राहुल गांधींवर धक्काबुक्कीचा आरोप करणारे भाजपचे 'हे' 3 खासदार कोण आहेत?

या फोटोत डावीकडून उजवीकडे प्रताप सारंगी, फान्गनॉन कोन्याक आणि मुकेश राजपूत दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रताप सारंगी, फान्गनॉन कोन्याक आणि मुकेश राजपूत (डावीकडून उजवीकडे)

हातात घोषणेच्या पाट्या, आंदोलन आणि त्यानंतर झालेली कथित धक्काबुक्की. संसदेच्या परिसरातलं गुरुवारचं (19 डिसेंबर) हेच दृश्य दिसत होतं.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नेते समोरा-समोर आले आणि काही वेळातच भाजपने आपले दोन खासदार जखमी झाल्याचं जाहीर केलं.

त्यातल्या एक होत्या नागालँडच्या फान्गनॉन कोन्याक. राहुल गांधी त्यांच्या इतके जवळ आले की, त्यांना फार अस्वस्थ वाटलं, असं त्या म्हणाल्या.

तर भाजपच्या खासदारांनी त्यांच्यासोबत आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत धक्काबुक्की केल्यानं गोंधळ माजला, असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकुर, बान्सुरी स्वराज आणि हिमांग जोशी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेची 109, 115, 125 131 आणि 351 ही कलमं लावली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी उपचारासाठी राममनोहर लोहिया रुग्णालयात घेऊन गेलेल्या दोन्ही खासदारांनी फोन करून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली.

कोण आहेत प्रतापचंद्र सारंगी?

यात प्रताप सारंगी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. एका व्हीडिओत सारंगी व्हीलचेअरवर बसलेले दिसतात. त्यांचं डोकं रुमालाने झाकलं आहे.

ओडिशाच्या बालासोर मतदारसंघातून संसदेचे सदस्य झालेले सारंगी या घटनेबद्दल बोलताना म्हणाले, "मी पायऱ्यांवर उभा होतो. तेव्हा राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का मारला आणि ते माझ्यावर पडले. त्यामुळे मला जखम झाली."

या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार प्रताप सारंगी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP CHANDRA SARANGI

फोटो कॅप्शन, प्रताप सारंगी ओडिशाच्या बालासोर मतदारसंघातून भाजपकडून संसदेत निवडून आलेत.

2019 मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर 69 वर्षांच्या सारंगी यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जाऊ लागलं.

त्यांच्या साध्या राहणीमानाविषयी आणि सायकलवरून प्रचार करण्याबद्दल तेव्हा फार चर्चा झाली होती.

पण सारंगी यांचा भूतकाळ फार वादग्रस्त आहे.

लाल रेष
लाल रेष

1999 मध्ये ओडिशाच्या केओन्झार जिल्ह्यात ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन धर्मप्रचारक ग्राहम स्टेन्स यांची आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर लावला गेला.

तेव्हा प्रताप सारंगी बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष होते. न्यायालयात त्यांची साक्षही घेण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी दारा सिंह यांचा बजरंग दलाशी काहीही संबंध नाही, अशी साक्ष त्यांनी दिली.

या प्रकरणाची सुनावणी अनेक वर्ष चालली. शेवटी 2003 मध्ये दारा सिंह आणि इतर 12 लोकांना दोषी ठरवण्यात आलं.

त्याआधी 2002 मध्ये ओडिशा पोलिसांनी सारंगी यांना दंगली, हल्ले आणि सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी बजरंग दलासोबत हिंदूत्ववादी संघटनांनी ओडिशा विधानसभेवर हल्ला केला होता.

या फोटोत भाजप खासदार प्रताप सारंगी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP CHANDRA SARANGI

फोटो कॅप्शन, भाजप खासदार प्रताप सारंगी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बालासोर मतदारसंघातून दोन बड्या नेत्यांना हरवून सारंगी आले. तेव्हाचे बिजू जनता दल पक्षाचे खासदार रविंद्र कुमार जेना आणि कांँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांचा मुलगा नवज्योती ही ती दोन नावं.

पाच वर्षानंतर 2024 मध्ये प्रताप सांरगी यांनी आधीपेक्षा जास्त मतं कमावली. मागच्या निवडणुकीत ते 12,956 मतांनी जिंकले होते, तर यावेळी त्यांनी जवळपास दीड लाख मतं जास्त मिळवली. या निवडणुकीत त्यांनी बीजेडीचे उमेदवार लेखाश्री सामंतसिंघर यांना हरवलं.

संसदेत निवडून येण्याआधी सारंगी यांना दोनवेळा आमदारकी मिळाली होती. दोन्ही वेळा ते नीलगिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण 2004 ला त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं होतं, तर 2009 ला ते स्वतंत्रपणे लढले होते.

उत्तर प्रदेशचे मुकेश राजपूत

55 वर्षांचे मुकेश राजपूत उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत निवडून आलेत. लोध समाजातून येणारे मुकेश 2014 पासून संसदेत निवडून येतायत. पण 2024 च्या निवडणुकीत ते फक्त 2,678 मतांच्या फरकाने जिंकले.

इंडिया युतीचे समाजवादी पक्षाचे नेते नवल किशोर यांनी त्यांना जोरदार आव्हान दिलं.

मुकेश राजपूत यांना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी राजकारणात पुढे आणलं. 2009 मध्ये कल्याण सिंह यांनी भाजप सोडलं, तेव्हा मुकेश यांनीही पक्षाला राजीनामा दिला होता. त्यानंतर कल्याण सिंह यांनी जन क्रांती पार्टीत मुकेश यांना उपाध्यक्ष बनवलं.

या फोटोत फर्रुखाबादचे खासदार मुकेश राजपूत दिसत आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/MUKESH RAJPUT

फोटो कॅप्शन, मुकेश राजपूत फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेत.

2014 मध्ये फर्रुखाबादमध्ये मुकेश यांच्यासमोर काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि समाजवादी पक्षाचे रामेश्वर सिंह यादव यांंचं आव्हान होतं. मुकेश यांनी तेव्हा 41 टक्के मतं मिळवत विजय मिळवला होता. संसदेत येण्याआधी 2000 ते 2012 दरम्यान मुकेश यांनी दोन वेळा फर्रुखाबादमध्ये दोन वेळा जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम केलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकही गुन्हेगारी तक्रार दाखल झालेली नाही आणि त्यांच्याकडे जवळपास 10 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नागालँडमधून राज्यसभेत आलेल्या पहिल्या महिला खासदार

एस. फान्गनॉन कोन्याक नागालँडमधून राज्यसभेत येणाऱ्या पहिल्या महिला खासदार आहेत.

2000 मध्ये त्या निवडून आल्या. भारताच्या संसदेत जाणाऱ्या त्या नागालँडमधल्या दुसऱ्या महिला ठरल्या.

कोन्याक यांनी धक्का बुक्कीच्या प्रकरणात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिलंय.

त्या शांतीपूर्ण विरोध करत असताना अचानक राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस सदस्य त्यांच्या समोर आले असं त्यांनी पत्रात लिहिलंय. त्यांच्यासाठी वेगळा रस्ता ठेवला होता, असंही त्या म्हणतात.

या फोटोत भाजप खासदार एस. फान्गनॉन कोन्याक दिसत आहेत.

फोटो स्रोत, SANSAD TV

फोटो कॅप्शन, जुलै 2023 मध्ये कोन्याक यांची उप-सभापतींच्या पॅनलमध्ये नेमणूक झाली होती.

"त्यांनी मोठ्या आवाजात बोलत माझ्यासोबत गैरव्यवहार केला आणि माझ्या इतके जवळ आले की, एक महिला म्हणून मला फार अस्वस्थ वाटलं. जड अंतःकरणाने मी एका बाजूला सरकले. पण कोणत्याही खासदाराला यापद्धतीची वागणूक मिळायला नको असं मला वाटलं," असं पत्रात लिहिलंय.

मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्यांना राज्यसभेच्या उपसभापती पॅनलमध्ये जागा मिळाली होती आणि काही दिवसांत त्यांना संसदेच्या वरच्या सभागृहात अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या नागालँडमधल्या त्या पहिल्याच महिला आहेत.

दिल्ली विद्यापीठातून शिकलेल्या कोन्याक नागालँडच्या भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)