'सिंहाला मिठी मारण्याचं स्वप्न', कुंपण ओलांडून आत उडी मारणाऱ्या तरुणाबरोबर काय घडलं?

    • Author, बीबीसी न्यूज, ब्राझील

(बातमीत विचलित करणारा मजकूर आहे)

ब्राझीलमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केलेल्या गर्सन डी मेलो मशाडो नावाच्या 19 वर्षीय तरुणाचा सिंहीणीनं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

ही घटना ब्राझीलच्या जोआओ पेसोआ शहरात असलेल्या अरुडा कामारा नॅशनल पार्कमध्ये घडली.

याठिकाणी असलेल्या काही पर्यटकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओमध्ये हा तरुण झाडावर चढून कुंपणाच्या पलिकडे असलेल्या सिंहांच्या भागात उडी मारताना दिसून आला.

त्यानं उडी मारल्यानंतर आत काही अंतरावर असलेल्या सिंहिणीनं त्याला पाहिलं. तरुण झाडावरून उतरला आणि त्यानंतर तरुण आणि सिंहिण एकमेकांकडे पाहत उभे होते.

पण काही वेळानंतर तो तरुण स्वतः सिंहिणीजवळ गेला. त्याचवेळी तिनं त्याच्यावर हल्ला केला.

गर्सन हा मानसिक समस्यांनी त्रस्त होता अशी माहितीही आता समोर आली आहे. मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यावेळी त्याचे कुटुंबीय आणि इतर काही जवळचे लोक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये व्हेरोनिका अ‍ॅलिव्हेरा याही होत्या. त्या जवळपास 9 वर्षांपासून गर्सनला सांभाळत होत्या.

गर्सनचा मृत्यू हा प्रशासन, समाज आणि मानसिक रुग्णांसाठी काम करणारी यंत्रणा या सर्वांच्या अपयशामुळं झाल्याचं मत व्हेरोनिका यांनी मांडलं.

गर्सनला चांगले उपचार मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रयत्न केले. पण अधिकाऱ्यांनी प्रत्येकवेळी त्याच्या वर्तनाचं कारण दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, "तो जोआओ पेसोआमधील सगळ्या केंद्रांमध्ये जाऊन आला होता. आम्ही सातत्यानं त्याचे अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करत होतो.

पण ज्युलियानो मोरेरामधील मानसोपचार तज्ज्ञांनी त्याला काहीच गंभीर आजार नसल्याचं म्हटलं होतं. त्याची समस्या त्याच्या वर्तनाशी संबंधित असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं आम्हाला नेमकं काहीही मिळालं नाही."

तरुणावर झालेले उपचार

बीबीसी ब्राझीलनं मानसोपचारतज्ज्ञांचा 2023 चा एक अहवाल पाहिला. त्यात चुकीचं वर्तन, लहरी स्वभाव (मूड स्विंग), तापटपणा अशा समस्यांचा उल्लेख करत विविध प्रकारच्या उपचारांची शिफारस करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गर्सननं लहानपणी आणि किशोरवयात असताना मानसिक आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांची भेट घेतली होती. तसंच काही समुपदेशन सत्रांतही तो उपस्थित राहिला होता. त्याला सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जात होतं."

'कमिन्हार सायकोलॉजिकल सेंटर' या केंद्राच्या संचालिका जनैना डी एमेरी यांनी गर्सनवर म्हणाल्या की, त्याची बालपणापासून काळजी घेतली जात होती. तो 2024 मध्ये या केंद्रात आला, पण उपचार घेण्यात त्याला अडचणी येत होत्या. तो काहीवेळा आला पण नंतर आलाच नाही, असं त्या म्हणाल्या.

गर्सनच्या मृत्यूनंतर परायबा कायदा कार्यालयानं चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी पार्कमधील संरक्षणाशी संबंधित उपाययोजना, प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक मूल्यमापन याचा अहवाल सादर केला जाईल.

तसंच उद्यान प्रशासनाला सिंहाच्या स्थितीसह त्याठिकाणी नेमकं काय करण्यात आलं, याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागेल.

सिंहाला मिठी मारण्याचे स्वप्न

अ‍ॅलिव्हेरा यांच्या मते, गर्सनचं सिंहाला मिठी मारण्याचं स्वप्नं होतं. तो लहानपणापासूनच तसं म्हणायचा.

दोन वर्षांपूर्वी आफ्रिकेत सफारीला जाण्यासाठी त्यानं एका विमानाच्या लँडिंग गिअरवर (विमानाच्या चाकाजवळील भाग) चढण्याचा प्रयत्नही केला होता, असंही त्यांनी सांगितलं.

सिंहाच्या एवढं जवळ जाण्यात किती धोका आहे, याची त्याला जाणीवच नव्हती, असं त्या म्हणाल्या.

"तुम्ही व्हीडिओ नीट पाहिला, तर तो स्वतः सिंहाच्या जवळ जाताना दिसतो. यात काहीच घाबरण्यासारखं किंवा अडचणीचं नाही असं त्याला वाटलं. तो सिंहाबरोबर खेळण्यासाठीच खाली उतरला होता," असं त्या म्हणाल्या.

गर्सनची आई आणि आजी दोघींनाही मानसिक आजार होता. मानसिक आजार असल्यामुळे गर्सनच्या आईने पाचही मुलांचा ताबा गमावला होता. त्यातली चार मुलं दत्तक गेली. पण, गर्सन सरकारी संगोपन केंद्रांमध्ये लहानाचा मोठा झाला.

त्याच्याशी बोललो की, तो म्हणायचा त्याला इथं राहायला आवडत नाही. आईसोबत राहणं चांगलं असतं असं त्याला वाटायचं. त्याचं आईवर खूप प्रेम होतं, पण आई त्याला सांभाळू शकत नव्हती. असं अ‍ॅलिव्हेरा सांगतात.

गुन्हेगारीशी संबंध

गर्सनला प्राणी खूप आवडायचे असंही अ‍ॅलिव्हेरा यांनी सांगितलं.

"तो घोडे चोरून त्यावर लहानशी रपेट मारायचा आणि परत आणून सोडायचा."

हळूहळू तो लहान-सहान चोऱ्या करू लागला. पण ते कुणाला त्रास देण्यासाठी नव्हतं. तो गाड्या चोरू लागला. पण तो स्वतः त्या पोलीस ठाण्यात जमा करायचा.

त्याच्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत होती. लोक त्याच्याबद्दल पोस्ट करून लाईक्स मिळवत होते.

काही जण चुकीच्या गोष्टींसाठी त्याला प्रोत्साहनही द्यायचे. लोक त्याच्या फोटोंचा गैरवापर करायचे म्हणून आम्ही अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्याची माहिती काढून टाकण्याचा प्रयत्नही केला.

वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला मदतीसाठी मिळालेलं कायदेशीर संरक्षण त्यानं गमावलं.

तुरुंगात किमान जेवण आणि सुरक्षितता मिळेल म्हणून तो तुरुंगात जाण्याच्या प्रयत्नात होता, असंही ऑलिव्हेरा म्हणाल्या. त्यामुळं काही कृत्यांमुलं तो सहा वेळा तुरुंगात गेला पण चौकशीनंतर त्याची सुटका व्हायची.

तो 25 नोव्हेंबरला त्याची कागदपत्रं आणि कामाचा परवाना मिळवण्यासाठी गेला होता, पण त्याला मदत मिळाली नाही.

त्याच्या अंत्यसंस्काराच्या पाद्री म्हणाले की, "सिंहाच्या पिंजऱ्यात तो तो स्वतः गेलेला असला तरी खरं म्हणजे समाजानं त्याला या दरीत ढकललं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)