काळ्या मनुका खाल्ल्याने लैंगिक आरोग्य सुधारतं का? काळ्या मनुकांचे काय फायदे?

काळ्या मनुका

फोटो स्रोत, Getty Images

ब्लॅक करंट (काळी मनुका) खाण्याचे बरेच फायदे आहेत. ब्रिटनमध्ये हे फळ मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं.

भारतातही आता ते बाजारात आणि ऑनलाइनही उपलब्ध होतं.

ब्लॅक करंटमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असतं. त्यात अँटिऑक्सिडंटही असतात. यांचा वापर औषधी कारणांसाठीही केला जातो.

या काळ्या मनुकांची पावडर आणि त्याचा अर्क ब्लडप्रेशरपासून मेंदूचं कार्य अधिक सुधारण्यासाठी वापरली जाते.

हे फळ लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे.

बेलफास्टमधील क्वीन्स युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर एडिन कॅसिडी यांनी ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’ असलेल्या पुरुषांसाठी काळ्या मनुका उपयुक्त ठरू शकतात का यावर संशोधन केलं आहे .

ते सांगतात, "इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्या बहुतेक वेळा अपुऱ्या रक्तप्रवाहामुळे उद्भवतात."

“काळ्या मनुकांमध्ये अँथोसायनिन्सह इतरही फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यामुळे धमन्या अधिक लवचिक बनतात आणि रक्तप्रवाळ सुरळीत व्हायला मदत होते.”

त्यांच्या मते, "10 वर्षांमध्ये 25,000 हून अधिक पुरुषांच्या अभ्यासातून असं दिसून आलं की, जे पुरुष आठवड्यातून तीन वेळा किंवा त्याहून अधिक वेळा काळ्या मनुका खातात, त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या तुलनेनं कमी भेडसावते.

टक्केवारीत बोलायचं तर त्यांच्यामध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची शक्यता जवळपास 19 टक्क्यांनी कमी होते.

ब्लॅक करंटचे आरोग्यासाठी काय फायदे?

ब्लॅक करंट ज्यूस

फोटो स्रोत, Getty Images

रक्तप्रवाह सुधारण्याव्यतिरिक्त अँथोसायनिनचे आरोग्यासाठी इतरही फायदे आहेत.

कॅसिडी यांनी म्हटलं की, गेल्या दशकभरात अँथोसायनिनच्या परिणामकारकतेचे अनेक पुरावे समोर आले आहेत. विशेषतः हृदयविकार तसंच पार्किन्सन्ससारख्या आजारात ते प्रकर्षाने दिसून आलं आहे.

मार्क विल्यम्स हे चिचेस्टर विद्यापीठात फिजिऑलॉजीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी काळ्या मनुकांचा आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांवर संशोधन केलं आहे. विशेषतः या मनुकांच्या अर्काच्या फायद्यांवर.

त्यांना स्वतःला ब्लॅक करंट हे फळ खूप आवडतं.

“जर तुम्ही पचनसंस्थेसाठी उपयुक्त फळांचा विचार केला तर बेरीवर्गातील इतर फळांच्या तुलनेत ब्लॅक करंटचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या बेरींमध्ये हे उत्कृष्ट फळ आहे.”

"टोकियोमधील निप्पॉन स्पोर्ट युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासात आम्हाला असं आढळून आलं की, काळ्या मनुका वृद्ध लोकांच्या रक्तवाहिन्यातील काठिण्य कमी करू शकतात.”

हृदयविकार

फोटो स्रोत, Getty Images

विल्यम्स यांनी सांगितलं की, रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य असणं म्हणजे त्या रुंदावू शकत नाही, विस्तारू शकत नाहीत. कालांतराने त्याचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.

त्यांनी केलेल्या एका संयुक्त अभ्यासामध्ये काही वृद्ध लोकांना ब्लॅक करंटचा रस सात दिवसांसाठी देण्यात आला. सातव्या दिवशी जेव्हा तपासणी केली, तेव्हा त्यांच्या रक्तवाहिन्यांमधील काठिण्य कमी झालं होतं.

गिर्यारोहक, अथलीट यांच्यावर केलेल्या संशोधनातूनही काही सकारात्मक परिणाम समोर आले.

व्यायामानंतर स्नायूंची झालेली झीज भरून काढण्यामध्ये काळ्या मनुकांच्या पावडरचा उपयोग होऊ शकतो. ज्या लोकांची फार शारीरिक हालचाल होत नाही, त्यांच्यासाठीही काळ्या मनुका उपयोगी ठरतात.

काळ्या मनुकांमुळे घामाची दुर्गंधी कमी होते?

एका छोट्या गटावर केलेल्य अभ्यासातून असं आढळून आलं आहे की, काळ्या मनुका खाल्ल्याने घामाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

विल्यम्स यांनी सांगितलं की, "45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या त्वचेतून एक विशिष्ट प्रकारचा वायू निघतो. त्याला अनेकदा दुर्गंधी म्हटलं जातं."

जसंजसं शरीराचे वय वाढत जाते तसतसे ऑक्सिडेटिव्ह तणाव अधिक वायू तयार करतो आणि तो त्वचेवाटे बाहेर पडतो.

55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 14 लोकांचा समावेश असलेल्या एका गटाचा जेव्हा अभ्यास केला, तेव्हा असं दिसून आलं की, काळ्या मनुकांची पावडर सात दिवस खाल्ल्याने पोट फुगण्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी होतं.

मार्क विल्यम्स यांनी म्हटलं की, "इतर प्रकारच्या बेरी खाल्ल्याने हा फायदा होऊ शकतो का हे पाहण्यात मला खूप रस आहे."

त्यांनी पुढे म्हटलं की, "काळ्या मनुकांमधल्या अँटिऑक्सिडंटचा हा परिणाम असू शकतो.”

हा सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय नाही

हृदय

फोटो स्रोत, Getty Images

मार्क विल्यम्स यांनी सांगितलं की, ब्लॅक करंट हे तुलनेनं खूप महाग असतात. त्यामुळे सगळ्यांनाच ते परवडतील असं नाही.

शिवाय सर्वच आरोग्यविषयक समस्यांवर हा रामबाण उपाय नाही.

ब्लॅक करंटच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत जे दावे केले जातात, त्यांची पडताळणी काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे, असंही विल्यम्स सांगतात.

“सर्व समस्यांचं निराकारण करणारी ती जादूची गोळी नाहीये.”

काळ्या मनुकांच्या उपयुक्ततेवर अजूनही संशोधन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)