फ्रेंच केक : अगदी कोणालाही बनवता येईल असा दह्याचा कमी गोड केक

केक आणि पेस्ट्रीजचा देश कोणता तर फ्रान्स असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण इथली केकची दुकानं किंवा बेकऱ्या एखाद्या चमचमणाऱ्या दागिन्यांच्या दुकानापेक्षा कमी नसतात.

एका बाजूला आयसिंग-टॉपड इक्लेअर्सच्या चमकदार रांगा तर दुसऱ्या बाजूला ग्लेज आलेले फ्रूट टार्ट्स तुमचं लक्ष वेधून घेतात.

पण जर तुम्ही फ्रेंच लोकांच्या स्वयंपाक घरात डोकावलं तर तुमच्या लक्षात येईल ते म्हणजे ही दुकानं या बेकऱ्या तुम्हाला इथल्या केकचं अर्धसत्यच सांगतात.

न्यूयॉर्कच्या मूळनिवासी आणि अमेरिकन जेम्स बियर्ड विजेत्या लेखिका अॅलेक्झांड्रा क्रॅपन्झानो सांगतात की, "जेव्हा फ्रेंच लोक बेक करतात आणि विशेष म्हणजे ते जेव्हा घरी बेक करतात तेव्हा त्यांचे पदार्थ आपल्यापेक्षा कमी गोडाचे असतात."

अॅलेक्झांड्रा क्रॅपन्झानो वयाच्या दहाव्या वर्षी अमेरिका सोडून फ्रान्समध्ये स्थायिक झाल्या.

त्यांनी गेटो: द सरप्राइजिंग सिंपलिसिटी ऑफ फ्रेंच केक्स नावाचं पुस्तक लिहिलंय.

यात बटरी क्वाट्रे-क्वार्ट्स (पाउंड केकचा एक प्रकार) ते फ्लोअरलेस चॉकलेट फोंडंट्स, गेटो औ याओर्ट अशा रेसिपींची यादीच आहे. आणि यात विशेष सांगायचं म्हणजे हे पदार्थ तयार करणं इथल्या लहान मुलांसाठी खेळ असल्याप्रमाणे आहे.

त्या त्यांच्या आठवणीत लिहितात, "मी फ्रान्सला गेले तेव्हा तिथल्या माझ्या वयाच्या प्रत्येकाला योगर्ट केक म्हणजेच दह्यापासून केक कसा बनवायचा हे माहीत होतं. त्यांना शिशु वर्गात (मॅटरनेल) मध्येच केक बनवायला शिकवतात आणि ही रेसिपी त्यांच्यासोबत आयुष्यभर राहते."

इथली लहान मुलं नेहमीच हा केक बनवतात. यात एक भाग दही, एक भाग तेल, दोन भाग साखर आणि तीन भाग मैदा घेऊन यात तीन अंडी आणि खमिर (किण्वन तयार करण्यासाठी) टाकतात. हे एक चविष्ट गणितीय कोड आहे. ही रेसिपी बहुतेक फ्रेंच केक प्रमाणे स्वयंपाकघरातील मापांवर अवलंबून नसते. तर यासाठी 125 ग्रॅमचा योगर्ट पॉट वापरला जातो. ( बतमीच्या शेवटी या केकच्या 3 रेसिपी देण्यात आल्या आहेत.)

त्या सांगतात "यासाठी मी मोजमापाचे कप वापरू शकते पण योगर्ट पॉट वापरून ही रेसिपी करणं आणखीन मजेदार असतं."

त्या सांगतात, या केकचं मिश्रण (बॅटर) हलकं आणि पाउंड केकपेक्षा जास्त ओलसर असतं. त्याचा तुकडा मऊसूद असला तरी केक म्हणावा तितका नाजूक नसतो.

आता ही रेसिपी मुलांसाठी अनुकूल असण्याचं आणखी एक कारण म्हणजे रेसिपीमध्ये साहित्याचं प्रमाण थोडं वर खाली झालं तरी केक काही बिघडत नाही. इथे जास्त फेटलेल्या मिश्रणात बटर ऐवजी तेलाचा वापर केला तरी केक मऊ होतो.

त्या सांगतात, मी अशी मुलं पाहिली आहेत की ज्यांना मिश्रण पाचवेळा फेटलं की कंटाळा येतो. पण काहीजण मजा मस्ती करत मिश्रण एकदम वेगात फेटतात, पण तरीही या केकची चव तशीच छानच लागते.

दह्यामध्ये असलेल्या आंबटपणामुळे या केकचा गोडपणा संतुलित होतो. आता हा गोड केक केवळ बनवला आणि काम संपलं असं होत नाही, तर तो बनविण्यासाठी एखादा विशेष प्रसंग देखील असावा लागतो.

खरं तर फ्रान्समध्ये वाढदिवस आणि रविवारच्या जेवणाचा समारोप बहुतेक वेळा प्रो पॅटीसियर्सने म्हणजेच केक आणि पेस्ट्रीजने होतो. यात 'गणाचे', 'सिरपने' हे स्पंज केक सजलेले असतात. याउलट, घरगुती फ्रेंच केक हे साधेपणाचा पुरावा आहेत. यावर आयसिंग केलं जात नाही.

क्रेपॅन्झानो सांगतात की, ख्रिसमस सण सोडला तर त्यांनी कधीही कोणत्या फ्रेंच व्यक्तीला आईस केक घरी बनवताना पाहिलेलं नाही.

पण याचा अर्थ असा नाही की दही टाकून बनवलेल्या गेटो ऑ याओर्टमध्ये मध्ये तुम्ही आयसिंग करू शकत नाही. क्रेपॅन्झानोच्या मते, केकचा साधेपणा त्याची ब्लूप्रिंट असते. हा एक कॅनव्हास आहे ज्यावर नानाविध प्रयोग करणं शक्य आहे.

क्रेपॅन्झानो यांच्या गेटो: द सरप्राइजिंग सिंपलिसिटी ऑफ फ्रेंच केक्स या पुस्तकात गेटो ऑ याओर्टच्या डझनभर रेसिपी आहेत. काहींमध्ये पेर आणि पोयर विलियम्स (पेरची चव असलेली ब्रँडी) पीच आणि वर्बेना टाकून केक बनवला आहे.

तर एका रेसिपीमध्ये, बदाम बारीक करून टाकल्यामुळे केकचा आकार आणखीन छान झाला आहे. दुसऱ्या रेसिपी मध्ये फ्रूटी ऑलिव्ह ऑइल लिंबू आणि थाईम टाकलं आहे.

त्या सांगतात, दही हा बेसिक पदार्थ वापरून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी या केक मध्ये टाकू शकता आणि त्याला नवी चव देऊ शकता. जे डेअरी-फ्री बेकर्स आहेत ते ओट आणि दह्यापसून सुरुवात करू शकतात. ही रेसिपी क्रेपॅन्झानो यांच्या शेजारी राहणाऱ्या अपोलोनिया पोइलेनने तयार केली होती.

थोडेफार बदल करून गेटो ऑ याओर्ट विशेष प्रसंगासाठी देखील तयार करता येतं. जसं की, डिनर पार्टीसाठी गेटो ऑ याओर्ट तयार करताना त्यात ग्रँड मार्नियर सिरपमध्ये मिसळून मार्मालेड रम ग्लेझने सजवता येतं.

क्रेपॅन्झानो सांगतात, "जेव्हा तुम्ही खरंच काहीतरी जास्त गोड बनवू इच्छित नसता तेव्हा हा केक तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो."

त्या सांगतात, आणि याशिवाय हे नेहमीच आपल्या आवाक्यात असतं. यात एक बरणी दही, एक वाडगा मैदा आणि व्हिस्क याशिवाय कशाचीच गरज नसते.

बरेच लोक क्रेपॅन्झानो यांचं पुस्तक वाचून दह्यापासून केक बनवायला शिकले. ही केवळ सहा घटकांची रेसिपी आहे. पण ज्या लोकांना याला क्लासिक टच द्यायचा आहे त्यांना यात सायट्रस आणि व्हॅनिला टाकता येऊ शकतो. पण ज्यांना याला पार्टी केक बनवायचा आहे त्यांनी केकमध्ये ग्रँड मार्नियर सिरप आणि रम ग्लेझचा वापर करावा.

गेटो ऑ याओर्ट (योगर्ट केक) : प्रकार 1

साहित्य

  • 1 जार (½ कप/ 125 ग्रॅम) दही
  • 3 मोठी अंडी
  • 2 जार (1 कप/ 200 ग्रॅम) साखर
  • 3 जार (1½ कप/ 180 ग्रॅम) मैदा
  • 2 टीस्पून बेकिंग पावडर
  • 1 जार (½ कप/ 108 ग्रॅम) व्हेजिटेबल ऑईल
  • ग्रीसिंगसाठी बटर

कृती

पहिली पायरी

ओव्हन 350F (175 C) वर प्रीहीट करा.

दुसरी पायरी

एका 8½ x 4½-इंच (22x11 सेमी) लोफ पॅनला बटर लावून त्यावर मैदा भुरभुरा.

तिसरी पायरी

वाडग्यात दही, अंडी एकत्र करून फेटा. रिकाम्या दह्याचं भांडं मोजण्याचा कप म्हणून वापरा. यात साखर घालून मिश्रण चांगलं फेटून घ्या. आता यात तीन कप मैदा आणि बेकिंग पावडर, तेल घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटून घ्या.

चौथी पायरी

तयार पॅनमध्ये मिश्रण ओतून 35-45 मिनिटे बेक करा. किंवा केकच्या मध्यभागी सुरी घालून ती स्वच्छ बाहेर येईपर्यंत केक बेक करा.

गेटो ऑ याओर्ट (योगर्ट केक) : प्रकार 2

साहित्य

  • 1 जार (½ कप/ 125 ग्रॅम) दही
  • 3 मोठी अंडी
  • 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स किंवा लिंबाचे, संत्र्याचे झेस्ट (किसलेले साल)
  • 2 जार (1 कप /200 ग्रॅम) साखर
  • 3 जार (1½ कप/ 180 ग्रॅम) मैदा
  • 2 टीस्पून बेकिंग पावडर
  • ¼ टीस्पून बारीक मीठ
  • 1 जार (½ कप/ 108 ग्रॅम) व्हेजिटेबल ऑईल
  • ग्रीसिंगसाठी बटर

कृती

पहिली पायरी

ओव्हन 350F (175C) वर प्रीहीट करा.

दुसरी पायरी

एका 8½ x 4½-इंच (22x11 सेमी) लोफ पॅनला बटर लावून त्यावर मैदा भुरभुरा.

तिसरी पायरी

वाडग्यात दही, अंडी एकत्र करून फेटा. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि लेमन झेस्ट टाका. आता साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. यात मैदा पावडर आणि मीठ, तेल घालून मिश्रण एकसंध होईपर्यंत फेटून घ्या.

चौथी पायरी

तयार पॅनमध्ये मिश्रण ओतून 35-45 मिनिटे बेक करा. किंवा केकच्या मध्यभागी सुरी घालून ती स्वच्छ बाहेर येईपर्यंत केक बेक करा.

टीप : ही रेसिपी 8 इंचाच्या (20 सेमी) स्प्रिंगफॉर्म किंवा 9 इंचाच्या (23 सेमी) गोल केक पॅनमध्ये देखील बनवता येते. 9 इंचाचा केक बेक करण्यासाठी सुमारे 30-35 मिनिटं लागतील, तर 8 इंचाचा गोल केक बेक करण्यासाठी 40 मिनिटं लागतील.

गेटो ऑ याओर्ट (डिनर पार्टी योगर्ट केक) : प्रकार 3

साहित्य

  • 1 जार (½ कप/ 125 ग्रॅम) दही
  • 3 मोठी अंडी
  • 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • लिंबाचे किंवा संत्र्याचे झेस्ट (किसलेले साल)
  • 2 जार (1 कप /200 ग्रॅम) साखर
  • 3 जार (1½ कप/ 180 ग्रॅम) मैदा
  • 2 टीस्पून बेकिंग पावडर
  • ¼ टीस्पून बारीक मीठ
  • 1 जार (½ कप/ 108 ग्रॅम) व्हेजिटेबल ऑईल
  • ग्रीसिंगसाठी बटर
  • केक भिजवण्यासाठी लागणारे सिरप
  • 2 चमचे ग्रँड मार्नियर
  • 2 चमचे संत्र्याचा रस
  • ¼ कप/ 50 ग्रॅम कॅस्टर शुगर - ग्लेझसाठी
  • ¾ कप जर्दाळू जॅम किंवा मार्मालेड
  • 2 चमचे रम किंवा पाणी

कृती

पहिली पायरी

ओव्हन 350F (175C) वर प्रीहीट करा.

दुसरी पायरी

एका 8½ x 4½-इंच (22x11 सेमी) लोफ पॅनला बटर लावून त्यावर मैदा भुरभुरा.

तिसरी पायरी

केक बनवण्यासाठी एका भांड्यात साखर आणि ऑरेंज झेस्ट हाताने चांगले एकजीव करा.

चौथी पायरी

वाडग्यात दही, अंडी एकत्र करून फेटा. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि

साखर टाका. आता मैदा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. यात मीठ, तेल घालून मिश्रण एकसंध होईपर्यंत फेटून घ्या.

पाचवी पायरी

तयार पॅनमध्ये मिश्रण ओतून 35-45 मिनिटे बेक करा. किंवा केकच्या मध्यभागी सुरी घालून ती स्वच्छ बाहेर येईपर्यंत केक बेक करा.

सहावी पायरी

ग्रँड मार्नियर आणि संत्र्याचा रस एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये कोमट करून त्याचं सिरप तयार करा. साखर विरघळण्यासाठी मिश्रण ढवळा. केक गरम असताना मिश्रण यावर ओता आणि केक थंड होऊ द्या.

सातवी पायरी

ग्लेझ बनविण्यासाठी मंद आचेवर रम आणि जाम एकत्र करून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर ब्रशने केकवर लावून घ्या.

टीप : ही रेसिपी 8 इंचाच्या (20 सेमी) स्प्रिंगफॉर्म किंवा 9 इंचाच्या (23 सेमी) गोल केक पॅनमध्ये देखील बनवता येते. 9 इंचाचा केक बेक करण्यासाठी सुमारे 30-35 मिनिटं लागतील, तर 8 इंचाचा गोल केक बेक करण्यासाठी 40 मिनिटं लागतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)