विधानपरिषद निकालाचा महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अर्थ काय? समोर आले ‘हे’ ठळक मुद्दे

पंकजा मुंडे, प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात भाजपच्या पंकजा मुंडेसह महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचाही विजय झाला आहे.

शेवटच्या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्यात दुसऱ्या फेरीत चुरस होती. पण अखेर मिलिंद नार्वेकरांनी जयंत पाटलांना पराभूत करत विजय मिळवला.

विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळं पराभवाचा धक्का नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा होती.

पण शरद पवारांचा पाठिंबा असलेल्या जयंत पाटील यांनाच हा पराभवाचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.

पंकजा मुंडेंनी या विजयानंतर माध्यमांशी बोलताना विजयाचा आनंद व्यक्त केला. "माझ्या विजयाचा लोकांना आनंद झाला त्याचा अधिक आनंद आहे. राज्याच्या राजकारणात परतल्याचा आनंद आहे. राज्यासाठी या माध्यमातून काम करायला मिळेल याचा आनंद आहे," असं पंकजा म्हणाल्या.

काँग्रेसची पाच मते फुटली?

आतापर्यंत समोर आलेली मतांची आकडेवारी पाहता काँग्रेसची पाच मतं फुटली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामागचे गणित खालील प्रमाणे आहे.

काँग्रेसचे एकूण 37 आमदार आहेत. त्यापैकी 25 आमदारांनी पहिल्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना दिली. म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची 12 मतं शिल्लक राहिली.

मविआच्या नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली. त्यात ठाकरे गटाची 15 मतं आहेत. उर्वरित सात मतं काँग्रेसची पकडली तरी पाच मतांचा प्रश्न राहतो.

शेकापचे जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची 12 मतं मिळाली. ही 12 मते शरद पवार गटाची आहेत.

ग्राफिक्स

पहिल्या पसंतीत कुणाला किती मते?

निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते मिळवून आठ उमेदवार विजयी झाले आहेत. तर उर्वरित मते मिळणाऱ्या दुसऱ्या पसंतीच्या मतावर अवलंबून राहावं लागणार आहे.

पहिल्या पसंतीची किमान 23 मते विजयासाठी आवश्यक होती. तेवढी किंवा अधिक मते मिळालेले उमेदवार विजयी ठरले आहेत. उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत.

भाजप -

पंकजा मुंडे - 26 (विजयी)

परिणय फुके - 26 (विजयी)

अमित गोरखे - 26 (विजयी)

योगेश टिळेकर - 26 (विजयी)

सदाभाऊ खोत - 14 (दुसऱ्या फेरीत विजयी)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) -

शिवाजीराव गर्जे - 24 (विजयी)

राजेश विटेकर - 23 (विजयी)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

कृपाल तुमाने - 24 (विजयी)

भावना गवळी - 24 (विजयी)

काँग्रेस -

प्रज्ञा सातव - 25 (विजयी)

शिवसेना (उद्ध ठाकरे गट) -

मिलिंद नार्वेकर - 22 (दुसऱ्या फेरीत विजयी)

शेकाप (शरद पवार गटाचं समर्थन) -

जयंत पाटील - 12 (पराभूत)

निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि बाबा सिद्दीकी.
फोटो कॅप्शन, निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि बाबा सिद्दीकी.

विधानभवनात 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया झाली. त्यानंतर मतमोजणी झाली.

लोकसभेच्या निकालानंतर आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्यानेही ती महत्त्वाची ठरली.

आमदार फुटण्याची भीती असल्याने गेल्या दोन दिवसांपासून खबरदारी म्हणून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटातील आमदारांना पक्ष नेतृत्त्वाकडून पंचतारांकित हाॅटेलमध्ये राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

काँग्रेसची पाच ते सात मतं फुटली का?

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "आमच्या दोन सहकारी पक्षांमध्ये मोठी फूट पडलेली होती. काँग्रेसमधलेही काही दिग्गज नेते आम्हाला सोडून भाजपमध्ये गेले होते आणि त्यामुळे आमचं संख्याबळ कमी झालं होतं. अशा परिस्थितीत तीन उमेदवार निवडून आणण्याचं पर्याप्त संख्याबळ आमच्याकडे नव्हतं पण आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडे प्रयत्न करून आमचा तिसरा उमेदवार निवडून आणू शकू. आमच्याकडे दोन उमेदवार उभे करून त्यांना बिनविरोध निवडून आणण्याचा पर्याय देखील होता. मात्र जे लोक पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी कदाचित आम्हाला समर्थन दिलं नाही. त्यामुळे हा पराभव झाला आहे."

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "जे लोक पक्ष सोडून गेले होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासोबतच आहोत पण ती मतं आम्हाला मिळालेली नाहीत. इथे जे काही झालं त्याचा सर्व रिपोर्ट आम्ही दिल्लीच्या प्रभारी महासचिवांना पाठवलेला आहे."

पृथ्वीराज चव्हाण

जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, "जयंत पाटील यांना प्रथम पसंतीची 12 मतं मिळाली. त्यांची अपेक्षा होती की त्यांना प्रथम पसंतीची आणखीन काही मतं मिळतील, ती मिळाली नाहीत. आम्ही त्यांना दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मतं दिली होती. आम्ही पहिल्यांदा आमच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना आमची प्रथम पसंतीची मतं दिली, काही मतं आम्ही मिलिंद नार्वेकर यांना दिली आणि जयंत पाटील यांना दुसऱ्या पसंतीची मतं आम्ही दिली होती. त्यांना अपेक्षित असणारी प्रथम पसंतीची मतं मिळाली नाहीत."

मागच्या निवडणुकीची तुलना करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "मागच्या आणि या निवडणुकीची तुलना करता येणार नाही. ही निवडणूक पक्षांमध्ये मोठी फूट पडल्यानंतर झालेली आहे. आम्ही दोनच उमेदवार उभे केले असते तर ही चर्चा झाली नसती पण सध्या राज्यात जे महायुतीच्या विरोधात वातावरण आहे त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत मिळतो का हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला पण तसं झालं नाही."

निकालातून समोर येणारे ठळक मुद्दे

  • उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊनही आणि आमदारांचं संख्याबळ नसताना विजय खेचून आणला. उद्धव ठाकरे यांचे पीए ते आमदार असा नार्वेकरांचा प्रवास आहे.
  • भाजपचे पाच उमेदवार विजय झाले. यात भाजपने पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलं. तसंच विधानसभेच्या तोंडावर तीन ओबीसी, एक दलित आणि एक मराठा चेहरा निवडून आणला.
  • एकनाथ शिंदे यांनी लोकसभेत ज्या दोन विद्यमान आमदारांना संधी नाकारली ती चूक यानिमित्ताने सुधारली. भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोन्ही शिवसेनेच्या नाराज माजी खासदारांना विधानपरिषदेत संधी दिली आणि निवडून आणलं.
  • जयंत पाटील यांना शरद पवार गटाने समर्थन दिलं तरी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी मात्र साथ दिली नाही.
  • काँग्रेसचे चार ते पाच आमदार फुटल्याचं मतांच्या आकडेवारीतून दिसून येतं. प्रज्ञा सातव यांना 25 मते आणि नार्वेकर यांना 6-7 मतं काँग्रेसच्या आमदारांनी दिल्याचं दिसतं. परंतु यानंतरही चार ते पाच आमदारांचं क्रॉस व्होटिंग झाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळं काँग्रेस नेतृत्वाला विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत विचार करावा लागेल.
  • महाविकास आघाडीसोबतचे अपक्ष आमदार आणि बहुजन विकास आघाडी, एमआयएम, सपा, मनसे अशा छोट्या पक्षांच्या आमदारांनीही पहिल्या पसंतीची मतं मविआच्या उमेदवारांना दिली नसल्याची शक्यता आहे.
  • एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळं शिंदे आणि अजित पवार गट भक्कम असल्याचा राजकीय संदेश त्यातून जातो.

सध्याचे पक्षीय संख्याबळ

विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ - 288

विधानसभेत विद्यमान आमदारांची संख्या - 274

आता विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या 12 उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रत्येकी 23 आमदारांच्या मतांची गरज होती.

महायुतीचा विचार करता अशी स्थिती होती.

भाजपचे आमदार 103

समर्थन असलेले अपक्ष आमदार - 7

शिवसेना (शिंदे गट) आमदार - 38

समर्थन असलेले आमदार - 10

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 40 आमदार

समर्थन असलेले अपक्ष आमदार - 2

महायुतीचे एकूण आमदार = 200

महायुतीचे एकूण उमेदवार - 9

तर महाविकास आघाडीची स्थिती खालील प्रमाणं होती.

महाविकास आघाडीत काँग्रेसचे आमदार - 37

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 12

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - 15

अपक्ष - 1

मविआचे एकूण संख्याबळ - 65

मविआचे विधानपरिषदेसाठीचे उमेदवार - 3

इतर पक्षांचे आमदार

बहुजन विकास आघाडी - 3

समाजवादी पक्ष - 2

एमआयएम - 2

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1

शेतकरी कामगार पक्ष - 1

मनसे - 1