श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत, पोटात कोणत्या भागाला दुखापत? बीसीसीआयनं काय सांगितलं?
भारताचा क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापतीवर उपचारासाठी सिडनीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
श्रेयस भारतीय पुरुष टीमचा उपकर्णधार आहे आणि ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली आहे.
शनिवारी सिडनीमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान श्रेयसनं अॅलेक्स कॅरेचा बॅकवर्ड पॉइंटवर झेल घेतला, तेव्हा त्याला ही दुखापत झाली.
त्यानंतर श्रेयसला मैदानाबाहेर नेण्यात आलं आणि नंतर खेळू शकला नाही. सिडनीत उपस्थित पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयसला इंटेन्सिव्ह केयर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
त्याच्या स्प्लीन म्हणजे प्लीहा या अवयवाला दुखापत झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे.
प्लीहा हा मुठीच्या आकाराचा अवयव आपल्या शरिरात डाव्या बाजूला बरगड्यांच्या खालीच असतो आणि शरिरातील जुन्या रक्तपेशी गाळण्यात आणि शरिराला संसर्गापासून वाचवण्यात या अवयवाची महत्त्वाची भूमिका असते.
बीसीसीआयनं जाहीर केलेल्या मेडिकल अपडेटनुसार श्रेयसवर उपचार केले जात असून त्याची तब्येत स्थिर आहे आणि तो उपचारांना प्रतिसाद देत आहे.
सिडनी आणि भारतातले डॉक्टर्स त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत आणि भारतीय संघाचे डॉक्टर सिडनीत थांबून त्याच्या तब्येतीची काळजी घेतील.
भारतीय संघातले इतर खेळाडू ट्वेन्टी20 मालिकेसाठी कॅनबराला रवाना झाले आहेत.






