ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण देतोय मृत्यूशी झुंज, काय आहे संपूर्ण प्रकरण?

फोटो स्रोत, GETTY IMAGES/BBC
- Author, शाहबाज अन्वर
- Role, बीबीसी हिंदीसाठी
क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा 2022 मध्ये रस्त्यावर अपघात झाला होता. त्यावेळेस त्याची मदत करणारा रजत आता स्वत: गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत आणि त्याच्या कथित प्रेयसीनं जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला. तर रजतची स्थिती अतिशय गंभीर आहे.
मात्र त्या तरुणीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, रजत आणि त्याच्या कुटुंबानं तरुणीचं अपहरण करून तिची हत्या केली.
रजतच्या कुटुंबानं मात्र हा आरोप फेटाळला आहे. रजतच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की "रजत आणि त्या तरुणीनं विष घेण्याआधी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात ते दोघे एकत्र जगण्या-मरण्याबद्दल बोलताना दिसत आहेत."
टीप: आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर 18002333330 या भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाईनवर मदत घेऊ शकता. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांची बोललं पाहिजे.


काय आहे सर्व प्रकरण?
मुजफ्फरनगरमधील पुरकाजी पोलीस स्टेशनमध्ये 11 फेब्रुवारीला एका प्रेमी जोडप्यानं विष घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पुरकाजी पोलीस ठाण्याचे प्रमुख जयवीर सिंह यांनी सांगितलं की, "शकरपूर गावातील मजरा बुच्चा वस्तीत राहणाऱ्या तरुणीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर रजतची स्थिती गंभीर आहे. शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा तपासणीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल."
मृत तरुणीच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आल्याची बाब पोलिसांनी नाकारली आहे.
पोलीस उप अधीक्षक राजू कुमार म्हणाले, "हे आत्महत्येचं प्रकरण आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की रजत आणि ती तरुणी यांचं एकमेकांवर प्रेम होतं."

जवळपास साडेचारशे लोकसंख्या असलेल्या रजतच्या गावात अनुसूचित जाती, कश्यम, सैनी आणि कुंभारसह इतर जातींचे लोक राहतात.

गावचे सरपंच गोपाल सिंह यांनी या घटनेबद्दल सांगितलं, "दोघांच्या कुटुंबांनं त्यांचा विवाह वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित केला होता. मात्र या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याची चर्चा गावात आहे. या दोघांना एकमेकांशी लग्नं करायचं होतं."
ते पुढे म्हणाले, "मात्र हे दोघेही वेगवेगळ्या समुदायाचे आणि एकाच गावचे रहिवासी असल्यामुळे हे कसं काय शक्य झालं असतं. 11 फेब्रुवारीलाच तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते."
मृत तरुणीच्या कुटुंबांनं केलेल्या आरोपांवर रजतचं कुटुंब काय म्हणालं?
मृत तरुणीचे वडील ई-रिक्षा चालवतात. तसंच चौकीदाराचं देखील काम करतात.
ते म्हणाले, "माझ्या मुलीच्या प्रेमप्रकरणाचा कोणताही विषय नाही. पानीपतमध्ये असलेल्या माझ्या चुलत भावाजवळ ती काम करायची. मार्च महिन्यात तिचं लग्नं होतं. म्हणून ती अलीकडेच तिथून घरी आली होती. रजत आणि त्याच्या कुटुंबियांनीच माझ्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी दिली होती."
त्यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचं लग्नं झालेलं आहे. तर ज्या मुलीचा मृत्यू झाला तिचं लग्न सहारनपूरमध्ये निश्चित करण्यात आलं होतं. मार्चमध्ये लग्नं होतं आणि त्याची तयारी सुरू होती.
मृत तरुणीच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचं सांगितलं आहे. या तक्रारीची प्रत स्थानिक प्रसारमाध्यमांकडे देखील आहे. अर्थात पोलिसांनी मात्र अशी कोणतीही तक्रार करण्यात आल्याचं नाकारलं आहे.

घटना घडल्यापासूनच रजतचे कुटुंबीय गावात दिसत नाहीत. रजतचा मोबाईल सुद्धा बंद आहे. अर्थात रजतचा छोटा भाऊ, ओम कुमार याच्याशी बीबीसीचं फोनवर बोलणं झालं आहे.
रजतचा भाऊ ओम कुमार उत्तराखंडमधील हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत आहे.
तो म्हणाला, "तरुणीचे कुटुंबीय खोटे आरोप करत आहेत. विष घेण्याआधी तरुणी आणि रजत यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात ते दोघे म्हणत आहेत की त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला पाठिंबा नाही."
ओम कुमार पुढे म्हणतो, "आम्हाला हे माहित नव्हतं की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही रजतचं लग्नं देखील ठरवलं होतं. लवकरच त्याचं लग्नंदेखील होणार होतं."
ऋषभ पंतला मदत केल्यामुळे चर्चेत आला होता रजत
रजत एका स्थानिक साखर कारखान्यात काम करतो. 30 डिसेंबर 2022 ला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला उत्तराखंडच्या सीमेजवळ पुरकाजीमध्ये अपघात झाला होता. त्यानंतर रजत चर्चेत आला होता.
त्यावेळेस रजत आणि त्याचा साथीदार निशू यांनी ऋषभ पंतला कारमधून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला होता.
त्यानंतर या दोघा तरुणांचा अनेक नेत्यांनी सन्मान केला होता. रजतचा भाऊ ओम कुमार म्हणाला की ऋषभ पंतने रजतला भेट म्हणून एक स्कूटीदेखील दिली होती.

फोटो स्रोत, X/RISHABH PANT
ऋषभ पंतनं एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून या दोन्ही तरुणांचे आभार मानले होते.
ऋषभनं लिहिलं होतं, "मला या दोन नायकांचे आभार मानायचे आहेत. या दोघांनी अपघाताच्या वेळेस माझी मदत केली आणि मी हॉस्टिपटलमध्ये सुरक्षित पोहोचेन याची खातरजमा केली. रजत कुमार आणि निशू कुमार तुम्हा दोघांचे आभार. मी नेहमीच तुमचा आभारी आणि ऋणी राहीन."

फोटो स्रोत, ANI
त्या दिवसाची आठवण काढून निशू म्हणतो, "तो दिवस आम्ही कसा विसरू शकतो. रजत आणि मी जेव्हा पाहिलं की एका कारला अपघात झाला आहे. तेव्हा मदत करण्यासाठी आम्ही लगेच तिथे धाव घेतली."
"तेव्हा आम्हाला हे माहित नव्हतं की कारमध्ये कोण आहे. माणुसकी म्हणून आम्ही हे सर्व केलं होतं. नंतर आम्हाला माहित झालं की आम्ही प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवण्यास मदत केली आहे."
आता रजत हॉस्पिटलमध्ये आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते तरुणीच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट बघत आहेत.
पोलिसांचं म्हणणं आहे की, मृत तरुणीच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे तक्रार करण्यात आली तर तपासाची व्याप्ती वाढू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











