आयटी बिघाडामुळे जगभरातील लाखो उपकरणं ठप्प का झाली? 5 प्रश्न आणि 5 उत्तरं

कम्प्युटर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

क्राऊडस्ट्राईक...आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी तुमचा संबंध नसेल, तर तुम्ही शुक्रवारी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं असेल.

आपण आपल्या मोबाईलमध्ये एखादं अ‍ॅप्लिकेशन अपडेट करतो अगदी तसाच एक अपडेट या क्राऊडस्ट्राईक नावाच्या कंपनीने बनवला, हे अपडेट होत असताना त्यात काही तांत्रिक बिघाड आला आणि जगभरातील अनेक बँका, एअरलाइन्स आणि टेलिकम्युनिकेशनचं कामकाज अचानक ठप्प झालं.

त्यादिवशीची तब्बल 3 हजार 300 विमानं रद्द करण्यात आली, लाखो कम्प्युटर बंद पडले, सोशल मीडिया आणि माध्यमांवर जागतिक आयटी संकटाच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या आणि एकच गोंधळ उडाला.

मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणारी विमानतळं, रेल्वे लाईन्स, मोठमोठ्या आयटी कंपन्या त्यादिवशी ठप्प झाल्या.

अर्थात लिनक्स आणि अ‍ॅपलची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांवर याचा काहीही परिणाम झाला नसला तरी या घटनेमुळे जगभरात मोठं नुकसान झाल्याचं बोललं जातंय.

माहिती तंत्रज्ञानाच्या जगात एक छोटासा 'बग' किती धुमाकूळ घालू शकतो हे शुक्रवारी दिसून आलं. आता बातमीच्या सुरुवातीलाच आयटी, मायक्रोसॉफ्ट, क्राऊडस्ट्राईक असे तांत्रिक शब्द ऐकून तुमची भंबेरी उडाली असेल तर थोडं थांबा.

शुक्रवारी जगभरात नेमकं काय घडलं? लाखो करोडो कम्प्युटरचा भाग असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबाबत कोणती माहिती सांगितली आहे?

त्यादिवशी तुमचा कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण या आयटी बिघाडामुळे बंद पडलं असेल तर कोणती खबरदारी बाळगायला हवी? आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.

बीबीसी
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

1. शुक्रवारी नेमकं काय घडलं?

तुम्ही कम्प्युटर किंवा मोबाईल वापरत असाल तर व्हायरस आणि हॅकिंग असे शब्द देखील कधीतरी तुमच्या कानावर पडलेच असतील. तर आयटी क्षेत्रात हॅकिंग करू पाहणाऱ्या हॅकर्सना रोखण्यासाठी अँटीव्हायरस बनवण्याचं काम क्राऊडस्ट्राईक नावाची ही कंपनी करते.

ही एक अमेरिकन कंपनी असून ऑस्टिन, टेक्सास, मध्ये हिची कार्यालयं आहे आणि अमेरिकेच्या भांडवली बाजारातली ही एक लिस्टेड कंपनी आहे.

थोडक्यात काय तर एखादा कम्प्युटर किंवा सिस्टीम हॅक झाली तर त्यानंतर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी क्राऊडस्ट्राईकची मदत घेतली जाते.

आयटी बिघाड झाल्यानंतर हातात फलक घेऊन उभा असलेला मुलगा

फोटो स्रोत, GETTY IMAGES

आता लोकांच्या अडचणी सोडवणाऱ्या या कंपनीने त्यांच्या अँटीव्हायरसमध्ये एक अपडेट केला आणि जगभरातील मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणारे सगळे कम्प्युटर अचानक बंद पडले.

जगभरातून 'ब्लु स्क्रीन ऑफ डेथ' म्हणजेच एखादा कम्प्युटर बंद पडल्यावर, नादुरुस्त झाल्यावर दिसणारी निळी स्क्रीन दिसत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या.

या बिघाडाचं कारण अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी क्राऊडस्ट्राईकचे प्रमुख जॉर्ज कुर्ट्झ म्हणाले की, "हा सिक्युरिटी किंवा सायबर अटॅक नाही. कारण या बिघाडामुळे फक्त मायक्रोसॉफ्टचे ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्या कम्प्युटरवरच याचा परिणाम झाला आहे. इतर ऑपरेटिंग सिस्टीम वापरणारे संगणक सुरळीत सुरु आहेत."

क्राऊडस्ट्राईक या अँटीव्हायरस तयार करणाऱ्या कंपनीने एक सॉफ्टवेअर अपडेट केलं. त्यामुळे हा गोंधळ झाला असा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर कुर्ट्झ यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं.

2. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय?

ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे तुमचा कम्प्युटरचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करणारी एक यंत्रणा. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वेगवेगळे प्रोग्रॅम असतात, ज्यांचा वापर करून तुमच्या संगणकावर माहितीचं व्यवस्थापन आणि नियंत्रण केलं जातं.

ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळी कामं करत असते. ज्यामध्ये तुमच्या कम्प्युटरची मेमरी व्यवस्थापित करणे, संगणकाचे युजर आणि त्यातील डेटा यांचं व्यवस्थापन करणे, कम्प्युटरला इतर कामं करण्यासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणे, एकाच वेळी अनेक कामं करणे, वापरकर्त्यांना येणारा अनुभव (युजर इंटरफेस) नियंत्रित करणे इत्यादी. थोडक्यात काय तर तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टींसाठी ऑपरेटिंग सिस्टीम जबाबदार असते.

कम्प्युटर वापरत असलेले लोक, ज्यांच्या मागे विंडोजचा लोगो आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows), अ‍ॅपल ओएस एक्स (Apple OS X), लिनक्स (Linux), अँड्रॉइड(Android) आणि आयओएस (IOS) ही ऑपरेटिंग सिस्टीमची काही उदाहरणं आहेत.

3. शुक्रवारचा आयटी बिघाड किती मोठा होता?

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी या घटनेला 'आयटी क्षेत्रातील आजवरचं सगळ्यात मोठं अपयश' असं म्हटलं. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारच्या जागतिक आयटी बिघाडामुळे जगभरातील तब्बल 85 लाख संगणक बंद पडले होते.

पहिल्यांदाच अशाप्रकारच्या संकटात प्रभावित झालेल्या सिस्टिम्सचा आकडा सांगण्यात आला आहे ज्यावरून हे दिसतं की हा बिघाड आजवरच्या आयटी क्षेत्रातील इतिहासातला सगळ्यात मोठा बिघाड होता.

मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष डेव्हिड वेस्टन यांनी पोस्ट करून माहिती दिली की, जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरणाऱ्या सिस्टिम्स पैकी 1 टक्क्याहूनही कमी सिस्टिम्सवर या बिघाडाचा परिणाम झाला.

मात्र जगभरातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात याचे झालेले परिणाम पाहता क्राऊडस्ट्राईक किती महत्त्वाच्या कंपन्यांकडून वापरलं जातं हे लक्षात येतं.

क्राऊडस्ट्राईक

फोटो स्रोत, Getty Images

4. याआधी असं घडलं होतं का?

याआधी 2017 मध्ये WannaCry सायबर-हल्ल्यात 150 देशांमधील सुमारे 3 लाख कम्प्युटरवर परिणाम झाला होता. या हल्ल्याच्या एक महिन्यानंतर एका NotPetya नावाचा आणखीन एक मोठा सायबर हल्ला झाला होता.

2021 साली इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप चालवणारी मेटा ही कंपनी सहा तासांसाठी ठप्प झाली होती.

5. कोणती खबरदारी घेतली पाहिजे?

सायबर सुरक्षा कंपन्या आणि तज्ज्ञांच्या मते अजूनही तुमचा संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टीम सतत अपडेट करत राहणं हा चांगला मार्ग आहे.

अर्थात शुक्रवारी अशाच एका अपडेटमुळे यंत्रणा ठप्प झाल्याचं बोललं जात असलं तरीही नवनवीन अपडेट्स महत्त्वाचे असतात.

तुम्ही क्राऊडस्ट्राईकचे ग्राहक असाल तर इतर कुणाचीही मदत न घेता क्राऊडस्ट्राईकच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आवश्यक त्या सूचना मिळवू शकता.

तुम्ही एखाद्या आयटी कंपनीत काम करत असाल किंवा तुमच्या कंपनीत स्वतंत्र आयटी टीम असेल तर ते ही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करतील.

मायक्रोसॉफ्टने ग्राहकांना आणखीन एक सोपा मार्ग सांगितला आहे आणि तो म्हणजे तुमचा कम्प्युटर किंवा सिस्टीम बंद करून पुन्हा सुरु करणे. एकदा असं करून कम्प्युटर सुरु होत नसेल तर अनेकवेळा सिस्टीम बंद करून चालू करण्याचा मार्ग तुमची अडचण सोडवू शकतो.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वर पोस्ट करून या प्रकाराची माहिती दिली

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वर पोस्ट करून या प्रकाराची माहिती दिली

भारताच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT)ने या संबंधी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. याबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वर पोस्ट करून माहिती दिली होती.

  • विंडोज सेफ मोड किंवा विंडोज रिकव्हरी इन्वॉन्मेंट मध्ये सुरू करा.
  • आता C:\\Windows\System 32\drivers\Crowdstrike directory वर जा
  • आता C- 000291*.sys, ही फाईल शोधा आणि डिलिट करा.
  • आता सिस्टिम पुन्हा नेहमीसारखी सुरू करा.
 प्रवासी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे जगभरातील विमानतळावर प्रवासी अडकले होते

यूके आणि ऑस्ट्रेलियामधील सायबर सुरक्षा संस्थांनी लोकांना अधिकृत असल्याचे भासवणाऱ्या बनावट ईमेल, कॉल आणि वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

क्राऊडस्ट्राईकचे प्रमुख जॉर्ज कुर्ट्झ यांनी कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींशी बोलत असल्याची खात्री करण्याची सूचना दिली आहे.

आता शेवटी तुमच्यासाठी एक चांगली बातमी अशी आहे की ज्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे हा सगळा गोंधळ झाला आहे ते सॉफ्टवेअर प्रामुख्याने मोठमोठ्या कंपन्यांकडून वापरला जातो त्यामुळे तुमच्या वैयक्तिक संगणकावर याचा परिणाम झाला असल्याची शक्यता कमी आहे.

असं असलं तरी शुक्रवारी घडलेल्या प्रकारामुळे आपण किती परावलंबी बनलो आहोत हे सिद्ध झालं आहे. परदेशातील एका कंपनीकडून दुरस्थपणे नियंत्रित केली जाणारी उपकरणं अचानक थांबली, बिघडली तर जगात किती मोठा गोंधळ उडू शकतो हेच आपल्याला क्राऊडस्ट्राईकच्या प्रकरणात दिसून आलं.