दूषित पाणी प्यायल्यामुळे गुजराती महिलेला झाला मणक्याचा आजार, दुर्मिळ रोगावर डॉक्टरांनी कसे केले उपचार?

दुर्मिळ आजाराशी झगडणाऱ्या मधू

फोटो स्रोत, PRAVIN KARKARE

फोटो कॅप्शन, दुर्मिळ आजाराशी झगडणाऱ्या मधू
    • Author, लक्ष्मी पटेल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काही दिवसांपुर्वी 50 वर्षांच्या मधू करकरे यांना ताप आला होता. त्यावर त्यांनी औषध घेतल्यावर त्यांना जरा बरं वाटू लागलं. पण हळूहळू त्यांना अधिक थकवा जाणवू लागला आणि शरीराचा खालचा भाग वेदनेनं ठसठसू लागला.

पुढे गंभीर पाठदुखी सुरू झाली. वेदनेची तीव्रता इतकी जास्त होती की त्यांना पलंगावरून उठणंही शक्य होत नव्हतं.

ही लक्षणं दिसण्याआधी त्यांनी दूषित पाणी प्यायलं होतं, असं म्हटलं जात आहे. त्यांच्या आसपास राहणाऱ्या अनेकांना त्यामुळे उटल्या आणि जुलाबाचा त्रासही झाला होता.

मधू अहमदाबादच्या निकोल भागातल्या राहिवासी आहेत.

ग्राफिक्स

बीबीसी गुजरातीशी बोलताना मधू करकरे म्हणाल्या, "मे महिन्यापासून मी अंथरूणाला खिळून आहे. 15 दिवस मला रुग्णालयातही भरती केलं होतं. माझ्या मणक्याच्या गादीत पस जमा होत असल्यानं मला दोन वेळा शस्त्रक्रिया करावी लागली."

"शिवाय, घरी 17 दिवस रोज सलाईन चढवावं लागत होतं. एमआरआय, सोनोग्राफी आणि रक्ताच्या आणि लघवीच्या कित्येक तपासण्या केल्या. आत्तापर्यंत या आजाराच्या उपचारावर 8.5 लाख रूपये खर्च झाला आहे," त्या पुढे सांगत होत्या.

त्यांच्या भागात मलवाहिनीचं काम सुरू होतं. त्यातच त्या भागात पाणीपुरवठा करणारी वाहिनी फुटली.

"सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळलं असल्याची शक्यताही त्यांना वाटत होती. कारण नळाच्या पाण्याला उग्र वास येत होता. त्यानंतर आमच्या भागातली काही लोकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले," त्या पुढे म्हणाल्या.

रुग्णालयात भरती झालेल्या मधू

फोटो स्रोत, PRAVIN KARKARE

फोटो कॅप्शन, रुग्णालयात भरती झालेल्या मधू

आजाराची सुरूवात कशी झाली याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "दुसऱ्या दिवशी मलाही ताप आला. आमच्या नेहमीच्या डॉक्टरकडून मी औषधं घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताप उतरला. पण चार ते पाच दिवसांतच मला भरपूर थकवा जाणवू लागला."

"कंबरेपासून खाली तळपायापर्यंत सगळा भाग दुखू लागला. पाच दिवस या वेदना मी सहन केल्या. नंतर ते इतकं असह्य झालं की जमिनीवर पाय ठेवणंही अवघड होऊन बसलं.

मला रक्तदाब, मधुमेह किंवा इतर कोणताही आजार नाही. असं इतकं आजारपण मला याआधी कधीही आलेलं नव्हतं," असं मधू यांनी सांगितलं.

ग्राफिक्स

बीबीसी गुजरातीशी बोलताना मधू यांचे पती प्रवीण करकरे सांगत होते, "आता आम्ही साठवून ठेवलेलं सगळं पाणी ओतून दिलं आहे. त्यातून अतिशय उग्र वास येत होता. पण सुरूवातीला आम्हीही हेच पाणी प्यायलो आहोत."

"आमच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. मी एका हिऱ्यांच्या कारखान्यात काम करतो. माझा मुलगा एका खासगी कंपनीत कामाला आहे. पत्नी आजारी पडल्यापासून सतत रुग्णालयाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कामावरही लक्ष देता येत नाहीय. आर्थिकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या आम्हाला फार त्रास होतोय."

मधू करकरे पती प्रवीण करकरे यांच्यासह

फोटो स्रोत, Praveen Karkare

फोटो कॅप्शन, मधू करकरे पती प्रवीण करकरे यांच्यासह

मधू यांच्या आजाराविषयी माहिती देताना प्रवीण यांनी आणखी एक वेगळी गोष्ट सांगितली. मधू यांना पाठदुखी सुरू झाली आणि पलंगावरून उठणं मुश्किल झालं तेव्हा त्यांनी मणक्याच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

मधू सांगतात, "आम्ही डॉ. बिरेन शाह यांच्याकडे उपचारासाठी गेलो. त्यांनी आम्हाला एमआरआय आणि सीटी स्कॅन करायला सांगितला. त्या चाचण्यांच्या अहवालात काहीच समोर आलं नाही.

पण मला पाठीत असह्य वेदना होत होत्या. गोळ्या-औषधं घेऊनही वेदना शमत नव्हती. कित्येकवेळा या चाचण्या आम्ही करून पाहिल्या. प्रत्येकवेळी सगळ्या चाचण्यांचं एकूण 20 ते 25 हजारांचं बील येत होतं. पण माझा आजार काही जात नव्हता."

ग्राफिक्स

बीबीसी गुजरातीशी बोलताना मधू करकरे यांच्यावर उपचार करणारे डॉ. बिरेन शाह म्हणाले, "मधू यांच्या पाठदुखीमागचं कारण सोनोग्राफी, सीटी स्कॅन किंवा एमआरआय अहवाल कशातूनच समोर येत नव्हतं."

"आम्ही त्यांना तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवलं. त्यानंतर त्यांच्या ठराविक अंतराने चाचण्या करून आतमधल्या अवयवांमध्ये काही बदल होत आहे का हे तपासलं गेलं."

"पहिली एमआरआय चाचणी केल्यानंतर 12 दिवसांनी त्यांची दुसऱ्यांदा एमआरआय चाचणी केली गेली आणि त्यानंतर आणखी काही दिवसांनी तिसऱ्यांदा तीच चाचणी करून घेतली," डॉ. शाह पुढे सांगत होत्या.

साल्मोनेला टायफी या जीवाणूने होणारा हा टायफॉईड तापाचा आजार एक जीवघेणा संसर्ग आहे.

फोटो स्रोत, Getty Images

त्या तिसऱ्या एमआरआय चाचणीच्या अहवालातून असं समोर आलं की त्यांच्या बीजांडकोषाजवळ फॅट स्ट्रँडिंग म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढणं सुरू झालं आहे.

"त्यावरून त्यांना या बीजांडकोषाच्या आसपास संसर्ग झाल्याचं नक्की झालं. पण हा संसर्ग नक्की कोणत्या पद्थतीचा आहे हे तपासण्यासाठी आम्ही रक्ताची ब्लड कल्चर ही चाचणी करून घेतली. त्यात त्यांच्या शरीरात साल्मोनेला हा जीवाणू आढळला."

या जीवाणूचाच संसर्ग त्यांना झाला होता. हा जीवाणू तुमच्या आतड्यात गेला की जुलाब, उलट्या, ताप असे आजार होतात. पण तिथून त्यांना मणक्यापर्यंत प्रवास करता आला तर त्याने साल्मोनेला टायफी व्हर्टिब्रल ऑस्टियोमायलिटिस या नावाचा आजार होता. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे." डॉ. शहा म्हणाले.

ग्राफिक्स

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितनुसार, साल्मोनेला टायफी या जीवाणूने होणारा हा टायफॉईड तापाचा आजार एक जीवघेणा संसर्ग आहे.

शक्यतो दूषित पाण्यामुळे किंवा अन्नातून तो परसतो. साल्मोनेला टायफी या जीवाणूनं एकदा शरीरात प्रवेश केला की ते त्यांची संख्या वाढवतात आणि रक्तवाहिनीत प्रवेश करतात.

हा जीवाणू फक्त माणसाच्या शरीरात जिवंत राहू शकतो. या आजाराचा संसर्ग झालेल्या माणसाच्या रक्तवाहिनीत आणि अन्ननलिकेत हा जीवाणू राहतो.

संसर्ग झाल्यावर दीर्घकाळ ताप येणं, थकवा जाणवणं, डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता किंवा जुलाब अशी लक्षणं दिसतात.

काही रुग्णांना पूरळही येऊ शकते. काही वेळा यात रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही नोंदवलं आहे. या रोगाचं निदान रक्त तपासणीतून करता येतं.

साल्मोनेला टायफी या जीवाणूने होणारा हा टायफॉईड तापाचा आजार एक जीवघेणा संसर्ग आहे.

फोटो स्रोत, Getty Images

"मधू यांना आधी कोणताही आजार नव्हता. कोणत्याही आजाराला पटकन बळी पडण्याची त्यांच्या शरीराची प्रवृत्तीही नव्हती," डॉ. बिरेन शाह सांगतात.

गेल्या काही दिवसांत मधू यांनी शिळं किंवा खराब झालेलं अन्न खाल्लं होतं का, असा प्रश्न डॉक्टरांनी त्यांना विचारला होता. त्यानंतर मधू यांनी पाणी कसं खराब आहे याची माहिती दिली.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांची ब्लड कल्चर ही चाचणी झाली होती. शरीरात कोणत्या जीवाणूमुळे संसर्ग होतो आहे हे शोधण्यासाठी ही चाचणी केली जाते.

मधूबेन यांच्यावर उपचार करणारे मणक्याचे शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. बिरेन शाह (सोबत मधू, त्यांचे पती प्रवीण आणि मधू यांचा मुलगा)

फोटो स्रोत, DR BIREN SHAH

फोटो कॅप्शन, मधूबेन यांच्यावर उपचार करणारे मणक्याचे शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. बिरेन शाह (सोबत मधू, त्यांचे पती प्रवीण आणि मधू यांचा मुलगा)

डॉ. बिरेन शाह सांगतात, "बॅक्टेरिया मणक्यापर्यंत पोहोचल्याने मधू यांच्या मणक्याच्या गादीत संसर्गाने पस तयार झाला होता. तो काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता.

या शस्त्रक्रियेत ही गादी स्वच्छ केली जाते. आणि नंतर मणका पुन्हा जोडण्यासाठी फिक्सेशन फ्यूजन ही शस्त्रक्रियाही करावी लागते."

"पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका आठवड्याने पुन्हा पस तयार होण्याची सुरूवात झाली. त्यामुळे मला पुन्हा दुसऱ्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. आता त्याला दोन महिने उलटून गेले आहेत. हळूहळू माझी तब्येत सुधारत आहे. "

पाठीत जाणवणाऱ्या असह्य वेदना आता कमी झाल्यात. पण शस्त्रक्रियेनंतर शरीरात अशक्तपणा जाणवतो.

डॉ. बिरेन शाह म्हणतात, "साल्मोनेला टायफी व्हर्टिब्रल ऑस्टियोमायलिटिस हा जगातला एक दुर्मिळ आजार आहे. पण या आजाराचं निदान व्यवस्थित झालं आणि त्यावर उपचार मिळाले तर रुग्ण बरा होऊ शकतो."

ग्राफिक्स

गेली अनेक दशकं या आजाराच्या रुग्णांची नोंद केली जात आहे. पण त्याचं प्रमाण फार दुर्मिळ आहे. जगभरात अगदी मूठभर लोकांना हा आजार झाला असेल.

"या आजारात रुग्णाला पाठीत भयंकर वेदना जाणवतात. पण एमआरआय आणि सीटी स्कॅनमध्ये काहीही कारण दिसत नाही.

"अशा परिस्थितीत रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवणं आणि ठराविक दिवसांनंतर चाचण्या करणं हाच पर्याय उरतो. या चाचण्यांच्या अहवालात काय बदल दिसतायत त्यावरून आजाराचं निदान करता येतं."

डॉ. बिरेन शाह पुढे असं म्हणाले की या आजाराची लक्षणं क्षयरोगाच्या लक्षणांसारखी असल्याने अनेकदा रुग्णाला क्षयरोग झाला आहे असा समज होतो. "त्यामुळे अशा आजाराचं निदान नक्की करण्यासाठी ब्लड कल्चर चाचणी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कोणत्या जीवाणूमुळे संसर्ग झालाय ते या चाचणीतून समोर येतं."

"जीवाणू कोणत्या प्रकारचा आहे हे कळाल्यावरच औषध देता येतं. प्रतिजैविक औषधांचा जास्त वापर केला तर शरीर त्याविरोधात प्रतिरोधकं तयार करतं. त्यामुळे नेमका कोणता जीवाणू शरीरात आहे हे समजल्यावरच औषधं देता येतात."

साल्मोनेला टायफी या जीवाणूने होणारा हा टायफॉईड तापाचा आजार एक जीवघेणा संसर्ग आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साल्मोनेला टायफी या जीवाणूने होणारा हा टायफॉईड तापाचा आजार एक जीवघेणा संसर्ग आहे.

या आजाराशी लढणारा आणखी एक रुग्ण काही दिवसांपूर्वीच भोपाळहून डॉ. बिरेन शाह यांच्याकडे उपचारासाठी आला होता. त्याचा पाणीपुरी विकायचा व्यवसाय होता. त्यांनाही प्रचंड पाठदुखीचा त्रास होत होता.

"त्याच्याही चाचण्यांमधून काहीच निष्पन्न होत नव्हतं. त्यानंतर ब्लड कल्चर चाचणीद्वारेच आजाराचं निदान झालं आणि त्यांना प्रतिजैविकं देऊन बरं करण्यात आलं."

मणक्यापर्यंत जीवाणू नुकताच पोहोचलेला असता, प्राथमिक पातळीवरच आजाराचं निदान झालं तर फक्त प्रतिजैविकांनी आजार बरा होऊ शकतो.

पण आजार अजून बळावला असेल तर हीच प्रतिजैविक इंजेक्शनच्या माध्यमातून थेट रक्तवाहिनीत सोडावी लागतात, अशी माहिती डॉ. शाह यांनी दिली.

मधू यांना अशी इंजेक्शन दिवसातून 3 वेळा 45 दिवस घ्यावी लागली.

ग्राफिक्स

अहमदाबाद महानगरपालिकेच्या पूर्व भागातली निकोलमधले अधिकारी सांगतात की दूषित पाण्याबद्दल तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यावर कारवाई केली होती.

बीबीसी गुजरातीशी बोलताना पूर्व भागाचे उप शहर अभियंता महेश हदियाल म्हणाले, "दोन महिन्यांपूर्वी निकोल भागातील एक मलवाहिका बदलण्याचं काम सुरू होतं."

त्यावेळी ईश्वरव्हिला सोसायटी आणि आसपासच्या भागात पाण्याची वाहिनी फुटल्याने दूषित पाणी येत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती.

"तक्रारीनंतर लगेचच फुटलेली वाहिनी दुरूस्त करण्यात आली. सद्य स्थितीत त्या भागात दूषित पाण्याची कोणतीही समस्या दिसून येत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.