'बटेंगे तो कटेंगे' हा योगी आदित्यनाथ यांचा नारा महाराष्ट्रात कितपत यशस्वी होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा हरियाणा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला होता. आता महाराष्ट्रातही याचा राजकीय प्रयोग सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंसह ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश देणारे फलक झळकले होते.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याकडून हे फलक लावण्यात आले. तसंच येत्या काही दिवसांत योगी आदित्यनाथ यांच्या जवळपास 15 सभा महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांत होणार आहेत. यामुळं महाराष्ट्रात योगी आणि त्यांचा हा नारा यशस्वी होऊ शकतो का? ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊया.
‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा कोणी आणि कुठे दिला?
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला 288 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही. यामुळे विधानसभेसाठी आता भाजपने अगदी प्रत्येक मतदारसंघासाठी रणनिती आखली आहे.
पुढच्या 15 दिवसांत महाराष्ट्रात भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुमारे 15 प्रचार सभा होणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत अंधेरी, वांद्रे कला नगर, ठाणे, जोगेश्वरी अशा अनेक भागात योगी आदित्यनाथ यांचे बॅनर्स झकळले होते.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश आणि त्यानंतर हरियाणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला ‘बटेंगे तो कटेंगा’ हा नारा लिहिला होता. मुंबईतील भाजपचे सदस्य विश्वबंधू राय यांनी हे बॅनर्स लावले होते.
बीबीसी मराठीशी बोलताना विश्वबंधू राय यांनी सांगितलं, “योगी आदित्यनाथ यांचे मुंबईसह महाराष्ट्रात अनेक चाहते आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत हिंदूंनी एकसाथ राहावं हा संदेश देण्यासाठी मी बॅनर्स लावले होते. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले न जाता हिंदू म्हणून एकत्र रहा असा योगी आदित्यनाथ यांनी नारा दिला होता. त्यासाठीच मुंबईतही हे बॅनर्स लावले.”
ते पुढे सांगतात, “आम्ही कोणत्याही धर्माचं नाव लिहिलेलं नाही. विरोधक जातीय ध्रुवीकरण करू पाहत आहेत. त्यांना आमचं उत्तर आहे. जातीय राजकारण न करता मतदान व्हावं एवढाच संदेश आम्ही देऊ इच्छितो.”

ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा इथल्या एका सभेत बांगलादेशच्या परिस्थितीवर बोलताना भाष्य केलं की, “राष्ट्रापेक्षा मोठं काहीही असू शकत नाही. राष्ट्र तेव्हाच सशक्त राहू शकतं ज्यावेळी आपण एक आणि नेक राहू. बटेंगे तो कटेंगे.”
ते पुढे म्हणतात, “तुम्ही बांगलादेशमध्ये पाहत आहात. ही चूक इथे होता कामा नये. एक रहेंगे तो नेक रहेंगे, सुरक्षित रहेंगे, आपल्याला विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी काम करायचे आहे.”
योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर राष्ट्रीय स्तरावरूनही अनेक नेत्यांनी यावर टीका केली. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतंच यावर भाष्य करताना म्हटलं की, “देशाच्या इतिहासात याहून नकारात्मक नारा कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेला नसेल. भाजपने नुकताच हा नारा दिला आहे.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही यावर पलटवार केला होता. ओवैसी म्हणाले की, “योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात बुल्डोजरच्या माध्यमातून मुस्लिमांची घरं तोडली जातात. ते स्वत: मुस्लिमांसंदर्भात हेट स्पीच देतात. ते स्वत: ठोक दुंगा असं म्हणतात. अशी विधानं त्यांच्याच तोंडून निघतात.”
महाराष्ट्रात विरोधकांचा पलटवार – ‘ना बटेंगे ना कटेंगे’
योगींच्या या नाऱ्याचे पोस्टर्स महाराष्ट्रात लागल्यानंतर इथंही राजकारण तापलं आहे. या नाऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. “छत्रपतींच्या धरतीवर ना कोई बटेगा ना कटेगा,” असं ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “योगी आदित्यनाथ आमचे चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ते आमचे बाबाजी आहेत. पण निवडणूक आणि राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर ते महाराष्ट्रात येऊन काय करणार? ते स्वत: लोकसभेत उत्तर प्रदेशात आपल्या पक्षाला वाचवू शकले नाहीत. अयोध्या, चित्रकूट वाचवू शकले नाहीत. तर ते महाराष्ट्रात येऊन काय करणार? इकडे महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करणार, वातावरण खराब करणार.”
ते पुढे म्हणतात, “महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीवर इथे कोणीही बटणार नाही किंवा कटणार नाही."
तर खासदार अमोल कोल्हे यांनी हे बॅनर योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून लावल्याचा आरोप केला आहे. एका भाषणात ते म्हणाले, “बटेंगे तो कटेंगे असे महाराष्ट्रात बॅनर लागलेत. योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून हे बॅनर लागले आहेत. बटेंगे तो कटेंगे सांगणाऱ्यांनो आम्हाला हे सुद्धा सांगा की महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार का कापला आणि गुजरातना का नेला? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हक्क का कापला? मराठी पक्षांना का कापलं? सामान्य माणसाचा खिसा का कापला?”


‘मोदी नाही म्हणून आता योगी’
लोकसभेत भाजपला देशभरातच अपेक्षित यश मिळालं नाही. अगदी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या राज्यातही भाजपला फटका बसला. अनेक ठिकाणी मोदींची लाट ओसरली असंही चित्र दिसलं. यामुळे याला पर्याय म्हणून आता योगी आणि हिंदू मतं एकवटणार नाहीत याची भीती असल्याने ‘बटेंगे तो कटेंगे’ अशाप्रकारचे नारे दिले जातात असं मत राजकीय विश्लेषकांचं आहे.
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण झालं परंतु त्या तुलनेत हिंदू मतांचं झालं नाही. म्हणूनच व्होट जिहाद, बटेंगे तो कटेंगे अशाप्रकारचे नारे किंवा स्लोगन दिले जातात. भाजपला हिंदू मतांची जुळवाजुळव करायची आहे. त्याचाच हा प्रयत्न आहे. लोकसभेत मुस्लीम मतदारांनी ज्या संख्येने मतदान केलं, सर्व गोष्टी विसरून, बाजूला सारून ते भाजपचा परभाव करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले. या तुलनेत हिंदुंनी मतदान केलं नाही आणि म्हणूनच असे नारे आता दिले जात आहेत.”
याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काही लक्षणीय प्रभाव दिसेल का? यावर बोलताना ते सांगतात, “महाराष्ट्रात गेल्या काही काळात मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पाहायला मिळाला. यामुळे आरक्षणाच्या मुद्याची किनार या निवडणुकीला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरण यशस्वी ठरत नाहीये. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात केवळ उत्तर भारतीय मतांसाठी आणलं जात नाहीय तर हिंदू आयकॉन म्हणून आणलं जात आहे.”
तर राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात, “महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यावर आधारित होणाऱ्या मतदानावर मात करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. हिंदू ऐक्य करण्याचा प्रयत्न करून जातीच्या आधारावर होणाऱ्या मतदानावर मात करण्यासाठी ही रणनिती असावी. भाजपला याचा अजिबातच फायदा होणार नाही असंही नाही. काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. तसं वातावरण तरी ते निर्माण करत आहेत. लोकसभेत मुस्लीम मतदान जास्त झालं असं नाहीय, तर भाजप सगळीकडेच हिंदू मतं एकवटण्याचा प्रयत्न करत आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











