अमित शाह: विरोधकांना धडकी भरवणारा नरेंद्र मोदींच्या उदया मागचा शांत रणनितीकार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, गुजरात
भारताचं पंतप्रधानपद सलग तिसऱ्यांदा भूषविण्याची ऐतिहासिक संधी नरेंद्र मोदींना मिळणार, की नाही हे जून महिन्यात स्पष्ट होईल. दशकभर सत्तेत राहिल्यामुळेच मोदींचा सर्वत्र प्रभाव दिसून येतो. मात्र त्यांच्यासोबत एक असे राजकारणी आहेत ज्यांच्याबद्दल कमी बोललं जातं आणि भारतीय जनता पक्षाच्या असामान्य उदयात या राजकारण्याचं मोलाचं योगदान आहे.
देशाचे गृहमंत्री आणि ज्यांचं वर्णन अनेकदा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्ती असं केलं जातं, ते अमित शाह, नरेंद्र मोदी यांचे जुने मित्र आणि सर्वात विश्वासू व्यक्ती असून मोदींच्या निवडणूक रणधुमाळीमागील व्यूहरचनाकार आहेत.
अमित शाह कट्टर हिंदुत्ववादी असून अमितभाई या नावानं प्रसिद्ध आहेत. त्यांनी भाजपाला अनेक निवडणुका जिंकून दिल्या आहेत.
नरेंद्र मोदींप्रमाणे अमित शाह प्रसिद्धीच्या झोतात नसतात, ते खासगीपण जपणारे आहेत. मात्र ते उत्तम संघटक, निवडणूक व्यूहरचनाकार आणि चतुर राजकारणी आहेत.
ते मोदींप्रमाणे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण घडवून आणणारे व्यक्ती आहेत, असं म्हटलं जातं.
त्यांचे समर्थक त्यांच्याकडे हिंदुत्वाच्या विचारसरणीचे भक्कम पुरस्कर्ते म्हणून पाहतात. मात्र जे त्यांच्या विरोधात जातात त्यांना ते धडकी भरवतात.
त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या मते देशातील काही सर्वाधिक वादग्रस्त विधेयकांमागे अमित शाह आहेत. यात भाजपाच्या जाहीरनाम्याचा दशकांपासून भाग असलेलं काश्मीरमधील कलम 370 हटवणं आणि मुस्लिमांबाबत प्रचंड भेदभाव करण्याचा आरोप असलेलं नवं नागरिकत्व विधेयक यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या बीबीसीच्या विशेष बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा- लोकसभा निवडणूक 2024

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीशी बोलताना, अमित शाह यांचे शालेय जीवन आणि त्याआधीपासूनचे मित्र, सहकाऱ्यांनी, फारशा माहित नसलेल्या त्यांच्या आयुष्याच्या सुरूवातीच्या टप्प्यावर प्रकाश टाकला. अमित शाह काही कालावधीसाठी तुरुंगात असतानादेखील हे मित्र त्यांच्या पाठी उभे होते.
अमित शाह यांच्या असामान्य यशामागचं जाणवलेलं रहस्य त्यांनी सांगितलं. त्यांनी अमित शाह यांच्या कठोर निष्ठेबद्दल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटत असणाऱ्या आत्मियतेबद्दल आणि कठोर परिश्रम करण्याच्या क्षमतेबद्दल सांगितलं.
मास्टर स्ट्रॅटेजिस्ट, भाजपचे चाणक्य
राष्ट्रीय स्तरावर अमित शाह यांचा ठसा दशकभरापूर्वी उमटला. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतातील सर्वात महत्त्वाच्या राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात, महत्त्वाचं योगदान दिल्यानंतर ते राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले.
बऱ्याच वर्षांपासून भाजपाला उत्तर प्रदेशात यश मिळालं नव्हतं. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवलं.
"चाणक्यापेक्षा तेज बुद्धी ही अमित शाह यांना मिळालेली दैवी देणगी आहे," असं यतिन ओझा सांगतात. ते वकील आणि भाजपाचे माजी राजकारणी आहेत. ते आणि अमित शाह वेगळे होईपर्यत त्यांनी अत्यंत जवळून अमित शाह यांच्यासोबत कित्येक दशकं काम केलं आहे.
यतिन ओझा अमित शाह यांची तुलना भारतीय उपखंडात पसरलेल्या 2,000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मौर्य साम्राज्याचे श्रेष्ठ रणनीतीकार, चाणक्याशी करतात.
अमित शाह यांच्या कौशल्यांचा निवडणूक काळात अप्रतिम वापर केला जात असण्याची बाब त्यांचे मित्र आणि प्रतिस्पर्धी दोघेही मान्य करतील.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी लोकसभेतील 2014च्या विजयानंतर 2017 आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दाखवला होता. आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आधीपेक्षा मोठं यश मिळवून देताना पक्षाला पुन्हा एकदा सत्तेचे दरवाजे खुले केले होते.
यतिन ओझा सांगतात की एक दिवस अमित शाह काहीतरी भव्यदिव्य करून दाखवतील, याची त्यांना सुरूवातीपासूनच कल्पना होती.
"मी त्यांच्यातील चुणूक पाहिली होती. त्यांची राजकीय चातुर्य पाहिलं होतं. ते मोठ्या निवडणुकांमधून यश कमावणार असं मला जाणवलं होतं."
अहमदाबादमधील भाजपा नगरसेवक देवांग दानी अमित शाह यांना 30 वर्षांपासून अधिक काळापासून ओळखतात. ते सांगतात, "पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे या गोष्टीलाच त्यांचा सर्वोच्च प्राधान्य क्रम असायचा."
"ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, कोणतीही निवडणूक लहान नसते. अमितभाईंना प्रत्येत युद्धात विजय मिळवायचाच असतो. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळेच 1984 मध्ये दोन जागा जिंकणाराी भारतीय जनता पार्टी 2019 मध्ये 303 जागांवर पोचली."
2019 च्या लोकसभा निवडणुकाचे निकाल ज्या दिवशी जाहीर झाले हा त्या दिवसाचा फोटो आहे. अमित शाह कारकिर्दीचा हा सर्वोच्च क्षण होता.
दिल्लीतील पक्ष कार्यालयाकडे त्यांची कार जात असताना त्यांना पक्ष कार्यकर्त्यांचा गराडा पडला होता. विद्यार्थी राजकारण्यापासून ते सत्तेतील वरच्या पातळीपर्यतच्या त्यांच्या विलक्षण प्रवासाचं वर्तुळ पूर्ण झालं होतं.
इथेच या प्रवासाची सुरूवात झाली
अमित शाह यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 ला गुजरातमधील मनसा या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील अनिलचंद्र यांचा पीव्हीसी पाईप बनवण्याचा छोटा व्यवसाय होता. तर त्यांची आई कुसुमबेन या गृहिणी होत्या.
अमित शाह यांचे बालपणीचे मित्र सुधीर दारजी, शाह यांच्या वडिलोपार्जित घराबद्दलच्या उत्कट प्रेमाबद्दल आणि मनसाला दिल्या जाणाऱ्या नियमित भेटीबद्दल सांगतात. सुधीर दारजी अमित शाह यांचे वडिलोपार्जित घर दाखवतात. याच घरात अमित शाह यांचं बालपण गेलं. ते इथं मित्रांबरोबर क्रिकेट आणि इतर खेळ खेळायचे.
वयाच्या 16 वर्षांपर्यत अमित शाह इथं राहिले. नंतर ते आपल्या आई वडिलांबरोबर अहमदाबादला राहण्यास गेले.

फोटो स्रोत, Getty Images
अमित शाह यांच्या काकांच्या घरातून आम्ही अमित शाह यांच्या कुटुंबाच्या जुन्या घराकडे गेलो. ते एक प्रशस्त आणि मध्यमवर्गीय घर होतं. आज ते बंद आहेत.
जवळच असलेल्या एका प्राथमिक शाळेत अमित शाह आणि दारजी शिकले आहेत. गेल्या अर्धशतकात त्या शाळेचं क्रीडांगण, वर्ग, खेळण्यांचं कपाट आणि शाळेची घंटा यातील काहीच बदललं नाही.
दारजी सांगतात की लहानपणी अमित शाह अतिशय मवाळ स्वभावाचे होते. इतर विद्यार्थी त्यांच्यावर दादागिरी करायचे. ते कधी अमित शाह यांची पाटी तोडायचे तर कधी त्यांचा डबा चोरायचे. अमित शाह आणि दारजी यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अनेकदा गैरवर्तन केल्याबद्दल बोलावणं यायचं.
रथाची दोन चाकं
भाजपाचा मुख्य वैचारिक स्रोत असलेल्या हिंदुत्वाच्या उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अमित शाह जोडले गेल्यानंतर त्यांची नरेंद्र मोदींशी पहिली भेट 1982 मध्ये अहमदाबाद इथं झाली.
नरेंद्र मोदी त्यावेळेस रा. स्व. संघाचे प्रचारक होते. मोदींनी आपल्या या तरुण सहकाऱ्याला भाजपाची विद्यार्थी शाखा असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेत सहभागी होण्याचा सल्ला दिला होता.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे सूर लगेचच जुळले होते. त्यामुळे मोदी जसजसे वरच्या स्थानांवर पोचत गेले तसतसे अमित शाह यांचा मार्गही प्रशस्त होत गेला. त्यांचे पाठीराखे या दोघांचा उल्लेख एका रथाची दोन चाकं असं करतात. त्यांची तुलना ते रामायणातील राम आणि लक्ष्मणाशी करतात.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार आणि 2000च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळात गुजरातमध्ये टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक असलेले किंगशुक नाग सांगतात की,"हे दोघेही एकमेकांना अत्यंत अनुकूल आहेत. नरेंद्र मोदी हा सातत्याने लोकांसमोर राहणारा चेहरा होता तर अमित शाह हे एक खासगीपण जपणारं लाजाळू व्यक्तिमत्व होतं. शाह नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले."
अमित शाह नेहमीच पडद्याआडून काम करत राहिले. त्यांनी आपला पाया तयार केला, मित्र आणि समर्थक जोडले. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांचा निवडणुकीत पराभव केला.
"मोदी यांच्यासाठी शाह चांगलं काम करू शकतात यातच त्यांचं महत्त्व दडलेलं आहे. शाह अशा असंख्य गोष्टी करू शकतात जे मोदी करू शकत नाहीत. अमित शाह मोदींसाठी उपयुक्त आहेत. मोदींच्या रस्त्यात येणाऱ्यांना अमित शाह रोडरोलरप्रमाणे भुईसपाट करतात," असं नाग सांगतात.
अनेक टीकाकार अमित शाह यांच्याबाबत उघडपणे बोलू इच्छित नाहीत. ते म्हणतात की, त्यांना खरोखरंच शाह यांची भीती वाटते. काही नोकरशहांनी सांगितलं आहे की ते अमित शाह यांची भेदक नजर, स्थिर डोळे आणि अतिशय निर्विकार चेहऱ्याला घाबरतात.
गुजरातमध्ये राजकीय कौशल्यांचा वापर
अमित शाह यांनी राजकारणाचे धडे त्यांच्या गृह राज्यात म्हणजे गुजरातमध्ये गिरवले. इतक्या वर्षांच्या काळात ते नरेंद्र मोदी यांचा उजवा हात बनले आहेत.
गुणवत्ता ओळखण्यात अमित शाह यांचा हातखंडा आहे आणि ज्या तरुणांमध्ये गुणवत्ता असल्याचं त्यांना वाटलं, त्यांच्या ते पाठीशी उभे राहिले आहेत, असं आरडी देसाई हे त्यांचे जवळचे सहकारी सांगतात. ते अमित शाह यांच्याबरोबर 1987 पासून आहेत. "मात्र राजकारणात दीड दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरदेखील अमित शाह यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. मला आधी संघटना बांधायची आहे असं ते म्हणतात."
अमित शाह यांच्याबद्दल हेच मत त्यांचे अनेक जुने सहकारी व्यक्त करतात. अमित शाह नेहमीच दूरचा विचार करतात.

फोटो स्रोत, Getty Images
नरेंद्र मोदी यांनी त्यांना सरखेज मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडल्यानंतर 1997 मध्ये अमित शाह यांनी गुजरात विधानसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तिथे ते 1998, 2002 आणि 2007 मध्ये निवडून आले होते.
2008 मध्ये तो मतदारसंघ विसर्जित झाल्यानंतर ते जवळच्या नारनपुरा मतदारसंघाकडे वळले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते उभे राहिले नव्हते. मात्र 2019 मध्ये ते गांधीनगर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
यंदाच्या निवडणुकीतदेखील ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरातमध्ये धार्मिक दंगली उसळल्या होत्या. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या परिस्थितीमुळे मोदी-शाह यांचे संबंध अधिक घट्ट झाले. या दंगलींमध्ये 1,000 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यातील बहुतांश मुस्लीम होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर दंगल रोखण्यास पुरेसे उपाय न केल्याबद्दल टीका झाली होती. आपण काहीही चुकीचं केलेलं नाही असं ते म्हणाले होते. आणि नंतर न्यायालयाकडून त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं होतं.
दंगलीनंतर अत्यंत धुव्रीकरण झालेल्या गुजरातची विधानसभा निवडणूक भाजपाने जिंकली होती. त्यानंतर अमित शाह यांना डझनभर मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली होती.
दंगलींच्या काही प्रकरणांमध्ये व्यवस्थित तपास न केल्याबद्दल अमित शाह यांच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलिसांवर सर्वोच्च न्यायालयानं कडक ताशेरे ओढले होते. न्यायालयानं याचं वर्णन न्यायाचा गर्भपात असं केलं होतं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं दोन अत्यंत महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी गुजरातबाहेर हलवली होती. राज्याच्या पोलिसांकडून तक्रारी नोंदवून घेण्यात आणि साक्षीदारांकडून साक्ष नोंदवून घेण्यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं गुजरात सरकारने न्यायालयात मान्य केलं होतं.
अनेक वर्षे अमित शाह यांच्यावर दंगलींमधील भूमिकेबद्दल आरोप होते. त्यांना या आरोपांचं खंडन केलं. मात्र या आरोपांचा नीट तपास झाला नाही.
वरिष्ठ पत्रकार राजीव शाह यांची सरखेजमध्ये सदनिका आहे. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलं होतं की त्यांनी अमित शाह यांना दंगलींनंतर त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करण्यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावर अमित शाह यांनी त्यांना विचारलं होतं की त्यांचं घर हिंदूबहुल भागात आहे की मुस्लिमबहुल भागात आहेत?
"मी जेव्हा त्यांना माझ्या घराचा परिसर सांगितला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की चिंता करू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. जे काही घडेल ते दुसऱ्या भागात घडेल."
बीबीसीने अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क केला, मात्र तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हत्येचे आरोप आणि तुरुंगवास
अमित शाह यांचं आयुष्य उलगडण्यास 2008 मध्ये सुरूवात झाली. तेव्हा त्यांच्यावर 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख या मुस्लीम नागरिकाचा आणि त्याची पत्नी कौसर बी च्या एनकाऊंटरचा आरोप करण्यात आला होता.
अमित शाह यांनी त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूनं करण्यात आल्याचं म्हणत नाकारले होते. मात्र 2010 मध्ये त्यांना अटक झाली होती आणि त्यांच्यावर हत्या आणि अपहरणाचे आरोप ठेवण्यात आले होते.
अटक होण्याची ही वेळ अमित शाह यांच्यासाठी सर्वात अयोग्य होती. कारण तोपर्यत त्यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे नरेंद्र मोदी यांचे भविष्यातील वारसदार म्हणून पाहिलं जाऊ लागलं होतं. मात्र त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास झाला होता.
जेव्हा अमित शाह यांची तुरुंगातून सुटका झाली तेव्हा न्यायायलाने त्यांना गुजरात सोडण्याचा आदेश दिला होता. त्यांनी साक्षीदारांवर दडपण आणू नये म्हणून हा आदेश देण्यात आला होता.
डिसेंबर महिन्यात अमित शाह यांनी त्यांच्या तुरुंगवासाची आठवण करताना म्हटलं होतं की तो कठीण काळ होता आणि फक्त पाच मिनिटात ते तुरुंगमंत्र्यांचे कैदी झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
हितेश बारोट यांची अमित शाह यांच्याशी रा. स्व. संघामध्ये 1988 मध्ये भेट झाली होती. हितेश सांगतात, "ही परमेश्वरानं त्यांची घेतलेली परीक्षा होती. मात्र ते यातून बाहेर आले. या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ते बनावट प्रकरण होतं." अमित शाह यांची सुटका झाल्याबरोबर दिल्लीत त्यांची भेट घेणारे देसाई म्हणतात, "शाह यांनी प्रतिकूल परिस्थितीचं रुपातंर संधीमध्ये केलं."
ते म्हणाले की "मी या वेळेचा उपयोग दिल्लीत माझं स्थान निर्माण करण्यासाठी आणि कॉंग्रेसला सत्तेतून ओढून नरेंद्र मोदी यांना सत्तेत आणण्यासाठी करेन."
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सहा महिन्यांनी, डिसेंबर 2014 मध्ये न्यायालयाने अमित शाह यांना दोषमुक्त केलं. न्यायमुर्ती एम.बी. गोसावी यांनी सांगितलं की, अमित शाह यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते.
त्याचबरोबर जुलै 2010 मध्ये पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात अमित शाह यांच्यावर तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवला होता. त्यांनी अमित शाह यांच्या सुटकेविरोधात कधीही अपील केलं नाही. यातून भाजपा सत्तेत आल्यानंतर पोलिसांवर त्यांचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने हे आरोप फेटाळले होते.
अमित शाह यांच्या निर्दोष मुक्ततेच्या काळातच काही अप्रिय गोष्टीदेखील घडल्या होत्या. काही दिवस अगोदरच शाह यांच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींना ह्रदयविकाराचा प्राणघातक झटका आला होता. त्या न्यायाधीशांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आणि त्यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. यातील कोणताही आरोप सिद्ध झाला नाही आणि यासंदर्भात तपास करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.
या कुटुंबाच्या आरोपांबाबत बीबीसीने विचारलेल्या प्रश्नांना अमित शाह यांच्या कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत.
'आपण' आणि 'ते'
त्यांचे नेते आणि मार्गदर्शकाप्रमाणेच, अमित शाहदेखील अनेकदा 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळताना झालेल्या ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याबद्दल बोलतात.
काश्मीरला देण्यात आलेला खास दर्जा (कलम 370) रद्द करणं आणि पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लीम अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व घेण्यासंदर्भातील नवीन वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणणं हे याच चुकांना दुरुस्त करण्याचे प्रयत्न आहेत.
या विधेयकाचा जागतिक पातळीवर निषेध झाला. 20 कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाविरोधातील हिंसाचारामध्ये 2014 पासून वाढ होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने, बेकायदेशीर मुस्लीम स्थलांतरितांचा उल्लेख 'वाळवी' असा केल्याबद्दल आणि त्यांना बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची धमकी दिल्याबद्दल अमित शाह यांच्यावर टीका केली होती. निवडणूक प्रचार सभांमध्ये अमित शाह नेहमीच 'आपण' आणि 'ते' असा उल्लेख करतात. यात 'ते' म्हणजे मुस्लीम असतात.
काही विश्लेषकांना अमित शाह यांची भाषा जोरदार प्रचाराचा भाग वाटते. तर ओझा यांना मात्र वाटतं की या मुद्द्यांवर त्यांचा गाढ विश्वास आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मला माहीत नाही नेमकं कशामुळे, मात्र मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हाच ते मला दिसलं. आणि त्यांचा मुस्लिमांबद्दलचा राग, पूर्वग्रह आणि असंतोष आजही तसाच आहे. त्यांचा तिरस्कार आणि त्यांचा स्वीकार न करण्याचं धोरण देखील तसंच आहे. खूपच निग्रही आणि खूपच कठोर."
मुस्लिमांबद्दलच्या मतांबद्दल आम्ही विचारलेल्या प्रश्नांना अमित शाह यांच्या कार्यालयाने प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यांचे बालपणीचे मित्र सुधीर दारजी या मुद्द्याशी सहमत नाहीत. "ते मुस्लिमांबाबत काहीही बोलणार नाहीत किंवा त्यांच्याविरोधातदेखील काहीही करणार नाहीत. सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याचाच त्यांचं उद्दिष्ट आहे."
जुहापुरा या अमित शाह यांच्या मतदारसंघात येणाऱ्या आणि गुजरातमधील सर्वात मोठ्या मुस्लीम वस्तीतील रहिवासी यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या खासदाराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. हा प्रश्नदेखील आम्ही शाह यांच्या कार्यालयाला विचारला. मात्र त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.
भ्रष्टाचाराचे आरोप
नरेंद्र मोदी आणि अमित शाह अनेकदा विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मात्र 2017 मध्ये 'द वायर' या वृत्त देणाऱ्या पोर्टलने अमित शाह यांचे पुत्र आणि व्यावसायिक जय अमित शाह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपाला त्यांचा बचाव करावा लागला होता.
भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांचा व्यवसाय 16,000 पटींनी वाढल्याच्या आरोपाचं जय शाह आणि अमित शाह यांनी खंडन केलं होतं. त्यांनी ही बातमी, खोटी, अपमानास्पद आणि बदनामीकारक असल्याचं म्हणत 'द वायर' वर खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.
जय शाह यांची जानेवारी 2021 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अमित शाह यांच्यावर नेपोटिझमचा देखील आरोप केला होता. भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचं नियमन बीसीसीआय ही श्रीमंत संस्था करते.
अमित शाह आपल्या मुलाचा बचाव करत असताना पंतप्रधान मोदी मात्र याबाबत गप्प होते. आणि काहींच्या मते अमित शाह मोदींसाठी किती महत्त्वाचे आहेत याचंच ते चिन्ह आहे.
भारताचे भावी पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 73 वर्षांचे आहेत आणि त्यांची तब्येतदेखील चांगली आहे. त्यामुळेच नजीकच्या काळात या पदासाठी संधी दिसत नाही. मात्र मोदी नंतर कोण? हा प्रश्न विचारल्यानंतर अमित शाह यांचं नाव समोर येतं.
वयाच्या 60 वर्षी अमित शाहाकंडे पुरेसा वेळ आहे. जरी मागील काही वर्षात आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या तरी त्यांना संधी आहे.
अमित शाहांना जरी पंतप्रधानाची महत्त्वाकांक्षी असली तरी त्यांनी ती दाखवलेली नाही. आणि कोणालाही असं वाटत नाही की पंतप्रधान मोदींच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. मोदींबरोबर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ काम केलं आहे.
"ते मोदींचा उजवा हात आणि सरसेनापती आहेत. मोदींचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अमित शाह मोदींविरोधात कधीही काहीही करणार नाहीत," असं नाग सांगतात.
ओझा सांगतात की "अमित शाहांसाठी कायम मोदीच सर्वोच्च आहेत. जर मोदी नसतील तर इतर कोणीही नाही."











