बौद्ध भिक्षूंसोबत लैंगिक संबंध, ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेकडून 80,000 फोटो आणि व्हीडिओ जप्त

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जिरापोर्न स्रीचाम आणि को ईवे
- Role, बीबीसी न्यूज
बौद्ध भिक्षूंसोबत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हीडिओ वापरुन, त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली थायलंडमधल्या पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.
या महिलेला पोलीस 'मिस गोल्फ' या नावाने संबोधत आहेत. या महिलेने जवळपास नऊ भिक्षूंसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गेल्या तीन वर्षात या माध्यामातून महिलेने 3,850 लाख बाथ म्हणजेच जवळपास 119 लाख डॉलर्स इतके पैसे कमावले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. बाथ हे थायलंडमधलं चलन आहे.
महिलेच्या घराची झडती घेतल्यानंतर तपासकर्त्यांना 80 हजारांहून अधिक फोटो आणि व्हीडिओ सापडले. याचा वापर करुन महिला भिक्षूंना धमकी देत होती, असं पोलीस विभागातल्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
थायलंडमधे अतिशय पूजनीय मानल्या जाणाऱ्या अशा बौद्ध संस्थेला हादरा देणारं हे प्रकरण आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये या संस्थेवर अनेक आरोप झाले आहेत. ज्यात काही भिक्षूंनी लैंगिक गैरवर्तन केल्याची, तसेच अंमली पदार्थांची तस्करी केल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
या प्रकरणाचा उलगडा पहिल्यांदा जून महिन्यात झाला असल्याचं पोलीस सांगतात.
एका महिलेने फसवणूक केल्यानं बँकाँकमधील एका मठाधिपत्यानं अचानक भिक्षू जीवन सोडून दिल्याचं पोलिसांना समजलं. ती महिला म्हणजे ही 'मिस गोल्फ' हीने या भिक्षूसोबत मे 2024 मध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर त्याच्यामुळे गर्भवती राहिल्याचा दावा करत तिने मूल वाढवण्यासाठी भिक्षूकडून 70 लाख बाथपेक्षा जास्त पैसे काढून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की, इतर अनेक भिक्षूंनी मिस गोल्फ यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत.
पोलिसांनी यालाच तिची गुन्हा करायची नेहमीची पद्धत (मोड्स ओपरेन्डी) असं म्हटलंय.
पुढचा तपास करताना पोलिसांना असं लक्षात आलं की, यातला जवळपास सगळाच पैसा बँकेतून काढण्यात आला आणि त्यातला काही ऑनलाईन जुगारासाठीही वापरण्यात आला.

फोटो स्रोत, Thai News Pix
तपास करताना जुलै महिन्याच्या सुरुवातीला मिस गोल्फ यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यातून तिच्याकडून अनेक मोबाईलही जप्त करण्यात आले. शिवाय, तिच्याकडे भिक्षूंना धमकवण्यासाठी वापरले जाणारे 80 हजारांहून अधिक फोटो आणि व्हीडिओही सापडले.
आर्थिक फसवणूक, खंडणीची मागणी आणि चोरीचा माल स्वीकारणं असे गंभीर आरोप या महिलेवर केले आहेत.
याशिवाय चुकीचं वर्तन करणाऱ्या भिक्षूंची तक्रार करण्यासाठी एक हॉटलाइनही (दूरध्वनी सेवा) पोलिसांनी सुरू केली आहे.
या घटनेनंतर भिक्षूधर्माच्या नियमांचा आढावा घेण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करणार असल्याची घोषणा थायलंडमधल्या संघ सर्वोच्च परिषदेने केली.
शिवाय, इथून पुढे धार्मिक आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या भिक्षूंना दंड आणि अटक यासारखी कठोर शिक्षा करणार असल्याचा प्रयत्न करणार असल्याचं थायलंडच्या सरकारनेही म्हटलं आहे.
थायलंडचा राजा वजिरालोंगकोर्न यांनीही 81 भिक्षूंना दिलेली उच्च पदवी आणि राजाश्रय मागे घेण्याची घोषणाही केली आहे. त्यासाठीचा जून महिन्यांत काढण्यात आलेला राजआदेश रद्द करण्यात आला आहे.
अलिकडे झालेल्या या गैरवर्तणुकीमुळे बौद्ध अनुयायांच्या मनाला खोलवर दुखापत झाली असल्याचं राजाने म्हटलं आहे.
थायलंडमधली 90 टक्के जनता बौद्ध धर्म पाळत असल्यानं तिथे भिक्षूंना फार आदराचं स्थान दिलं जातं. अनेक थाई पुरूष पुण्य कमावण्यासाठी दिक्षा घेऊन तात्पुरत्या काळासाठीही भिक्षू बनतात.
पण या बौद्ध संस्थेत गेल्या काही वर्षांपासून घोटाळे सुरू झाले आहेत. याआधीही अशी अनेक प्रकरणं बाहेर आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सतत प्रवास करणाऱ्या आणि त्याच्या अलिशान जीवनशैलीमुळे ओळखला जाणाऱ्या विराफोल सुकफोल या बौद्ध भिक्षूवर 2017 मध्ये लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले होते. त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांतही झाली होती.
त्यानंतर 2022 मध्ये थायलंडच्या फेच्छाबून या उत्तरेकडील प्रांतातील एका मंदिरात काम करणाऱ्या चारही भिक्षूंना अंमली पदार्थांविरोधी छाप्यात अटक करण्यात आली आणि त्यांचं भिक्षूपद काढून टाकण्यात आलं. त्यानंतर या मंदिरात एकही भिक्षू उरला नव्हता.
बेशिस्त आणि बेजबाबदारपणावरून थाई संघावर अनेकदा टीका करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही शेकडो वर्ष जुन्या या संस्थेत फारसा बदल झाला नाही, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात. या प्रश्नांचं मूळ संघातल्या कठोर उतरंडीत असल्याचं तज्ज्ञ पुढे सांगतात.
"थाई नोकरशाहीप्रमाणे ती एक अधिकारवादी प्रणाली आहे. तिथे ज्येष्ठ भिक्षू हे एखाद्या वरच्या पदावरच्या अधिकाऱ्यासारखे असतात आणि कनिष्ठ भिक्षू त्यांच्या हाताखाली काम करतात," धार्मिक अभ्यासक सुराफोत थवीसाक बीबीसी थाईशी बोलताना सांगत होते.
"त्यांना काही चुकीचं झाल्याचं समजलं तरी त्याविरोधात बोलण्याची हिंमत ते करत नाहीत. तसं केल्यास आपल्याला मंदिरातून सहजपणे हाकलून लावलं जाऊ शकतं हे त्यांना माहीत आहे," सुराफोत पुढे म्हणाले.
पण धर्मात सुधारणा होण्याची अतिशय गरज असून, अलिकडे झालेल्या या प्रकरणामुळे पोलीस आणि संघ परिषद या दोघांनीही सुरू केलेल्या चौकशीतून त्यादृष्टीने पावले उचलली जातील, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
"महत्त्वाचं म्हणजे यातून सत्य परिस्थिती समोर येईल. संघ निष्पाप नाही हे लोकांना पटेल," असं बँकॉकमधील थमासाट विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ प्रकीरती सतसुत म्हणाले.
"धर्म वाचवण्यासाठी संघ सर्वोच्च परिषद स्वतःच्या प्रणालीत काय बदल करते यावर सगळं अवलंबून आहे," ते पुढे म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











