चांदीच्या किंमती अचानक इतक्या का वाढल्या? या वर्षात चांदीच्या किंमती अशाच वाढतील की घसरतील?

आपल्याकडे सोन्याच्या किमती नेहमीच चर्चेचा विषय असतात. कारण गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि पर्याय म्हणून अनेक जण सोन्याकडे पाहतात.

मात्र, 2025 संपता संपता सर्वांत जास्त चर्चा झाली ती चांदीबद्दल.

यामागचं कारण म्हणजे चांदीच्या किमतींमध्ये झालेली अभूतपूर्व वाढ. औद्योगिक क्षेत्राकडून वाढलेली मागणी आणि मर्यादित पुरवठ्यामुळे या वर्षी चांदीच्या किमतींमध्ये थोडी-थोडकी नाही तर तब्बल 180 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळेच गुंतवणुकदारांचा कलही चांदीकडे वाढताना दिसत आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला चांदीच्या किमतीत प्रतिकिलो 15 हजार रुपयांची घसरण झाली असली, तरी चांदीचे दर किलोला अडीच लाखांच्या आसपास आहेतच.

एका टप्प्यावर तर चांदीचा दर तीन लाख रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाजही व्यक्त केला जात होता.

चांदीच्या किमतीत वाढ का?

कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या किमती वाढण्यामागे कोणतेही एक ठराविक कारण नसून त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.

चांदीच्या किमती वाढण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे औद्योगिक मागणी. सोन्याच्या तुलनेत चांदीचा वापर दुहेरी कारणांसाठी होतो.

म्हणजे चांदी मौल्यवान धातू आहेच, पण त्याचबरोबर उद्योगांमध्येही चांदीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.

सोलार पॅनेल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटऱ्यांमध्ये चांदीचा वापर वाढला आहे. मात्र, चांदीचा पुरवठा मर्यादित आहे.

याशिवाय, अमेरिकेने चांदीचा समावेश 'क्रिटिकल मिनरल्स'च्या यादीत केल्याने तिच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन डॉलरचाही प्रभाव चांदीच्या किमतीवर पाहायला मिळतो. सध्या डॉलरची किंमत तुलनेने कमी झाल्यामुळे आणि पुढच्या वर्षी अमेरिकेत व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेमुळे सध्या चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.

भारतात चांदीच्या दराची परिस्थिती काय?

जागतिक बाजारपेठेप्रमाणे भारतातही चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

हैदराबाद आणि चेन्नईमध्ये 29 डिसेंबरला एक किलो चांदीचा दर 2.73 लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता.

कोलकाता, बंगळुरू आणि मुंबईमध्ये चांदीचा दर जवळपास 2.50 लाख रुपयांच्या आसपास होता.

स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि इतर कारणांमुळे भारतात वेगवेगळ्या शहरांमध्ये चांदीच्या किमतीमध्ये फरक दिसून येतो.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला MCX वरील चांदीच्या किमतीमध्ये 5.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि चांदीचे दर साधारणतः 2.36 लाखांच्या आसपास पाहायला मिळाले.

'रॉयटर्स'च्या अहवालानुसार, 2025 हे वर्ष चांदीसाठी 'ब्लॉकबस्टर' ठरलं. या वर्षात चांदीची किंमत दुपटीहून अधिक वाढली.

याच वर्षात सोन्याच्या किमतीमध्येही जवळपास 65 टक्क्यांची वाढ झाली. 1979 नंतरची ही एका वर्षातली सर्वाधिक वाढ ठरली आहे.

चांदीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर नफावसुली झाली, ज्यामुळे 31 डिसेंबरला किमतीमध्ये घसरण दिसून आली. सोमवारी (29 डिसेंबर) प्रति औंस (28.34 ग्रॅम) 83.62 डॉलरचा उच्चांक गाठल्यानंतर बुधवारी (31 डिसेंबर) चांदीचा दर घसरून 72 डॉलरवर आला.

म्हणजेच 29 डिसेंबर रोजी जागतिक बाजारात चांदीचा दर प्रतिकिलो सुमारे 2.65 लाखांच्या आसपास होता.

नवीन वर्षातही चांदीची मागणी वाढणार?

अमेरिकेने अलीकडेच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या 10 धातूंची यादी केली. या यादीत चांदी आणि तांब्याचा समावेश आहे.

हे धातू इलेक्ट्रिक वाहनं, पॉवर ग्रिड्स आणि स्टील उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक ठरणारे आहेत.

चांदी आणि तांब्याव्यतिरिक्त पोटॅश, सिलिकॉन आणि शिसं या धातूंचाही यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

2025 मध्ये जगभरातील चांदीचा एकूण पुरवठा सुमारे 1.05 अब्ज औंस राहीला होता, आता तो वाढून 1.20 अब्ज औंसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांदीच्या किमतींमध्ये सलग पाचव्या वर्षी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये जुलै महिन्यात चांदीने पहिल्यांदा प्रतिकिलो 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

याशिवाय चांदीच्या किमतीमध्ये चीनची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जगभरात दरवर्षी प्रक्रिया होणाऱ्या चांदीपैकी सुमारे 60 ते 70 टक्के चांदी एकट्या चीनमध्ये प्रक्रिया केली जाते. जानेवारीपासून चीनमध्ये चांदीच्या पुरवठ्यासाठी कठोर परवाना पद्धती लागू केली जाईल. त्यामुळे पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे.

जानेवारीपासून चीनमध्ये फक्त त्या कंपन्यांनाच निर्यात परवाने मिळतील, ज्यांची वार्षिक उत्पादन क्षमता किमान 80 टन आहे.

2026 मध्ये चांदीच्या किमती वाढतील की घसरतील?

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि रिद्धिसिद्धी बुलियन्सचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी म्हटलं की, सोलार पॅनेल्स, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण क्षेत्रातील मोठ्या मागणीमुळे चांदीच्या किमती वाढत आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार पृथ्वीराज कोठारी यांनी म्हटलं की, "डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर राहिला तर 2026 अखेरपर्यंत चांदीचा दर प्रतिकिलो 2.80 लाख ते 3.20 लाख रुपयांच्या दरम्यान राहू शकतो."

पृथ्वीराज कोठारी यांनी असंही सांगितलं की, "दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास चांदीचे बिस्कीट किंवा नाणी खरेदी करता येतात. मात्र, त्यात साठवणूक आणि मिंटिंग शुल्कही द्यावे लागते. त्याऐवजी चांदीचे ईटीएफ (एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स) किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक योग्य असतात, कारण त्यामध्ये सुरक्षितता आणि शुद्धतेबाबत कोणतीही चिंता नसते."

अर्थात, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, चांदीच्या किमतीमध्ये उसळी येऊन नंतर तीव्र घसरण होण्याचाही इतिहास आहे.

डिसेंबर 1979 मध्ये चांदीच्या किमती एका महिन्यासाठी प्रचंड वाढल्या होत्या, मात्र पुढील वर्षी एप्रिल 1980 मध्ये चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 62 टक्क्यांची घसरण झाली होती.

(हा लेख केवळ गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)