Fifa World Cup : मेस्सीच्या हातात वर्ल्ड कप, अर्जेंटिनाचं स्वप्न 36 वर्षांनंतर साकार

मेस्सी

फोटो स्रोत, Getty Images

कतारमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील काही खास गोष्टी-

  • अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून फ़ुटबॉल वर्ल्ड कप 2022 जिंकला आहे.
  • अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. 1978 आणि 1986 मध्येही अर्जेंटिनाने जगज्जेतेपद पटकावलं होतं.
  • पेनल्टी शूट आउटपर्यंत अंतिम सामना रंगला आणि अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये 4 गोल केले.
  • सेकंड हाफमध्ये दोन्ही संघाची आधी 2-2 अशी बरोबरी झाली आणि त्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्ये पुन्हा 3-3 अशी बरोबरी झाली.
  • अर्जेंटिनाकडून लियोनेल मेस्सीने दोन आणि मारियाने एक गोल केला.
  • फ्रान्ससाठी एम्बापेनं तीन गोल केले.
  • या संपूर्ण स्पर्धेत आठ गोल करणाऱ्या एम्बापेला 'गोल्डन बूट' मिळाला.
  • सात गोल करणाऱ्या मेस्सीला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा मान मिळाला.

सार्वकालीन महान फुटबॉल लढतींमध्ये गणना होईल अशा दर्जेदार खेळाची अनुभूती अर्जेंटिना आणि फ्रान्स लढतीने दिली. निर्धारित वेळेत सामना 2-2 बरोबरीत सुटला. जादा वेळेत 3-3 बरोबरी झाली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशी सरशी साधत अर्जेंटिनाने जेतेपदावर कब्जा केला. तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वविजेतेपदावर नाव कोरलं.

मेस्सी

फोटो स्रोत, Getty Images

आधुनिक फुटबॉलमधील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या नावावर वर्ल्डकपची ट्रॉफी नव्हती. हा सल मेस्सीने दोन गोल करत भरुन काढला आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षणाची अनुभूती अनुभवली.

हा वर्ल्डकप माझा शेवटचा असेल असं मेस्सीने आधीच जाहीर केलं होतं. जेतेपदासह अर्जेंटिनासाठीच्या कारकीर्दीची सांगता करत मेस्सीने चाहत्यांना हवीहवीशी भेट दिली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने निर्विवाद वर्चस्व राखत एकावर एक गोल केले. फ्रान्ससाठी मात्र पेनल्टी शूटआऊट निराशादायी ठरला. अर्जेंटिनातर्फे माँटियल, पेरडेस, डायबाला आणि मेस्सी यांनी गोल करत अर्जेंटिनाला थरारक विजय मिळवून दिला.

चुरशीचा सामना

लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना, बार्सिलोना, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिओनेल मेस्सी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एक्स्ट्रा टाइममध्ये लिओनिल मेस्सीने पुन्हा एक गोल करत 3-2 अशी आघाडी मिळवली. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकला, पुढील काही मिनिटातच एम्बापेनी तिसरा गोल करत सामना बरोबरीत आणला.

108व्या मिनिटाला लौटारे मार्टिनेझने गोल दागला पण फ्रान्सचा गोलकीपर लॉरिसने तो छातीवर बॉल घेत अडवला. तिथेच असणाऱ्या मेस्सीने हलकेच बॉलला गोलपोस्टमध्ये ढकललं, फ्रान्सच्या उपमेकानोने गोलपोस्टमधून तो परतावला पण तो स्वत: गोलपोस्टमध्ये असल्याने अर्जेंटिनाचा गोल झाला आणि त्यांच्या चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतलं.

79व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. फ्रान्सचा हुकूमी एक्का एम्बापेने अर्जेंटिनाचा गोलकीपर ज्या दिशेने झेपावला त्याच दिशेने गोल दागला. एम्बापेच्या वेगाने गोलकीपरला भेदलं आणि फ्रान्सने गोलचं खातं उघडलं.

आणखी दोन मिनिटात, मार्कस लिलिआन थुरुम युलियनच्या वेगवान पासवर तितक्याच वेगाने एम्बापेने थरारक गोल करत फ्रान्सला बरोबरी करुन दिली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात फ्रान्सने बॉलवर नियंत्रण मिळवत दणका उडवला.

माँटेइलने एम्बापेचा फटका रोखायचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी बॉल त्याच्या हाताला लागला. रेफरींनी फ्रान्सला पेनल्टी जाहीर केली. एम्बापेने हॅट्ट्रिक करत फ्रान्सला बरोबरी करून दिली.

पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाची आघाडी

अर्जेंटिना

गोल करण्याची विलक्षण हातोटी सिद्ध करत लिओनेल मेस्सीने फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलमध्ये फ्रान्सविरुद्ध दिमाखदार गोल केला.

या गोलसह अर्जेंटिनाने आघाडी घेतली आहे. अल्वारेझ आणि डी मारिया बॉलवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नात असताना फ्रेंचच्या बचावपटूने त्यांना रोखण्यासाठी शर्थ केली. रेफरींनी अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाल्याचं घोषित केलं.

अर्जेंटिनाचा हुकमी एक्का मेस्सीने छोट्याशा रनअपसह फ्रान्सच्या गोलकीपरला चकवत शिताफीने गोल केला. मेस्सीने गोल करताच मैदानात अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 23व्या मिनिटालाच गोल झाल्याने फ्रान्सच्या खेळाडूंवर दडपण जाणवू लागलं. मेस्सीचा यंदाच्या वर्ल्डकपमधला हा सहावा गोल आहे.

36व्या मिनिटाला डि मारियाने मिळालेल्या अफलातून पासचा सुरेख उपयोग करत शानदार गोल केला. सांघिक प्रदर्शनाचं सर्वोत्तम उदाहरण पेश करत डि मारियाने अर्जेंटिनाची आघाडी वाढवली.

अॅलेक्सिस मॅकअलिस्टरने फ्रान्सच्या खेळाडूला चकवत डि मारियाकडे बॉल सोपवला. प्रचंड अंतर कापून धावत आलेल्या डि मारियाने झटपट बॉलवर नियंत्रण मिळवलं आणि फ्रान्सचा गोलकीपर लॉरिसला भेदत अफलातून गोल केला.

एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत गोल करणारा मेस्सी एकमेव खेळाडू ठरला आहे. ग्रुप स्टेज, सुपर 16, सुपर 8, सेमी फायनल आणि फायनल यासर्व फेरीत गोल करणारा लिओनेल मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरला आहे. या गोलमुळे गोल्डन बूट पुरस्कारासाठी तो प्रबळ दावेदार झाला आहे.

फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हाफटाईमला अर्जेंटिनाने 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. 23व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने तर 36व्या मिनिटाला डि मारियाने खणखणीत गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिना आणि फ्रान्स या संघांनी याआधी दोनदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला आहे. अर्जेंटिनाने विश्वचषक पटकावला तर 30 वर्षांनंतर त्यांचं विजेते होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकतं. दुसरीकडे गतविजेत्या फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी आहे. यंदाच्या स्पर्धेत सहावा गोल करणारा मेस्सी पहिल्या हाफचं वैशिष्ट्य राहिला. अर्जेंटिनाने 64 टक्के वेळ बॉलवर नियंत्रण राखत दबदबा राखला. मोरोक्कोविरुद्धच्या अवघड लढतीनंतर फायनलमध्ये दाखल झालेला फ्रान्सचा संघ काहीसा थकलेला जाणवत आहे.

कोणाचं पारडं किती जड?

आधुनिक फुटबॉलच्या शिलेदारांपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी आणि त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ वर्ल्डकप जेतेपदासाठी फ्रान्सचा मुकाबला सुरू आहे.

बार्सिलोना क्लब आणि अर्जेंटिनासाठी मेस्सीने असंख्य स्पर्धा जिंकून दिल्या आहेत पण त्याच्या शिरपेचात वर्ल्डकप नाही. ही खंत भरुन काढण्याची नामी संधी मेस्सी आणि सहकाऱ्यांसमोर असणार आहे.

दुसरीकडे सलग दुसरं जेतेपद नावावर करण्यासाठी फ्रान्सचा संघ उत्सुक आहे. 2018 मध्ये फ्रान्सने क्रोएशियाला नमवत जेतेपदाची कमाई केली होती. ते जेतेपद चमत्कार नाही हे सिद्ध करत सातत्याचा प्रत्यय घडवण्याची संधी फ्रान्सकडे आहे.

अर्जेंटिनाचा हुकूमी एक्का लिओनेल मेस्सी तर दुसरीकडे सातत्याने गोल करण्यासाठी प्रसिद्ध एमबाप्पे यांच्यात रंगणारी जुगलबंदी या लढतीचं वैशिष्ट्य असेल.

योगायोग म्हणजे मेस्सी आणि एम्बापे हे दोघंही पॅरिस सेंट जर्मेन क्लबसाठी खेळतात. कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट कंपनीनेच या संघात प्रचंड गुंतवणूक केली आहे. कतारच्या मैदानावर एरव्ही एकमेकांबरोबर खेळणाऱ्या दोन सहकाऱ्यांमध्ये विश्वविजेतेपदासाठी मुकाबला होणार आहे.

फुटबॉल वर्ल्डकप, अर्जेंटिना, फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फुटबॉल वर्ल्डकप

पेले, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याबरोबरीने सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं. यापैकी पेले यांनी ब्राझीलला तर मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला वर्ल्डकपचं जेतेपद मिळवून दिलं आहे.

पोर्तुगालच्या रोनाल्डाचं हे स्वप्न यंदा तरी पूर्ण होऊ शकलेलं नाही. पण एका विजयासह मेस्सी हे अधुरं स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकतो. मेस्सीसमोर एम्बापेच्या रुपात तगडं आव्हान असणार आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत मेस्सी आणि एम्बापे 5 गोलांसह संयुक्तपणे अव्वलस्थानी आहेत. 2018 मध्ये विश्वविजेत्या फ्रान्सच्या संघाचा एम्बापे भाग होता.

23वर्षीय एम्बापेला संघाला जिंकून देण्याची मोठी संधी आहे. पेले यांनी पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये जेतेपद पटकावलं होतं.

फुटबॉल वर्ल्डकप, अर्जेंटिना, फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेस्सीची लोकप्रियता अद्भुत आहे.

अंतिम सामन्यात गोल करून आपल्या देशाला विश्वचषक जिंकवून देण्याचा आणि स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला मिळणारा ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावण्याचा दोन्ही तारांकित खेळाडूंचा प्रयत्न असेल.

फ्रान्सच्या संघाने गेल्या दशकभरात फुटबॉल विश्वावर वर्चस्व गाजवले आहे. दिदिएर डेशॉम्प यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने गतविश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता 1962 नंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरण्याचीही फ्रान्सला संधी आहे.

डेशॉम्प हे खेळाडू म्हणून 1998 च्या विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा भाग होते. आता विश्वचषक जिंकणारे ते केवळ दुसरे प्रशिक्षक ठरू शकतील. यापूर्वी व्हिट्टोरिओ पोझ्झो यांनाच अशी कामगिरी करता आली आहे. त्यांनी 1934 आणि 1938 मध्ये इटलीला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.

फुटबॉल वर्ल्डकप, अर्जेंटिना, फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून संघाला जेतेपद मिळवून देण्याची किमया डेशॉम्प यांच्याकडे आहे.ुट

फ्रान्स आणि अर्जेटिना हे दोनही संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्नात आहेत. फ्रान्सने1998 आणि 2018 मध्ये, तर अर्जेटिनाने 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

मॅराडोना यांनी अविश्वसनीय कामगिरी करताना 1986 मध्ये अर्जेटिनाला विश्वचषक जिंकवून दिला होता. आता अर्जेटिनाला विजय मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी मेसीच्या खांद्यावर असेल.

फ्रान्सविरुद्धचा सामना हा मेसीच्या विश्वचषक कारकीर्दीतील विक्रमी 26 वा सामना असेल. मेसीने क्लब आणि जागतिक पातळीवर जवळपास सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत.

मात्र, विश्वचषकाच्या जेतेपदाने त्याला कायम हुलकावणी दिली आहे. आठ वर्षांपूर्वी जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात मेसी आणि अर्जेटिनाला पराभव पत्करावा लागला होता. आता मेसी आपल्या विश्वचषकातील कारकीर्दीची जेतेपदाने सांगता करतो का, हे पाहणं रंजक असेल.

फुटबॉल वर्ल्डकप, अर्जेंटिना, फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ज्युलियन अल्वारेझ

बेन्झेमाच्या अनुपस्थितीत एम्बापेसह ऑलिव्हिएर जिरुड आणि अ‍ॅन्टोन ग्रीझमन यांनी फ्रान्सच्या आक्रमणाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. युवा मध्यरक्षक ऑरेलियन टिचोआमेनीने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले. तसेच अ‍ॅड्रियन रॅबिओनेही खेळ उंचावला. बचावात अनुभवी राफाएल वरान आणि थिओ हर्नाडेझ यांनी चमक दाखवली.

यंदाच्या विश्वचषकातून आघाडीपटू ज्युलियन अल्वारेझच्या रूपात अर्जेटिनासाठी नवा तारा उदयास आला आहे.

22 वर्षीय अल्वारेझने मेसीला तोलामोलाची साथ देताना सहा सामन्यांत चार गोल नोंदवले आहेत. त्याने क्रोएशियाविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन गोल करत अर्जेटिनाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अर्जेंटिनाच्या यशात गोलरक्षक एमिनियानो मार्टिनेझचे योगदानही निर्णायक ठरले आहे. त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेटिनाला विजय मिळवून दिला होता. त्याने दोन पेनल्टी अडवल्या होत्या. आता एम्बापेला रोखण्याचे त्याच्यापुढे आव्हान असेल.

अर्जेंटिना आणि फ्रान्स 6 सामन्यात आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे मुकाबला तुल्यबळ होणार यात शंकाच नाही.

कतार वर्ल्डकपचं आभूषण असलेल्या लुसेल स्टेडियमवर हा मुकाबला रंगणार आहे. जवळपास लाखभर लोक याचि देही याचि डोळा या महामुकाबल्याचा आनंद लुटतील.

अर्जेंटिनाची वाटचाल

सौदी अरेबिया 1-2 मेक्सिको 2-0 पोलंड 2-0 ऑस्ट्रेलिया 2-1 नेदरलँड्स 2-2 (शूटआऊट 4-3) क्रोएशिया 3-0

फ्रान्सची आगेकूच

ऑस्ट्रेलिया 4-1 डेन्मार्क 2-1 ट्युनिशिया 0-1 पोलंड 3-1 इंग्लंड 2-1 मोरोक्को 2-0

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त