You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थंडीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी?
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हृदयविकार भारतात झपाट्याने वाढत आहे. तुम्हाला माहीत आहे का की, भारतात हृदयविकार हे मृत्यूचं एक मोठं कारण ठरतंय.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीच्या अहवालानुसार, भारतात होणाऱ्या दर 4 मृत्यूंपैकी 1 मृत्यू हा हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतो.
हृदयविकारांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 80 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे होतात.
मात्र, हृदयाच्या बाबतीत एक सर्वसाधारण समज आहे की, कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य असेल, तर सगळं काही ठिक आहे.
पण खरंच, केवळ कोलेस्ट्रॉल नॉर्मल असल्यामुळे आपलं हृदय पूर्णपणे निरोगी आहे, असं मानता येईल का?
या लेखात कोलेस्ट्रॉलशिवाय असे कोणते संकेत आणि घटक आहेत, जे हार्ट अटॅकचा इशारा आधीच देऊ शकतात, तसेच हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी, याचा आढावा घेतला आहे.
हिवाळ्यातील धोका
हिवाळ्यात तापमान घसरत असताना हृदयावर येणारा ताण दुर्लक्षित करता येत नाही. या काळात हृदयाशी संबंधित धोके कसे वाढतात हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या प्रमुख जर्नल JACC मध्ये 2024 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हा अभ्यास युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी (ESC) काँग्रेस 2024 मध्ये मांडण्यात आला होता.
या अभ्यासानुसार, अतिशय थंड हवामान आणि अचानक येणाऱ्या थंडीच्या लाटा हार्ट अटॅकचा धोका वाढवतात. विशेष म्हणजे हा धोका थंडी पडताक्षणीच नसून, थंडी वाढल्यानंतर 2 ते 6 दिवसांनंतर सर्वाधिक वाढतो, असं या अभ्यासात सांगितलं आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार दरवर्षी ख्रिसमस आणि नववर्षाच्या काळात हार्ट अटॅकचे रुग्ण आणि हृदयाशी संबंधित मृत्यू सर्वाधिक नोंदवले जातात.
तज्ज्ञांच्या मते, थंड वातावरणासोबतच जीवनशैलीतील बदल हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो, याबाबत आम्ही मेदांता मूलचंद हार्ट सेंटरचे असोसिएट डायरेक्टर आणि प्रमुख प्राध्यापक डॉ. तरुण कुमार यांच्याशी संवाद साधला.
त्यांच्या मते, हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका धोका वाढण्यामागे मुख्यत्वे 4 कारणं असतात.
थंडी वाढली की शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आणि नसा आकुंचन पावू लागतात.
याचा परिणाम हृदयाच्या प्रमुख रक्तवाहिन्यांवर म्हणजेच कोरोनरी आर्टरीवर होतो. त्यामुळे हृदयापर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
थंडीत घाम कमी येतो आणि दैनंदिन हालचालीही मंदावतात. याचा परिणाम शरीरातील द्रवसंतुलनावर होतो आणि रक्त अधिक दाट होतं. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाची धडधड वाढते, ज्याचा भार थेट हृदयावर पडतो.
थंड हवामानात शरीराचा मेटॅबॉलिझम दर काहीसा मंदावतो. त्याचवेळी अनेक जण नकळत जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ लागतात.
जसं की, गाजराचा हलवा, गजक, शेंगदाणे, तळलेले पदार्थ. यासोबतच बाहेर फिरणं किंवा नियमित व्यायाम कमी होतो. परिणामी वजन वाढण्यासोबतच कोलेस्ट्रॉल वाढण्याचाही धोका वाढतो.
हिवाळ्यात शरीरातील हार्मोन्समध्येही काही बदल होतात. यामुळे रक्तात क्लॉट तयार होण्याची प्रवृत्ती वाढते.
हा क्लॉट जर हृदयाच्या रक्तवाहिनीत अडकला, तर ती नस बंद होऊ शकते आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.
नोएडाच्या मेट्रो हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजीचे डायरेक्टर डॉ. समीर गुप्ता सांगतात, "ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी हिवाळ्यात जास्त सूप किंवा मिठाचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणं धोकादायक ठरू शकतं. जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका अधिक वाढतो."
हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी?
डॉ. समीर गुप्ता यांच्या मते, हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी होणं, तळलेले पदार्थ अधिक खाल्ले जाणं आणि वाढता ताणतणाव हे सगळे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
ते सांगतात, "वजन नियंत्रणात ठेवा, कारण अतिरिक्त वजनामुळे हृदयावर ताण येतो. ताण कमी करण्यासाठी दररोज योग, ध्यानाचा सराव करा आणि 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या"
तळलेले पदार्थ जसं की, भजी, समोसे यांचं सेवन कमी ठेवावं. त्याऐवजी फळं, भाज्या आणि डाळी आहारात अधिक प्रमाणात समाविष्ट कराव्यात. जास्त मीठ आणि साखर टाळणंही तितकंच आवश्यक आहे.
तरुणांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकारांच्या घटनांकडे पाहता ते धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे सोडण्याचा सल्ला देतात. तसंच रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून घ्यावी.
छातीत वेदना होणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा चक्कर येणं अशी लक्षणं जाणवताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हे छोटे-छोटे बदल अंगीकारल्यास हिवाळ्यातही हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
हार्ट अटॅकची लक्षणं
2025 मध्ये ICMR आणि AIIMS यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, तरुणांमध्ये होणाऱ्या अचानक मृत्यूंचं सर्वात मोठं कारण हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर आलं आहे.
हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 85 टक्के प्रकरणांमध्ये धमन्यांमध्ये चरबी साचणं (कोरोनरी आर्टरी डिसीज) आणि त्यातून होणारा हार्ट अटॅक हे प्रमुख कारण ठरतं.
डॉ. तरुण कुमार सांगतात, "भारतात आता तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण वेगाने वाढत आहे. 50 वर्षांखालील वयोगटात हार्ट अटॅक होणं आता दुर्मिळ राहिलेलं नाही. एकूण प्रकरणांपैकी 25 ते 30 टक्के हार्ट अटॅक हे 40 वर्षांखालील तरुणांमध्ये आढळतात."
हार्ट अटॅकची लक्षणं ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यास जीव वाचू शकतो.
छातीच्या डाव्या बाजूला किंवा मध्यभागी दुखणं, जडपणा, दाब किंवा जळजळ जाणवणं, ही वेदना पोटाच्या वरच्या भागातून खाली पसरू शकते.
वेदना डाव्या हातातही (आर्ममध्ये) जाणवू शकतात. यासोबतच अस्वस्थता, घाम फुटणं, चक्कर येणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं ही देखील सामान्य लक्षणं आहेत.
डॉ. तरुण कुमार सांगतात, "अशी कोणतीही लक्षणं जाणवली, तर क्षणाचाही विलंब करू नका आणि तात्काळ वैद्यकीय मदत घ्या."
ते पुढे सांगतात, "प्रत्येक वेळी छातीत वेदना होतीलच असं नाही. अनेकदा कोणतंही ठोस कारण नसताना श्वास घेताना धाप लागणं (अनएक्सप्लेंड डिस्प्निया) एवढंच एकमेव लक्षण असू शकतं. अशा वेळी स्वतःहून हालचाली कमी करणं किंवा दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ही लक्षणं दुर्लक्षित केल्यास धोका वाढू शकतो."
लक्षणांशिवाय वाढणारे हृदयविकाराचे संकेत
आता प्रश्न असा आहे की, कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त असे कोणते घटक आहेत, जे शांतपणे शरीरात काम करत राहतात आणि हृदयविकाराचा इशारा आधीच देतात.
डॉ. समीर गुप्ता यांच्या मते, त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे -
एपो बी (Apo B) लेव्हल :
एपो बी हे प्रत्येक खराब कोलेस्ट्रॉलच्या कणावर उपस्थित असतं. रक्तातील अशा अपायकारक कणांची खरी संख्या एपो बीच्या पातळीवरून समजू शकते. त्यामुळे केवळ एकूण कोलेस्ट्रॉलपेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक अचूकपणे मोजण्यासाठी एपो बी उपयुक्त ठरतं.
लिपोप्रोटीन (ए) [Lp(a)] लेव्हल :
हा एक जनुकीय (जेनेटिक) घटक आहे, जो जन्मत:च ठरलेला असतो आणि त्यात फारसा बदल करता येत नाही. दक्षिण आशियाई लोकांमध्ये विशेषतः भारतीयांमध्ये याची पातळी अनेकदा जास्त आढळते. त्यामुळे हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हिमोग्लोबिन A1c (HbA1c) :
हा रक्ततपासणीचा निकष मागील 2-3 महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवतो. HbA1c जास्त असल्यास केवळ डायबिटीजच नव्हे, तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका स्वतंत्रपणे वाढतो.
डॉ. तरुण कुमार यांच्या मते, हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आणि तपासण्या आहेत. या गोष्टी वेळोवेळी तपासल्यास आपण आधीच सतर्क राहू शकतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे निकष
वजन आणि BMI (बॉडी मास इंडेक्स):
BMI 18.5 ते 24.9 या मर्यादेत असणं आरोग्यासाठी योग्य मानलं जातं. यापेक्षा जास्त BMI असल्यास हृदयावर ताण वाढू शकतो.
कोलेस्ट्रॉल पातळी:
- LDL (बॅड कोलेस्ट्रॉल): 100 mg/dL पेक्षा कमी ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
- HDL (गुड कोलेस्ट्रॉल): साधारणतः 50 mg/dL किंवा त्याहून अधिक पातळी योग्य मानली जाते.
हे निकष नियंत्रणात ठेवल्यास हृदय निरोगी ठेवण्यास आणि भविष्यातील धोका कमी करण्यास मोठी मदत होते
हाय-सेन्सिटिव C-रिएक्टिव प्रोटीन (hs-CRP):
ही तपासणी धमन्यांमधील सूज (व्हॅस्क्युलर इन्फ्लेमेशन) किती आहे, हे मोजते. कोलेस्ट्रॉलची पातळी नॉर्मल असली, तरी hs-CRP जास्त असल्यास धमन्यांमध्ये साचलेला कोलेस्ट्रॉल प्लेक फुटण्याचा धोका वाढतो.
विशेषतः तीव्र ताणतणावाच्या किंवा अचानक जोरदार व्यायामाच्या वेळी रक्ताची गुठळी तयार होऊ शकते आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो.
धोका मोजण्याच्या पद्धती
फ्रेमिंगहॅम रिस्क कॅल्क्युलेटर:
या पद्धतीद्वारे पुढील 10 वर्षांत हार्ट अटॅक होण्याचा धोका मोजला जातो. यामध्ये वय, लिंग, कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्तदाब अशा विविध घटकांचा विचार केला जातो.
जर हा धोका 5 टक्क्यांपेक्षा जास्त आढळला, तर डॉक्टर औषधोपचार सुरू करण्याचा विचार करू शकतात.
कोरोनरी आर्टरी कॅल्शियम स्कोअर (CAC स्कोअर):
ही तपासणी सीटी स्कॅनच्या मदतीने केली जाते. स्कोअर शून्यापेक्षा जितका जास्त, तितका हार्ट अटॅकचा धोका अधिक मानला जातो.
डॉ. तरुण कुमार काही इतर महत्त्वाच्या तपासण्यांचीही शिफारस करतात.
ते सांगतात, "जर तुम्हाला डायबेटिस किंवा इतर कोणत्याही आजाराची शंका असेल, तर ईसीजी, ईको (ECHO) आणि टीएमटी (ट्रेडमिल टेस्ट) करून घ्या. टीएमटीमध्ये चालताना ईसीजी जोडलेलं असतं, त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच समस्या ओळखता येते."
ते पुढे नमूद करतात की, आजच्या काळात लहान वयापासूनच सतर्क राहणं अत्यावश्यक आहे.
18-20 वर्षांच्या वयात कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी.
त्यानंतर 30-35 वर्षांच्या वयात फ्रेमिंगहॅम रिस्क कॅल्क्युलेटर, कोरोनरी आर्टरी कॅल्शियम स्कोअर आणि टीएमटी या तपासण्या करून घेतल्यास हृदयविकाराचा धोका आधीच ओळखून आवश्यक खबरदारी घेता येते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)