'कसाबच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता, उलट विजयी भाव होते, ते आजही क्लेश देतात'

मुंबई हल्ला, दहशतवादी, कामा हॉस्पिटल
फोटो कॅप्शन, अंजली कुलथे मुंबई हल्ल्यावेळी कामा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या.

26 नोव्हेंबर 2008चा दिवस मुंबईकरांसाठी भीषण दुर्देवी ठरला. संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता तर तीनशेहून अधिकजण जखमी झाले होते. आजही या हल्ल्याचे सल मुंबईकरांच्या मनातून गेलेला नाही.

या हल्ल्यादरम्यान अनेकांचे जीव वाचवणाऱ्या धाडसी आणि जिगरबाज नर्स अंजली कुलथे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपला अनुभव कथन केला. या हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी म्हणजे अजमल कसाब. ज्यावेळी कसाबला तुरुंगात पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता.

अंजली कुलथे यांनी गुरुवारी व्हीडिओ लिंकच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघटनेला संबोधित केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादविरोधी दृष्टिकोण: आव्हानं आणि पुढचा मार्ग या विषयावर उहापोह झाला.

मुंबई हल्ला, दहशतवादी, कामा हॉस्पिटल
फोटो कॅप्शन, अंजली कुलथे

कुलथे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत 26/11 हल्ल्यादरम्यानचे अनुभव सांगितले. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा अंजली कुलथे कामा अँड एल्बलेस हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रन मध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या.

'मला एका गोष्टीचं समाधान आहे की त्या रात्री मी 20 गरोदर महिला आणि त्यांच्या पोटात असलेल्या बाळांचा मी जीव वाचवू शकले. पण त्या रात्री मृत्यूचं तांडव आणि भीती आजही मनातून गेलेली नाही. त्या रात्री मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मिळून जीवाची बाजी लावून अनेक गरोदर बायकांचा जीव वाचवला हेच त्यातलं त्यात समाधान'

'हल्ल्याच्या महिनाभरानंतर एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवण्यासाठी मला बोलावलं होतं. न्यायालयात साक्ष देण्याबाबत माझ्या घरच्यांना भीती वाटत होती. पण मी साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला'. त्या पुढे म्हणाल्या, 'तुरुंगात मी कसाबला ओळखलं. त्याने मला हसत हसत सांगितलं की मॅडम तुम्ही माझी खरी ओळख पटवली आहे. मी अजमल कसाबच आहे. कसाबला कोणताही पश्चाताप नव्हता. त्याला केलेल्या कृत्याबद्दल शरम वाटत नव्हती. त्याच्या मनात जराही अपराधीपणाची भावना नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर विजयी झाल्याचा भाव होता. तो चेहरा आणि त्याच्यावरचे विजयी भाव मला आजही क्लेश देतात'.

'जगातल्या कुठल्याही दहशतवादी हल्ल्याची बातमी मी वाचते किंवा पाहते तेव्हा मला पीडितांचे कुटुंबीय, लहान मुलं, आईवडील यांच्याबद्दल वाईट वाटतं. ते अख्खं आयुष्य या हल्ल्याच्या कटू आठवणी विसरू शकत नाही'

मुंबई हल्ला, दहशतवादी, कामा हॉस्पिटल

फोटो स्रोत, file footage

फोटो कॅप्शन, अजमल कसाब

मुंबई हल्ल्यातील पीडित अजूनही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण हा हल्ला घडवून आणणारे आजही मोकाट आहेत. अनेकांनी जीव गमावला, अनेकांनी पालक गमावले, बहीणभाऊ गमावले. असंख्य लोक आजही त्या हल्ल्याच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

या परिषदेच्या माध्यमातून मी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करते की 26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून पीडितांसाठी हा अध्याय संपेल.

अंजली यांनी कसाबसह हल्लेखोरांना रुग्णालयात शिरताना पाहिलं. त्यांनी सुरक्षारक्षकांची हत्या केली तेही पाहिलं. 26/11 रोजी हल्लेखोरांनी मुंबईला लक्ष्य करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, नरिमन हाऊस, कामा रुग्णालय, लिओपोल्ड कॅफे, द ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, ताज हॉटेल आणि टॉवरवर हल्ला केला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी अंजली यांचे आभारी मानले आहेत.

जयशंकर म्हणाले, अंजली कुलथे यांची साक्ष या गोष्टीची आठवण करुन देते की 26/11 हल्ल्यासह असंख्य दहशतवादी घटनातील पीडितांना न्याय मिळणे बाकी आहे.

अंजली कुलथे यांनी अजमल कसाबला ओळखलं होतं आणि त्याच्याविरुद्ध साक्षही दिली होती. 21 नोव्हेंबर 2012रोजी कसाबला फाशी देण्यात आली. पुण्यातल्या येरवडा तुरुंगात कसाबचं दफन करण्यात आलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त