'जाना था जपान, पहुंच गए चीन'; धुरंधर चित्रपटातील जमलेल्या आणि बिघडलेल्या गोष्टी

फोटो स्रोत, Aditya Dhar/Instagram
- Author, अक्षय शेलार
- Role, बीबीसी मराठीसाठी
'धुरंधर' हा सिनेमा नक्की कशाविषयी आणि कसा आहे, या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं आहे.
सिनेमाची सुरुवात होते भारतीय हेरगिरीपासून. 1999 चे विमान अपहरण, 2001 मध्ये संसद भवनावरील हल्ला, मग त्यानंतरचे गुप्त संवेदनशील ऑपरेशन, पाकिस्तानच्या (म्हणजे वाचा: शत्रूच्या) अंतर्गत भागात शिरलेला हेर (रणवीर सिंग), तिथले खबरी आणि भारतातले वरिष्ठ अधिकारी अशा गोष्टी त्यात आहेत.
त्यानंतर मात्र पाकिस्तानमधल्या गँग वॉरची गोष्ट शैलीदार पद्धतीने मांडण्यातच दिग्दर्शकाला अधिक रस आहे. त्यामुळे गोष्ट वरवर पाहता आहे भारताच्या अंगाने, भारतीय पात्रांच्या दृष्टिकोन घेऊन मांडली जाणारी.
पण, ती उलगडते पाकिस्तानातील गुंड, भ्रष्ट लष्करी आणि पोलिस अधिकारी, राजकारणी यांच्या स्टाइलाइज्ड चित्रणातून!
गंमत अशी की, यात पाकिस्तानमधील मुस्लिम आणि बलोच पात्रांचं उदात्तीकरणही घडलं आहेच!
'आदित्य धरच्या या सिनेमावर दोन मुख्य दिग्दर्शकांचे प्रभाव'
दिग्दर्शक आदित्य धरच्या या सिनेमावर दोन मुख्य दिग्दर्शकांचे प्रभाव आहेत: अनुराग कश्यप (विशेषतः गँग्ज ऑफ वासेपूर) आणि क्वेन्टिन टॅरेन्टिनो (विशेषतः किल बिल, आणि काही प्रमाणात इनग्लोरियस बास्टर्ड्स).
भरपूर पात्रं घेऊन उलगडणारी कथा, गुंडांमधील हेवेदावे, गुंड आणि राजकारण्यांचे घनिष्ठ संबंध, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा आणि मर्यादा, मुबलक हिंसा आणि ती हिंसा ज्या पद्धतीने उलगडते त्यात दडलेला विनोद असे गुण कश्यपच्या सिनेमातून येतात.

फोटो स्रोत, Getty Images
तर, सूडाची कथा ('धुरंधर'च्या पुढील भागाचे शीर्षक 'रिव्हेंज' असल्याचे लाल रंगात, भल्यामोठ्या अक्षरांत लिहून येते), एखाद्या कादंबरीप्रमाणे प्रकरण पाडून केलेली कथानकाची रचना, प्रत्येक प्रकरणाची वेगळी शैली, गती आणि ठळकपणे लक्षात राहणारी नावं (द बास्टर्ड किंग ऑफ ल्यारी, बुलेट्स अँड रोजेस, द डेव्हिल्स गार्डियन, इ.) अशा गोष्टी टॅरेन्टिनो-सदृश आहेत.
त्यामुळे बरेचसे दृक-श्राव्य संदर्भ, आशा भोसले नि उषा उथपपासून ते गुलाम अलीपर्यंतची गाणी घेऊन सिनेमा आकर्षक, गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतीने घडतो.
इथेही वरचे प्रभाव लगेचच लक्षात येतात. विशेषतः, पार्श्वभूमीवर गाणी सुरु असताना तयार होणारा तणाव, त्यानंतर उलगडणारी हिंसा, त्या हिंसेतील विशिष्ट ताल हे 'पॅकेजिंग' फारच शैलीदार आणि म्हणूनच रंजक आहे.
पंजाबी, हिंदी, इंग्रजी गाणी, त्यातही पुन्हा बॉलिवूड गाणी आणि पाकिस्तानी गजलेपासून ते रॅपपर्यंत सारं वापरलं आहे. संगीत दिग्दर्शक शाश्वत सचदेव आणि दिग्दर्शक धर यांनी हे चांगलंच जमवून आणलं आहे.
'जाना था जपान, पहुंच गए चीन'
आता या रंजकतेला मर्यादा कशा येतात, ते पाहू.
मुख्य म्हणजे हेरगिरी, देशप्रेम आणि राष्ट्रवाद यांपासून सुरु होणारा हा चित्रपट तिथल्या गँग वॉरमध्ये, तिथल्या गँग नि पोलिस किंवा लष्करी पात्रांच्या चकचकीत रूपामध्ये गुंततो.
मग मधेच भारतातील इंटेलिजन्स ब्युरो, अजय सन्याल (आर माधवन) आणि त्यांचा कनिष्ठ अधिकारी असे प्रसंग येतात ते ठिगळ लावल्यासारखे येतात.
जणू, लेखक दिग्दर्शकाला अचानक आठवावं की, अरेच्चा! बराच वेळ झालं आपण भारतातल्या अधिकाऱ्यांचे चातुर्य, तत्कालीन सरकारचा (म्हणजे कोण, तर अर्थातच काँग्रेस) भ्रष्ट आणि अनैतिक कारभार दाखवलाच नाही!

फोटो स्रोत, Getty Images
दिग्दर्शकाची काहीएक विचारसरणी आहे आणि ती उजवीकडे झुकणारी आहे, हे उघडच आहे. त्यामुळे भारतीयांचे चातुर्य आणि काँग्रेस सरकारांचा, नेत्यांचा भ्रष्टपणा दाखवायचा आहे खरं, पण त्याचवेळी त्याला पाकिस्तानी गँग्जविषयीची फिल्मही बनवायची आहे. त्यामुळे हा गोंधळ 'जाना था जपान, पहुंच गए चीन' अशा पद्धतीचा बनतो.
आपल्याला काय सांगायचं आहे आणि ते सांगताना इतर किती गोष्टींना महत्त्व द्यायचं आहे, याविषयीची अस्पष्टता यात दिसते. त्यामुळेच अक्षय खन्नाचे स्लो मोशन शॉट्स म्हणा किंवा बऱ्याचदा पात्रांमधील तद्दन फिल्मी संवाद म्हणा किंवा पुष्कळ सिगारेटी फुंकणारी, स्क्रीनवर देखणी दिसणारी पात्रं म्हणा, त्यातच दिग्दर्शक अधिक रमतो.
परंतु, पाकिस्तानात घडत असूनही तिथल्या राजकारणाचे, जगण्याचे बारकावे चित्रपटात येतच नाहीत. कारण, दृष्टिकोन शेवटी भारतीय दिग्दर्शकांना 'दुश्मन मुल्क'विषयी असलेल्या विचित्र आकर्षणातूनच तयार झालेला आहे.
याचं टोकाचं उदाहरण म्हणजे, मेघना गुलजार दिग्दर्शित 'राज़ी' हा चित्रपट. त्यात बव्हंशी सिनेमा एका पात्राच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये घडत असूनही सारं काही फारच मेथॉडिकल रीतीने मांडलं जातं.
'दिग्दर्शकाला हिंसेतही रमायचंच आहे'
शिवाय, दिग्दर्शकाला हिंसेतही रमायचंच आहे. त्याचा सहपटकथाकार शिवकुमार व्ही पानिकर हाच चित्रपटाचा संकलकही आहे. हा माणूस 'किल' नावाच्या फारच रंजक हिंसक सिनेमाचाही संकलक होता. मग हे दोघे आणि छायाचित्रकार विकास नौलाखा मिळून हिंसा ज्या पद्धतीने मांडतात, ते नक्कीच पाहावं असं बनतं.
उदा. एक पुष्कळ गोळीबार होणारा ॲक्शन सीक्वेन्स 'रंभा हो संभा हो' गाण्याच्या तालावर रचला आहे. त्या पूर्ण सीक्वेन्सची रचना, त्यातल्या कॅमेऱ्याच्या डायनॅमिक मूव्हमेंट्स, संगीताचा नि अर्थातच संकलनाचा ताल मुळातूनच पाहण्यासारखा आहे.
हे केवळ एका सीक्वेन्सपुरतं लागू नाही. इतरही प्रसंग अशाच पद्धतीने रचलेले, कापलेले आहेत. त्या हिंसेत ग्राफिकनेस आहे, पण सोबत गंमतही आहे.
इथे कश्यप आणि टॅरेन्टिनो यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. हिंसेचं मानसशास्त्र, तिचा वेगवेगळ्या अंगांनी करता येणारा वापर, प्रत्यक्ष आयुष्यातील हिंसेमध्ये दिसणारा सफाईदारपणाचा अभाव, हाती लागेल ते वापरून केली जाणारी मारहाण, नुसत्या बंदुकांच्या पलीकडे जाणारी हिंसा असं पुष्कळ काही या दिग्दर्शकांनी त्यांच्या सिनेमात दाखवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सांगायचा उद्देश हा की, यातून इतकं तर स्पष्ट होतं की दिग्दर्शक आदित्य धरला दृक-श्राव्य माध्यम तर कळतं. अमुक गोष्ट अशीच का दाखवायची आहे, यामागचं त्याचं तर्क त्याला शैलीविषयी असलेल्या आकर्षणात सापडतं. असंच दाखवायचं आहे, कारण ते छान दिसतं! स्टाईल ओव्हर सबस्टन्स.
आणि दिग्दर्शकाला ज्या प्रसंगांमधून आपण सबस्टन्स अर्थात सघन आशय मांडत आहोत असे वाटते, ते प्रसंगही फारच एक्स्पोजिटरी पद्धतीने लिहिलेले, 'भारतीयच भारतीयांचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत' अशा अर्थाची पोकळ वाक्यं असलेले आहेत. त्यामुळे आर माधवन जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा आपण याकडे नक्की का आलो, हेच उमगत नाही. तिकडे पाकिस्तानात, तिथल्या शैलीदार मांडणीत रमलो होतो तेच बरं होतं, असं जाणवतं.
भारताच्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या, 'स्पाय थ्रिलर'मध्ये भारतातील प्रसंगच ठिगळं लावल्यासारखे वाटतात, ही मोठी विलक्षण विचित्र गोष्ट आहे. ती यासाठीही की, आपल्याला इंटेलिजन्स किंवा ऑपरेशन याविषयी फार काही कळतच नाही.
सिनेमा हा तपशीलातून आकार घेत असतो. 'धुरंधर'सारख्या सिनेमात तर तपशीलाला खूपच जास्त महत्त्व आहे. पण, इथे तपशीलात शिरायचंच नाहीय. जितके तपशील येतात ते तपशील इतक्या उथळ पद्धतीने येतात किंवा अशा भ्रष्ट हेतूने येतात की त्यांचं महत्त्वच कमी होतं.
याचं एक ठळक उदाहरण म्हणजे सिनेमाचा मिड-क्रेडिट सीन. त्यात रणवीर सिंग आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहतो आणि म्हणतो, 'ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी'. भाजपाच्या वेबसाईटवर याविषयीचा व्हिडिओ दिसतो. इतरत्रही असेलच. मग ही अशी जाहिरात सिनेमाचा भाग म्हणून उगाचच समाविष्ट करण्याची गरजच काय? हा सीन फारच अप्रस्तुत आणि अस्थानी आहे.
राईट विंगकडे चांगले चित्रपटकर्ते नाहीत. जे आहेत, ते विवेक अग्निहोत्रीसारखे आहेत. जे वाईट चित्रपट बनवतात. मग आता आदित्य धरसारखा दिग्दर्शक येतो की ज्याला, केवळ सिनेमा माध्यमाच्या विषयी बोलायचं झाल्यास, अग्निहोत्रीपेक्षा चांगलीच समज आहे. त्याच्याकडे एक व्यावसायिक दृष्टी आहे, त्याला सिनेमा 'पॅकेज' करून चांगलाच विकता येतो. त्याला साऱ्या सिनेमांना सरसकट 'फाईल्स' म्हणत बसायची गरज (अजून तरी) पडत नाही. त्यामुळे मग त्यातल्या त्यात चांगला चित्रपटकर्ता हाती लागला की, त्याचा पुरेपूर वापर करायचा, हे ओघानेच आलं; आणि त्या दिग्दर्शकाला स्वतःलाही ते करायचंय, हेही उघडच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आता पुन्हा सिनेमाकडे येऊ.
सिनेमातला एक विशिष्ट तुकडा अनेकांच्या चांगलाच लक्षात राहील असा आहे. २६/११चा हल्ला होण्यापासून आपण रोखू शकलो नाहीत आणि त्यात आपलाही सहभाग होताच, अशी जाणीव एका पात्राला झाल्यावर पूर्ण पडदा लालसर रंगाचा होता. त्यावर काळ्या रंगात अक्षरं दिसतात आणि २६/११मधील खऱ्याखुऱ्या रेकॉर्डिंग्स, दहशतवाद्यांचे आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येतात. हा तुकडा दृश्य भाषेच्या वापराचा चांगला नमुना आहे.
दिग्दर्शक धर सिनेमात इतरही अनेक ठिकाणी खऱ्या घटनांचे अर्कायव्हल फुटेज वापरतो. मग त्याच्या हेतूंवर शंका येऊ लागते. कारण, एकीकडे चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर म्हणून एक छोटेखानी निबंध येतो की, हे खऱ्या घटनांचे कल्पित रूप आहे. पण, दुसरीकडे अर्कायव्हल फुटेजमुळे सारे काही संपूर्ण सत्य असल्याचा दावा फार सूक्ष्म पद्धतीने, चलाखीने केला जातो. मग लगेचच सरकार भ्रष्ट, मंत्री भ्रष्ट, दहशतवादी 'पोचलेले', इत्यादी मांडणी केली जाते.
26/11 चा तुकडा हादरवून टाकणारा असला तरी, जवळपास लगेचच त्याचा प्रभाव पुसला जाईल अशा अपबीट म्युझिकसह पुढचा प्रसंग येतो. मग आपण पुन्हा गाड्या, बंदुका, पाकिस्तानी माफिया या साऱ्यात रमू लागतो. अशावेळी संवेदनशील पद्धतीने केलेलं, आदरयुक्त चित्रण कुठे संपतं आणि 'एक्स्प्लॉइटेशन' (एखाद्या गोष्टीचा, घटनेचा पूर्ण फायदा घेणे) कुठे सुरु होतं, असा मोठा प्रश्न उभा राहतो. आणि 26/11 विषयीचा हा एक विशिष्ट तुकडा वगळता इतर ठिकाणी येणारं अर्कायव्हल फुटेज, न्यूज चॅनलवरील अर्णब गोस्वामीचा आवाज अशा गोष्टी फारच चलाखीने वेगळाच मुद्दा रेटणाऱ्या आहेत, असं लक्षात येतं.
या साऱ्यातून आदित्य धर रंजक (चित्र)पट उभा करतो का, तर नक्कीच हो! परंतु, या पूर्ण पट, त्याचं व्यापक स्वरूप आणि त्यात अपेक्षित असलेली गुंतागुंत, तपशील तो नक्कीच उभे करू शकत नाही. इथे लेखक आणि एक चित्रपटकर्ता म्हणून त्याच्या मर्यादा आड येतात, स्पष्ट होतात. त्याची वैयक्तिक विचारसरणी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (दूरगामी?) उद्दिष्टांनीही या मर्यादा येतात.
(या लेखात लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











