राज्यात पावसाचे थैमान, एकूण 21 जणांचा मृत्यू; पावसाचा जोर अजून कायम

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईसह राज्यात आजही (20 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाच्या किनारी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली.
राज्यात 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसात 21 जणांचा मृत्यू झाल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. 19 ऑगस्ट रोजी मृतांचा हा आकडा जारी करण्यात आला आहे.
मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात 3 जणांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. सोमवारी (19 ऑगस्ट) रात्रीपासून पावसाचा जोर सुरुच असून गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. तर, चंद्रपुरात पूर परिस्थिती कायम आहे.
मुंबईत सुरु असलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची स्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड येथे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, UGC
पावसाचा परिणाम वाहतूक सेवेवरही झाला असून सेंट्रल, हार्बर पाठोपाठ वेस्टर्न रेल्वेमार्गावरही वाहतूक ठप्प झाली आहे. वसई ते विरार स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे. सीएसएमटी ते मानखुर्द लोकल सेवा तूर्तास बंद ठेवण्यात आली असून वाशी ते पनवेल सुरु असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत मुसळधार पावसात जमिनीपासून उंचावर असलेली प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे अचानक बंद पडली. यात मोठ्या संख्येने प्रवासी आत अडकले होते. दरम्यान, जवळपास दोन तासांनंतर प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.
चेंबूर ते भक्ती पार्क स्थानकादरम्यान संध्याकाळी सव्वा सहा वाजता ही मोने रेल्वे बंद पडली. ही रेल्वे प्रवाशांनी भरलेली होती. एसीही बंद पडल्याने आणि दरवाजे बंद असल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. तसंच मदतीसाठी बोलवायला काही प्रवाशांनी दरवाजे खोलण्याचाही प्रयत्न केल्याचं या रेल्वेतून प्रवास केलेल्या प्रवाशाने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे. तसंच महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना करण्यात आलं आहे.
तसंच नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत अशी माहिती दिलीय तर प्रवाशांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत अशी माहिती दिलीय तर प्रवाशांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं आहे.
एक्स प्लॅटफॉर्मवर सीएमओ महाराष्ट्र अकांउंटवरुन पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, 'मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे.
मिठी नदीची उंची 3.9 मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.'
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती.
ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे.
या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने जांभूळपाडा आणि बदलापूर या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात जोरदार पावसाने अनेक नागरिक अडकून पडले. एसडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 293 नागरिकांना सुखरुप स्थळी हलवले.
पालघर येथे एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने मोरी गावातील अंदाजे 120 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
सावंतपाडा येथे अडकून पडलेल्या 44 नागरिकांना एनडीआरएफ पथकाद्वारे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले

फोटो स्रोत, Alpesh Karkare
दरम्यान, समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी 3.9 मीटर वरून आता 3.6 मीटर इतकी झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुळा-मुठा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
पुण्यात झालेल्या जोरदार पावसाने मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या शहरातील लोकवस्त्या व गावांना प्रशासनाेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी मुळा-मुठा नदीपात्राजवळ जाण्याचे टाळावे, पूर्व सूचना मिळाल्याशिवाय पुलांचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने प्रशासनाकडून पिंपरी भागातील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, जाधव घाटावरील लोकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
पंचशीलनगर, पिंपळे नीलख परिसरातील 14 जणांचा समावेश असलेल्या 5 कुटुंबांना जवळच्या महानगरपालिका शाळेत हलवण्यात आले आहे. तसेच 34 जणांचा समावेश असलेल्या 12 कुटुंबांना लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव परिसरातील जवळच्या महानगरपालिका शाळेत हलवण्यात आले आहे.
संजय गांधी नगर मधील अंदाजे 75 रहिवासी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यातील 30 व्यक्ती महापालिका शाळेत स्थलांतरित झाले तर इतर नातेवाईकांकडे गेले आहेत.
कुठे काय स्थिती
पश्चिम विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे 59 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं, तसंच अजूनही नदी नाल्यांना पूर आहे.
हवामान विभागानं मुंबईसह उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे प्रशासनानं इथल्या शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईमध्ये विशेषतः उपनगरात रात्री जोरदार पाऊस झाला असून सखल भागांत पाणी साचलं आहे.
18 तारखेला सकाळी आठ ते 19 तारखेला सकाळी आठ या कालावधीत कोकणात अनेक ठिकाणी दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत असून आज ती पश्चिमेकडे सरकते आहे आणि जमिनीवर येण्याची शक्यता आहे.
या प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या चोवीस तासांत आंध्र प्रदेशसह, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पाऊस झाला आहे. पुढचे तीन ते चार दिवस मान्सून इथे सक्रीय राहील.

फोटो स्रोत, Mustan Mirza/BBC
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 20 ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढच्या सात दिवसांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आली.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट
पुढील 12 तासांसाठी या जिल्ह्यांना रेड अलर्ट
- पालघर
- ठाणे
- मुंबई
- रायगड
- रत्नागिरी
- चंद्रपूर
- नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथ्याचा प्रदेश
पुढील 12 तासांसाठी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- सिंधुदुर्ग
- कोल्हापूरचा घाटमाथ्याचा प्रदेश
- नागपूर
- गडचिरोली
- धुळे
- वर्धा
- गोंदिया
सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश
नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी 'सचेत' ॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत.
आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र 24×7 सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. 022-22794229 किंवा 022-22023039 तसेच मोबाईल क्र. 9321587143 उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचंही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आलं आहे.
काय काळजी घ्यावी?
पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडणे, झाडं कोसळणे यांसारख्या घटना घडतात. वीज पडणे अत्यंत धोकादायक असू शकते आणि व्यक्ती, संरचना आणि सामान्य पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करते, असं हवामान खात्याकडून नमूद करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायला हवी याची माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी दिली.
1. घरात रहा: मोठ्या इमारतीत किंवा पूर्णपणे बंद असलेल्या वाहनात आश्रय घ्या. मोकळ्या जागा, उंच जमीन, उंच झाडे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू टाळा.
2. इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा: विद्युत उपकरणे डिस्कनेक्ट करा आणि लँडलाइन टेलिफोन वापरणे टाळा. वीज पडल्याने वीज पडू शकते ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होऊ शकते.
3. पाणी टाळा: वादळाच्या वेळी आंघोळ करू नका, आंघोळ करू नका किंवा नळ वापरू नका, कारण विजेचे प्रवाह प्लंबिंगमधून जाऊ शकतात.
4. खिडक्या आणि दारे दूर रहा: उघड्या खिडक्या किंवा दारे वापरून वीज इमारतींमध्ये प्रवेश करू शकते. सर्व खिडक्या आणि दारे बंद करा आणि त्यांच्याकडे झुकू नका.
5. धातूच्या वस्तू वापरणे टाळा: छत्री, गोल्फ क्लब, सायकली किंवा इतर कोणत्याही धातूच्या वस्तू बाहेर वापरण्यापासून परावृत्त करा. धातू वीज चालवते आणि वीज पडण्याचा धोका वाढवते.
6. माहिती ठेवा: कोणत्याही आपत्कालीन सूचना किंवा हवामान परिस्थितीत बदलांसाठी स्थानिक हवामान अद्यतने, बातम्या बुलेटिन किंवा अधिकृत घोषणा ऐका.
7. जर तुम्ही जवळपास निवारा नसताना बाहेर पडलात तर: झाडे, खांब किंवा कोणत्याही उंच वस्तूंपासून दूर सखल जागा शोधा. खाली वाकून बसा, तुमचे पाय एकत्र ठेवा आणि जमिनीशी तुमचा संपर्क कमीत कमी करा. मोकळी मैदाने, टेकड्या आणि पाण्याचे साठे टाळा.
लक्षात ठेवा, पाऊस सुरू होण्यापूर्वी किंवा थांबल्यानंतरही वीज कोसळू शकते. वादळ पूर्णपणे निघून जाईपर्यंत आणि परिस्थिती सुधारेपर्यंत सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
कृपया तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा इशारा शेअर करा. माहिती ठेवा, सतर्क रहा आणि या वीज पडण्याच्या इशाऱ्यादरम्यान तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
अधिक मदतीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत, पोलिस किंवा अग्निशमन विभागासारख्या तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि सुरक्षित रहा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)













