विमान प्रवासादरम्यान आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास काय करावं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
अहमदाबादमध्ये विमान कोसळलं, तेव्हा केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला. एरव्हीही मोठ्या विमान अपघातात बचावणाऱ्या प्रवाशांची संख्या बहुतेकदा कमी असते. असं का? तर यामागे अनेक कारणं आहेत.
टाईम मॅगझिनने 2015 साली एक अभ्यास केला. त्यापूर्वीच्या 35 वर्षांमधल्या विमान अपघातांबद्दल त्यांनी संशोधन केलं. त्यानुसार विमानाचं समजा तीन भागांत विभाजन केलं.
त्यानुसार मागच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण होतं 32%. तर मधल्या भागात बसणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण होतं 39%
समोरच्या भागात बसणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण होतं 38% एवढं.
Exit च्या दरवाजाच्या जवळ बसलेली व्यक्ती जिवंत बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते, असं अपघातानंतर Emergency Exit च्या वापराबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ ग्रिनीचने केलेल्या संशोधनात आढळलं.
इमर्जन्सी एक्झिटपासून साधारण 5 रो (रांगा) अंतरापर्यंत बसलेल्या व्यक्ती वेळेत विमानाबाहेर पडू शकल्या असं त्यांना आढळलं.
अहमदाबादमध्ये फ्लाईट AI 171 च्या अपघातात बचावलेली एकमेव व्यक्ती 11A या सीटवर होती. ही सीट इमर्जन्सी एक्झिटला लागून असते.
पण विमानात तुम्ही कुठे बसताय, यापेक्षा विमान अपघात कसा होतो, विमानाचं नेमकं कशामुळे आणि किती नुकसान होतं, यावर सगळं अवलंबून असतं.
अपघात झाला तेव्हा विमान जमिनीपासून किती उंचीवर आहे, ते पूर्ण ताबा जाऊन कोसळलं की लँड होताना आदळलं किंवा घासलं, ते एकाच बाजूला म्हणजे डावीकडे वा उजवीकडे किंवा पुढे अथवा मागून आदळलं, आदळल्यानंतर आग लागली का? ते कोसळण्याची जागा किती लोकवस्तीची होती? तिथे रेस्क्यू टीम्सना पोहोचणं किती कठीण होतं? या सगळ्या गोष्टींनुसार मृत्यूंचा आकडा कमी-जास्त होतो.
अनेकदा वेळेत पावलं उचलली, तर मोठी दुर्घटना टळते. 2009 साली न्यूयॉर्कमध्ये कॅप्टन सलनबर्गर ऊर्फ सली यांनी विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडल्यावर ते हडसन नदीत लँड केलं होतं.
तेव्हा आजुबाजूच्या राफ्ट्स आणि रेस्क्यू बोट्सनी विमानाच्या पंखावरून प्रवाशांची सुटका केली. पण हेच विमान समुद्रात उतरलं असतं, तर रेस्क्यू ऑपरेशन कठीण झालं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
विमान अपघात भयंकर असतात, यात एकाचवेळी अनेकांचा मृत्यू होतो, ती दृश्यं थरकाप उडवणारी असतात.
पण, असं असलं तरी प्रवासाच्या इतर पर्यायांपेक्षा विमान प्रवास सुरक्षित असल्याचं टाईम मासिकानेही म्हटलं होतं.
2024 मध्ये जर्नल ऑफ एअर ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटनं केलेल्या अभ्यासानुसार प्रवासी विमान अपघातात अमेरिकेत मरण पावण्याची शक्यता 1.37 कोटीमध्ये 1 असल्याची नोंद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आधुनिक विमानं ही अपघातातही वाचू शकतील अशी बनवलेली असतात, त्यामुळे आता विमान अपघातातून बचावणाऱ्यांची संख्या तशी मोठी असते.
पण, हे विमान प्रवाशांच्या प्रसंगावधानावरही अवलंबून असते. आणीबाणीची वेळ आलीच तर त्यावेळी घाबरून जाण्याऐवजी आधीच काही गोष्टी करता येतील.
आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास काय करावे?
- उड्डाणापूर्वी सांगण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या. समोर त्याबद्दलचं कार्डही ठेवलेलं असतं, ते नीट वाचा.
- सीटबेल्ट लावून ठेवणं कधीही चांगलं.
- तुमच्या सीटपासून जवळची इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे, ते पाहून ठेवा.
- आणीबाणीच्या वेळी क्रू कडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करा. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
- विमानातून evacuate करण्याची वेळ आली, तर सामान घेत बसू नका. बहुतेक evacuations च्या वेळी लोक बॅगा घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. याने विमानातून लोक बाहेर पडण्यासाठी अधिक वेळ लागतो. असं करून तुम्ही तुमच्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात घालता.
- गरज पडल्यास 90 सेकंदांमध्ये सर्व प्रवाशांना विमानाबाहेर पडता येईल अशा प्रकारे विमानांची रचना करण्यात आलेली असते. त्यामुळे घाईगडबड करून चेंगराचेंगरीची स्थिती येणार नाही, याची काळजी घ्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











