You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला खेळाडूंच्या कामगिरीवर त्यांच्या स्तनांचा आणि मासिक पाळीचा काय परिणाम होतो?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, बीबीसी न्यूज, आरोग्य प्रतिनिधी
महिलांच्या खेळातील एका अत्यंत महत्त्वाच्या उन्हाळ्यातील युरो कप स्पर्धा संपते आहे.
मात्र, खेळाच्या मैदानावरील भावनिक दृश्यं आणि रोमांचाव्यतिरिक्त, एक वैज्ञानिक क्रांती देखील घडते आहे.
वैज्ञानिकांची एक टीम उच्च दर्जाच्या खेळांचे महिलांच्या शरीरावर होणाऱ्या विशेष परिणामांचा अभ्यास करते आहे.
एखादी महिला खेळाडू ज्या प्रकारे धावते त्यानुसार तिच्या स्तनामध्ये कसे बदल होतात, योग्य स्पोर्ट्स ब्रामुळे महिला खेळाडूला थोडा फायदा होऊ शकतो, मासिक पाळीचा महिला खेळाडूच्या कामगिरीवर होणारा परिणाम, मासिक पाळीचे ट्रॅकर्स काय भूमिका बजावू शकतात, विशिष्ट प्रकारच्या दुखापतींचा धोका कशामुळे वाढतो आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल?
मला व्यावसायिक महिला खेळाडूंनी मला सांगितलं की त्यांना 'मिनी मेन' मानलं जातं, त्या काळापेक्षा ही वेगळी गोष्ट आहे.
स्तनाचं बायोमेकॅनिक्स
2022 च्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील तो प्रसिद्ध प्रसंग जरा आठवून पाहा.
ब्रिटनच्या क्लो केलीनं विम्ब्ले स्टेडियममध्ये अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाईम) जर्मनीच्या विरोधात विजयी गोल केला होता.
सामना जिंकल्यानंतर जो जल्लोष झाला त्यात तिनं तिच्या संघाचा (ब्रिटन) टी शर्ट काढला आणि तिचा स्पोर्ट्स ब्रा जगाला दाखवला.
त्याचं डिझाईन पोर्ट्समाऊथ विद्यापीठातील प्राध्यापक जोआना वेकफिल्ड-स्कार यांनी तयार केलं होतं. त्यांना 'ब्रा प्रोफेसर' या टोपणनावानं ओळखलं जातं.
त्यांनी खेळांच्या संदर्भात स्तनांबद्दल दिलेली माहिती जाणून घेऊया,
- एका फुटबॉल सामन्यात महिला खेळाडूचे स्तन सरासरी 11,000 वेळा उसळतात
- योग्य आधाराशिवाय या उसळण्याचा सरासरी आकार 8 सेंटीमीटर (3 इंच) असतो
- त्यांची 5जी च्या बलानं (गुरुत्वाकर्षणाच्या पाच पट) हालचाल होते, हा अनुभव एखाद्या फॉर्म्युला 1 कार ड्रायव्हरला येणाऱ्या अनुभवासारखाच आहे.
खेळाडूंच्या छातीवरील हालचाली मोजणाऱ्या मोशन सेन्सर्सचा वापर करून प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात आले. त्यावरून दिसून आलं आहे की हालणाऱ्या स्तनांच्या ऊतींच्या वजनामुळे शरीराच्या इतर भागांच्या कार्यावर काय परिणाम होतो आणि याप्रकारे बदललेल्या कार्याचा खेळाडूच्या कामगिरीवर कसा परिणाम होतो.
"काही महिलांचे स्तन जड असू शकतात आणि जर त्यांची हालचाल झाली, तर त्यामुळे त्यांच्या शरीराच्या हालचालीत बदल होऊ शकतो, अगदी ते मैदानावर ज्याप्रमाणात ताकद लावतात त्यामध्ये बदल होऊ शकतो," असं वेकफिल्ड-स्कार यांनी मला सांगितलं.
शरीराच्या वरच्या भागाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून, स्तन वरच्या दिशेला होणारी आणि खालच्या दिशेला होणाऱ्या हालचालींची भरपाई करतात, कमरेची स्थिती बदलतात आणि घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाची लांबी कमी करतात.
त्यामुळे स्पोर्ट्स ब्रा हे फक्त आराम आणि फॅशनसाठीचं साधन नाही, तर ते खेळाडूची कामगिरी उंचावण्याचं देखील साधन आहे.
"आम्हाला आढळलं की जर स्तनांना कमी आधार असेल, तर त्यामुळे स्ट्राईडची लांबी चार सेंटीमीटरनं कमी होते", असं वेकफिल्ड-स्कार सांगतात.
"जर तुम्ही मॅरेथॉनमधील प्रत्येक पावलामागं चार सेंटीमीटरनं अंतर कमी केलं, तर त्यातून एकूण एक मैलाचं अंतर कमी होतं."
स्पोर्ट्स ब्रा स्तनांमधील मऊ ऊतींचं देखील संरक्षण करतात. "जर आपण त्यांना ताणलं तर तो बदल कायमस्वरूपी होतो. त्यामुळे उपचारांपेक्षा समस्येला प्रतिबंध करणं अधिक महत्त्वाचं आहे," असं प्राध्यापक म्हणतात.
मासिक पाळी आणि त्याचा खेळाडूच्या कामगिरीवर होणारा परिणाम
मासिक पाळीचा शरीरावर स्पष्टपणे परिणाम होतो. त्याचा भावना, मन:स्थिती आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. तसंच त्यामुळे थकवा येऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते आणि पेटके येऊ शकतात.
मात्र असं असूनदेखील मासिक पाळीच्या खेळावर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलणं ठअजूनही निषिद्ध किंवा चुकीचं मानलं जातं. ते निषिद्ध नसावं, कारण आपण अजूनही या मुद्द्याबाबत संघर्ष करत आहोत," असं कॅली हॅगर-थॅकरे म्हणतात. त्या लांब पल्ल्याच्या धावपटू असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनचं प्रतिनिधित्व केलं आहे.
कॅली म्हणतात की मासिक पाळी येण्याची वेळ जवळ येताच त्यांना त्यांच्या शरीरात होणारे बदल नेहमीच जाणवतात.
"मला थकल्यासारखं वाटतं, माझे पाय जड होतात, काहीवेळा तर मला असं वाटतं की मी चिखलातून धावते आहे, प्रत्येक गोष्टीला नेहमीपेक्षा अधिक श्रम, प्रयत्न करावे लागतात," असं त्या म्हणतात.
त्यांना असं वाटतं की त्यांचं आयुष्य त्यांच्या मासिक पाळीच्या ट्रॅकरवर आधारलेलं आहे.
तसंच "जेव्हा मोठ्या शर्यतींमध्ये भाग घ्यायची गोष्ट असते," तेव्हा त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेमुळे त्यांना चिंता वाटते.
अशीच एक मोठी शर्यत एप्रिल महिन्यात होती, ती म्हणजे बॉस्टन मॅरेथॉन. त्याचवेळेस त्यांना मासिक पाळी आलेली होती. या शर्यतीत त्या सहाव्या क्रमांकावर आल्या.
त्या म्हणतात की "त्या सुदैवानं त्यातून बाहेर पडल्या," मात्र त्याचवेळी, त्या म्हणतात की त्यांना आश्चर्य वाटलं की त्या शर्यतीत आणखी चांगली कामगिरी करू शकल्या असत्या का.
मासिक पाळी दोन हार्मोन्समधील चढ-उतारांद्वारे नियंत्रित होते. हे दोन हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. या दोन्ही हार्मोन्सचा खेळाडूंच्या कामगिरीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो?
"ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगवेगळी असते आणि त्यात अनेक बारकावे असतात. मासिक पाळीचा खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होतो", असं म्हणण्याइतकं ते सोपं नसतं, असं प्राध्यापक कर्स्टी इलियट-सेल म्हणतात. त्या मँचेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठात महिला एंडोक्रायनोलॉजी आणि व्यायामाशी निगडीत शरीरशास्त्राच्या तज्ज्ञ आहेत.
"स्पर्धा, वैयक्तिक कामगिरी, विश्वविक्रम, सर्वकाही मासिक पाळीच्या प्रत्येक दिवशी घडलं आहे. तेव्हा खेळाडू जिंकले आहेत आणि हरले आहेत," असं त्या म्हणतात.
यात पॉला रॅडक्लिफ यांचा समावेश आहे. त्यांनी 2022 च्या शिकागो मॅरेथॉनमध्ये धावताना मासिक पाळीमुळे पोटात वेदना होत असताना विश्वविक्रम केला होता.
मासिक पाळीचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो की नाही, हे समजून घेण्यासाठी या काळात हार्मोन्समुळे संपूर्ण शरीरात होणारे बदल लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तसंच मासिक पाळीच्या लक्षणांना तोंड देण्याचं आव्हान, मासिक पाळीच्या वेळेस स्पर्धा करण्याचा मानसिक परिणाम आणि या सर्व गोष्टींवरील दृष्टीकोन समजून घेणं महत्त्वाचं आहे.
"असा कोणताही एक टप्पा नसतो, जेव्हा खेळाडू भक्कम किंवा कमकुवत असतो. असा टप्पा नसतो जिथे ते जिंकतात किंवा हारतात. मात्र सैद्धांतिकदृष्ट्या, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, हाडं, स्नायू किंवा हृदय यासारख्या शरीरातील भागात बदल करू शकतात," असं प्राध्यापक एलियट-सेल म्हणतात.
"आपल्याला अजूनही एक गोष्ट समजलेली नाही, ती म्हणजे याचा खेळाडूच्या कामगिरीवर खरोखर मोठा परिणाम होतो का?" असं ते म्हणतात.
"अपुरी झोप, थकवा आणि पेटके याचा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हा एक मान्य करता येण्यासारखा निष्कर्ष आहे. खेळाडू जेव्हा मासिक पाळीच्या काळात मोठ्या संख्येनं असलेल्या लोकांसमोर खेळतात, तेव्हा त्यांना वाटणारी भीती आणि चिंता "पूर्णपणे समजण्यासारखी बाब आहे," असं प्राध्यापक पुढे म्हणाल्या.
"ते खूप मोठं ओझं आहे", असं त्या म्हणतात. जे खेळाडू, गळतीचा धोका टाळण्यासाठी आणि लाजिरवाणी परिस्थिती टाळण्यासाठी, मासिक पाळीसाठीच्या अंतर्वस्त्रांचे तीन थर परिधान करतात अशा खेळाडूंशी त्या बोलल्या आहेत.
सेल शार्क्स वीमेन्स रग्बी टीम, मॅंचेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठाबरोबर भागीदारीत काम करते आहे.
मी कॅटी डेली-मॅकलीन यांना भेटलो. त्या ग्रेट ब्रिटनच्या रग्बी टीमच्या माजी कर्णधार आहेत आणि इंग्लंडच्या सार्वकालिक सर्वाधिक स्कोरर आहेत.
मासिक पाळीचा संभाव्य परिणाम आणि त्याचं नियोजन कसं करावं हे समजून घेण्यासाठी टीम खुल्या पद्धतीनं सल्लामसलत करते आहे.
यात "मी याबाबत काहीही करू शकत नाही," असा विचार करण्याऐवजी तीन दिवस आधीच आयबुप्रोफेनच्या गोळ्या घेण्याचा समावेश आहे, असं डेली मॅकलीन म्हणतात.
"या आकलनाच्या आणि माहितीच्या आधारे आपण त्याबद्दल बोलू शकतो, योजना बनवू शकतो आणि एखाद्याला चांगला रग्बी खेळाडू बनवण्यासाठी त्याच्या वर्तनात बदल करू शकतो", असं त्या म्हणतात.
दुखापती कशा टाळायच्या?
महिलांच्या खेळांकडे अधिक लक्ष देण्यात आल्यामुळे एक गोष्ट उघड झाली आहे, ती म्हणजे काही दुखापतींच्या शक्यतेत झालेला बदल.
पायाचा वरचा भाग आणि खालच्या भागाला जोडणाऱ्या अँटेरियर क्रुसिएट लिगामेंट (एसीएल) वर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं आहे. या लिगामेंटला होणाऱ्या दुखापती खूप गंभीर स्वरुपाच्या असतात. त्यातून सावरण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.
महिला कोणत्या खेळात भाग त्यानुसार, पुरुषांच्या तुलनेत या दुखापती होण्याची शक्यता महिलांना फक्त आठ पट जास्त नसते, तर त्या खूपच सामान्य होत चालल्या आहेत, असं थॉमस डॉस सँटोस म्हणतात. ते मॅंचेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठात स्पोर्ट्स एपिडेमियोलॉजिस्ट आहेत.
मात्र महिलांना याचा धोका जास्त का असतो, याचं कोणतंही 'साधं सोपं स्पष्टीकरण' नाही, असं ते म्हणतात.
शरीर रचनेतील फरकांमुळे हे असू कदाचित असू शकतं. कारण महिलांचे हिप्स अधिक मोठे असल्यानं, मांडीच्या हाडाचा वरचा भाग रुंद स्थितीतून सुरू होतो. त्यामुळे पायाच्या खालच्या भागाला गुडघा ज्या कोनात मिळतो, तो बदलतो. परिणामी त्यामुळे दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो.
"अँटेरियर क्रुसिएट लिगामेंट (एसीएल) महिलांमध्ये थोडीशी लहान असते. त्यामुळे ती थोडीशी कमकुवत असू शकते," असं डॉ. डॉस सँटोस म्हणतात.
मासिक पाळीच्या कोणत्याही टप्प्यावर एसीएलच्या दुखापती होऊ शकतात. मात्र हार्मोन्समुळे होणाऱ्या बदलांचा अभ्यास देखील अनेक संस्थाकडून केला जातो आहे. यात फिफाकडून निधी मिळालेल्या संस्थेचा समावेश आहे. फिफा ही फुटबॉलचं नियमन करणारी जागतिक संस्था आहे.
"मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेनच्या उच्च पातळीमुळे लिगामेंटच्या गुणधर्मात बदल होऊ शकतात. यामुळे लिगामेंटची स्ट्रेचेबिलिटी म्हणजे ताणलं जाण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दुखापत होण्याचा धोका सैद्धांतिकदृष्ट्या खूप अधिक असू शकतो," असं ते म्हणतात.
मात्र डॉस सँटोस असा युक्तिवाद करतात की निव्वळ शरीररचनाशास्त्राच्या पलीकडे विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण महिलांना अजूनही पुरुषांइतका पाठिंबा मिळत नाही आणि त्या अजूनही पुरुषांइतके शरीर बळकट करण्याचे व्यायाम करत नाहीत.
ते याची तुलना बॅलेशी करतात. ज्यात नर्तकींना दर्जेदार प्रशिक्षण मिळतं आणि "पुरुष आणि महिलांमधील दुखापतीच्या प्रमाणामधील फरक जवळपास नगण्य आहे," असं डॉस सँटोस म्हणतात.
शहरी महिला खेळाडूंना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना असणारा एसीएलच्या दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो, यावर अभ्यास सुरू आहेत.
अर्थात याचा विपरित परिणाम होऊ शकतो. फुटबॉलसारख्या खेळात समोरच्या खेळाडूला चकवण्यासाठी खांदा खाली करणं आणि मग दुसऱ्या दिशेनं धावणं ही आवश्यक बाब आहे. याप्रकारच्या तंत्रामुळे एसीएलवर तणाव येतो.
"आपण असं म्हणू शकत नाही की आपण त्यांना लपवावं आणि खेळाडूला टाळावं," असं डॉस सँटोस म्हणतात.
"ते या भारांना तोंड देण्याइतकं मजबूत आहेत, याची खातरजमा आपण केली पाहिजे. काहीजण म्हणतात की आपण एसीएलच्या दुखापती 100 टक्के रोखू शकतो, तितकं हे सोपं नाही. आपण तसं करू शकत नाही."
आणखी 'मिनी मेन' नकोत
अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असले तरी, सेल शार्क्स वीमेन्स टीमच्या कॅटी डेली-मॅकलीनसाठी हा खूप मोठा बदल आहे.
त्यांना आठवतं की जेव्हा 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा खेळण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांचं शरीर कशी कामगिरी करेल, याबद्दलची सर्व गृहीतकं पुरुष रग्बी खेळाडूंकडून मिळालेल्या डेटावर आधारित होती.
"आम्हाला मिनी-मेन सारखी वागणूक देण्यात आली", असं डेली मॅकलीन म्हणतात.
त्या म्हणतात की महिला आणि मुलींना त्या खेळाच्या दुनियेबाहेरील आहेत असं आता वाटत नाही. विविध खेळ आता उच्च स्तरावरील प्रतिभा वाढवण्यास आणि अधिकाधिक महिलांना खेळांमध्ये सहभागी करून घेण्यास मदत करत आहेत.
"हे खूपच अद्भूत आहे, ही आनंदाची बाब आहे. जर तुम्ही आकडेवारीकडे पाहिलं, तर तरुण महिला खेळाडू खेळ सोडून देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीराबद्दलची प्रतिमा. ती मासिक पाळीशी आणि योग्य प्रकारचा स्पोर्ट्स ब्रा नसण्याशी संबंधित आहे. या समस्या आता सहजपणे सोडवता येतात,"असं त्या म्हणतात.
गेरी हॉल्ट निर्मित 'इनसाइड हेल्थ' या बीबीसीच्या कार्यक्रमातून
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)