डेमोक्रॅटिक पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून टिम वॉल्झ यांच्या नावाची घोषणा

डेमोक्रॅटिक पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून टिम वॉल्झ यांच्या नावाची घोषणा

फोटो स्रोत, Getty Images

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी (रनिंग मेट) मिनेसोटाचे गव्हर्नर 'टिम वॉल्झ' यांची निवड केली आहे. कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर त्यांनी म्हटलं आहे, "उपराष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार (running mate) म्हणून टिम वॉल्झ यांच्या नावाची घोषणा करताना मला अभिमान वाटतो आहे. गव्हर्नर, प्रशिक्षक, शिक्षक आणि अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचा समावेश करणं ही आनंदाची बाब आहे."

आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना टिम म्हणाले, "कमला हॅरिस यांच्यासोबत निवडणूक प्रचारात सहभागी होणं ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च अभिमानाची बाब आहे. मी त्यांच्यासोबत आहे."

ते पुढे म्हणाले, 'राजकारणात काय काय करणे शक्य आहे याचा वस्तुपाठ कमला हॅरिस यांनी दाखवून दिला आहे.'

"मला शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण होते. आपण नक्कीच जिंकू," असं वॉल्झ म्हणाले.

माजी सभापती, नॅन्सी पेलोसी यांनी वॉल्झ यांच्या निवडीचे स्वागत केलं आहे. त्या म्हणाल्या,

"टिम वॉल्झ एकमेवाद्वितीय आहेत." त्या पुढे म्हणाल्या की सभागृहात एकत्र काम केल्यामुळे त्या वॉल्झ यांना चांगलं ओळखतात.

कोण आहेत टिम वॉल्झ?

टिम वॉल्झ 60 वर्षांचे आहेत. 2018 मध्ये टिम वाल्झ यांची मिनेसोटाच्या गव्हर्नरपदी निवड झाली होती. त्यांनी 12 वर्षं अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे एक कणखर आणि लढाऊ सदस्य अशी त्यांची ओळख आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. वान्स यांना विचित्र किंवा अस्वाभाविक म्हणण्याच्या रणनीतीमुळे टिम वॉल्झ राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले.

पक्षासाठी निधी जमवण्याच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड हे अगदी विचित्र व्यक्ती आहेत, असं वॉल्झ म्हणाले होते.

त्यांचं स्पष्टवक्तेपणा आणि छोट्या शहरातील पार्श्वभूमी स्वतंत्र आणि पारंपारिक मतदारांना आकर्षित करू शकेल.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

त्यांनी आर्मी नॅशनल गार्डमध्ये 20 वर्षे सेवारत होते. त्याचबरोबर माध्यमिक शाळेत शिक्षक होते आणि सहाय्यक फुटबॉल प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काही काळ काम केलेलं आहे.

मिनेसोटाचे गव्हर्नर उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असण्याचा निवडणुकीत कमला हॅरिस यांना फायदा होऊ शकतो.

जाणकारांच्या मते टिम वॉल्झ यांची निवड राजकीय डावपेचांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. कारण डेमोक्रॅटिक पक्षाच्या गव्हर्नरमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे टिम यांना निवडणुकीसाठी निधी जमा करण्यास आणि निवडणुकीचा प्रचार करताना मदत होणार आहे.

त्यांना सैन्याची पार्श्वभूमी असल्यामुळे श्वेतवर्णीय मतदार आणि ग्रामीण भागातील मतदार त्यांच्याकडे आकृष्ट होऊ शकतात.

उत्साही व्यक्तिमत्त्व आणि सकारात्मक दृष्टिकोनासाठी ते ओळखले जातात.