You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल, अमेरिका-ब्रिटनचं स्थान का घसरलं? भारत कितव्या स्थानावर?
हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये या वर्षी भारताच्या पासपोर्टनं क्रमवारीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी झेप घेतली आहे.
लंडनच्या ग्लोबल सिटिझन आणि हेनली अँड पार्टनर्स या रेझिडन्स अॅडव्हायझरी फर्मच्या 2025 च्या तिमाहीसाठीच्या इंडेक्सनुसार पासपोर्ट रँकिंग किंवा क्रमवारीत जगामध्ये भारत 77 व्या स्थानावर आहे. भारतानं आठ क्रमांकांची झेप घेतली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत भारत जगात 85 व्या क्रमांकावर होता.
त्यामुळे भारतीय पासपोर्टधारक आता 59 देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आधी या देशांची संख्या 57 होती.
इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल असोसिएशनच्या आकडेवारीच्या आधारे, हेनली ही फर्म हा इंडेक्स तयार करते.
सिंगापूरच्या पासपोर्टधारकाला 193 देशांमध्ये (व्हीओए आणि ईटीएसह) व्हिसा-फ्री प्रवास करता येतो. या यादीमध्ये सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे.
जपान आणि दक्षिण कोरियाचा पासपोर्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाच्या पासपोर्टधारकांना 190 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येतो.
भारताचा पासपोर्ट किती भक्कम?
आता भारतीय नागरिकांना 59 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येणार आहे.
मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव आणि थायलंड या देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येतो. तर मकाऊ आणि म्यानमार हे देश भारतीय पासपोर्टला व्हिसा-ऑन-अरायव्हलची सुविधा देतात.
भारतीय पासपोर्टला व्हिसा-फ्री प्रवास करण्याची परवानगी देणाऱ्या दोन नवीन देशांमध्ये फिलिपाईन्स आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
भारतीय पासपोर्ट असल्यास व्हिसाशिवाय अंगोला, बारबाडोस, भूतान, ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूह, कुक द्वीप समूह, डोमिनिका, फिजी, ग्रेनाडा, हैती, इराण, जमैका आणि किरिबाती या देशांमध्ये प्रवास करता येतो.
याव्यतिरिक्त, मकाऊ, मादागास्कर, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मोंटसेराट, नेपाळ, नियू, फिलीपाईन्स, रवांडा, सेनेगल, सेंट विंसेंट आणि ग्रेनेडाइंस, त्रिनिदाद, टोबॅगो, कजाकस्तान आणि वानुअतु या देशांमध्ये देखील भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो.
भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवास करता येणाऱ्या देशांमध्ये फक्त दोनच देशांची झालेली वाढ कदाचित किरकोळ वाटू शकते. मात्र याचं मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्व आहे.
ट्रॅव्हल फ्रीडममध्ये भारताचं स्थान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या तुलनेत खूप वरचं आहे.
सर्वात पुढे कोण?
हेनली इंडेक्समध्ये सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली आणि स्पेनसह सात युरोपियन देश आहेत, ज्यांच्या पासपोर्टधारकाला 189 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येतो.
व्हिसाच्या रँकिंगसंदर्भात ऑस्ट्रिया, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलॅंड्स, नॉर्वे, पोर्तुगाल आणि स्वीडन चौथ्या क्रमांकावर आहेत. तर न्यूझीलंड, ग्रीस आणि स्वित्झर्लंड हे देश पाचव्या क्रमांकावर आहेत.
ब्रिटन या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलिया, चेक रिपब्लिक, हंगेरी, माल्टा आणि पोलंड हे देश सातव्या क्रमांकावर आहेत. तर कॅनडा, इस्टोनिया आणि संयुक्त अरब अमिराती आठव्या क्रमांकावर आहेत.
अमेरिका आणि ब्रिटनचं स्थान घसरलं
सर्वसाधारपणे ब्रिटनचा पासपोर्ट हा पॉवरफूल मानला जातो. मात्र आता पासपोर्ट रँकिंगमध्ये ब्रिटनचं स्थान घसरलं आहे. ब्रिटनच्या पासपोर्टवर आता 186 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येतो.
तर अमेरिका 10 व्या क्रमाकांवर घसरला आहे. अमेरिकेच्या पासपोर्टवर 182 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येतो. यावर्षाच्या सुरुवातीला अमेरिका नवव्या क्रमांकावर होता.
अमेरिका आणि ब्रिटन हे दोन्ही देश या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. 2015 मध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर होतं तर अमेरिका 2014 मध्ये पहिल्या क्रमांकावर होता.
मात्र आता जसजसं इतर देश द्विपक्षीय करार आणि प्रवासाच्या सुविधांमध्ये सुधारणा करत आहेत. तसतसं ब्रिटन आणि अमेरिकेच्या पासपोर्टचं महत्त्व कमी होत चाललं आहे.
सौदी अरेबिया आणि चीनची झेप
सौदी अरेबियानं यावेळेस सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे. जानेवारीनंतर सौदी अरेबियाच्या पासपोर्टवर व्हिसा-फ्री प्रवास करता येणाऱ्या देशांमध्ये चार नवे देश जोडले गेले आहेत.
आता या पासपोर्टनं 91 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास केला जाऊ शकतो.
2015 पासून आतापर्यंत चीननं 34 क्रमांकांची जबरदस्त झेप घेतली आहे. या इंडेक्समध्ये चीन आता 94 क्रमांकावरून 60 व्या क्रमांकावर आला आहे.
इंडेक्समध्ये सर्वात खाली अफगाणिस्तान आहे. या देशाच्या पासपोर्टनं फक्त 25 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करता येतो. या वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत यात एक देश कमी झाला आहे.
पासपोर्टची ताकद कशाच्या आधारे ठरते?
एखाद्या देशाचा पासपोर्ट किती प्रभावी किंवा भक्कम आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं.
त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, अंतर्गत परिस्थिती आणि इतर देशांबरोबरच्या संबंधांचा परिणाम देखील पासपोर्ट रँकिंगवर होतो.
अर्थात पासपोर्ट रँकिंगमध्ये भारताचं स्थान उंचावलं आहे. मात्र, जागतिक पातळीवर लक्षात घेता अजूनही क्रमवारीत भारत खूपच खाली आहे.
हेनली अँड पार्टनर्सच्या डोमिनिक वॉलेस यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, सर्वसाधारणपणे पासपोर्टची ताकद त्या देशाच्या इतर देशांबरोबर असलेल्या द्विपक्षीय संबंधावर ठरते.
ते म्हणतात, "भारतात येण्यासाठी दुसऱ्या देशाला नागरिकाला प्री एन्ट्री क्लियरन्स किंवा आधी व्हिसा घेण्याची आवश्यकता असते. त्या देशांमध्ये देखील भारतीय नागरिकांसाठी असेच नियम असतात."
"जर भारतीय नागरिकांना व्यापार, नोकरी किंवा पर्यटनासाठी परदेशात जायचं असेल तर त्यांना देखील त्या देशाच्या अशाच प्रक्रियेतून जावं लागतं. अनेक भारतीय इतर देशांचं नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्यांना सहजपणे परदेशात प्रवास करता यावा."
मजबूत पासपोर्टचा अर्थ काय?
डॉ. जुएर्ग स्टेफेन, हेनली अँड पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या काळात पासपोर्ट म्हणजे फक्त प्रवासासाठी लागणारं कागदपत्रं नाही.
एखाद्या देशाचा डिप्लोमॅटिक प्रभाव, जागतिक स्तरावरील प्रभाव-संबंध आणि परदेश धोरणाचं प्राधान्य पासपोर्टमधून दिसून येतो.
ते म्हणतात, "तुमचा पासपोर्ट हा फक्त प्रवासापुरता मर्यादित दस्तावेज राहिलेला नाही. तुमच्या देशाची मुत्सद्देगिरीतील ताकद आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तो इंडेक्स झाला आहे."
"वाढत चाललेली विषमता आणि राजकीय अनिश्चिततेच्या या काळात, स्ट्रॅटेजिक ट्रॅव्हल फ्रीडम आणि नागरिकत्व हे आधीच्या तुलनेत खूप अधिक महत्त्वाचं झालं आहे."
ते असंही म्हणाले की अमेरिका आणि ब्रिटनच्या नागरिकांमध्ये पर्यायी नागरिकत्व मिळवण्याबाबत रस वाढतो आहे. तसंच रेसिडन्सी-बाय-इन्व्हेस्टमेंट आणि इतर पासपोर्ट कार्यक्रमांची मागणी वाढत चालली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)