मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट

बऱ्याच काळापासून हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

याआधी रविवारी (9 फेब्रुवारी) संध्याकाळी भाजपचे एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.

बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशी चर्चा होती. मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून वांशिक हिंसाचार सुरू आहे, गेल्या काही दिवसांपासून तिथे शांतता असली तरी हिंसेचं सावट कायम आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर राज्यातील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप लावले गेले आहेत.

यापूर्वी, मणिपूरमधील 19 भाजप आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली होती. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोक्चोम सत्यब्रत सिंह, मंत्री थोंगम विश्वजित सिंह आणि युमनम खेमचंद सिंह यांचा समावेश होता.

9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत बिरेन सिंह यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती केली होती.

मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयातील बिरेन सिंह यांचे वैयक्तिक सहाय्यक दीपक शिजागुरुमायुम यांनी बीबीसीशी बोलताना राजीनाम्याच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला होता. दीपाक शिजागुरुमायुम म्हणाले, "मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे."

दरम्यान, एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावर मणिपूर विधानसभेचं नियोजित अधिवेशन स्थगित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात काँग्रेस पक्ष भाजप सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता.

त्यापूर्वी बिरेन सिंह यांनी राजभवनात जाऊन राजीनामा सादर केल्याचं म्हटलं आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही याबाबतची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

एएनआयने पोस्ट केलेल्या छायाचित्रात एन. बिरेन सिंह यांच्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा आणि इतर भाजप नेते दिसत आहेत.

एन. बिरेन सिंह 2017 पासून मणिपूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अनेकदा विरोधकांनी बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

त्यांच्यावर हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयश आल्याचा आरोप होत आला आहे.

मणिपूरमधल्या कुकी आणि मैतेई या दोन समाजांमध्ये 3 मे 2023 ला संघर्ष सुरू झाला.

पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सादर केला.

सिंह यांच्यासोबत भाजप आणि एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंटचे) इतर 14 आमदारही राजभवनात उपस्थित होते.

या शिष्टमंडळात भाजपचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष ए. शारदा आणि पक्षाचे खासदार संबित पात्रा हे देखील उपस्थित होते.

बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित

2017 मध्ये एन. बिरेन सिंह पहिल्यांदाच मणिपूरचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये भाजप सरकारचा हा सलग दुसरा कार्यकाळ आहे.

असं असलं तरी, गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्य मे 2023 पासून हिंसाचाराने होरपळून निघत आहे.

कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमधील हिंसाचारामुळे येथे शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. तेव्हापासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. तसेच बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बिरेन सिंग राजीनामा देतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बिरेन सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता.

या काळात बिरेन सिंग यांच्या नावाने लिहिलेल्या कथित राजीनामा पत्राचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

यानंतर लगेचच त्यांनी ट्विटरवर म्हटलं होतं की, या महत्त्वाच्या टप्प्यावर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो.

कोण आहेत एन बिरेन सिंह?

एकेकाळी मणिपूरमधील फुटबॉल खेळाडू म्हणून राष्ट्रीय ख्याती मिळवणारे नोंगथोम्बम बिरेन सिंह हे 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्यमंत्री बनले.

60 जागांच्या मणिपूर विधानसभेत, 2017 मध्ये भाजपला फक्त 21 जागा मिळाल्या होत्या, परंतु 28 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मागे टाकत बिरेन सिंह यांनी राज्यात सरकार स्थापन केलं.

मणिपूरमध्ये 1963 नंतर 12 मुख्यमंत्री झाले, त्यापैकी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या ओकराम इबोबी सिंह यांचा कार्यकाळ सलग 12 वर्षांचा होता.

हे तेच ओकराम इबोबी सिंह आहेत, ज्यांच्याकडून बिरेन सिंह यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांचे नेते ओकराम इबोबी सिंह यांच्याविरुद्ध आणि पक्षाविरुद्ध बंड केलं.

बिरेन सिंह यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, पत्रकारिता आणि फुटबॉलमध्ये ज्या त्वेषाने ते वावरले, त्याच जिद्दीमुळं त्यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचता आलं.

मैतेई समुदायातून येणारे बिरेन सिंह यांनी मणिपूर विद्यापीठातून बीएची पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारितेत डिप्लोमा देखील केला आहे.

1 जानेवारी 1961 रोजी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील लुवांगसांगबम मामांग लीकाई गावात जन्मलेले बिरेन सिंह हे मणिपूरमधील एकमेव प्रख्यात फुटबॉलपटू होते जे राजकारणात येण्यापूर्वी देशाबाहेर खेळले होते.

लेफ्ट बॅक पोझिशनवरून खेळणाऱ्या बिरेन सिंह यांनी फुटबॉलच्या मैदानात उत्तम बचावात्मक खेळ दाखवला. याच कारणामुळे ते 1981 मध्ये ड्युरंड कप जिंकणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या संघात होते.

नंतर त्यांनी नाहोरोल्गी थुआडांग नावाच्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या वेळी सरकार आणि कट्टरतावादी संघटनांच्या दबावात मणिपूरमधील तरुणांच्या भूमिकेवर पत्रकार म्हणून काम करणं सोपं नव्हतं. बिरेन सिंह हे तत्कालीन मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांचे सर्वात जवळचे मित्र मानले जात होते.

2002 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर इबोबी सिंग यांना स्थिर सरकार चालवण्याच्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं.

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत कसे पोहोचले?

1972 मध्ये मणिपूरला राज्याचा दर्जा मिळाल्यापासून राजकीय अस्थिरतेमुळं 18 वेळा येथील सरकारं बदलली आहेत.

अशा परिस्थितीत ओकराम इबोबी सिंह यांना अशा एका सहकाऱ्याची गरज होती जो त्यांच्या आघाडी सरकारचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल. 2003 साली बिरेन सिंह यांच्या रूपानं त्यांचा शोध पूर्ण झाला.

इबोबी यांनी बिरेन सिंह यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतलं आणि त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं. अशाप्रकारे, ते इबोबी सरकारमध्ये पहिल्यांदाच दक्षता विभागात राज्यमंत्री झाले.

बीरेन सिंह यांनी 2002 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मणिपूरच्या लोकांमध्ये ते एक फुटबॉल खेळाडू आणि नंतर पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना राजकारणात झाला. त्यांनी डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशनरी पीपल्स पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात हिंगांग विधानसभेत विजय मिळवला.

पण इबोबी यांनी बिरेन यांच्या तिसऱ्या कार्यकाळात स्वतःला त्यांच्यापासून दूर केले होते. बिरेन सिंह हे काँग्रेसमध्ये असे नेते म्हणून पाहिले जाऊ लागले जे कधीही इबोबी यांच्याकडून सत्ता हिसकावून घेऊ शकतील.

त्यावेळी, इबोबी यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारे ते काँग्रेसमधील एकमेव नेते होते.

नंतर, जेव्हा दोघांमधील मतभेद वाढू लागले, तेव्हा पक्षाने त्यांना शांत करण्यासाठी बिरेन सिंह यांना मणिपूर काँग्रेसचे उपाध्यक्ष बनवले.

मात्र, इबोबी सिंह यांच्यासोबतचा त्यांचा संघर्ष कमी झाला नाही. 2012 मध्ये जेव्हा इबोबी सिंह यांनी तिसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन केले, तेव्हा बिरेन सिंह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.

2016 मध्ये आसाम आणि नंतर अरुणाचल प्रदेशात सरकार स्थापन केल्यानंतर, भाजपची नजर मणिपूरवर होती. भाजप मणिपूरमध्ये इबोबी सिंह यांना हरवू शकेल अशा नेत्याच्या शोधात होता.

भाजपच्या दृष्टीने मणिपूरमधील बिरेन सिंह हे एकमेव नेते होते ज्यांना इबोबी यांच्या राजकीय हालचाली चांगल्या प्रकारे माहित होत्या.

ऑक्टोबर 2016 मध्ये भाजपनं बिरेन सिंह यांना पक्षात घेण्यात यश मिळवलं. नंतर 2017 मध्ये ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)