतिमेत अडकून पडले नाहीत. त्यांनी सत्यजीत रे यांच्या शजरंज के खिलाडी सिनेमात अवधच्या वाजिद अली शाह नवाबाची भूमिका केली होती. इस्ट इंडिया कंपनीचं पुढचं लक्ष्य झालेल्या अवध संस्थानाच्या लाचार नवाबाची ही भूमिका होती. याच मालिकेत गिरीश कर्नाड यांच्या उत्सवचं ही नाव घेतलं जातं.
  • उत्सवमध्ये अमजद खान यांनी कामसूत्राचे लेखक वात्सायन यांची भूमिका केली होती. अमजद यांनी फक्त नकारात्मक भूमिका केल्या असं नाही. यारानामध्ये ते अमिताभ यांचे मित्र तर प्रकाश मेहरा यांच्या लावारिसमध्ये ते अमिताभ यांचे वडील झाले होते.
  • सिनेमात आपण लोकांना फक्त घाबरवूच शकत नाही तर हसवूही शकतो हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं होतं. फिरोज खान यांचा कुर्बानी आणि बासू चॅटर्जी यांच्या चमेली की शादी सिनेमात त्यांनी अशा लोकांना हसवणाऱ्या भूमिका अमजद खान यांनी केली होती.
LAAWARIS MOVIE

फोटो स्रोत, LAAWARIS MOVIE

1976 साली झालेल्या रस्ते अपघातात अमजद खान यांचं आयुष्यच बदलून गेलं. उपचारांमुळे त्यांचा जीव वाचला पण औषधांच्या दुष्परिणांमुळे त्यांचं वजन वाढत गेलं. या लठ्ठपणाशी ते दीर्घकाळ झगडत राहिले. 27 जुलै 1992 रोजी वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.

हे ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)