You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मालेगाव स्फोट प्रकरणानंतर चर्चेत आलेला 'भगवा दहशतवाद' शब्द कुठून आला?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
31 जुलै 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आल्यावर अगदी पुढच्या तासाभरातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर एका ओळीची पोस्ट केली.
देवेंद्र फडणवीसांनी त्यात असं लिहिलं - "आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा."
मालेगाव स्फोटाच्या निकालाच्या बरोबर एक दिवस अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेतील चर्चेत म्हटलं होतं, "ही 'हिंदू दशतवादा'ची कल्पना कोणी आणली? मी आज जगासमोर गर्वानं सांगतो की, हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही."
त्यांच्या या विधानाची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी (31 जुलै) मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आला आणि त्यानंतर या 'भगवा दहशतवाद' किंवा 'हिंदू दहशतवादा'ची चर्चा पुन्हा सुरू झाली.
मालेगाव प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला होता. तेव्हा केंद्रात काँग्रेसप्रणित 'यूपीए'चं सरकार होतं आणि महाराष्ट्रात 'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी'चं सरकार होतं. गेल्या दीड दशकात या शब्दयोजनेनं भारताच्या राजकारणावरही मोठा परिणाम केला.
हिंदुत्व एक मुख्य अंग असलेलं राजकारण करणाऱ्या भाजपानं सातत्यानं हे आरोप केले आहेत की, काँग्रेस आणि त्यांच्या काही मित्रपक्षांनी स्वत:च्या अनुनयाच्या राजकारणासाठी जाणूनबुजून हा शब्द तयार करुन वापरात आणला.
निवडणुकीच्या प्रचारातही हा आरोप आणि त्यावरचे प्रत्यारोप सातत्यानं केले गेले आणि अजूनही केले जातात.
बऱ्याच काळापासून चालेल्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये 'भगवा दहशतवादा'च्या शब्दप्रयोगानं राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली हे मात्र नाकारता येणार नाही. आजपर्यंत या शब्दाचा उल्लेख केव्हा आणि कसा झाला, आणि त्यावरुन वादंग कसे उठले, हे पाहूया.
'भगवा दहशतवादा'चा उल्लेख केव्हा केव्हा झाला?
80 च्या दशकापासून, म्हणजे जेव्हा रामजन्मभूमी आंदोलनापासून देशात एका नवीन प्रवाहाचं राजकारण सुरु झालं, तेव्हा 'हिंदुत्वाचं' अथवा 'कमंडल'चं राजकारण सुरु झालं असं म्हटलं गेलं. या घडामोडींचा परिणाम असा की भाजपाचा देशभर विस्तारात झाला.
या पुढच्या काळात धार्मिक दंगली, मुंबई बॉम्बस्फोटासारख्या हिंसात्मक घटना घडल्या.
2002 च्या गुजरात दंगलींनंतरही देशभरातलं वातावरण ढवळून निघालं.
याशिवाय विविध घटनांमुळे पुढच्या दशकांत 'दहशतवाद' हे भारताच्या आंतरिक सुरक्षेसमोरचं एक मोठं आव्हान बनलं.
पण तोपर्यंत 'भगवा' दहशतवाद' असा शब्दप्रयोग कधी केला गेला नव्हता. तो चर्चेत येण्यास सुरुवात झाली 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर.
महाराष्ट्र ATS ने हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात याप्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संशयाची सुई काही हिंदुत्ववादी संघटनांकडे वळाली. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह अन्य काहींना अटक झाली.
पहिल्यांदाच कोणा हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना बॉम्बस्फोटासारख्या प्रकरणात अटक झाली होती.
याच काळात पहिल्यांदा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी पहिल्यांदा 'भगवा दशतवाद' असा उल्लेख केला होता.
2010 साली दिल्लीत सगळ्या राज्यांचे पोलीस महासंचालक आणि विविध दलांचे संचालक (DG आणि IG) यांच्या कॉन्फरन्समध्ये बोलतांना त्यांनी या प्रकारच्या दहशतवादबद्दल विधान केलं होतं.
"भारतात तरुण-तरुणींना कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. शिवाय, 'भगव्या दहशतवादा'ची अलिकडेच उघडकीस आलेली घटना आहे, ज्याच्याशी संबंधित त्यापूर्वीच्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे की, आपण नेहमीच सतर्क राहिले पाहिजे. केंद्र आणि राज्य पातळीवर दहशतवादविरोधी आपली क्षमता वाढवत राहिले पाहिजे," असं चिदंबरम म्हणाले होते.
त्यावेळेस याच्या अनेक बातम्याही आल्या होत्या आणि वादही झाला होता. जरी काँग्रेसनं आणि नंतरही 'ते चिदंबरम यांचं व्यक्तिगत मत आहे' असं म्हणून या विधानापासून फारकत घेतली तरीही टीका होतच राहिली.
त्याच वर्षी अजून एक वाद झाला तो म्हणजे 'विकिलिक्स'च्या एका 'केबल'मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे भारतातले तत्कालीन राजदूत टिमोथी रोमर यांना 2009 सालच्या एका भेटीदरम्यान असं म्हटलं होतं की, 'भारताला जास्त धोका हा कट्टरतावादी होत चाललेल्या हिंदुत्ववादी संघटनांचा आहे, ज्या मुस्लिम समुदायासोबत धार्मिक आणि राजकीय संघर्ष घडवून आणतात.'
तेव्हा 'विकिलिक्स'ची जगभरात चर्चा सुरु होती आणि भारतासंबंधीच्या या 'केबल'ची जगातल्या माध्यमांनी दखल घेतली होती.
सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग यांची वक्तव्यं
यानंतर 'भगवा दहशतवाद' वरुन मोठा वाद झाला, जेव्हा चिदंबरम यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री झालेले सुशीलकुमार शिंदे यांनीही हा शब्दप्रयोग केला.
जानेवारी 2013 मध्ये पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबीर राजस्थानच्या जयपूर इथं झालं होतं. तेव्हा तिथं आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण करतांना शिंदेंनी या प्रकारच्या दहशतवादाचा उल्लेख केला होता.
शिंदेंनी अलिकडेच लिहिलेल्या आपल्या 'फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' या आत्मचरित्रातही आपण हा उल्लेख का केला होता, याचा विस्तारानं उहापोह केला आहे.
आपल्याला तेव्हा गृहमंत्रालयात असतांना तपासातून आलेले काही कागदपत्र पाहत असतांना त्यात 'भगवा दहशतवाद' असा उल्लेख आढळल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या वादावर असलेलं प्रकरण त्यांनी विस्तारनं 'द प्रिंट'च्या वेबसाईटवरही प्रकाशित केलं आहे.
"केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेल्या एका गोपनीय कागदपत्रात मला 'भगवा दहशतवाद' हा शब्द सापडला होता. परंतु भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्याचा वैचारिक आधार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचा यात सहभाग असल्याने हा मुद्दा मोठ्या वादात रूपांतरित होण्याची शक्यता होती. म्हणूनच, सार्वजनिकरित्या आरोप करण्यापूर्वी मी प्रथम त्याची सत्यता तपासण्याची काळजी घेतली," असं सुशीलकुमार शिंदे आपल्या पुस्तकात लिहितात.
शिंदेंनी असंही म्हटलं आहे की, त्यांनी विचारपूर्वक 'हिंदू दहशतवाद' असं न म्हणता 'भगवा दहशतवाद' असा उल्लेख केला होता.
"जर कोणी माझ्या त्यावेळच्या मीडिया विधानांचा संदर्भ दिला तर त्यांना लक्षात येईल की मी 'भगवा दहशतवाद' हा शब्द काळजीपूर्वक निवडला होता. मला आठवते की मीडियातल्या कोणीतरी विचारले होते की हा हिंदू दहशतवाद आहे की भगवा दहशतवाद. 'हा भगवा दहशतवाद आहे जो मी म्हटले आहे,' मी उत्तर दिलं."
अर्थात शिंदेंच्या या विधानावरुन तेव्हाही आणि आताही वाद होत असतो. भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार त्याचा संदर्भ देऊन काँग्रेसवर टीका केली जाते.
मालेगाव स्फोटाच्या याच तपासाच्या काळात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही अनेकदा हा शब्दप्रयोग वापरल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो.
दिग्विजय सिंगांनी त्यावेळेस असंही म्हटलं होतं की, मालेगाव स्फोटाचा तपास करणारे अधिकारी हेमंत करकरे यांच्याशी ते 26/11 च्या हल्ल्यात शहीद होण्याच्या काही वेळ अगोदर बोलणं झालं होतं आणि या तपासामुळे त्यांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्याचं ते म्हणाले होते.
दिग्विजय यांची तेव्हाची वक्तव्यं वादग्रस्त ठरली. 2019 सालच्या निवडणुकांमध्ये भोपाळमधून त्यांच्या विरुद्ध भाजपानं मालेगाव स्फोटातल्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्या प्रचारादरम्यानही 'भगवा दहशतवादाची' वक्तव्य चर्चेत आली जेव्हा प्रज्ञा यांनी दिग्विजय सिंग यांनी 'हिंदू दहशतवाद' हा शब्द तयार केल्याचा आरोप केला होता.
परंतु दिग्विजय सिंग म्हणतात, "मी कधीही असे म्हटलेले नाही. मला अशी क्लिप दाखवा, जिथे मी हिंदूंना दहशतवादी म्हटले आहे. मी स्वतः हिंदू आहे. मी स्वतःला दहशतवादी का म्हणू?" असंही दिग्विजय या मुलाखतीत पुढे म्हणतात.
भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनी 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 'हिंदू दहशतवाद' हा शब्द पहिल्यांदा वापरला होता, असा आरोप केला होता.
"शरद पवारांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला आणि त्यावरुन चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांनी तो उचलला," असं फडणवीस यांनी तेव्हा म्हटलं होतं.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अलिबाग इथं झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात पवारांनी या प्रकारच्या दहशतवादावरुन चिंता व्यक्त केली होती. या आरोपांनंतर वादही झाला होता.
मालेगाव स्फोटासारखी अन्य प्रकरणं आणि दहशतवादाची चर्चा
एका बाजूला मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरु असतांना या घटनेच्या आसपासच्या काळात घडलेल्या अन्य बॉम्बस्फोटांसारख्या हिंसात्मक कारवायांमध्येही हिंदुत्ववादी संघटनांशी जोडलेली नावं समोर आली होती.
मालेगाव प्रकरणातल्या आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर, प्रसाद पुरोहित यांचा यातल्या काही घटनांशी संबंध आहे, असं तपास यंत्रणांचं म्हणणं होतं.
विविध राज्यांमध्ये घडलेल्या या प्रकरणांचा नंतर एकत्रिरित्याही राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) तपास केला. पुढील न्यायालयीन प्रक्रियेत यातले काही आरोपी सुटले.
2007 साली भारत पाकिस्तानदरम्यान धावणाऱ्या 'समझोता एक्स्प्रेस'मध्ये स्फोट झाला होता आणि त्यात 68 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात स्वामी असीमानंद याच्यासह अनेकांना अटक केली होती.
2019 मध्ये असीमानंद याच्यासह चारही आरोपींची न्यायालयानं मुक्तता केली. या निर्णयाला पुढे आव्हान न देण्याच्या निर्णयावरही टीका झाली होती.
2007 सालीच अजमेर इथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातही, ज्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता, असीमानंद हा आरोपी होता. या प्रकरणात 2017 मध्ये निकाल आला ज्यात असीमानंद याला निर्दोष सोडण्यात आलं तर सुनील जोशी, भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आलं. सुनील जोशी याची दरम्यानच्या काळात हत्याकरण्यात आली होती.
मे 2007 मध्ये हैदराबाद इथं घडलेल्या मक्का मस्जिद स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला होता. यातही स्वामी असीमानंद यासोबत 11 जण आरोपी होते. 'सीबीआय'नं सुरुवातीचा तपास केल्यानंतर हे प्रकरण NIA कडे देण्यात आलं होतं. पण 2018 मध्ये न्यायलयानं सगळ्यांची पुराव्याअभावी मुक्तता केली. 'सीबीआय'च्या कोठडीत असतांना असीमानंदनं दिलेला कबुलीजबाबही कोर्टानंमान्य केला नाही.
या अशा अनेक घटनांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित व्यक्ती आरोपी होत्या. 2008 मध्ये मालेगावं स्फोटप्रकरणाचा तपास करतांना महाराष्ट्र ATS नं केलेल्या तपासात पहिल्यांदा अशा संघटनांतील आरोपीचा संबंध तपासअधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यानंतर विविध प्रकरणांमध्ये अटका झाल्या होत्या. या तपासांदरम्यानवापरल्या गेलेल्या 'भगवा दहशतवाद' या शब्दप्रयोगावरुन वाद निर्माण झाला.
नावं कोणतीही असो, दहशतीचं काय?
मालेगावचा निकाल आल्यावर पुन्हा एकदा 'भगवा हिंदुत्ववादा'च्या मुद्द्यावर पुन्हा आरोप झाले.
देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलतांना 'काँग्रेसनं भगव्या दहशतवादाचं नरेटिव्ह पसरवल्याबद्दल देशाची माफी मागावी' असं म्हटलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला प्रत्युत्तर देत, "दहशतवादाला कोणताही धर्म, जात, रंग नसतोपण काही पक्ष त्यालाही रंग देतात," असं म्हटलं.
निकाल देतांना न्यायालयानंही गुरुवारी (31 जुलै) म्हटलं होतं की, कोणतीही हिंसात्मक कृती ही धर्माशी जोडता येत नाही. त्यामुळेच ज्या हिंसात्मक कारवाया झाल्या, ज्यात सामान्यांचे जीव गेले, त्या कोणी घडवल्या हा प्रश्न कोणताही शब्द वापरला किंवा न वापरला तरीही राहतोच.
पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर विचारतात, "मग जी लिंचिंगची प्रकरण झाली, ती झालीच नाहीत का? मालेगावच्या स्फोटात जे मारले गेले, ते गेलेच नाहीत का? ते कोणी घडवलं? याची उत्तरं कोण देणार?"
परुळेकर पुढे म्हणतात, "या देशात बहुसंख्याकांची एक दहशत तयार होते आहेत आणि तिच्याखाली अल्पसंख्याक, आदिवासी हे दबून चालले आहेत."
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांच्या मते असे शब्दप्रयोग आणि त्यावरुन उभं राहणारं राजकारण हे भारतात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु असलेल्या दोन वेगवेगळ्या प्रवाहांच्या संघर्षातून तयार होतं.
"अगदी पूर्वीही तुम्ही पाहिलंत तरी असं दिसतं. कॉंग्रेसची युरोप अथवा पाश्चिमात्य उदारमतवादी अंगानं जाणारी अशी भारताची एक कल्पना दिसते. तर संघ अथवा हिंदुत्ववादी पक्ष, संघटना यांची देशी संस्कृती, इतिहास यांच्या अंगानं जाणारी भारताची कल्पना आहे. या दोन प्रवाहांचा संघर्ष कायम होत राहिला आहे. मालेगाव प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासातून जे काही समोर आलं त्यातून कॉंग्रेसला असं वाटलं की एक राजकारण करता येईल. तसंही गुजरात दंगल, मोदींचा उदय यानंतर अशा प्रकारची टीका ते करतच होते. अर्धवट तपासामुळे असे राजकीय खेळ करायला संधी मिळते. मूलत: दोन विचारप्रवाहांच्या संघर्षातूनच 'भगवा दहशतवाद' असे शब्दप्रयोग आणि त्यावरचं राजकारण झालं. पुढे ए के एंटनी यांनी पक्षांतर्गत पराभवाची कारणमीमांसा करतांना असं म्हटलं होतं की कॉंग्रेसला 'भगवा दहशतवाद' म्हणणं महागात पडलं. या सगळ्या राजकारणात होतं हे की तपास व्यवस्थित होत नाही आणि न्याय मिळत नाही. मालेगावचे स्फोट कोणी घडवले, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)