एकनाथ शिंदेंची आमदारकी रद्द झाली तरी ते मुख्यमंत्रिपदी राहू शकतात का?

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट आज थोड्याच वेळात त्यांचा निर्णय देणार आहे.

यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून दाखल करण्यात आलेल्या 16 आमदारांच्या निलंबनाची याचिकासुद्धा आहे. त्याबाबतसुद्धा सुप्रीम कोर्ट आदेश देण्याची शक्यता आहे

दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या आमदाराचं निलंबन करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. तसंच राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार आणि विधानसभेच्या नियमांनुसारदेखील हा निर्णय केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

तसंच या विषयावर जोपर्यंत अध्यक्ष निर्णय देत नाहीत तोपर्यंत सुप्रीम कोर्टसुद्धा काहीच निर्णय देणार नाही, असा दावासुद्धा नार्वेकर यांनी केला आहे.

पण आमदारकी गेली तर मात्र एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद अबाधित राहील का, या प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकर यांनी “यापूर्वीही अनेक मुख्यमंत्री झाले आहेत जे विधिमंडळाचे सदस्य नव्हते, परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे,” असं सूचक वक्तव्य केलं आहे.

कायद्यानुसार विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येते. पण त्यांना पुढच्या सहा महिन्याच्या आत विधान परिषद किंवा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून यावं लागतं. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांचं नाव उदाहरणादाखल घेता येऊ शकतं.

पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दिल्लीतून राज्यात मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते. तेव्हा त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर विधान परिषदेवर ते आमदार म्हणून निवडून आले.

उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते आमदार किंवा खासदार नव्हते. पण त्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले होते.

या उदाहरणांमध्ये दोघेही आधी आमदार नव्हते. त्यामुळे त्यांना निवडून येणं भाग होतं. पण मग आमदारकी गेली किंवा निलंबन झालं तसंच कार्यकाळ संपला तर काय?

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

...तर शिंदेच मुख्यमंत्री

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हाच मुद्दा बीबीसी मराठीनं राज्यघटनेचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक प्राध्यापक अशोक चौसाळकर यांना विचारला.

त्यांच्या मते, “सुप्रीम कोर्ट आमदारांवर निलंबनाची कारवाई करू शकत नाही. याआधी अलाहाबाद हायकोर्टानं आमदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. पण सुप्रीम कोर्टानं ती रद्द ठरवली होती. तसंच या प्रकरणात नैसर्गिक न्यायाचा मुद्दा विचारात घेतला तर मात्र विधानसभा अध्यक्षांना या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेऊन, प्रत्येकाची बाजू ऐकून घेऊन त्यांचा निर्णय द्यावा लागेल.”

पुढे जाऊन मात्र चौसाळकर राहुल नार्वेकर यांच्या मुद्द्याला हात घालतात.

ते सांगतात, “पण तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जर का सर्वोच्च न्यायालयाने अभूतपूर्व निर्णय देत 16 आमदारांचं निलंबन केलं तरी एकनाथ शिंदे पुढचे सहा महिने मुख्यमंत्री म्हणून कायम राहू शकतील. तसंच त्यांना पुढच्या सहा महिन्यात दोन्हीपैकी एका सभागृहात आमदार म्हणून निवडून यावं लागेल.”

पण इथं खरा मुद्दा नैतिकतेचा आहे. त्यामुळे कोर्टानं निलंबित केलं तर त्यांना नैतिकदृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं विरोधक म्हणू शकतात. त्यांच्यावर दबाव आणू शकतात, याकडेसुद्धा चौसाळकर लक्ष वेधतात.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Facebook/Eknath Shinde

पण राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांचं मात्र मत वेगळं आहे.

त्यांच्यामते “जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत एखाद्याची आमदारकी गेली तर 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या 91 व्या घटनादुरूस्तीनुसार त्या व्यक्तीला मंत्रिपदावर राहता येत नाही.

परिणामी जर एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तर यांचं मुख्यमंत्रिपदसुद्धा जाईल आणि सरकार पडेल. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.”

राज्यघटनेनुसार प्रत्येक विधानसभेला त्यांचे स्वतःचे असे नियम करण्याचे अधिकार असतात. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नियमांचा आधार फार महत्त्वाचा ठरणार आहे.

अशा स्थितीत अनेक राजकीय शक्यता – नार्वेकर

आमदारकी रद्द झाली तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रिपदी राहतील का, असा सवाल बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी विचारल्यावर त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राजकीय शक्यता आणि उपायाबाबतही भाष्य केलं आहे.

नार्वेकर म्हणाले “नियम हेच सांगतो की ज्या व्यक्तीकडे विधिमंडळाचं बहुमत असले तो मुख्यमंत्री बनू शकतो. त्यासाठी कुठल्याही सभागृहाचं सदस्य नसलं तरी हरकत नाही. अशा स्थितीत अनेक राजकीय शक्यता आणि उपाय आहेत. त्यामुळे यावर जास्त भाकीतं न करता त्या त्या परिस्थिती योग्य निर्णय होतील अशी अपेक्षा करू.”

शिवा आमदारांच्या निलंबनाची कारवाई केवळ विधानसभा अध्यक्षच करू शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

हा अधिकार कोणतीही इतर संस्था अध्यक्षांकडून काढून घेऊ शकत नाही, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय देत नाहीत तोपर्यंत कुठलंही कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं कायदा सांगतो, अशी आठवण त्यांनी करून दिली आहे.

तसंच एखाद्या पक्षात फूट पडली आहे की नाही ते नियमाप्रमाणे विधानसभा अध्यक्ष ठरवतात. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष याबाबतचा निर्णय देत नाहीत तोपर्यंत इतर कुठलीही घटनात्मक संस्था त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असंसुद्धा राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.

अध्यक्षांचा निर्णय जर का घटनाबाह्य असेल तर कोर्ट नक्की त्यात हस्तक्षेप करू शकतं, असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय.

राहुल नार्वेकर

मग शिंदेंचा पुन्हा शपथविधी?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या भाष्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे जर का एकनाथ शिंदे यांची आमदारकी रद्द झाली तर त्यांना त्यांचं मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी पुन्हा शपथ घ्यावी लागेल का?

तर नियमानुसार आमदारकी गेलेल्या व्यक्तीचं मंत्रिपद किंवा मुख्यमंत्रिपद जातं. घटनातज्ज्ञ

उल्हास बापट यांनी सांगितल्या प्रमाणे जर का 91 व्या घटनादुरूस्तीनुसार एकनाथ शिंदे यांची आमदारकी केली तर त्यांचं मुख्यमंत्रिपदसुद्धा जाईल.

त्यावेळी मग राहुल नार्वेकर म्हणतात तसं : ज्या व्यक्तीकडे सर्वांत जास्त आमदारांचा पाठिंबा तो व्यक्ती मुख्यमंत्री, या नियमानुसार जर का एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला तर त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येऊ शकते.

दीपक सावंत प्रकरण काय आहे?

विधानसभा

फोटो स्रोत, Getty Images

देशातल्या काही राज्यांमध्ये विधानसभेबरोबरच विधान परिषदेचं सभागृह अस्तित्वात आहे. राज्यसभेच्या धर्तीवर त्याचं कामकाज चालतं. म्हणजेच ते राज्यसभेसारखं स्थायी सभागृह आहे. ते कधीच विसर्जित होत नाही. फक्त ठाराविक कालावधीनंतर त्याचे काही सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागी नवे सदस्य निवडून येत असतात.

त्यामुळे विधान परिषदेचा एखादा आमदार राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री किंवा मंत्री असेल आणि त्याचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात आला असेल, तर मात्र त्याला पुढचे सहा महिने त्याच्या पदावर राहून पुन्हा एकदा विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून येणं भाग असतं.

म्हणजेच विधान परिषदेचं सदस्यत्व संपुष्टात आल्याच्या पुढच्या सहा महिन्याच्या आत तो सदस्य पुन्हा एकदा परिषदेवर किंवा विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आला तरच त्याला मंत्रि‍पदावर कायम राहता येतं.

इथं आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्री असलेल्या दीपक सावंत याचं उदाहरण घेता येईल. दीपक सावंत विधान परिषदेवर आमदार होते. पण सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला.

तसंच त्यांच्या त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून जाण्याची संधी दिली नाही. पुढच्या सहा महिन्यात ते दोन्हीपैकी कुठल्याही सभागृहात निवडून येऊ शकले नाहीत. परिणामी त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय?

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

एखादं सरकार अल्पमतात आलं किंवा वेळेआधीच विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस झाली किंवा आणीबाणीच्या स्थितीत विधानसभेचा कार्यकाळ वाढवण्यात आला, तर अशा परिस्थितीत आहे त्याच मुख्यमंत्र्यांना राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती करू शकतात.

2014 च्या विधानसभा निवडणुकांआधी शिवसेना भाजपची युती तुटली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं तेव्हाच्या लोकशाही आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातलं पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार अल्पमतात आलं होतं.

त्यावेळी अत्यंत अल्प काळासाठी नवं सरकार येणं शक्य नव्हतं. तसंच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या तेव्हा राज्यपालांनी पृथ्वीराच चव्हाण यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.

आता राहाता राहिला मुद्दा एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमता येईल का या प्रश्नाचा.

अशोक चौसाळकर यांच्यामते शिंदे यांच्या 16 आमदारांचं निलंबन झालं तरी त्यांचं सरकार अल्पमतात येत नाही. त्यामुळे त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याचा विषय इथं लागू होत नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)