जागतिक महायुद्धात नाझींविरुद्ध लढणाऱ्या गुप्तहेराची कहाणी अंगठीमुळे आली समोर

फोटो स्रोत, LECCIA FAMILY
दुसऱ्या महायुद्धात नाझींविरोधात लढणाऱ्या एका ब्रिटिश एजंटची कहाणी जवळपास विस्मरणातच गेली असती. प्रेम, शौर्य आणि बलिदानाची ही कहाणी समोर आली ती एका अंगठीमुळे.
या अंगठीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला त्यामुळे ही गोष्ट आता सर्वांपर्यंत पोहोचली आहे. एक 98 वर्षीय वयोवृद्ध ब्रिटीश व्यक्तीच्या अथक प्रयत्नांची जोड देखील याला आहे. पण या कहाणीची खरी सूत्रधार ही सोन्याची एक 'एंगेजमेंट रिंग' म्हणजे अंगठी आहे.
तर झालं असं....
9 सप्टेंबर 1944 रोजी दुपारी 3.30 वाजता बुचेनवाल्ड इथल्या नाझीच्या छळछावणीमध्ये समोरच्या गेटजवळ 16 युद्धकैदी वाट पाहत उभे होते.
हे सगळे मित्र देशांचे एजंट होते. त्या सर्वांना शत्रूच्या हद्दीतून पकडण्यात आलं होतं. त्यापैकी आठ जण फ्रेंच होते.
युकेच्या स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (एसओई-SOE) या चर्चिल यांच्या "सिक्रेट आर्मी" साठी ते काम करत होते.
तर उर्वरित ब्रिटिश, कॅनडियन आणि बेल्जियन होते. जर्मनीनं या सर्वांना पकडण्यापूर्वी त्यांना डी-डे (आक्रमणाचा दिवस) च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विरोधाला मदत करण्यासाठी पॅराशूटच्या सहाय्यानं शत्रूराष्ट्रांच्या ताब्यात असलेल्या भागात उतरवण्यात आलं होतं.
त्याचदिवशी आधी छावणीतील त्यांच्या ब्लॉक चीफनं त्यांच्या नावाची यादी सादर केली होती. त्यांच्यापैकी प्रत्येक जण गेस्टापो (छळ करण्याची कोठडी) मधून आल्यानं रक्तानं माखलेला होता.
त्या सर्वांना केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, असं सांगण्यात आलं होतं. त्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसेल याची खात्री त्यांना पटवून देण्यात आलेली होती. भविष्यात जर्मन अधिकाऱ्यांच्या एका गटाच्या मोबदल्यात त्यांची देवाण घेवाण केली जाणार असल्याचंही त्यांना भासवण्यात आलं होतं. पण त्या कैद्यांपैकी एकाला यामध्ये शंका आली होती.
"फक्त अजासिओहून आलेले लहानशे मार्सेल लेसिया म्हणाले की, आपल्याला फासावर लटकवले जाणार आहे'." ब्लॉक प्रमुख आणि जर्मन राजकीय कैदी असलेल्या ओट्टो स्टोर्च नावाच्या व्यक्तीला युद्धानंतर परत त्यासाठी बोलावण्यात आलं होतं. ते कापो (कैंद्यांवर वक्ष ठेवण्यासाठी निवडलेला त्यांच्यातील एक जण) किंवा कैद्यांचे अर्दली म्हणून काम करत होता.
लेसिया 33 वर्षांचे होते. ते कोर्सिकन प्रतिरोधाच्या काळातील एका प्रतिष्ठीत कुटुंबातील होते. तसंच त्यांना असलेल्या युद्धाच्या अनुभवामुळं त्यांच्याकडं अविश्वासाचं ठोस कारणही होतं. गुप्तपणे जर्मनीसाठी काम करणाऱ्या एका कॉम्रेडनं दगा दिल्यामुळं त्यांना अखेरच बुचेनवाल्डच्या छावणीत जाण्याची वेळ आली होती.
एका ब्रिटीश अधिकाऱ्यांनी लेसिया यांना गनिमी काव्यासाठी प्रशिक्षण दिलेलं होतं. त्यांच्या मते, लेसिया हे अत्यंत वेगवान आणि तल्लख बुद्धी असलेले होते.
"ते त्यांच्या बोलण्यानं कधीही अडचणीत आले नाही. अत्यंत उत्साही, मनोरंजक आणि मनमिळावू होते," असं इतर फ्रेंच व्यक्तीसारखं त्यांचं वर्णन केलं होतं. तर दुसऱ्या एका जणानं त्यांचं वर्णन "इतरांवर विश्वास नसलेले आणि अहंकारी" असंही केलं होतं. मात्र, लेसिया यांची एक हळवी बाजूदेखील होती.

फोटो स्रोत, Getty Images
प्रशिक्षण सुरू असताना ते ओडेट्टे विलेन नावाच्या 24 वर्षीय महिला एसओई एजंटच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर या दाम्पत्याची एंगेजमेंट झाली होती. त्यामुळंच बुचेनवाल्डमध्ये गेटसमोर गोळा होण्यापूर्वीच लेसिया यांनी स्टॉर्च यांच्याकडे काहीतरी दिलं होतं.
"त्यांनी मला त्यांची एंगेजमेंट रिंग दिली होती," असं ब्लॉक चीफनं रिपोर्टमध्ये लिहिलं होतं.
कॅम्पच्या गेटवर जमलेल्या या 16 कैद्यांची नावं SS (हिटलरची खास आर्मी) अधिकाऱ्यांकडून पुकारण्यात आली, असं स्टॉर्च सांगतात. त्यानंतर या कैद्यांना दोन-दोनच्या गटात त्यांचे हात बांधून घेऊन जाण्यात आलं. "आम्ही सगळेच प्रचंड उदास होतो. विशेषतः मी. कारण पुढं काय होणार आहे, याची मला चांगलीच जाणीव होती," असं स्टॉर्च यांनी लिहिलंय.
पण तो काही कथेचा अंत नव्हता. छावणीमध्ये दुसरीकडं असलेल्या एका ब्रिटिश कैद्यानं बोलावण्यात आलेल्या या 16 कैद्यांची नावं ऐकली होती.
अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत मार्सेल लेसिया यांचं नाव हे त्याच्या कुटुंबीयांना वगळता जणू अगदी विस्मरणातच गेलेलं होतं.

त्यांची कोणतीही ठोस अशी ओळख नव्हती. फ्रान्समधल्या वॅलोसेमधील ब्रूकवूड लष्करी स्मशानात असलेल्या स्मृतीस्थळावर एसओईच्या भागामध्ये त्यांचं नाव होतं. ब्रिटनच्या बेपत्ता झालेल्या अधिकाऱ्यांचं ते स्मृतीस्थळ होतं. पण याठिकाणी खऱ्या नावाऐवजी, ते ज्या नावानं एजंट म्हणून वावरत होते ते, नॉम दे गुरे असं नाव होतं. फ्रान्समध्ये ज्याठिकाणी त्यांना पॅराशूटच्या सहाय्याने उतरवण्यात आलं होतं, त्याच्या जवळ एका बोर्डावर, याठिकाणी त्यांना सहकाऱ्यांसह गेस्टापोद्वारे अटक करण्यात आल्याचा, चुकीचा उल्लेख होता.
"यापूर्वी कधीही त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही, केवळ त्यांच्याबाबत काही सहज समोर आलेले विचित्र संदर्भ आहेत," असं मत लष्करी इतिहासकार पॉल मॅकक्यू यांनी मांडलं. लेसिया यांची कहाणी समोर आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. कापोला त्यांची एंगेजमेंट रिंग देण्याच्या लेसिया यांच्या निर्णयाचाही या सर्वामध्ये मोठा वाटा राहिला.

मार्सेल मॅथ्यू रेने लेसिया यांचा जन्म 1 जानेवारी 1911 रोजी झाला होता. त्यांचे वडील फ्रान्सच्या लष्करात कर्नल होते. लेसिया हे मोठे होत असताना काही काळ फ्रान्सच्या ताब्यात असलेल्या ऱ्हाईनलँडमध्ये होते. त्यामुळं जर्मन भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. राष्ट्रीय सेवा बजावल्यानंतर त्यांनी काही काळासाठी रेनॉ कारचे सेल्समन म्हणून काम केलं. त्यानंतर अॅलिस बेट्झ नावाच्या एका महिलेशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुलं झाली मात्र पुढं त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ऑगस्ट 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून लष्करात पुन्हा बोलावण्यात आलं.
लेसिया यांना आक्रमण केलेल्या जर्मन लष्कराविरुद्ध लढताना दाखवलेल्या शौर्यासाठी क्रोईक्स डी गुरे या पदकानं गौरवण्यात आलं होतं. पण जून 1940 पर्यंत त्यांना पकडण्यात आलं होतं. बर्लिनच्या दक्षिणेला 90 किमी अंतरावर असलेल्या युद्ध छावणीतील कैद्यांच्या स्टॅलॅग XI-A या तुरुंगात त्यांना नेण्यात आलं होतं. त्यानंतर 1942 मध्ये ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.

फोटो स्रोत, Getty Images
वोसजेस पर्वत पार केल्यानंतर ते मध्य फ्रान्सच्या लिमोजेस शहरात पोहोचले. त्यावेळी तो भाग सहकारी विंची शासकाच्या नियंत्रणात होता. मात्र. अद्याप त्याठिकाणी अॅक्सिस तुकड्यांचा (शत्रू राष्ट्र) ताबा नव्हता. याठिकाणी लेसिया यांच्या कुटुंबीयांनी घर तयार केलं होतं.
लेसिया यांनी लिओन गुथ नावाच्या त्यांच्या जुन्या मित्राला संपर्क केला. गुथ हे विची यांच्यासाठी काम करणारे पोलिस प्रमुख असले तरी, मित्र देशांप्रती त्यांना सहानुभूती होती. गुथ यांच्या प्रभावामुळं लेसिया यांना लिमोजेसमध्ये युद्दबंदींसाठीच्या एका केंद्राचं व्यवस्थापन सांभाळण्याचं काम मिळालं. त्याचप्रमाणं ते गुथ आणि व्हर्जिनिया हॉल यांच्यात मध्यस्थ म्हणूनही ते काम करत होते. व्हर्जिनिया हॉल म्हणजे अमेरिकेत जन्मलेल्या एक पाय असलेल्या प्रसिद्ध हेर होत्या. त्या फ्रान्समध्ये एसओईसाठी हेरगिरीचं काम करायच्या. तसंच सीआयएसाठीही त्या काम करायच्या.
हॉल यांनी लेसिया यांच्याबाबत खूप विचार केला. त्यानंतर त्यांनी लेसिया आणि त्यांचे मित्र कॉम्रेड एलिस अॅलार्ड हे त्यांचे पुतणे असल्याचं भासवत कैदेत असलेल्या काही ब्रिटिश एजंटच्या सुटकेसाठी त्यांची मदत घेतली. मात्र 1942 च्या अखेरीस शत्रू राष्ट्रांनी लिबरे भाग ताब्यात घेण्यासाठी आगेकूच केलं. जर्मनी आपल्या शोधात असेल हे माहिती असल्यानं हॉल स्पेनला गेल्या. त्यानंतर काही काळातच लेसिया यांनीही त्यांच्या पाठोपाठ तिथं जाण्याचा निर्णय घेतला. पण अलार्ड यांच्यासह पीरनीज ओलांडताच आवश्यक ती कागदपत्रं नसल्यामुळं त्यांना बार्सिलोनाला जाणाऱ्या एका रेल्वेत अटक करण्यात आली.

लेसिया आणि अलार्ड यांनी त्यानंतरचा काही काळ स्पेनची तुरुंगं आणि छळछावण्यांमध्ये घालवला. पण 1943 मध्ये जेव्हा जनरल फ्रँको यांनी स्पेनच्या शत्रूराष्ट्रांना दिलेल्या पाठिंब्यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली, त्यावेळी या दोघांची सुटका करण्यात आली होती. हॉल यांच्या मदतीनं सीमा ओलांडत ते पोर्तुगालला पोहोचले. तिथून त्यांनी लिस्बनमधील ब्रिटीश दुतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर या सर्वांची हवाई प्रवासाची व्यवस्था केली आणि 10 ऑक्टोबरला ते ब्रिस्टलला पोहोचले.
या दोन्ही फ्रेंच व्यक्तींना एमआय 5 च्या लंडनमधील रिसेप्शन सेंटरला नेण्यात आलं. शहराच्या दक्षिणेला वँड्सवर्थमध्ये हे मोठ्ठं आश्रयस्थान किंवा ठिकाण होतं. युद्धादरम्यान शत्रू राष्ट्रांच्या ताब्यात असलेल्या युरोपमधून पळालेल्या सुटलेल्यांना सुरक्षा मंजुरीसाठी इथं ठेवलं जायचं. कारण युकेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शत्रूंच्या हेरांवर गुप्तहेर यंत्रणा करडी नजर ठेवून होत्या. तसंच ब्रिटनसाठी सेवा बजावू शकतील किंवा एजंट बनण्याची क्षमता असलेल्यांचा शोध घेण्यासाठीही या केंद्राचा वापर करण्यात आला.
युकेकडून फ्रान्समध्ये असलेल्या एसओई एजंटला पुरवल्या जाणाऱ्या साहित्याबाबत लेसिया यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यात एजंटला पाठवले जाणारे कपडे अत्यंत नवे आणि अशा प्रकारचे दिसणारे असायचे जे फ्रान्समध्ये सर्वसामान्यांसारखे वाटत नसायचे. तसंच चलनाच्या नोटा या सलग क्रमांक असलेल्या असायच्या. तसंच काही एजंट सार्वजनिकरित्या स्मोकींग करायचे अशीही तक्रार त्यांनी केली होती. ते त्यावेळच्या फ्रेंच परंपरांच्या विरुद्ध होतं.
लेसिया यांचा त्यांची चौकशी करणाऱ्या एमआय 5 च्या अधिकाऱ्यावर चांगलाच प्रभाव पडला. त्यांनी लेसिया यांचं वर्णन "बुद्धिमान आणि पुढाकार घेणारे" असं केलं होतं.

फोटो स्रोत, STRUGO FAMILY
त्यानंतर लवकरच त्यांची भरती सीओईमध्ये करण्यात आली होती. शत्रू राष्ट्रांच्या ताब्यात असलेल्या देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या चळवळीला शस्त्र पुरवठा आणि नियोजन करण्यासाठी ब्रिटिशांकडून एसओईची स्थापना करण्यात आली होती. कुटुंबाला धोका होऊ नये म्हणून त्यांना प्रशिक्षणादरम्यान "जॉर्जेस लुईस" या नावासह 309883 हा सर्व्हीस नंबर देण्यात आला.
त्यांना ब्रिटनमध्ये असलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवण्यात आलं. त्याठिकाणी त्यांना त्यांचं पॅराशूट "विंग्ज" मिळालं. याठिकाणी त्यांनी औद्योगिक घातपात आणि त्याचबरोबर दूरसंचार उपकरणं कशी हाताळायची याचं प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या प्रशिक्षणानंतरचा निष्कर्ष पुढील प्रमाणे होता, "या व्यक्तीमध्ये जन्मजात नेतृत्न गुण आहेत. त्यांना स्वतःवर विश्वास आहेत. अत्यंत उपयुक्त कार्य पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरू शकतात."
हॅम्पशायच्या ब्यूलियूमध्ये लेसिया यांनी ओडेट्टा विलेन नावाच्या 24 वर्षीय महिलेबरोबर प्रशिक्षण घेतलं. विलेन लंडनमध्ये चेक वंशांचे पिता आणि फ्रेंच वंशाच्या आईच्या पोटी जन्मलेल्या होत्या. त्यांचे पती आरएएफ पायलट प्रशिक्षक होते आणि एका वर्षापूर्वीच त्यांचं अपघाती निधन झालं होतं.
"ती अत्यंत तरुण होती. नुकतीच विधवा झालेली असली तरी तिच्यात जीवन जगण्याची प्रचंड इच्छा होती. युद्धाच्या या वातावरणात सकारात्मक योगदान देण्याची तिची इच्छा होती," असं त्यांचा मुलगा मिगुएल स्ट्रुगो यांनी सांगितलं होतं. त्या कुशल भाषातज्ज्ञ होत्या आणि त्यांचं प्रशिक्षण वायरलेस ऑपरेटर म्हणून झालेलं होतं. त्या आणि लेसिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
त्यानंतर लेसिया फ्रान्सला परत येण्याची वेळ आली होती. ते त्यांच्या जुन्या ओळखीसह फ्रान्सला परतले. पण आता त्यांना "लेबरर" हे आणखी एक कोडनेमदेखील मिळालेलं होतं. एसओई मुख्यालय आणि त्याची एक लहानशी टीम त्याला याच नावाने ओळखत होती. त्याचबरोबर त्यांचं फिल्डनेम "बॉडॉइन" होतं, स्थानिक विरोधासाठी ते हे नाव वापरणार होते.

फोटो स्रोत, ISABELLE HUREAUX
त्यांच्या मोहिमांमध्ये लॉयर खोऱ्याच्या बाह्य भागात असलेल्या रेल्वे लाईन उध्वस्त करण्याचे आणि जर्मनीच्या लष्कराकडून वापर केल्या जाणाऱ्या आसपासचं गावं किंवा तळ नष्ट करण्याच्या आदेशांचा समावेश होता. 5-6 एप्रिल 1944 च्या रात्री लेसिया आणि त्यांचे सहकारी टुर्सच्या दक्षिण पूर्वेला असलेल्या टुर्समध्ये पॅराशूटद्वारे उतरले. त्याठिकाणी त्यांची भेट स्थानिक गुप्त लष्कराच्या लोकांशी झाली.
लेसिया, एलिसी अलार्ट आणि पिएरे गीलेन नावाचे रेडिओ ऑपरेटर यांच्या टीमला सुरुवातीला ते जिथं उतरले होते, तिथून जवळच असलेल्या गावातील एका घरात ठेवण्यात आलं होतं. पण त्यांना त्यांचं लक्ष्य असलेल्या ठिकाणाच्या आणखी जवळची जागा शोधायची होती.
लेसिया कुणाच्या तरी मदतीनं त्याची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात होते. सीओईच्या कागदपत्रांमध्ये मदत करणाऱ्या त्या व्यक्तीचा उल्लेख "पेबर्ट" किंवा "लान्स" असा आहे. रेने लवॉड नावाचा तो एक तरुण वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी होता, असं म्हटलं जातं. ओडेट विलेनही तिथं पॅराशूटद्वारे उतरल्या. त्या दुसऱ्या एका नेटवर्कसाठी रेडिओ ऑपरेटरचं काम करणार अशी शक्यता होती. पण त्यांचं प्रशिक्षण अत्यंत घाईत पूर्ण झालेलं होतं. त्यामुळं "धोका पत्करायचा नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळं मदत करण्यासाठी", म्हणून त्यांचा या लेबररच्या पथकात समावेश करण्यात आला.
या पथकानं त्यांच्याबरोबर पॅरिसला जावं असा सल्ला लवॉड यांनी दिला. लेसिया त्यासाठी तयार झाले पण त्यांनी विलेन यांना नवीन ठिकाण तयार होत नाही, तोपर्यंत आहे तिथंच थांबायचं सांगितलं. या निर्णयामुळंचं विलेन यांचे प्राण वाचले होते, कारण लवॉड हे गुप्तपणे जर्मनीसाठी काम करत होते.
लवॉड त्या सर्वांना घेऊन थेट चेर्चे मिडी नावाच्या फ्रान्सच्या पॅरिसमधील एका जुन्या लष्करी तुरुंगात गेले. त्याठिकाणी जर्मन सैनिकांनी त्यांच्यासाठी कोठड्या तयार ठेवल्या होत्या, असं रेकॉर्ड्समध्ये स्पष्ट झालंय. (नंतर समोर आलेल्या माहितीनुसार लवॉड त्यांच्या जर्मन म्होरक्यांपासून वेगळे झाले होते आणि त्यांना गेस्टापोंकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या.)

फोटो स्रोत, Getty Images
लेसिया हे 84 अॅव्हेन्यू फोन या SS काऊंटर इंटेलिजन्स सर्व्हीसच्या मुख्यालयात 52 दिवस होते. त्याठिकाणी अत्यंत क्रूर पद्धतीनं चौकशी केली जायची. त्यानंतर 8 ऑगस्ट 1944 ला लेसिया, त्यांचे सहाकारी आणि इतर एजंट अशा 37 जणांना जर्मनीला जाणाऱ्या रेल्वेत पाठवण्यात आलं. या रेल्वेमध्ये आणखी दोन दिग्गज एसओई अधिकारीही होते. विंग कमांडर यिओ थॉमस त्यांना गेस्टापोनं "द व्हाईट रॅबिट" नाव दिलं होतं. तर दुसरे होते क्वाड्रन लीडर मॉरीस सॉथगेट. 17 ऑगस्ट रोजी ते बुचेनवाल्डच्या बाह्य भागात असलेल्या वीमरला पोहोचले. याठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या जर्मनीच्या सीमाभागात असलेली नाझींची पहिली आणि सर्वात मोठी छळछावणी होती.
तिथं सुमारे 56 हजार जणांचा मृत्यू झाला होता. त्यात यहुदी, युद्धबंदी, राजकीय कैदी, पोलिश, रोमानी, फ्रिमेसन्स आणि नाझींकडून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या इतर घटकांतील लोकांचा समावेश होता. त्याशिवाय गुन्हेगार, लैंगिक दृष्ट्या राक्षसी वृत्ती असलेले तसेच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत लोकांचाही समावेश होता. लेसिया आणि त्यांच्यासह एसओईच्या इतर सर्वांना ब्लॉक 17 मध्ये ठेवण्यात आलं होतं. हा ब्लॉक खास कैद्यांसाठी राखीव होता. काटेरी तारांच्या कुंपणाद्वारे तो, इतर कैद्यांपासून वेगळा करण्यात आला होता.
लेसिया याठिकाणी आल्यानंतर तीन आठवडे आणि दोन दिवसांनंतर त्यांची हत्या करण्यासाठी त्यांना छावणीच्या गेटवर बोलावण्यात आलं होतं.

"मला वाटतं ते एक लहान शरीरयष्टी असलेले पण, उत्साही व्यक्ती होते. ते एक चांगले व्यापारी होते, असं मी म्हणू शकत नाही," असं मत मॅकक्यू यांनी मांडलं. "पण हा सगळ्याचा शेवट आहे, असं म्हणणाऱ्या काहींपैकी ते एक होते, किंवा तसं म्हणणारे एकटेच होते."
छावणीतील नोंदींनुसार विचार करता त्या सगळ्यांची तीन दिवसांनी 12 सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. त्यांच्या गळ्याला तारा बांधून शवगृहातील हूकला त्यांला टांगण्यात आलं होतं. त्यांचे मृतदेह छावणीतील स्मशानामध्येच पुरण्यात आले असावे. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात आणखी 4 एसओई एजंटसह 14 जणांच्या एका समुहाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे 14 जण त्या 37 जणांपैकीच होते.
लेसिया यांच्या मृत्यूनंतर एसओईच्या फ्रान्स विभागाचे प्रमुख कर्नल मॉरीस बकमास्टर यांनी त्यांच्याबाबत काही लिहिलं होतं. त्यातून लेसिया यांच्याबाबत काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. " लेसिया त्यांच्या कामात निपूण होते, हे त्यांच्या सुरुवातीच्या कामातून स्पष्ट होतं. पण त्यांचा आत्मविश्वास जरा जास्तच वाढला होता का? कदाचित एक लहानसा निष्काळजीपणा? विलेन यांच्याशी एंगेजमेंट त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी दुर्घटना ठरली." असं त्यांनी लिहिलं होतं.
पहिल्या पतीच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर विलेन फियान्सेलाही गमावून बसल्या होत्या.
लेसिया आणि एसओईमधील त्यांचे इतर सहकारी भाग्यात होतं तसे जीवनापासून दूर जात असताना, एक इंग्लिश एअरमॅन त्यांना लांबून पाहत होता. त्या सर्वांची नावं लाऊडस्पिकरवर पुकारली जात असताना, तोही त्याच तुरुंगात होता.
ते होते 22 वर्षीय स्टॅनली बूकर. त्यांचा जन्म केंटमधील गिलिंघममध्ये झाला होता. ते RAF (रॉयल एअर फोर्स) मध्ये हॅलिफॉक्स बॉम्बर होते. हल्ल्याच्या एका दिवसापूर्वी त्यांचं विमान फ्रान्सच्यावर असताना पाडण्यात आलं होतं. काही जणांनी सुरुवातीला त्यांना आश्रय दिला होता. पण कुणीतरी दगा देऊन गेस्टापोला माहिती दिल्यानं त्यांची परतण्याची योजना फसली होती.
बूकर हे बुचेनवाल्डमध्ये असलेल्या मित्रदेशांच्या 168 हवाई सैनिकांपैकी एक होते. जर्मनीच्या विरोधात राबवलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या मोहिमेमुळं त्यांना पकडणाऱ्यांच्या भावना त्यांच्याबाबत अत्यंत तीव्र होत्या. ते त्यांना दहशतवाद्यासारख्या उपमा देऊ लागले होते. छावण्यांमध्ये असलेली त्यांची उपस्थिती ही जिनिव्हा ठरावाचं उल्लंघन होतं. त्यांच्याबरोबर मानवी अधिकारांनुसार वर्तन करण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्यासाठी त्यांना नाझींनी युद्धबंदींसारखं वेगळं ठेवणं अपेक्षित होतं.

फोटो स्रोत, SSAFA, THE ARMED FORCES CHARITY
पण त्यांनी तसं केलेलं नव्हतं. तसंच त्यांच्या कागदपत्रांवर "इतर छावण्यांत स्थलांतर करू नये" असं नमूद केलेलं होतं.
बूकर यांनीही त्यांच्या सहकाऱ्यांसह हे मान्य केलं होतं की, त्यांना आता इथून कधीही जीवंत बाहेर पडता येणार नाही. "ते आमचं डेथ वॉरंट होतं," असं बूकर म्हणतात. ते सध्या 98 वर्षांचे आहेत.
पॅरीसमध्ये त्यांचीही अत्यंत निर्घृणपणे चौकशी करण्यात आली होती. ते शहर स्वतंत्र करण्यापूर्वी त्यांनाही बुचेनवाल्डच्या रेल्वेत बसून पाठवून देण्यात आलं होतं. लेसिया आणि इतर 36 एसओईच्या सदस्यांनंतर पाच दिवसांनी ते या छावणीत पोहोचले होते. पण तसं असलं तरीही त्यांना एकमेकांच्या उपस्थितीबाबत माहिती ही होतीच.
9 सप्टेंबर रोजी जेव्हा लाऊड स्पीकरवर 16 नावं पुकारली गेली, तेव्हा बूकर यांनी ती अत्यंत लक्षपूर्वक ऐकली होती. त्यातली बहुतांश नावं फ्रेंच होती पण काही ब्रिटिश वाटत होती. "त्या नावात मॅक किंवा असं काहीतरी होतं. ते कदाचित कॅनडीयन कॅप्टन जॉन केन मॅकलिस्टर असावेत," असं ते म्हणाले.
बूकर म्हणाले की, नेमकं काय होत आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इतरांसह गेटवर आलो. "त्याठिकाणी बाहेर ते सर्व एकत्र जमले होते. तो सर्व तमाशा भयावह होता. त्या सर्वांना एका इमारतीत नेलं जात होतं. ते सगळे आत गेले आणि दार बंद झालं. त्यानंतर आम्ही त्यांना परत कधीही पाहिलं नाही."
बूकर हे लेसिया यांच्यापेक्षा नशीबवान होते. बुचेनवाल्डमधील कम्युनिस्ट त्याठिकाणी मित्रदेशांचे हवाई सैनिक असल्याची माहिती जर्मन वायू दल लुफ्तवाफेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले. बंदी बनवलेल्या हवाई सैनिकांबरोबर आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणं वर्तन व्हायला हवं, याची खात्री करण्याचं काम लुफ्तवाफे करत होतं. त्यामुळं त्यांनी या सर्व हवाई सैनिकांच्या स्थलांतरणासाठीचा अर्ज दाखल केला.
लवकरच त्यांचं स्थलांतर करून त्या सर्वांना अधिकृत युद्धबंदी म्हणून सध्याच्या पोलंडमधील स्टॅलॅग लुफ्त III मध्ये आणण्यात आलं. 1963 मधील चित्रपट द ग्रेट एस्केप यावरच आधारित होता. त्यानंतर बूकर यांना युद्धबंदीच्या बर्लिनमधील छावणीत पाठवण्यात आलं. त्याठिकाणी सुटका होण्यापूर्वी रेड आर्मीनं त्यांना ताब्यात घेतलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
युद्धानंतर बूकर RAF बरोबर हेरगिरीचं काम करू लागले. ते कुटुंबासह जर्मनीला स्थलांतरीत झाले. त्याठिकाणी ते बर्लिन एअरलिफ्टमध्ये सहभागी झाले. सुमारे वर्षभर चाललेल्या सोव्हिएतच्या निर्बंधांच्या काळात हवाई मार्गानं शहरांना पुरवठा करण्याचं काम ते करत होते. पण युद्धाच्या भयावह आठवणींनी आयुष्यभर त्यांची पाठ सोडली नाही.
पुढं स्क्वाड्रन लीडर या रँकसह निवृत्त झाल्यानंतर त्यांना ब्रिटिश गुप्तहेर खात्यातील सेवांसाठी MBE या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. निवृत्तीनंतर त्यांनी ब्रिटिश सेवेत काम करणाऱ्या RAF आणि SOE च्या अशा सैनिकांच्या प्रचाराचं काम करण्याचा निर्णय घेतला, ज्यांना अधिकृत युद्धबंदी न बनवताच बुचेनवाल्डला नेण्यात आलं होतं आणि त्यांच्या वेदनांकडंही दुर्लक्ष करण्यात आलं होतं.
उदाहरणादाखल, बूकर यांना ते छावणीमध्ये होते त्या काळासाठीचं RAF चं वेतन मिळालं नव्हतं. ही रक्कम अगदी तुरळक आणि दुर्लक्ष करण्यासारखी असली तरीही, प्रतिकात्मक म्हणून तरी ती मिळायला हवी, अशी बाजू त्यांनी मांडली होती. अखेर 2010 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यानंतर अखेर ब्रिटिश, फ्रेंच आणि बेल्जियन सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ दोन फलकांचं अनावरण करण्यात आलं. याचवर्षाच्या सुरुवातीला 98 वर्षीय बूकर यांना फ्रान्समधील सर्वोच्च लष्करी किंवा नागरी सन्मान लिजिऑन डि ऑनर नं गौरवण्यात आलं.
9 सप्टेंबर 1944 रोजी हत्या करण्यापूर्वी ज्या एसओई एजंटची नाव पुकारण्यात आली होती, त्यांना बूकर कधीही विसरू शकणार नाहीत.

फोटो स्रोत, SSAFA, THE ARMED FORCES CHARITY
"माझ्या वडिलांवर या घटनेचा मोठा प्रभाव आहे. टोपण नावांसह काम केलेल्या किंवा मारल्या गेलेल्या या अज्ञात व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठीची ती मोठी प्रेरणा होती," असं बूकर यांची मुलगी पॅट विनिकोम्ब यांनी म्हटलं.
2020 मधील कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान, विनिकॉम्ब त्यांच्या वडिलांच्या जुन्या वस्तू आणि कागदपत्र चाळून, त्यांचा अभ्यास करत होत्या. तसंच वडिलांबरोबर चर्चा करून बुचेनवाल्डमधील त्यांच्यासह इतर RAF चे सैनिक आणि SOE एजंट यांच्या गोष्टींवरून त्या एक पुस्तक लिहित आहेत. त्यासाठीच्या संशोधनादरम्यान त्यांना गेस्टापोनं ठेवलेली काही कागदपत्रं मिळाली. "दस्तऐवज सांभाळण्याच्या बाबतीत जर्मन खूप चांगले आहेत," असं त्या म्हणाल्या.
त्यांना लेसिया आणि त्यांच्यासह इतर एसओईंच्या हत्येनंतर त्यांचा ब्लॉक प्रमुख ओट्टो स्टॉर्च यानं त्याबाबत लिहिलेला रिपोर्टही सापडला. त्याच्या अनुवादासाठी पॅटनं पॉल मॅकक्यू यांची मदत घेतली. पॉल हे सिक्रेट वर्ल्ड वॉर 2 लर्निंग नेटवर्क संस्थेचे ट्रस्टी आहेत. ही संस्था युद्धादरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांबाबत माहिती गोळा करण्याचं काम करते.
"जेव्हा पॉल यांनी या कागदपत्रांचं भाषांतर केलं तेव्हा त्यांना अचानक एंगेजमेंट रिंगचं महत्त्वं लक्षात आलं," असं विनकॉम्ब यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, STRUGO FAMILY
मॅकक्यू यांनी सध्या छावणीच्या ठिकाणी उभारलेल्या बुचेनवाल्ड मेमोरियल या संग्रहालयाशी संपर्क केला. त्यांनी ही रिंग अजूनही त्यांच्याकडे आहे, असा दुजोरा दिला. त्यांनी त्याचा फोटोही मला पाठवला असं मॅकक्यू म्हणाले.
बुचेनवाल्ड मेमोरियलच्या होम कर्स्टन यांच्या मते, युद्धानंतर स्टॉर्च यांनी रिंग त्यांच्याकडं ठेवली होती. 1970 मध्ये मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या एका सहकारी कैद्याला ती रिंग दिली. त्यानं 1980 च्या सुमारास ही रिंग संग्रहालयाला दान केली. त्यानंतर 1995 पासून ती संग्रहालयात प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहे.
लेसिया यांच्या वंशजांना याबाबत माहितीदेखील आहे की नाही अशी शंका मॅकक्यू यांना होती. पण त्यांना अजूनही लेसिया यांच्याबाबत अत्यंत तोकडीच माहिती होती. त्यांच्याबाबत ऑनलाईन फारशी माहिती नव्हती. केवळ विलेन यांच्यासंदर्भातील माहितीत त्यांचा उल्लेख होता. विलेन यांचं 2015 मध्ये वयाच्या 96 व्या वर्षी ब्युनस आयरसमध्ये निधन झालं.
लेसिया यांना पकडल्यानंतर त्या पायरेनीजला पळून गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांची भेट सँटियागो स्ट्रुगो गॅरे या स्पॅनिश व्यक्तीशी झाली. ते स्पॅनिश एस्केप नेटवर्क चालवत होते. युद्धानंतर त्यांनी लंडनमध्ये विलेन यांचा शोध घेतला आणि त्या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर हे दाम्पत्य अर्जेंटिनाला स्थलांतरीत झालं.
त्यांचा मुलगा मिगुएल स्ट्रुगो यांच्या मते, विलेन यांनी मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी बुचेनवाल्ड संग्रहालयाशी संपर्क केला होता. "एक दिवस त्यांनी मला अंगठीबद्दल आणि ती अंगठी बुचेनवाल्डमध्ये आहे याबाबत सांगितलं होतं. पण माझा त्यावर विश्वासच बसला नाही," असं स्ट्रुगो म्हणाले. "कैद्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या सर्व वस्तू, लुटल्या जात असतील," असं वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
मॅकक्यू यांनी नंतर 'केव' मधील राष्ठ्रीय अभिलेखागारातील लेसिया यांची वैयक्तिक फाईल तपासली. त्यात युद्धकाळातील त्यांचे कारनामे आणि त्यावेळच्या जीवनाबाबतच्या माहितीचा खजिना होता.
ब्रूकवूड लष्करी स्मशानातील मेमोरियलमध्ये लेसिया यांचा समावेश त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर "जॉर्जेस लुईस" या प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या नावाने असल्यानं नंतर स्पष्ट झालं. नंतर मॅकक्यू यांनी संबंधित व्यवस्थापनाला संपर्क केला, तेव्हा त्यांनी वेबसाईटमध्ये लेसिया यांचं खरं नाव अपडेट करण्याची तयारी दर्शवली. तसंच ममोरियलमधील फलकावरही लवकरच बदल केला जाईल, असंही प्रवक्त्यांनी सांगितलं.
त्यानंतर मॅकक्यू यांनी फ्रेंच इतिहासकारांच्या माध्यमातून आणि टेलिफोन डिरेक्टरींचा वापर करून लेसिया यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अखेर त्यांना फ्रँकोईन लेसिया नावाचा एक व्यक्ती सापडला. त्यांचे आजोबा या काळातील संघर्षात सहभागी होते. त्यांनी त्याकाळात मार्सेल लेसिया यांची मदत केली. त्यावेळी लेसिया एप्रिल 1944 मध्ये पॅराशूटद्वारे परत आले होते.
मार्सेल यांची कहाणी फार लोकांना माहिती नसली तरी, ती त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तरी माहिती होती. कारण त्यांच्या बहिणीचं निधन नुकतंच म्हणजे 2018 मध्ये 106 वर्षांच्या असताना झालं होतं.
"मी ब्रिटिश सिक्रेट सर्व्हीसमध्ये असलेले माझे कझिन मार्सेल यांच्याबाबत नेहमी ऐकलं आहे. त्यांना बुचेनवाल्डमध्ये फासावर लटकावण्यात आलं होतं," असं पश्चिम आफ्रिकेच्या गॅबॉनमध्ये राहणारे फ्रँकॉईस म्हणाले. ते याठिकाणी शिपिंग कंपनी चालवतात. त्यांचे काही नातेवाईक कोर्सिकामध्ये एका रस्त्याला मार्सेल यांचे नाव देण्यासाठी प्रचार करत होते, असंही त्यांनी सांगितलं. मार्सेल लेसिया यांचे नातू जीन मार्क यांच्या संपर्कात असल्याचंही फ्रँकॉईस यांनी सांगितलं.
मॅकक्यू यांनी फ्रँकॉईस लेसिया यांना विचारलं की, ती अंगठी परत मिळावी असं त्यांना वाटतं का? त्यावर फ्रँकॉईस आणि जीन मार्क दोघांनीही, ती आहे तिथंच राहावी असं मत व्यक्त केलं.
"माझ्या मते एखाद्या ड्रॉवरच्या कोपऱ्यात पडून राहण्यापेक्षा, ती अंगठी त्यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी बुचेनवाल्ड संग्रहालयातच राहायला हवी," असं फ्रँकॉईस म्हणाले.
त्यामुळं आता सिद्ध झालं आहे की, या अंगठीनंच बूकर, मॅकक्यू आणि विनिकोम्ब यांना या अनन्य साधारण जीवनप्रवासाचा शोध घेण्याची प्रेरणा दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








