'देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच बंडखोरी, 2 वर्षांत 150 बैठका'- तानाजी सावंत #पाचमोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस तानाजी सावंत

फोटो स्रोत, facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -

1. देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच बंडखोरी, 2 वर्षांत 150 बैठका – डॉ. तानाजी सावंत

"महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: मिळून 150 बैठका घेतल्या, आणि आमदारांचं मन वळवलं.

"जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी ‘मातोश्री’वर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो," असं विधान आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.

धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तानाजी सावंत हा दावा केला आहे.

“30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 3 जानेवारी 2020 च्या आसपास सुजितसिंह ठाकूर, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. त्यावेळी बंडाचं निशाण फडकवणारा पहिला व्यक्ती मी होतो,” असं तानाजी सावंतांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. आम्ही कुणाच्याही सांगण्यावरून काम करत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

"निवडणूक आयोग कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेत नाही," असं स्पष्टीकरण मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलं आहे.

आसाममधील जिल्ह्यांच्या पुनर्व्याख्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

मतदान यंत्र

फोटो स्रोत, AFP

काँग्रेसने एका महत्त्वाच्या बैठकीत आसाम परिसीमन प्रक्रिया ही पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला होता.

तसेच याबाबतीत निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला होता.

काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले, “एक आयोग म्हणून आमची प्रक्रिया दोन तत्वांवर अवलंबून असते. ती म्हणजे, प्रकटीकरण आणि सहभाग."

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांशी सल्लामसलत करण्याची इच्छा असल्याचे सांगितलं. ही बातमी सकाळने दिली.

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाची डी. लिट पदवी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देत सन्मानित करण्यात आलं आहे.

मंगळवारी (28 मार्च ) डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्यी दीक्षांत समारोहात त्यांना डी. लीट ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, facebook

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं तर, मी यापूर्वीच डॉक्टर झालो आहे. छोटी-मोठी ऑपरेशन करत असतो. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे. पण, विनम्रता माझ्यासाठी महत्वाची आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

“कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्याबद्दल मनात जिद्द आणि खंतही होती. तीन वर्षापूर्वी बीएची पदवी घेतली. अजूनही पुढं शिकायचं आहे,”असंही शिंदे यांनी म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

4. काँग्रेसने 75 वर्षांत लुटलं नाही तेवढं भाजपने 7 वर्षांत लुटलं – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जनता जीएसटी भरते आणि ते पैसे पंतप्रधान मोदींजवळ जातात.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसने 75 वर्षात जेवढं लुटलं नाही, तेवढं यांनी ( भाजपा ) 7 वर्षात लुटलं. डोकं अदाणींचं आणि पैसा पंतप्रधान मोदींचा असतो, असा हल्लाबोल केजरीवाल यांनी विधानसभेत बोलताना केला आहे.

“जेव्हा अदाणी जगातील सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती बनले. तेव्हा, पंतप्रधान मोदी जगातील सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती बनले होते. आता ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू इच्छित आहेत. तसेच, अदाणी समूहात सर्व पैसा पंतप्रधान मोदी यांचा आहे,” असा आरोप केजरीवाल यांनी केला. ही बातमी दैनिक भास्करने दिली.

5. मला तुरुंगात डांबण्यासाठी जाळं टाकलं, पण ते अयशस्वी – नरेंद्र मोदी

“मला तुरुंगात डांबण्यासाठी जाळं टाकण्यात आलं होतं. पण त्यामध्ये विरोधक यशस्वी होऊ शकले नाहीत,” असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

मंगळवारी (28 मार्च) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, “भ्रष्टाचाराने आपल्या देशाचं खूप नुकसान केलं आहे. भ्रष्टाचाराने देशाला खूप सतावलं आहे. देशाची जनता पाहत आहे की, आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाईच्या नावाने फक्त खानापुरी केली. हे तर ते लोकं ज्यांनी मलाही जेलमध्ये टाकण्यासाठी काय-काय जाळं नाही टाकलं. पण ते त्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“काँग्रेस सत्तेत असताना काही लोक बँकेला लुटून पळाले. नी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जनतेला आवाहन करताना परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर आम्ही निवडून आलो. भाजप सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई करत गेल्या नऊ वर्षात 1 लाख 10 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, असं मोदी यांनी सांगितलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)