You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जवळपास वर्षभरापूर्वी अतुल परचुरे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केल्याची त्यांनी स्वत:च माहिती दिली होती.
अतुल परचुरे हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते होते. मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते.
सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून आपल्या विनोदानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम त्यांनी केलं. तसंच, अनेक गंभीर भूमिकाही त्यांनी लीलया पेलल्या.
अतुल परचुरे यांच्या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अतुल परचुरे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली होती. त्यातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली होती.
ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाले होते. मात्र, अचानक पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं होतं.
अतुल परचुरे 'सूर्याची पिल्ले' नाटक करणार होते आणि त्याची तयारी सुरू होती, असंही वाडकरांनी सांगितलं.
तर ज्येष्ठ अभिनेते संजय मोने बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "आम्ही काय गमावलं आहे, ते मला शब्दात सांगता येणार नाही."
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट - एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.
"तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. ओम शांती."
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनीही अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमोल कोल्हे म्हणाले म्हणाले की, "अभिनय क्षेत्रातील माझे सहकारी व मित्र, आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे, मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत ही आपल्या कलेचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे."
अतुल परचुरे यांची अभिनय कारकीर्द
अतुल परचुरे यांचा त्यांच्या खास अभिनयासाठी ओळखलं जातं. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं आहे. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत आणि मालिका विश्वातही अतुल परचुरे यांचं मोठं नाव होतं.
अनेक मराठी चित्रपटांसह नाटकं आणि मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजलेल्या होत्या.
टीव्ही मालिकांचा विचार करता, त्यांची 'आर के लक्ष्मण की दुनिया' ही मालिका चांगलीच गाजली होती. आर के लक्ष्मण यांच्या कल्पनेतील 'कॉमन मॅन' अतुल परचुरे यांनी या मालिकेतून अत्यंत उत्तमपणे छोट्या पडद्यावर साकारला होता.
त्याशिवाय हिंदीमधील त्यांच्या 'यम है हम', 'बडी दूर से आये है' अशा मालिकाही प्रचंड गाजल्या होत्या.
कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्येही त्यांच्या विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.
मराठी मालिकांचा विचार करता मोहन या नावानं ते घराघरात पोहोचले होते. 'जागो मोहन प्यारे' आणि नंतर 'भागो मोहन प्यारे' या दोन मालिकांमधली त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती.
त्याशिवाय 'अळी मिळी गुपचिळी', 'माझा होशील ना' अशा अनेक मालिकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचलनही अतुल परचुरे यांनी केलं होतं.
नाटकांमध्ये 'तरुण तुर्क' हे त्यांचं प्रचंड गाजलेलं नाटक होतं. त्याशिवाय प्रियतमा, वासूची सासू, वाह गुरू, आम्ही आणि आमचे बाप यातही त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
हिंदी चित्रपट सृष्टीत शाहरूख खानसह अनेक मोठ्या अभिनेत्यांबरोबर अतुल परचुरे रुपेरी पडद्यावर झळकले होते. फिर भी दिल है हिंदुस्तानी, क्या दिल ने कहा, स्टाईल, क्योंकी, गोलमाल, बिल्लू बार्बर या चित्रपटांत त्यांच्या भूमिका होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)