You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चिलखती बुरुज, अभेद्य तटबंदी, भवानी गुफा ते मदार मोर्चा; अशी आहे रायगड किल्ल्याची लष्करी वास्तूरचना
- Author, आर्किटेक्ट वरुण सर्जेराव भामरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
(लेखक हे वास्तुरचनाकार आणि रायगड विकास प्राधिकरणात वास्तुसंवर्धक आहेत.)
"राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा."
सभासद बखरात शिवाजी महाराजांच्या या पहिल्या रायगड भेटीच्या वर्णनातून रायगड किल्ल्याची भौगोलिक रचना, त्याची उंची, अभेद्यता आणि राजधानीसाठीची उपयुक्तता स्पष्ट होते.
गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूल, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे मूल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे प्राण संरक्षण - आज्ञापत्रातील या उल्लेखावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील दुर्गांचे अनन्य साधारण महत्त्व अधोरेखित होते.
स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून शिव छत्रपतींनी दुर्गराज रायगड किल्ल्याची निवड करण्यामागे मुख्य कारण होते ते म्हणजे रायगडाचा लष्करी भूगोल. किल्ले रायगडाचे लष्करी वास्तुशास्त्र समजून घ्यायचे म्हटल्यास अनेक अंगानी आपणास अभ्यासता येईल.
नुकताच रायगडावर 'यंत्रराज' सौम्ययंत्र सापडले. हे यंत्र सापडल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की रायगडाची रचना ही शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याचा मोठा पुरावा हाती आला आहे. त्या निमित्ताने आपण रागयडाची वास्तुरचना कशी होती हे समजून घेऊ.
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग
रायगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून जवळपास 4,400 फुट उंच व वरील पठार हे 1,200 एकर आहे व घेऱ्याचा विचार केल्यास यात प्रामुख्याने सह्याद्रीच्या पर्वत रांगा ह्या गडाला लाभलेली नैसर्गिक तटबंदी होय.
तसेच या घेऱ्यात असलेली काळ नदी ही रायगडासाठी नैसर्गिक खंदकाचे काम करत, घेऱ्यातील राने, अरण्ये व त्यात असलेली गस्तीच्या व्यवस्था तसेच गडावर येणारे मार्ग सोपे नसावे हे लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जात.
गडाच्या सभोवती असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा व किल्ल्यांची शृंखला ही रायगडाची नैसर्गिक मुख्य तटबंदी.
तटबंदी व बालेकिल्ल्याची तटबंदी. बाकी दिशाचे गडाचे कडे हे उभे व तासल्याप्रमाणे असल्याने तेथे तटबंदीची व्यवस्था दिसून येत नाही.
रायगड तटबंदीची रचना समजून घेतल्यास असे लक्षात येते की गडाची महा दरवाजा अभेद्य तटबंदी ही तीव्र उतारावर जवळपास 2,900 फुट लांब व 11 फुट रुंद अशी नैसर्गिक कातळात इंटर लॉक पद्धतीने, पावसाच्या पाण्याचे विनियोग होण्यासाठीचे जागोजागी आउटलेट सह ह्या भिंतीची रचना करण्यात आल्याचे निदर्शनास येते.
या तटबंदीचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे सर्पाकर, गोमुखी रचना असलेला दोन अभेद्य बुरुजंच्या आत दडलेला महा दरवाजा तसेच या तटबंदीत चऱ्या, जंग्या, तोफाच्या जागा, चोर दरवाजा इ. रचनाबद्ध केल्याचे दिसते.
तसेच रायगडाच्या लष्करी सुरक्षेची जबाबदारी मुख्यत्वे बुरुजाची, यात प्रामुख्याने खुबलढा बुरुज, नाणे दरवाजा बुरुज, महादरवाजा तटबंदी बुरुज, चिलखती बुरुज, हिरकणी बुरुज, वाघ दरवाजा बुरुज यावर असत.
रायगडावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारकाईने नियोजन केल्याचे दिसून येते, बालेकिल्ल्यातील पावसाचे पाणी काही कोरलेल्या मार्गानी कुशावर्त तलावात आणल्याचे निदर्शनास येते.
गडावर एकूण 84 पाणवठे असल्याचे दिसून येते यात काही मुख्य तलाव जसे गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कुशावर्त तलाव, कोळिम तलाव, श्रिगोंदे तलाव, काळा हौद इ. आहेत.
तर काही कातळात कोरलेल्या लहान मोठ्या टाक्या जसे बारा टाके समूह, जेथे जेथे वस्ती व लष्कर शिबंदी वावर तेथे असे पाण्याचे नियोजन केल्याचे आढळून येते.
राजधानीच्या गडावर पाण्याची मुबलक सोय करण्यास शिवछत्रपतींनी महत्त्व दिल्याचे दिसून येते. रायगडावर होणारा पाऊस मोजण्या करिता पर्जन्यमापक ही वास्तूची सुद्धा रचना केल्याचे दिसून येते.
गडावरील बालेकिल्लाची रचना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास असे लक्षात येते की बालेकिल्ला हा गडावरील सर्वात उंच अशा खडकावर रचनाबद्ध केल्याचे दिसते, होळीच्या माळा वर आल्याच्या नंतरही बालेकिल्ला सहजा सहजी आपणास दृष्टिक्षेपास पडत नाही हे त्यातील लष्करी वास्तुशास्त्र दर्शवते.
बालेकिल्ल्यात प्रामुख्याने नगारखना, राजसदर, प्रशासकीय मुख्यालय, कचेऱ्या, राजगृह, राणीवसा, अष्टप्रधान वाडे, दासीवसा, मनोरे, कोठार, शौचकुप, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा चौफेर अभेद्य तटबंदी इ. घटकांनी नियोजित केल्याचे दिसून येते.
रायगडावर मंदिरांची उभारणी ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केल्याचे लक्षात येते त्यात प्रामुख्याने जगदीश्वर मंदिर, वाडेश्वर मंदीर, शिरकाई मंदीर, भवानी गुफा ही प्रार्थनास्थळे गडावर निरनिराळ्या ठिकाणी रचनाबद्ध केल्याचे दिसून येते तसेच जगदीश्वर मंदीर, हिरकणी बुरुजवार व हनुमान टाके या ठिकाणी श्री. हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घडते.
रायगडच्या मुख्य पठाराच्या सभोवती आपणास घोड्याच्या पागा, लष्करी छावण्या, सैनिकांची निवासस्थाने, दारुगोळा कोठारे इ घटक नियोजीत केल्याचे दिसून येते. यावर सर्व गडाच्या संरक्षणाची मदार असत.
लष्करी वास्तुशास्त्राचा विचार केल्यास एक मुख्य बाब लक्षात येते ती म्हणजे रायगडाच्या पश्चिमेस असलेल्या वास्तूतील नजरेच्या टप्प्यात असणे व संदेश आदान प्रदान करण्यासाठीचा वापर (Visual Linkages) यात असलेले खुबलढा बुरुज, नाणे दरवाजा, हिरकणी बुरुज, मदार मोर्चा, टकमक टोक या वास्तूत असलेल्या एक परस्पर संबंध (linkages) तसेच पाचाड येथील जिजाऊ मासाहेबांचा वाडा हा रायगडावरुन पश्चिम भागातून ठळकपणे दृष्टक्षेपात येत असल्यामुळे कोणताही महत्त्वाचा संदेश वेगवेगळ्या संकेतांमार्फत पायथ्यापासून कमीत कमी वेळात गडावर पाठवण्यासाठी सोयीस्कर होत.
वरील सर्व अंगाचा अभ्यास करता असे कळते की, स्वराज्याची अभेद्य राजधानी दुर्गराज रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गकेंद्रीत राज्यपद्धतीत व लष्करी वास्तुशास्त्राचा अद्वितीय असा नमुना आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)