IPL ला मिळणार नवा विजेता; RCB की पंजाब किंग्स? कुणाचं पारडं जड?

श्रेयस अय्यर आणि विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली
    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

29 मेच्या रात्री चंदीगडच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 8 विकेट राखून पराभव केला. बंगळुरूच्या या विजयानंतर मुल्लानपूरच्या मैदानात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या.

तब्बल 18 वर्षं आयपीएलच्या विजेतेपदासाठी झगडणाऱ्या विराट कोहलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माकडे बघून 'आणखी एक सामना जिंकायचा बाकी' असल्याचा इशारा केला.

दुसरी घटना म्हणजे पराभवानंतर प्रतिक्रिया देताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, "आम्ही लढाई हरलोय, पण युद्ध नाही."

श्रेयस अय्यरने त्याचे शब्द खरे ठरवत क्वालिफायर-2 मध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सचा पराभव करून आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

आज (3 जून) रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना होईल आणि यावर्षी आयपीएलला एक नवा विजेता मिळेल.

18 नंबरची जर्सी घालून तब्बल 18 वर्षं खेळणाऱ्या विराट कोहलीला आजवर आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या वर्षी दोन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत घेऊन येण्याची किमया साधली आहे.

मागच्या वर्षी श्रेयसने आयपीएल जिंकण्याचा अनुभव असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला विजेता बनवलं होतं, पण त्यानंतर झालेल्या लिलावात पंजाब किंग्सने श्रेयसला त्यांच्या तंबूत घेतलं आणि आजवर कधीही आयपीएलचा विजेता न ठरलेल्या पंजाब किंग्सला देखील श्रेयसने अंतिम फेरीत पोहोचवलं आहे.

आरसीबी की पंजाब किंग्स

फोटो स्रोत, ANI

अर्थात साखळी फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या या दोन संघांच्या कामगिरीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असली, तरी दोन्ही संघांमध्ये अतिशय गुणवान, तरुण खेळाडूंचा देखील भरणा आहे.

क्वालिफायर-1 मध्ये पंजाबच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली होती. मात्र, अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आजवरचा प्रवास विसरून, आजवर आलेलं अपयश विसरून यावर्षीचा आयपीएल चषक त्यांच्या नावे करण्यासाठी प्राणपणाने झुंजतील यात कसलीही शंका नाही.

'ई साल कप नाम दे' गाणं खरं ठरणार का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आजपर्यंत आयपीएलचे तीन अंतिम सामने खेळले आहेत.

2009, 2011 आणि 2016 साली झालेल्या तिन्ही आयपीएल फायनल्समध्ये बंगळुरूला पराभव स्वीकारावा लागला आहे.

मागच्या 18 वर्षांमध्ये दरवर्षी अत्यंत दर्जेदार खेळाडूंना घेऊन मैदानात उतरवणाऱ्या या संघाला कधीही आयपीएल जिंकता आलेलं नाही.

विराट कोहली, ख्रिस गेलं, युवराज सिंग, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स यासारख्या महान खेळाडूंनी या संघाकडून आयपीएलमध्ये भाग घेतला, पण कोणताही खेळाडू आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करू शकला नाही.

अत्यंत मोक्याच्या क्षणी पराभव स्वीकारल्यानंतर मैदानात भावूक झालेले बंगळुरूचे खेळाडू अनेक क्रिकेट रसिकांनी बघितले असतील.

असं असूनही विराट कोहली आणि बंगळुरूच्या चाहत्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच गेली. आयपीएल जिंकण्याच्या याच इच्छेतून गाणं तयार झालं, 'ई साल कप नाम दे'. या गाण्याचा अर्थ होतो 'यावर्षी कप आमचाच आहे.'

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली आयपीएलच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत बंगळुरूला विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाहीये, पण हा इतिहास यावर्षी बदलेल का?

आता अखेर 9 वर्षांनंतर बंगळुरूच्या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वात आणि विराट कोहलीच्या उपस्थितीत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे.

बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा पराभव केलेला असल्यामुळे त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास असेल हे नक्की, पण मुंबईला पराभवाची धूळ चारून आलेल्या पंजाबच्या संघाला कमी लेखण्याची चूक ते नक्कीच करणार नाहीत.

बंगळुरूच्या संघात विराट कोहली, रजत पाटीदार, जितेश शर्मा, लियम लिविंगस्टन, रोमारीओ शेफर्ड सारखे तगडे फलंदाज आहेत.

तर कृणाल पंड्या, यश दयाल, सुयश शर्मा सारखे गोलंदाज देखील आहेत. देवदत्त पडिकल जखमी झाल्यामुळे संघात आलेल्या मयांक अग्रवालने देखील मागच्या काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे.

त्यामुळे आयपीएल विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी हे सगळेच खेळाडू आतोनात प्रयत्न करतील यात शंका नाही.

श्रेयस दोन संघांना आयपीएल जिंकवणारा पहिला कर्णधार ठरणार?

पंजाब किंग्सच्या यावर्षीच्या प्रवासात दोन व्यक्तींची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग.

शेवटपर्यंत हार न मानण्याची कांगारू क्रिकेटपटूंची वृत्ती पंजाबच्या तरुण खेळाडूंमध्ये रुजवण्यात रिकी पॉंटिंगला यश आलं आहे, असं संघाच्या कामगिरीवरून स्पष्ट दिसतंय.

या संघात अनकॅप्ड म्हणजे भारताकडून पदार्पण न झालेले खेळाडू अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत.

पंजाबला आक्रमक सुरुवात करून देणारे प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, नेहाल वढेरा, शशांक सिंग आणि त्यांच्यासोबत विजयकुमार विषक सारखा तरुण गोलंदाज अत्यंत मोक्याच्या क्षणी संघासाठी चमकदार खेळ करण्यात यशस्वी ठरले आहेत. यासोबतच जॉश इंग्लिस आणि मार्कस स्टाॅयनीस सारख्या परदेशी खेळाडूंनी देखील दमदार कामगिरी केली आहे.

श्रेयस अय्यर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यरने यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या सगळ्या तरुण संघाला पुढे घेऊन जाण्यात सगळ्यात मोठी भूमिका बजावली आहे मुंबईकर श्रेयस अय्यरने.

श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत 16 सामन्यांमध्ये 54.82 च्या सरासरीने आणि तब्बल 175.80 च्या स्ट्राईक रेटने 603 धावा अक्षरशः कुटल्या आहेत.

क्वालिफायर-2 मध्ये मुंबईच्या बलाढ्य गोलंदाजीसमोर अत्यंत शांत राहून श्रेयसने 41 बॉल्समध्ये 87 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने तब्बल 8 षटकार लगावले. पण महत्त्वाची बाब ही होती की, विजयानंतर कुठेही त्याच्यामध्ये आक्रमकपणा दिसला नाही, त्याने अत्यंत शांतपणे हातातले ग्लोव्ज काढले, प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाला की 'द जॉब इज हाफ डन.' (अजूनही अर्ध काम बाकी आहे.)

पंजाबने याआधी 2014 साली आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. श्रेयस अय्यरने त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचा पहिला सामना खेळला होता.

पंजाबच्या संघात आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याचा अनुभव केवळ दोनच खेळाडूंना आहे. पहिला श्रेयस अय्यर आणि दुसरा युझवेंद्र चहल.

चहल याआधी बंगळुरूकडून अंतिम सामना खेळला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात इतर खेळाडू कसे खेळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

फायनलच्या आधी ही आकडेवारी नक्की वाचा

अहमदाबादच्या मैदानावर यावर्षी धावांची बरसात झाली आहे. या मैदानावर झालेल्या आठ सामन्यांमध्ये तब्बल अकरावेळा 200 ची धावसंख्या ओलांडली गेली आहे आणि एका डावात 196 धावा काढण्यात आल्या आहेत.

पंजाबने याआधी इथे दोन सामने खेळले आहेत. साखळी फेरीत खेळलेल्या सामन्यात त्यांनी 243 धावांचा डोंगर उभा केला होता. या मैदानावर बंगळुरूचा हा पहिलाच सामना असेल.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी इथे झालेल्या आठपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. रात्री खेळवण्यात आलेल्या एकाच सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे आणि तो सामना म्हणजे क्वालिफायर-2.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर

फोटो स्रोत, Getty Images

पंजाब आणि बंगळुरू यांच्यामध्ये या स्पर्धेत एकूण तीन सामने झाले आणि तिन्ही सामन्यात बंगळुरूच्या भेदक गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला होता. या तिन्ही सामन्यांमध्ये पंजाबची अवस्था 53/4, 76/4, आणि 38/4 अशी झाली होती.

बंगळुरू आणि पंजाब यांच्यामध्ये 2008 पासून आतापर्यंत झालेल्या 36 सामन्यांमध्ये 18 पंजाबने जिंकले आहेत तर 18 सामन्यांमध्ये बंगळुरू विजयी झाली आहे. यावर्षी झालेल्या तीन सामन्यांमध्ये बंगळुरूने 2 तर पंजाबने 1 सामना जिंकला आहे. दोन्ही संघांनी विरुद्ध संघाच्या घरच्या मैदानावर विजय मिळवले आहेत हे विशेष.

यंदाचं आयपीएल म्हणजे भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत?

आयपीएलची सांगता होत असली तरी यावर्षीची ही स्पर्धा एका युगाचा अंत आहे, असं म्हणावं लागेल. महेंद्रसिंग धोनीने त्याच्या निवृत्तीबाबतचा संभ्रम कायम ठेवला असला, तरी या स्पर्धेत त्याची कामगिरी बघून त्याच्या कारकिर्दीचा शेवट जवळ आला आहे हे दिसू लागलं आहे.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सला चार विजेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला देखील मागच्या वर्षी कर्णधार पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता तो केवळ 'इम्पॅक्ट प्लेअर'च्या रूपात मुंबईकडून खेळताना दिसला. विराट कोहली आणि रोहितने आयपीएल सुरू असतानाच कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

एकविसाव्या शतकाची पहिली दोन दशकं गाजवणाऱ्या या खेळाडूंच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध सुरू असताना भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर शुबमन गिल, साई सुदर्शन, प्रसिद्ध कृष्णा, वैभव सूर्यवंशी आणि अनेक दर्जेदार खेळाडूंचा उदय होतो आहे.

आयपीएलचे सामने नीट बघितले, तर प्रत्येक संघ आता पुढच्या भविष्याची तयारी म्हणून त्यांच्या संघाची धुरा तरुण खेळाडूंच्या खांद्यावर देतो आहे हे दिसतं.

चेन्नई सुपरकिंग्सने ऋतुराज गायकवाड, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रजत पाटीदार, लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंत, दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल, राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या, गुजरात टायटन्सने शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवलं आहे. त्यामुळे 2025 ची आयपीएल स्पर्धा ही खऱ्या अर्थाने संक्रमणकाळातली स्पर्धा आहे, असं म्हणता येईल.

आता अंतिम सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ विजयाच्याच निर्धाराने मैदानात उतरतील. एका बाजूला देशाच्या दक्षिणेकडील बंगळुरूचा संघ त्यांचं 18 वर्षं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे पंजाबचे किंग्स पहिल्यांदाच आयपीएलचे किंग होण्यासाठी जीवाचं रान करेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)