जुगारात नवरा–बायकोनं 7 कोटी जिंकले; पण नंतर जे उघडकीस आलं, त्यामुळे झाली अटक

फोटो स्रोत, NSW Police
एखाद्या कॅसिनोत जिंकण्यासाठी छुपे कॅमेरे, इअरफोन असल्या गोष्टी वापरायच्या आणि मग खूप सारे पैसे जिंकायचे, हे प्रकार आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिले आहेत. पण याचा प्रत्यक्ष वापर करून एका जोडप्याने कॅसिनोला 7 कोटी 19 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
कझाकस्तानमधल्या जोडप्याने ऑस्ट्रेलियातल्या एका कॅसिनोमध्ये जिंकण्यासाठी स्पायकॅम आणि इयरफोनचा वापर केला. पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कॅसिनोच्या स्टाफने 36 वर्षांच्या दिलनोजा इस्राइलोव्हच्या टी-शर्टमध्ये एक छुपा कॅमेरा पाहिला. त्यानंतर तिला आणि तिचा 44 वर्षीय पती अलीशेरीखोजा इस्राइलोव्हला अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ चुंबक आणि मिरर केलेला एक फोन मिळाला. त्याचा वापर अफरातफरीसाठी केला जात होता.
या दोघांवर आर्थिक फायदे मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप ठेवला असून आता दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितलं की, हे जोडपं ऑक्टोबर महिन्यात कझाकस्तानमधून सिडनीला आलं होतं आणि त्याच दिवशी दोघांनीही कॅसिनोच्या सदस्यतेसाठी अर्ज केला.
कशी करत होते फसवणूक?
सिडनीत आल्यानंतर दोघेही अनेक आठवडे बऱ्याच कॅसिनोमध्ये गेले. दोघांनी या कॅसिनोमध्ये जवळपास सात कोटी रुपयांची रक्कम जिंकली.
त्यानंतर कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांना संशय येऊ लागला. गेल्या गुरूवारी (27 नोव्हेंबर) दोघांनाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितलं की ते वापरत असलेली उपकरणं (स्पाय कॅमेरा) मोबाईल फोनशी जोडलेले होते. त्याचा वापर करून ते टेबलाचे फोटो घेऊन पाहू शकत होते.
त्यांच्याकडे लपवलेले एअरपीसही होते. त्यातून त्यांना कार्डवर कधी पैसे लावायचे याच्या सूचना मिळायच्या.

फोटो स्रोत, NSW Police
न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं की, ते सध्या या फसवणुकीच्या प्रकारात इतर कोणत्याही व्यक्तीचा तपास करत नाहीयेत.
या जोडप्याच्या कॅसिनोच्या जवळच असलेल्या घराची झडती घेण्यात आली. त्यात पोलिसांना महागडे दागिने आणि 2,000 युरो (जवळपास 2.08 लाख रुपये) रोख मिळाले.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितलं की, दोघांनाही शुक्रवारी (28 नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना जामीन मंजूर करायला न्यायालयानं नकार दिला.
गार्डियन ऑस्ट्रेलियातील एका वृत्तानुसार दिलनोजाला आता फेब्रुवारी महिन्यात न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, तर तिचा पती इस्रलाइलोव्हला 11 डिसेंबरला न्यायालयासमोर हजर केलं जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











